26 February 2021

News Flash

१७७. लक्ष्य

मनोबोधाच्या ४०व्या श्लोकाकडे आपण आता वळणार आहोत.

मनोबोधाच्या ४०व्या श्लोकाकडे आपण आता वळणार आहोत. या पुढील तीन श्लोकांत विवेक, विचार आणि धारणा या त्रिसूत्रीद्वारे सत्संगात आणि त्यायोगे व्यापक जाणिवेत स्थिर व्हायला समर्थ सांगत आहेत. प्रथम ४०वा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ पाहू आणि मग मननार्थाकडे वळू. मनोबोधातला हा श्लोक असा आहे :

मना पाविजे सर्वही सूख जेथें।

अतीआदरें ठेविजे लक्ष्य तेथें।

विवेकें कुडी कल्पना पालटीजे।

मना सज्जना राघवीं वस्ति कीजे।। ४०।।

प्रचलित अर्थ : हे मना! सर्व सुख जिथं अखंड मिळतं त्या रामरूपी अत्यादरानं लक्ष लावून राहा, तेथे एकाग्र आणि निश्चळ होऊन राहा. विवेकानं द्वैतयुक्त वाईट कल्पना सोडून दे. शुद्ध अद्वैतभावानं रामरूपात समरस होऊन राहा.

आता मननार्थाकडे वळू. या श्लोकात सुख, कल्पना, विवेक आणि लक्ष्य या चार महत्त्वाच्या संकल्पनांचा उल्लेख आहे आणि या चार संकल्पनांच्या आधारेच मानवी जीवनाच्या खऱ्या हेतूकडे समर्थानी लक्ष वेधलं आहे. आता आपल्या जन्माचा खरा हेतू माणसाला माहीत नसतो, पण तरीही जगण्यातील त्याच्या प्रत्येक धडपडीमागचा हेतू सुखप्राप्ती हाच असतो.  म्हणजेच माणसाला सुखच सुख हवं असतं. थोडय़ा सुखानं माणसाला समाधान लाभत नाही. त्याला सुखात कधीच घट नको असते, कोणताही अडथळा नको असतो. अर्थात सर्वकाळ संपूर्ण आणि अखंड सुखात राहाण्याचीच माणसाची जन्मजात इच्छा असते. मात्र खरं सुख म्हणजे नेमकं काय आणि ते कशानं मिळतं, हे माणसाला उमगत नाही. देहाद्वारे भोगता वा अनुभवता येणारं आणि मनाला समाधानी करणारं ते सारं सुख असंच तो मानत असतो. म्हणजेच त्याची सुखाची कल्पना ही त्याच्या देहबुद्धीनुसारच ठरत असते. देहबुद्धी ही अहंकारातूनच प्रसवत असते. अर्थातच ती संकुचित असते. या देहबुद्धीच्या आधारावर ज्या ज्या कल्पना मनात प्रसवत असतात त्यादेखील म्हणूनच कुडय़ा अर्थात संकुचित, क्षुद्रच असतात. या देहबुद्धीनुरूप निर्माण होणाऱ्या कल्पनांनुसार माणूस अन्य व्यक्ती, वस्तू आणि परिस्थितीत ‘सुख’ मिळविण्याची धडपड करीत राहातो. व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती ही काळाच्या आधीन असते, अर्थात घट, बदल आणि नाश हे काळाचे नियम त्यांना लागू असतात. त्यामुळेच त्यांच्यापासून मिळणारं ‘सुख’ हे कधीच कायमचं असू शकत नाही. तेव्हा खरं, शाश्वत, अखंड सुख हे मिथ्या, अशाश्वत आणि खंडित आधारांपासून मिळूच शकणार नाही. हे खरं सुख जो शाश्वत आहे त्याच्याच आधारानं मिळू शकतं. पण असा आधार प्राप्त करणं सोपं का आहे? म्हणूनच समर्थ ४०व्या श्लोकाच्या पहिल्या दोन चरणांत अत्यंत सूचकपणे सांगत आहेत, ‘‘मना पाविजे सर्वही सूख जेथें। अतीआदरें ठेविजे लक्ष्य तेथें।’’ हे मना! शाश्वत असं जे सद्गुरूतत्त्व आहे त्याच्याच आधारावर तुला खरं संपूर्ण सुख लाभू शकतं, पण त्यासाठी तेच सुख प्राप्त करणं हेच जीवनाचं लक्ष्य झालं पाहिजे आणि अतिशय आदरानं त्या लक्ष्याकडे लक्ष असलं पाहिजे! पण सद्गुरू हाच पूर्ण सुखाचा आधार आहे आणि त्या आधाराची प्राप्ती हेच जीवनाचं लक्ष्य आहे, हे उमगावं आणि पटावं तरी कसं? माझं देहबुद्धीच्या तालावर सुरू असलेलं जगणं अविवेकानं भरलं आहे. त्यामुळे सुखाबाबतच्या सर्व कल्पना या अविवेकीच आहेत. विवेकाच्या जागी अविवेक, विचाराच्या जागी अविचार आणि ज्ञानाच्या जागी अज्ञानच बोकाळलं असल्यामुळे जे खऱ्या सुखाचं नाही तेच मला सुखाचं वाटतं, जे खऱ्या हिताचं नाही तेच मला हिताचं वाटतं. त्यामुळे सुखासाठी पदोपदी ठेचकाळत मी दु:खाचाच संग्रह करतो. हे चित्र बदलायचं असेल तर माझ्या अंतरंगातील कल्पनांमध्येच पालट करावा लागेल. आता देहबुद्धीनं माखलेल्या मला कल्पना बदलणं शक्य आहे का? ज्या ज्या गोष्टी सुखाच्या आहेत अशी माझी कल्पना आहे त्या त्या गोष्टींची आस मनातून काढण्याची कल्पना सोपी आहे का?

– चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2016 2:22 am

Web Title: samarth ramdas philosophy 77
Next Stories
1 १७६. सूत्र-बोध
2 १७५. चांचल्य
3 १७४. सद्गुरूमाहात्म्य
Just Now!
X