सद्गुरूंना मी माझं मानतो, त्यामुळे त्यांनी माझ्या ‘मी’ आणि ‘माझे’ची राखण सदोदित करावी, ही अपेक्षा माझ्या मनात असते. ती नसती, तर महाराज मी तुमचा एवढा जप करतो, एवढी पूजा करतो तरी माझ्यावर संकट का, हा प्रश्नच मनात आला नसता!  आणि हे ‘मी’ आणि ‘माझे’वरचं जे प्रेम आहे तेच सद्गुरूंच्या बोधाकडे निखळ दृष्टीनं पाहू देत नाही. तो बोध जाणू देत नाही आणि तो आचरणात आणू देत नाही. समर्थ सांगतात.. ‘‘जिवां मानवां निश्चयो तो वसेना।’’ माणसाचा सर्व जीवभाव हा वासनेतच गुंतला असतो त्यामुळे त्याच्या जीवबुद्धीत निर्वासन सद्गुरूंच्या बोधानुरूप जगण्याचा निश्चय वसू शकत नाही. या पातळीवर अडकलेल्या साधकाचीही सद्गुरू उपेक्षा करीत नाहीत आणि त्याचा प्रापंचिक आणि पारमार्थिक असा दोन्ही तऱ्हेचा भार घेतात! समर्थ म्हणतात, ‘‘शिरीं भार वाहेन बोले पुराणीं। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।।’’ भक्तांचा संपूर्ण सांभाळ भगवंत करतो, याचे दाखले पुराणांत आहेत. गीतेतही भगवंत म्हणतात, ‘‘अनन्याश्चिन्तयन्तो माम् ये जना:  पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।’’ जे माझे निजजन अनन्य भावानं माझं चिंतन करतात त्यांचा आणि त्यातील जे नित्य माझ्याशीच अभियुक्त आहेत, ज्यांना माझ्याशिवाय जगण्याचा दुसरा विषय नाही, ज्यांचं अंत:करण सदोदित मत्प्रेमानं युक्त आहे त्यांचा योग आणि क्षेम मी सांभाळतो! तेव्हा सद्गुरूही सांगतात, मी भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही भार घेतो.. आणि होतं काय की, भौतिक वाटचालीविषयी आपल्याला जितकी उत्कंठा असते तितकी ती आध्यात्मिक वाटचालीविषयी नसते! भौतिकातल्या अडचणींनी आपण लगेच चिंताक्रांत होतो, दु:खी होतो.. अध्यात्मसाधनेतल्या अडचणींनी मात्र तेवढे उन्मळून पडत नाही. तरीही सद्गुरू सांगतात की, तुझ्या प्रपंचाचा भार मी घेतो, पण मी जे सांगतो तेवढं मात्र तू मन:पूर्वक आचरणात आण.. ज्यांनी त्यांच्यावर सगळा भार टाकला त्यांच्या आयुष्याचं कसं सोनं झालं, हे पुराणकाळापासून नोंदलं आहेच. तरी त्या आपल्याला पुराणकथाच वाटतात! असं प्रत्यक्षात का शक्य आहे, असंही वाटतं. आता प्रश्न असा की भौतिकाचा सगळा भार त्यांच्यावर टाकायचा म्हणजे नेमकं काय? तर हा भार आधी मनातलाच आहे! प्रपंचाचा प्रत्यक्ष दृश्यातला पसारा मर्यादित असतो, पण त्याचा मनातला पसारा अमर्याद असतो. अनंत इच्छा, अनंत संकल्प, अनंत चिंता, अनंत काळज्या यांनी मनातला हा प्रपंच भरला असतो. हा भार सद्गुरूवर टाकण्याची सुरुवात म्हणजे ‘अमुक व्हावं, अमुक होऊ नये’,  हे बीजच मनात रुजू न देणं. कारण अमुक व्हावं आणि अमुक होऊ नये, हे चिरंतन द्वैतच आजन्म आशेत गुंतवतं आणि आयुष्य संपवतानाही अतृप्तच ठेवतं! एकदा अमुक व्हावं किंवा होऊ नये, या संकल्पाचीच पेरणी झाली नाही की मग काळजी आणि चिंतेचं पिक तरी कसं तरारणार? तेव्हा भौतिकाची काळजी सद्गुरूंवर प्रथम टाकून तर पाहायला हवी.. ते करून ओझ्यातून सुटका होत असल्याचा अनुभव जसजसा वाढत जाईल तसतसं भौतिकाची काळजी त्यांच्यावर पूर्णपणे सोपवून त्यांच्या बोधानुरूप आचरण करण्याचा प्रामाणिक अभ्यासही सुरू होईल. तेव्हाच खऱ्या अर्थानं बोधानुरूप आचरण हा जीवनिश्चय होईल! मग हा सद्गुरू दासाची कधीच कशी उपेक्षा करीत नाही, हे जाणवेल. पण तरीही ही गोष्ट काय सोपी आहे? सद्गुरूंबाबत तसा दृढ भाव होणं सोपं नाही, पण अशक्यही नाही. या भावाचाच अभाव असल्यानं समर्थ पुढील श्लोकात सांगतात.. असे हो जया अंतरीं भाव जैसा। वसे हो तया अंतरीं देव तैसा!!

चैतन्य प्रेम

Virat Kohli's video goes viral
IPL 2024: गौतम गंभीरच्या गळाभेटीवर विराटने सोडले मौन; चाहत्यांना म्हणाला, ‘तुमचा मसाला संपला म्हणून तुम्ही…’, पाहा VIDEO
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे