जग नव्हे तर श्रीसद्गुरू हे खरे आपले आहेत.  कारण तेच माझं खरं हित साधणारे आहेत. मनोबोधाचा ४२वा श्लोक हेच स्पष्टपणे सांगतो. हा श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे:

बहूतांपरी हेंचि आतां धरावें।

Narayan Rane Uddhav Thackeray
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “मग परत जायचा रस्ता कुठून जातो ते दाखवतो”
raghuram rajan
“भारतातील तरुणांची मानसिकता विराट कोहलीसारखी”, RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन असं का म्हणाले?
jitendra awhad marathi news, jitendra awhad latest news in marathi
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “भाजपची जादू संपलेली आहे”
Ulta-Chashma
उलटा चष्मा: नेहरू नव्हेत, बोस..!

रघूनायका आपुलेसें करावें।

दिनानाथ हें तोडरीं ब्रीद गाजे।

मना सज्जना राघवीं वस्ति कीजे।। ४२।।

प्रचलित अर्थ : हे मना, फार सांगण्यात काय अर्थ आहे? एकच गोष्ट सांगतो की, कसेही करून रामाला आपलेसे करून घे. दीनपरिपालनाचा त्याचा बाणा आहे म्हणून तू मोठेपणाच्या साऱ्या कल्पना सोडून त्याच्या स्वरूपी मिळून जा.

आता मननार्थाकडे वळू. माणूस हा प्रेमाचा भुकेला आहे. त्याला प्रेम हवं असतं आणि म्हणून तो दुसऱ्यावर प्रेम करतो! त्याला अपेक्षित असणारं प्रेम हे त्याची देहबुद्धी सुखावणारं, जोपासणारंच असतं, यात मात्र शंका नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या आधारे आपली देहबुद्धी अधिक सुखावते त्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो आणि त्या बदल्यात कित्येक पटीनं अधिक प्रेमाची अपेक्षा त्या व्यक्तीकडून करतो. आपण जगात जन्म घेतो, जगातच वावरतो आणि जगालाच पूर्ण खरं मानतो. म्हणूनच या जगातच आपण प्रेम शोधतो आणि ते मिळवण्यासाठी जगात सापेक्ष प्रेमाची पखरणही करतो. थोडक्यात आपण जगाला आपलं मानतो, पण तेच जग आपल्या मनाविरुद्ध वागलं, आपल्या स्वार्थाआड आलं, आपल्या इच्छेविरोधात गेलं की आपल्या अंत:करणावर आघात होतो. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात ना? ‘आघात जगाचे नाहीत आपलेपणाचे असतात!’ खरं तर जग तोवरच आपलं ऐकतं जोवर जगाचा स्वार्थ साधतो किंवा जगाचं भलं होत असतं. जग तोवरच ऐकतं जोवर आपल्याला दुखावल्यानं स्वार्थपूर्तीत अडचणी येतील, अशी जगाला भीती वाटते! आणि जगाला का दोष द्या? आपण काय जगावेगळे किंवा जगापेक्षा वेगळे आहोत का? तेव्हा मी स्वार्थमय असताना स्वार्थमय जग माझं खरं आप्त बनूच शकत नाही. खरा आप्त तोच असतो जो निस्वार्थ भावनेनं मला स्वार्थाच्या खोडय़ातून सोडवतो! भ्रम, मोह, आसक्तीतून माझा स्वार्थ पक्का होतो. त्या स्वार्थापायी मी करू नये ते करतो, बोलू नये ते बोलतो. अविचारानं माझं जीवन व्यापून जातं. तेव्हा त्या स्वार्थाच्या जाळ्यातून माझी सुटका हेच खरं हित असतं. ती सुटका करणारा जो सद्गुरू तोच माझा खरा आप्त आहे! समर्थही सांगतात की हे मना जगात अनेक ठिकाणी तू प्रेमाचा शोध घेतलास, पण खरं निस्वार्थ निर्हेतुक प्रेम कुठेच आढळलं नाही. कारण असं खरं निस्वार्थ निर्हेतुक प्रेम तूदेखील कुणावर कधी केलं नाहीस. हे प्रेम केवळ सद्गुरूच करू शकतात. त्यांनाच खरा आप्त मान. जिथं ताठा आहे, अहंकार आहे तिथं दुरावा आहे. माझा ताठा, माझा अहंकार कायम ठेवून मी ना कुणावर खरं प्रेम करू शकतो ना कुणी माझ्यावर प्रेम करू शकतं. प्रेम म्हणजे त्याग. अहंकाराचा त्याग, वर्चस्वभावनेचा त्याग. प्रेमात पूर्ण अद्वैत असतं. समर्थानी फार छान सांगितलंय. म्हणाले, ‘‘माझं माझं तुझं माझं’’ अशी जगाची रीत असते.. ‘‘माझं तुझं तुझं तुझंच’’ ही भावना केवळ प्रेमातूनच उदय पावते. तेव्हा अशा खऱ्या प्रेमाचा पूर्ण अभाव आपल्यात आहे. अन्नाचा कणही न लाभलेला ज्या आर्ततेनं भीक मागतो ती आर्तता, ती दीनता भगवंताचं प्रेम लाभावं म्हणून आहे? जोवर त्या प्रेमाची जाणही नाही तोवर खरी दीनता कुठली.. तोवर त्या दीनानाथाचं खरं प्रेम लाभणार तरी कसं? म्हणून हे मना केवळ त्या राघवाचाच.. त्या सद्गुरूचाच हो.. त्यालाच आप्त मान.. त्याच्याकडेच विशुद्ध प्रेमाची भीक माग!

– चैतन्य प्रेम