News Flash

१७३. पायथा आणि शिखर

श्रीसद्गुरूंची अवज्ञा अजाणता होतेच, पण जीव जाणतेपणानंही ती करतो हे पाहून प्रत्यक्ष भगवंत थक्क होतो.

श्रीसद्गुरूंची अवज्ञा अजाणता होतेच, पण जीव जाणतेपणानंही ती करतो हे पाहून प्रत्यक्ष भगवंत थक्क होतो. तर अशी जाणता किंवा अजाणता सद्गुरूंची अवज्ञा होऊ नये, असं वाटत असेल तर त्यासाठीचा उपाय एका सूत्रात समर्थ सांगतात तो असा की, ‘‘मना सज्जना राघवीं वस्ति कीजे।।’’ इथं दोन टप्प्यांतली वस्ती सांगितली आहे. एखादं शिखर सर करताना जसं पायथ्याशी एक तळ असतो आणि मग थेट शिखर हाच दुसरा आणि अखेरचा टप्पा असतो अगदी त्याचप्रमाणे हे दोन टप्पे आहेत. पहिला पायथ्याचा टप्पा आहे तो  सत्संगाचा आणि शिखर आहे ते सद्गुरूमयतेचं! पायथ्यापर्यंत अनेकजण पोहोचतात, शिखर फार थोडे गाठतात! अगदी त्याचप्रमाणे सत्संगाच्या विविध रूपांत अनेकजण रमतात, पण सत्संगाचं खरं शिखर आणि सद्गुरूजाणिवेतील वस्तिचं खरं शिखर हे फार थोडे गाठतात!! जोवर खरा सत्संग लाभत नाही आणि त्यात मन स्वत:ला विसरत नाही तोवर खरी सद्गुरूमयताही लाभत नाही. त्यामुळे समर्थ सांगतात की, हे मना तू सत्संगात वस्ती कर आणि त्यायोगे सद्गुरूमयतेच्या व्यापक जाणिवेत सदोदित वस्ती कर.. आणि लक्षात ठेवा पायथ्यापर्यंत पोहोचल्याशिवाय शिखराकडेही वाटचाल करता येत नाही. अगदी त्याचप्रमाणे सद्गुरूमयतेच्या व्यापक जाणिवेत स्थिर होण्याची पायरी सत्संग हीच आहे. त्याशिवाय साधायचंच नाही. आता सत्संग म्हणजे तरी काय? मोठमोठे मंडप टाकून, ध्वनिवर्धक लावून, वाद्यांची साथसंगत घेत तत्त्वज्ञानाचं जे विवेचन होतं तो सत्संग आहे का? आपल्या डोळ्यासमोर सत्संग म्हटलं की हेच चित्र येतं आणि काही काही प्रवचनकार, तत्त्वज्ञानाचे भाष्यकार फार मुद्देसूद, प्रवाही आणि प्रभावी बोलतात हेही खरं, पण तरीही खरा सत्संग हाच, असं म्हणता येत नाही. अशा सत्संगातून धार्मिक किंवा काही प्रमाणात आध्यात्मिक संस्कार मनावर होतीलही, पण सद्गुरूजाणिवेत तो साधकाला नेईलच आणि स्थिर करील, अशी काही हमी त्यात नाही. मग सत्संग म्हणजे काय? तर जो सत्मध्ये सदोदित निमग्न आहे अशाचा संग. ज्या संगाच्या योगे सत्ची, शाश्वताची धारणा अंतरंगात वाढत जाते आणि पक्की होते तोच सत्संग. सत्पुरुषाच्या संगाला आपण सत्संग मानतो खरं, पण देहाचा सहवास काही सदोदित मिळतोच असं नाही. देहाचा संग कायमचा नाही, सद्ग्रंथ वाचून मिळणारा सत्संग कायमचा नाही, दुसऱ्याशी सद्चर्चा करून साधला जाणारा सत्संगही कायमचा नाही. या सगळ्या सत्संगांना काळवेळ-परिस्थितीची मर्यादा आहे. पण नामाचा सत्संग अखंड साधता येऊ शकतो. व्यापक तत्त्वाशी जे अखंड जोडलं आहे आणि जे माझं अंतरंग व्यापक करीत नेतं असं काही असेल तर ते नाम आहे.. आणि सत्संगाची पायरी चढल्याशिवाय व्यापक तत्त्वाची जाणीव रूजणारच नाही. ‘श्रीरामचरित मानसा’तही म्हटलं आहे, ‘‘बिनु सतसंग ज्ञान नहीं होई।’’ सत्चा संग झाल्याशिवाय असत्चं खरं स्वरूप उकलून देणारं ज्ञान होणार नाही. ते होत नाही तोवर माणूस अज्ञानातच राहाणार आणि रमणार! आज ज्ञान तोंडानं सांगणाराही अज्ञानातच बद्ध आहे.. तोंडानं ज्ञान सांगितलं जात आहे, पण जगण्यात अज्ञानाचंच दर्शन आहे! विरक्तीची थोरवी श्रोत्यांना सांगितली जात आहे, पण कोटय़ाधीशांना लाजवील इतका वैराग्याचा प्रपंच  पसारा मांडला आहे! मग असा ‘सत्संग’ अज्ञानातून कसा सोडवेल? तो पायथ्यापर्यंत पोहोचण्यालाच शिखर सर करणं मानेल आणि तसं बिंबवेल! तो मलाही अज्ञानातच आणखी रूतायला मदत करील. मला अहोरात्र संग आहे तो भौतिकाचा आणि हा ‘सत्संग’ही माझ्या मनातलं भौतिकाचं प्रेमच जोपासत राहील. भौतिकाच्याच कौतुकानंच तो ओथंबला असेल. तेव्हा खरं ज्ञान हवं असेल तर खरा सत्संगच हवा!

– चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 2:14 am

Web Title: samarth ramdas philosophy 73
Next Stories
1 १७२. गुरू परमात्मा परेशु
2 १७१. क्षमिणां वर:
3 १७०. निशाणी!
Just Now!
X