श्रीविष्णुसहस्त्रनामात परमात्म्याचं वर्णन ‘क्षमा’ म्हणजे सर्व अपराध सहन करणारा आणि ‘क्षमिणां वर:’ म्हणजे क्षमाशीलांमध्ये श्रेष्ठ, असं केलं आहे. आणि कोणत्याही सद्गुरूंचं चरित्र पाहा, त्यात या सर्वश्रेष्ठ क्षमाशीलतेचा प्रत्यय आल्यावाचून राहाणार नाही. सद्गुरूचरित्रांतील असे प्रसंगदेखील हरिभक्तीचा अर्थात सद्गुरूभक्तीचाच पाठ देतात. गेल्या भागात ज्या गिरीशचंद्रांचा उल्लेख केला ना, ते एकदा मध्यरात्री मित्रांसोबत मद्यपान करीत धुंद झाले होते. अचानक  त्यांना श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या दर्शनाची उत्कट इच्छा झाली. त्याच अवस्थेत टांगा करून ते दक्षिणेश्वरी गेले. ते आल्याचं समजताच श्रीरामकृष्णही बाहेर आले आणि झिंगत असलेल्या गिरीशचंद्रांचा हात हाती घेऊन प्रेमानं गाऊ आणि नाचू लागले! त्या भजनाचा आशय असा होता की, ‘‘मला मातेच्या प्रेमाची नशा इतकी लागली आहे की त्या प्रेमाच्या  नशेपुढे जगातील कोणतीच नशा टिकत नाही!’’ गिरीशचंद्र नंतरच्या आयुष्यात हा प्रसंग आठवून सांगत की, ‘‘ज्या अवस्थेत घरच्यांनीही मला झिडकारलं आणि धुत्कारलं असतं त्या अवस्थेतही मला प्रेमानं जवळ करणारा एकच होता!’’ गिरीशचंद्रांना तर साध्या दारूची नशा होती, पण आपल्यात स्वार्थकेंद्रित प्रपंचाची नशा किती भिनली आहे! तरीही आपण या पंथावर जे टिकून आहोत ते आपल्या कर्तृत्वानं नव्हे, तर केवळ त्यांच्या क्षमाशील वात्सल्यकृपेनं! ‘करुणाष्टका’त समर्थ म्हणतात ना? ‘‘जननिजनक माया लेकरू काय जाणे?’’ जन्म देणाऱ्या आईची माया लेकराला काय माहीत? तिच्या वात्सल्यप्रेमरसासाठी तिच्या अंगाखांद्यावर असताना ते तिला लाथाच झाडणार. पण जरी सद्गुरू ‘क्षमिणां वर:’ असले, आपले अनंत अपराध.. आपल्याकडून होणारा त्यांचा अपमानही पोटात घालणारे असले तरी आपण मात्र तसं वर्तन घडू देऊ नये, असा इशारा समर्थ मनोबोधाच्या ३८व्या श्लोकात देतात. त्याचबरोबर एक सूत्रही पुढील पाच श्लोकांत बिंबवू पाहातात. प्रथम हा ३८वा श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ आणि मग त्याचा मननार्थ पाहू. श्लोक असा आहे:

मना प्रार्थना तूजला एक आहे।

peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Guru Gochar 2024
गुरु कृतिका नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींच्या लोकांचा होईल भाग्योदय, धन-संपत्तीत होईल चांगली वाढ
lakshmi narayan yoga 2024
एप्रिल महिना सुरु होताच या ३ राशींना मिळेल अपार पैसा; बुध-शुक्राच्या युतीमुळे निर्माण होईल लक्ष्मी नारायण योग!

रघूराज थक्कीत होऊनि पाहे।

अवज्ञा कदा हो येदर्थी न कीजे।

मना सज्जना राघवीं वस्ति कीजे।। ३८।।

प्रचलित अर्थ : हे मना माझी तुझ्याकडे एक प्रार्थना आहे की तू आश्चर्यानं थक्क होऊन भगवंताकडे पाहा. तू भगवंतापाशी कायमचा निवास कर. या माझ्या विनंतीचा तू कधीही अनादर करू नकोस.

आता मननार्थाकडे वळू. मनाच्या श्लोकांची गुंफण एका क्रमात कशी आहे, हे आपल्या चिंतनातून उलगडत आहेच. त्यामुळे ३७व्या श्लोकात प्रचलित अर्थानुसार चक्रवाक पक्ष्यांसाठी जसा सूर्य तसा संकटात परमेश्वर भक्तासाठी धाव घेतो आणि त्याच्या भक्तीचा नगारा वाजत आहे, असं म्हटलं असताना मग पुढच्याच श्लोकात भगवंताकडे आश्चर्यानं पाहाण्याची प्रार्थना भक्ताला का करावी लागेल? भगवंतापाशी कायमचा निवास कर, या सांगण्याचा अनादर करू नकोस, हे का सांगावं लागेल? त्यामुळे या श्लोकाचा गूढार्थही वेगळाच असला पाहिजे. आपल्या मननार्थानुसार ३७वा श्लोक सद्गुरू हा साधकाकडून होणारा अपमानसुद्धा स्वीकारून त्याची भक्तीच वाढवतो, हे सांगतो. त्यामुळे ३८व्या श्लोकाचा मननार्थही त्याच्याशी सुसंगतच असला पाहिजे. या श्लोकाचा मननार्थ दोन वाक्यांत सांगायचा तर असा की, ‘‘हे मना, तुला कळवळून सांगतो की सद्गुरू हा जरी क्षमावंतांमध्ये सर्वश्रेष्ठ असला तरी भगवंतदेखील थक्क होईल इतक्या हीन पातळीवर घसरून सद्गुरूंची अवज्ञा कदापि करू नकोस. ती अवज्ञा होऊ नये यासाठी हे मना सद्गुरूजाणिवेतच सदोदित वस्ती कर!’’

चैतन्य प्रेम