मनोबोधाच्या ३८व्या श्लोकात समर्थ सांगतात की,  ‘‘हे मना, सद्गुरू क्षमावंतांमध्ये श्रेष्ठ असला तरी भगवंत थक्क होईल अशी त्यांची अवज्ञा कधी करू नकोस!’’ आता सद्गुरूंची अवज्ञा साधक करीत असेल तर भगवंतानं का थक्क व्हावं, हे पाहू. आपण मागेच पाहिलं की या सृष्टीची निर्मिती भगवंताच्या इच्छेतून झाली आहे. आनंद भोगण्यासाठी दोन व्हावं, ही ती इच्छा. त्यातूनच समस्त द्वैताचा पसारा उलगडत आहे. हे जग ही जरी त्याच भगवंताची निर्मिती असली तरी ते त्याच्यासारखं सच्चिदानंदमय स्थितीत नाही, त्याचंच असूनही त्याच्यात विलीन होत नाही, हेदेखील उघड आहे. तेव्हा जगाचा हा पसारा आवरायला सद्गुरू प्रकटले आहेत! जेव्हा जेव्हा मी सद्गुरू असा उल्लेख करीत आहे तेव्हा खरे सद्गुरूचं अभिप्रेत आहेत, भोंदू नव्हे. तर सद्गुरू पसारा आवरत आहेत आणि तो आवरण्याची त्यांची पद्धत कशी आहे? तर तुझं जे जे काही आहे ते ते रामाचं आहे, हे साधकाला शिकवणं. घरदार, नातीगोती काहीही सोडायची गरज नाही. त्यात राहूनच त्या व्यापक तत्त्वाचं स्मरण राख, एवढंच ते सांगतात. आपण मागेच पाहिलं की स्थूलापेक्षा सूक्ष्मातला पसारा फार मोठा असतो. आपलं घर असावं, या इच्छेतून आपण घर घेतो ते आपल्या ऐपतीनुसारच असतं, पण आपल्या कल्पनेत अनेक घरं तयार असतात! तेव्हा जे काही आहे ते रामाचं आहे, राम देईल त्यातच कल्याण आहे, हे सद्गुरू बिंबवतात तेव्हा साधकाच्या अंतरंगातला पसाराच ते आवरत असतात. भगवंताचीच जबाबदारी पार पाडत असतात. भगवंताचंच असलेलं, पण त्याच्यापासून दुरावलेलं जग ते या योगे त्याच्यात विलीन करीत असतात. त्यामुळे भगवंतच सद्गुरूंच्या आधीन असतो. ‘गुरुचालिसे’ त म्हटलं आहे की, ‘‘राउर अविचल अटल निदेशू।। टारि न सकत राम परमेशू।।’’ म्हणजे, ‘‘ हे सद्गुरो तुमची आज्ञा अटळ आणि अविचल आहे. प्रत्यक्ष परमात्मादेखील ती टाळू शकत नाही!’’ मग त्या सद्गुरूचा अवमान एक अत्यंत तुच्छ जीव करीत आहे हे पाहून भगवंत थक्कच होणार ना? ‘गुरूगीते’त म्हटलं आहे की प्रत्यक्ष भगवंत कोपला तरी गुरू साधकाला वाचवू शकतो, पण गुरूच कोपला तर तिन्ही लोकांत कुणीही त्या साधकाला वाचवू शकत नाही. सद्गुरू हा ‘क्षमिणां वर:’च असल्याने त्यानं कोपण्याची शक्यता अत्यंत कमी. पण तरीही गुरूगीतेचा हा श्लोकही भगवंतापेक्षा सद्गुरूचं श्रेष्ठत्वच सूचित करतो. इथं नामदेव आणि त्यांचे सद्गुरू विसोबा खेचर यांची कथा आठवते.  नामदेवांची बालपणापासून विठ्ठलाशी मैत्री होती. त्यामुळे गुरूची गरज काय, असा प्रश्न त्यांना पडला. तरीही विठ्ठलानं त्यांना विसोबांकडे पाठवलं.. आणि ती गोष्ट आपल्याला माहीतच आहे की ते पिंडीवर पाय ठेवून पहुडले होते. हा कसला गुरू, असा विकल्प येऊन नामदेव परतले. तेव्हा तू गुरूचा अवमान केला आहेस, आता त्यांनी सांगितल्याशिवाय माझं दर्शन नाही, असं सांगून विठ्ठल अंतर्धान पावले. व्यथित नामदेव विसोबांकडे गेले. तरीही पिंडीवरील पाय  पाहवेना. हसून विसोबा म्हणाले, ‘‘जिथे पिंडी नाही तिथे माझे पाय ठेव.’’ नामदेव जिथे जिथे त्यांचे पाय ठेवू लागले तिथे तिथे पिंडी प्रकटू लागली. तेव्हा विसोबांचं महत्त्व नामदेवांना उमगलं. त्यांच्या प्रेमबोधानं ते आनंदले तरी मनात आलं, आपल्याकडून गुरूची अवज्ञा झाली आहे. त्याचं प्रायश्चित्त घेतल्याशिवाय विठ्ठलाची पुनर्भेट नाही! त्यांच्या मनातली सल ओळखून विसोबांनी जमिनीवर रामनाम लिहिलं आणि त्यात नामदेवांना लोळायला सांगितलं. मग म्हणाले, आता सर्व पापांतून तू मुक्त आहेस. खुशाल विठ्ठलाला भेट. नामदेव त्यांचे चरण पकडून म्हणाले, ‘‘या विठ्ठलाला सोडून आता कुठे आणि का जाऊ?’’

चैतन्य प्रेम

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
balmaifal, symbol of revolution, dr ambedkar balmaifal
बालमैफल: क्रांतीचे प्रतीक
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण