सद्गुरू सर्वसमर्थ असला तरी त्याच्या बोधानुरूप जगणं साधत नाही, सर्व भार त्यांच्यावर सोपवून निश्चिंत होणं साधत नाही. तरीही सद्गुरू आपल्या माणसाची उपेक्षा करीत नाहीत, हे मनोबोधाच्या ३१ ते ३३ या तीन श्लोकांत समर्थानी सांगितलं. सद्गुरू माझी कधीच उपेक्षा करीत नसले, मला अव्हेरत नसले तरी माझ्या मनात मात्र त्यांच्या बोधानुरूप जगण्याचा दृढनिश्चय होत नाही, हे ३४व्या श्लोकात सांगितलं. याचं मुख्य कारण जे भावाचा अभाव, त्यावर समर्थ मनोबोधाच्या ३५व्या श्लोकात बोट ठेवत आहेत. हा ३५वा श्लोक  आणि त्याचा प्रचलित अर्थ आता पाहू. हा श्लोक असा आहे :

असे हो जया अंतरीं भाव जैसा।

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?

वसे हो तया अंतरीं देव तैसा।

अनन्यास रक्षीतसे चापपाणी।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।। ३५।।

प्रचलित अर्थ : अंत:करणात जसा भाव असेल त्याप्रमाणे देव पावतो. जो अनन्य आहे त्याचं रक्षण तो चापपाणी भगवंत करतो. तो दासांचा अभिमानी राम कधीच दासाची उपेक्षा करीत नाही.

आता मननार्थाकडे वळू. या श्लोकाच्या पहिल्या दोन चरणांत एक मानसिक रहस्य समर्थ सांगत आहेत.  हे रहस्य असं की, अंत:करणात जसा भाव असेल तसा देव वसेल! थोडक्यात देवाचं त्याप्रमाणे अस्तित्व जाणवेल!! आणि हे व्यवहारातील अनुभवातही थोडं पाहाता येतं. समजा आपल्याला भौतिकातील एक विशिष्ट वस्तू हवी आहे, मग तो दूरचित्रवाणी संच असेल किंवा दुचाकी असेल किंवा चारचाकी असेल.. तर ती वस्तू मिळवण्याची आस मनात असते याचाच अर्थ आपला भाव त्या वस्तूभोवती केंद्रित झाला असतो. आणि हा भाव जितका खोलवर असतो तितकं त्या वस्तूचं स्मरण अंत:करणात खोलवर असतं! मग रस्त्यानं चालताना आपल्याला जी गाडी हवी आहे ती दिसली तरी त्या वस्तूच्या प्राप्तीची इच्छा तीव्रतेनं जागी होते. इथं समर्थ अध्यात्मातली गोष्ट सांगत आहेत ती म्हणजे, अंत:करणात भगवंताविषयी जेवढा भाव असेल म्हणजेच जेवढी तळमळ असेल तेवढं त्याचं स्मरण राहील.. आणि यापुढे जाऊन सांगतात की त्याप्रमाणात त्याचं अस्तित्वच आतमध्ये जाणवू लागेल! हा अनुभव मात्र व्यवहारातल्या अनुभवापेक्षा वेगळा आणि विलक्षण आहे. भौतिकातली जी वस्तू हवीशी वाटते तिच्यासाठी अंत:करणातला भाव हा मनाला शांत करीत नाही, त्या वस्तूच्या अस्तित्वाचा अनुभव देत नाही.. उलट तो मनाची खळबळ वाढवतो, अस्थिरता वाढवतो, मनाला अशांत करतो. त्या वस्तूच्या अभावाचं दु:ख तीव्र करीत राहातो. साधनेनं मात्र भगवंताचं आंतरिक अस्तित्व जाणवू लागतं.. त्या जाणिवेचा विकास होत जातो तसतसा त्याचा प्रत्यक्ष आंतरिक सहवास जाणवू लागतो. मी मागे कृष्णाच्या आईची कथा सांगितली होती ना? बालकृष्णाच्या एका मूर्तीला आईच्या ममतेनं त्या सांभाळत होत्या. त्यांच्या खोलीत पाऊल टाकताना प्रथम वाटलं, या वेडय़ा तर नाहीत? पण उत्तुंग भक्तीप्रेमातून त्यांच्यात जे सहज ज्ञान विलसत होतं ते पाहून खोलीबाहेर पडताना जाणवलं, याच खऱ्या शहाण्या आहेत.. जग वेडं आहे!! ज्याच्या अंतरंगात सद्गुरूंचा अखंड सहवास असतो त्याचं वावरणं एखाद्याला जगावेगळं वाटू शकतं.. अव्यावहारिक वाटू शकतं.. पण त्या आंतरिक सहवासातून जी निर्भयता, स्पष्टता, सहजता आणि तृप्ती लाभते तिच्यापुढे जगाचं ज्ञान तोकडं पडतं.. पण या भावनिर्मितीचं काही कृत्रिम रोपण होऊ शकत नाही. हा भाव जागा व्हावा, विकसित व्हावा आणि बळकट व्हावा, यासाठीच तर साधना आहे. साधनेचा खरा हेतू भावजागृती हाच आहे. ज्ञानजागृती त्यापुढे दुय्यम आहे!

-चैतन्य प्रेम