भौतिकाकडे वृत्तीचा ओघ आहे.  भौतिक हे क्षणोक्षणी बदलणारं आहे. त्या भौतिकाबाबत माझ्या मनात असलेली आवड-नावड बदलणारी आहे. त्यामुळेच भौतिकात आणि भौतिकाविषयीच्या माझ्या आंतरिक भावनेत चांचल्य आहे. त्यामुळेच भौतिकाशी संलग्न झालेलं मन चंचलच राहातं. सद्गुरू तत्त्वाची जाणीव ही शाश्वताशी जोडणारी आहे. जे शाश्वत आहे तेच स्थिर आहे. त्यामुळे या सद्गुरू जाणिवेशी जोडल्या जाणाऱ्या मनालाच स्थिर, शाश्वत धारणेचा आधार लाभतो. या शाश्वत जाणिवेच्या विकासानं आपल्या जगण्यातलं अशाश्वतातलं गुंतणं हळूहळू उमगू लागतं. तेव्हा ‘तयालागि’ म्हणजे त्या सद्गुरूला ‘हे सर्व चांचल्य दीजे’ हे समस्त भौतिक देऊन टाकायचं आहे. आता सर्व भौतिक द्यायचं म्हणजे काय? आपण ज्या घरात राहातो ते घर त्याला देऊन टाकायचं आहे का? आपली सर्व मिळकत त्याला देऊन टाकायची आहे का? आपली म्हणून जेवढी माणसं आहेत ती त्याला देऊन टाकायची आहेत का? तर हो आणि नाही! म्हणजे प्रत्यक्षात यातलं काहीच द्यायचं नाही, पण या सर्वामध्ये माझी जी आसक्ती आहे ती देऊन टाकायची आहे. कारण नाती अडकवत नाहीत, त्यातली माझी आसक्तीच मला अडकवते. त्या आसक्तीतूनच अपेक्षा निर्माण होतात. त्या अपेक्षांतूनच हट्टाग्रह, दुराग्रह निर्माण होतो. आपल्या आग्रहानुसार गोष्टी घडल्या तर ‘सुख’ वाटतं आणि अहंकार अधिक पक्का होत जातो. आपल्या आग्रहाविरुद्ध गोष्टी घडल्या तर ‘दु:ख’ वाटतं आणि द्वेष, मत्सर, असूया यांनी मन व्यापतं. त्यातही गोष्ट ‘सुखा’ची होवो की ‘दु:खा’ ची होवो, दोन्हींतून चिंता, काळजी, भीतीही वाढतेच. एकदा आसक्तीच ओसरली तर कर्तव्यं घडतील, पण अपेक्षा उरणार नाहीत. बसमध्ये बसलेल्या शेकडो प्रवाशांना बसचा वाहक तिकीटं देतो, पण म्हणून आपण तिकीट दिल्यामुळेच लोकांना प्रवास करता येतो तेव्हा त्यांनी याची जाण ठेवून कृतज्ञ राहावं, अशी त्याची अपेक्षा असते का? तिकीट देणं हे माझ्या कर्तव्याचा भाग आहे आणि त्यासाठी पगारही मिळत आहे, हेच तो जाणतो ना? मग आपल्या आयुष्यात जी जी माणसं आली आहेत त्यांच्या बाबतच कर्तव्यं करताना आपण त्यांच्यात अपेक्षेनं का अडकतो? मोठअया महालाचं उद्यान असो, झोपडीबाहेरची कुंडी असो किंवा जंगल असो; तिथं उगवलेल्या गुलाबाच्या सौंदर्यात, सुवासात काही फरक पडतो का? लोकांच्या प्रतिक्रियेनुसार तो कमी-जास्त सुगंध देतो का? आपली कर्तव्यं मग अपेक्षांनुसार कमी-जास्त का होतात? तर आपल्या मनाचा ओघ जोवर खऱ्या सद्गुरूकडे वळत नाही, तोवर आसक्ती आणि अपेक्षांच्या डबक्याकडेच हा ओघ वळत राहाणार आणि जीवन संकुचित करीत राहाणार. त्यामुळे या मनाला ‘‘मना सज्जना राघवीं वस्ति कीजे।।’’ सज्जनांच्या सत्संगात आणि त्यायोगे व्यापक अशा सद्गुरू जाणिवेत वस्ती करायला समर्थ सांगत आहेत.  मनोबोधाच्या ३९व्या श्लोकाचं मनन पूर्ण करीत आता  आपण ४०व्या श्लोकाकडे वळणार आहोत. ३८ ते ४२ या पाच श्लोकांत ‘‘मना सज्जना राघवीं वस्ति कीजे।।’’ हेच एक सूत्र सांगितलं आहे. अर्थात सज्जनांच्या सत्संगात आणि व्यापक सद्गुरू जाणिवेत  स्थिर व्हायला हा प्रत्येक श्लोक वेगवेगळ्या अंगानं सांगत आहे. ३९व्या श्लोकानं वृत्तीचं चांचल्य सोडून या सत्संगात आणि या व्यापक जाणिवेत स्थिर व्हायला सांगितलं आहे (तयालागि हे सर्व चांचल्य दीजे। मना सज्जना राघवीं वस्ति कीजे।।), ४०व्या श्लोकानं विवेकाची कास धरीत कल्पना सोडून या व्यापक जाणिवेत स्थिर व्हायला सांगितलं आहे (विवेकें कुडी कल्पना पालटीजे। मना सज्जना राघवीं वस्ति कीजे।।), ४१व्या श्लोकानं विचाराच्या आधारावर स्वाध्याय साधत सद्गुरूतत्त्वात स्थिर व्हायला सांगितलं आहे (विचारें बरें अंतरा बोधवीजे। मना सज्जना राघवीं वस्ति कीजे।।) तर ४२व्या श्लोकानं जगातली ममत्वाची धारणा सोडून सद्गुरूंशिवाय खरा आप्त कोणी नाही, या धारणेत स्थिर व्हायला सांगितलं आहे (बहूतांपरी हेंचि आतां धरावें। रघूनायका आपुलेसें करावें।). तर आता ४०व्या श्लोकाकडे वळू.

– चैतन्य प्रेम

peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
scholarship
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणातील संशोधनात्मक पद्धती
deep learning definition
कुतूहल : डीप लर्निग – सखोल शिक्षण म्हणजे काय?
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान