समर्थ जेव्हा सांगतात की, देहेदु:ख हें सूख मानीत जावें। विवेकें सदा स्वस्वरूपी भरावें।। तेव्हा देहदु:ख सोसणं, सहन करणं कठीण आहे, हे तेदेखील एकप्रकारे मान्य करतातच. हे देहदु:ख सोसायला विवेकाचीच जोड घ्यायला म्हणूनच तर ते सांगतात! विवेक म्हणजे काय? शंकराचार्यापर्यंत अनेकानेक तत्त्वज्ञांनी विवेक म्हणजे सार काय आणि असार काय, याची जाण, निवड आणि त्यानुरूप वर्तन, असं सांगितलंय. प्रत्यक्षात जे असार आहे, असत् आहे तेच मला साररूप, सत्रूप वाटू शकतं. तेव्हा खरा विवेक माझ्या आकलनानुसार मला साधणार नाही. त्यासाठी सद्गुरूंच्याच बोधाचा आधार घ्यायला हवा. आज मी परिस्थितीचं, व्यक्तीचं, प्रसंगाचं खरं रूप न जाणता भ्रामक समजुतीतून त्या परिस्थितीकडे, व्यक्तीकडे किंवा प्रसंगाकडे पाहात असेन तर तो भ्रम सोडून वास्तवाची जाणीव मनाला करून देणं म्हणजे विवेक! आणि वास्तवाची ही जाण मला सद्गुरूच अनेक प्रकारे करून देत असतात. समर्थभक्त ल. रा. पांगारकर यांनी ‘मनोबोध’ या पुस्तकात पुढील अकराव्या ओवीच्या विवेचनात मुक्तेश्वरांच्या ओव्या उद्धृत केल्या आहेत. मला तर या ओवीसाठीच त्या अतिशय बोधकारक वाटतात. दु:खाकडे कसं पाहावं आणि वाटय़ाला आलेलं दु:ख भोगताना मनाला काय समजवावं, हे या ओव्या सांगतात. मुक्तेश्वरांच्या या ओव्या अशा : ईश्वरें प्रेरिलें प्रारब्धातें। प्रारब्धें प्रेरिलें मनातें। यास्तव घडेल तेंचि निरुतें। ब्रह्मसूत्र जाणावें।। १।। ईश्वरइच्छेनें घडे सकळ। वाउगी मनाची तळमळ। अज्ञानाचें हेंचि फळ। जे सुख-दु:खें प्रलपिजे।। २।। जें जें घडे जिये काळीं। तें तें मौनें घेईजे मौळीं। भोगविते तिघे बळी। काळ कर्म ईश्वरू।। ३।। जो जो प्राप्त होईल भोग। त्याचा मानूं नको उबग। तेणें सत्वर रमारंग। कृपा करील निर्धारें।। ४।। जीवासि जीवत्व-अभिमान। तंवचि वर्ते कर्माधीन। स्वरूपीं लागल्या अनुसंधान। सुख-दु:ख असेना।। ५।। दु:खानं उन्मळून पडणं, खचून जाणं हे जसं खऱ्या हिताचं नाही, त्याचप्रमाणे सुखानं हुरळून जाणंही वास्तवाचं भान सुटल्याचंच लक्षण आहे. त्यामुळे सुख किंवा दु:ख या दोहोंच्या प्रभावातही अलिप्त राहण्याचा विवेक कसा साधावा, हे मुक्तेश्वरांच्या या ओव्या सांगतात. यातली पहिलीच ओवी फार मार्मिक आहे. जीव जी जी र्कम करतो त्यातून प्रारब्ध घडत असतं, पण मी केलेल्या कर्माचं फळ भोगायला योग्य परिस्थिती, योग्य काळ यांचा मेळ लागतो. ती योग्य परिस्थिती कोण ठरवतो? साधीभोळी माणसं याचं उत्तर एकच मानत, देवाची इच्छा! थोडक्यात देवच प्रारब्धभोग माझ्या वाटय़ाला देतो, भले ते माझ्याच कर्मातून का उत्पन्न झाले असेनात. तर मुक्तेश्वर म्हणतात, ईश्वरें प्रेरिलें प्रारब्धातें। ईश्वरानं प्रारब्धभोगांना वाटय़ाला येण्याची प्रेरणा दिली आणि मग प्रारब्धें प्रेरिलें मनातें। त्या प्रारब्धानं मनाला प्रेरणा दिली! ही कसली प्रेरणा आहे हो? आपण एखाद्या ठिकाणी अचानक जातो आणि तिथं आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंगही घडतो. मग तो अचानक लाभ किंवा मोठं यश पदरात पाडणारा असो की हानी किंवा मोठं अपयश वाटय़ाला आणणारा असो. आता त्या ठिकाणी ‘अचानक’ जरी आपण गेलो असलो तरी तिथं जावं, ही इच्छा मनानंच तर निर्माण केली असते आणि मनानंच आपल्याला तिथं नेलं असतं. तिथं प्रारब्धाचा भोग आपली वाट पाहात असतो! म्हणून मुक्तेश्वर म्हणतात, प्रारब्धें प्रेरिलें मनातें। प्रारब्धानं मनाला प्रेरणा दिली! मग जे अटळ आहे ते आपल्या वाटय़ाला येतं. याला मुक्तेश्वर ब्रह्मसूत्र म्हणतात तर संत ‘कर्माची रेखा’ म्हणतात! थोडक्यात प्रारब्धभोगाचा मनावर आघात होऊ द्यायचा नसेल, तर ज्या मनाला प्रारब्ध प्रेरणा देतं त्या मनाला सद्गुरू प्रेरणेतच गुंतवलं पाहिजे!

– चैतन्य प्रेम

daughters become guests in their own father house after marriage
नातेसंबंध : माहेर उपरं करतं?
loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
Guru Gochar 2024
गुरु कृतिका नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींच्या लोकांचा होईल भाग्योदय, धन-संपत्तीत होईल चांगली वाढ
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….