News Flash

१५१. रावणविचार

देवांवर महासंकट ओढवलं तेव्हा याचप्रकारे राघवानं त्यांना सोडवलं, असा दाखला समर्थ देतात.

देवांवर महासंकट ओढवलं तेव्हा याचप्रकारे राघवानं त्यांना सोडवलं, असा दाखला समर्थ देतात. तो फार सूचक आहेच. त्यामुळे आपल्याला संकटातून वाचविणारा, सर्वशक्तीमान असा देवही संकटात नव्हे, महासंकटात सापडतो, ही गोष्ट ऐकायलाही खटकते. पण असं घडल्याचे अनेक दाखले पुराणांत आहेत. इंद्राचं इंद्रपद धोक्यात आल्याच्याही कथा आहेत आणि त्यातून हेच स्पष्ट होतं की ज्याप्रमाणे देवांचा राजा हे जसं पद आहे तसंच अनेक देव हेदेखील पदासीनच आहेत! देवलोकात त्यांचा निवास आहे आणि तोवर त्यांच्याकडे एकेक महत्कार्यही सोपवलं आहे. अग्नी, पाऊस, वायू, पाणी अशा पंचमहाभूतांशी संबंधित तत्त्वांच्या अधिष्ठात्या देवता आहेत. सृष्टीच्या संचलनात या देवीदेवतांची आपापली जबाबदारी आहे. पुण्यबळानं देवत्व लाभल्यानं पुण्यबळ ज्यायोगे वाढतं अशा सत्त्वगुण वाढविणाऱ्या साधनेला हे देव बळ देतात. अशा साधकाला ते आधारही देतात. असं असलं तरी देवलोकातील अनेकानेक देव हे माणसाप्रमाणेच अनेकदा संकुचित वृत्तीनं वागतात आणि मनोवेगांमागे वाहावत जातात. अशा देवांवर साधंसुधं नव्हे, तर  महासंकट ओढवल्याचं समर्थ सांगतात. कोणतं महासंकट होतं हे? तर तपसामथ्र्य, बुद्धीसामथ्र्य, शक्तीसामर्थ्यांत या देवांवर रावणानं मात केली होती आणि या देवांना बंदीवासात टाकलं होतं! ‘अवधभूषण रामायणा’त म्हटल्याप्रमाणे त्याची पूजा स्वीकारायला ब्रह्मदेव आणि शिवजींना स्वत:हून यावं लागत होतं. इंद्रादि देवांना त्याला नमन करून वर त्याचं अवमानजक बोलणं ऐकून घ्यावं लागत होतं. यक्ष आणि किन्नरांना त्याचं रंजन करावं लागत होतं. सर्व तऱ्हेच्या उपासना, यज्ञकर्म बंद पाडण्यात आली होती. ऋषीमुनींचा वध केला जात होता. थोडक्यात देवांना अत्याचारी रावणाकडून पदोपदी अवमानित व्हावं लागत होतं. भगवंतानं अशी लीला अनेकदा केली आहे. जेव्हा जेव्हा देवांचा अहंकार वाढू लागला तेव्हा तेव्हा असुरांना बळ देऊन देवांचा अहंकार परमात्म्यानं ठेचून टाकला आहे. जेव्हा जेव्हा असुरांचा अहंकार वाढू लागला तेव्हा तेव्हा देवांना बळ देऊन असुरांना पराजित केलं आहे. कधी असुरांच्या वंशात परमभक्त निर्माण करून तर कधी देवांमधीलच दानव जागा करून या परमलीला साकारल्या आहेत. या श्लोकात देव ज्या महासंकटात सापडल्याचा उल्लेख आहे, ते रावणानं लादलेलं संकट आहे. विशेष गोष्ट म्हणजे समर्थ ‘‘महासंकटी सोडिलें देव जेणें’’ असं म्हणतात. इथं ‘सोडिले’ हा शब्द संकटात सोडून दिलं आणि मग त्या संकटातून सोडवलं, अशा अर्थानंही आहे! ‘रामायणा’चं परमरहस्य जाणून घेतलंत तर उकलेल की सारं काही रामच आहे. रावण हेसुद्धा तर रामाचंच रूप आहे! शत्रुत्वाच्या आधारावर रावण जितका अंतर्बाह्य़ राममय होता तितके भक्तीच्या आधारावर आपणदेखील राममय होऊ शकत नाही!! संपूर्ण जीवनात रावणानं रामाचं नावदेखील मुखातून उच्चारलेलं नाही, पण त्याच्या मनात सदोदित त्याचंच खदखदतं स्मरण आहे. त्यानं सदोदित त्याचीच वाट पाहिलेली आहे. त्यानं सामोरं यावं यासाठीचे सारे उद्योग केले आहेत. मर्यादा पुरुषोत्तम स्वरूपानं समोर यावं यासाठी सर्व मर्यादांचं उल्लंघन रावणानं पदोपदी केलं आहे. सीताहरण हे त्यातलं मोठं पाऊल होतं. त्यानंतरही काही घडेना तेव्हा दासाभिमानी रामाच्या परमदासाचा अर्थात हनुमानाचा यथेच्छ अवमान करून रावणानं आपली लंकाही जाळून घेतली आहे! रामभक्त अशा आपल्या परमप्रिय बिभीषणाला लत्ताप्रहार करून रामाकडेच जायला लावलं आहे! त्यानंतरच ‘नुपेक्षी कदा राम दासाभिमानी’ अशा राघवानं आगळ्या प्रताप आणि बळाचं दर्शन घडवित महासंकटातून देवांना सोडवलं आहे!

 -चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 3:21 am

Web Title: samarth ramdas philosophy 50
Next Stories
1 १५०. देवविचार
2 १४९. सेवक
3 १४८. परम लाभ!
Just Now!
X