भौतिक जगात आपण वावरतो आणि त्या भौतिकाचा आपल्या मनावर खोल ठसा असतो. त्याच भौतिक जगात आपण श्रीसद्गुरूंना पाहातो! त्यांनाही भौतिकाचाच भाग मानतो आणि आपल्या भौतिक इच्छांच्याच परिघात त्यांना आणण्याचा प्रयत्न करीत राहातो. सद्गुरू भौतिक जगात असतात आणि या जगातली सर्व कर्तव्यं पार पाडतानाही दिसतात, पण ते सदोदित परम शाश्वत सत्य तत्त्वाशी अखंड एकरूप असतात. खरा सद्गुरू हा शिष्याचा भौतिक पसारा नष्ट करीत नाही, तर त्यातलं त्याचं अंत:करण सोडवतो. कबीरही एके ठिकाणी म्हणतात ना? या थोडय़ाशा जीवनात प्रत्येकानं त्याच्या त्याच्या परीनं पसारा मांडलेलाच आहे. प्रपंचाच्या आसक्तीच्या रांगेत सर्वच उभे आहेत.. राजाही आहे, रंकही आहे आणि सुलतानही आहे! गरीबाचा प्रपंच अभावानं भरला असेल आणि राजाचा प्रपंच अनंत वस्तूंनी भरलेला असेल, तरी त्या प्रपंचाविषयीची चिंता, तळमळ, काळजी, धडपड दोघांमध्ये सारखीच आहे! प्रत्येकजण आपली भौतिक परिस्थिती पालटण्याचा प्रयत्न करीत आहे आणि ते स्वाभाविकही आहे. आनंदाची प्राप्ती ही आपली मूळ आस असल्यामुळे तो आनंद वस्तूंतून मिळतो, पैशातून मिळतो, असं जोवर आकलन आहे तोवर त्यासाठी माणूस धडपडणारच. भौतिकासाठीचे माझे प्रयत्न आणि मला लाभलेलं भौतिक यात सद्गुरू हस्तक्षेप करीत नाहीत फक्त त्यात मनानं, चित्तानं, बुद्धीनं रूतून राहाण्याची माझी सवय ते सोडवू पाहातात. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात ना? ‘‘खेळाऐसा प्रपंच मानावा!’’ म्हणजे काय? प्रपंचाचा खेळ नाही करायचा, तर प्रपंच खेळासारखा माना याचा अर्थ खेळाला खेळाचे नियम असतात. ते नियम पाळावे लागतात. तो खेळ कितीही जिद्दीनं खेळला जात असला तरी अखेरीस तो खेळच आहे, ही जाण खेळताना असतेच. त्या खेळापलीकडेही खेळणाऱ्याचं जीवन असतंच. खेळ हा जगण्यातला महत्त्वाचा भाग असला तरी जगण्याइतकं महत्त्व खेळालासुद्धा नसतं! तेव्हा प्रपंच, भौतिकातले प्रयत्न हे व्यवहाराच्या नियमानुसार करावेत पण त्या पलीकडेही जगण्याचा परीघ अत्यंत विराट आहे, हे भान सुटू देऊ नये, एवढीच सद्गुरूंची साधकाकडून अपेक्षा असते. त्या भौतिकावर, त्या प्रपंचावर, त्या जगावर जीव लावू नये की जीव त्यात गुंतवत राहू नये. त्यांना जेवढं आहे तेवढं महत्त्व द्यावंच आणि प्रपंचाची, भौतिकाची हेळसांडही करू नये, पण त्या प्रपंचापायी, भौतिकाच्या प्रभावापायी जीवनाचा जो मूळ परम अर्थ आहे त्याची हेळसांड होऊ देऊ नये. त्यासाठी केवळ एका सद्गुरूंवरच जिवापाड प्रेम करावं (मना सज्जना येक जीवीं धरावें।), भौतिकातली कर्तव्यं करीत असतानाही त्यात न गुंतता, सद्गुरू भक्तीच्या योगे भक्तांमध्येही आपलं खरं हित साधून घ्यावं (जनीं आपुलें हीत तूंवां करावें।). आता हे साधण्याची प्रक्रिया समर्थ ४३व्या श्लोकाच्या अखेरच्या दोन चरणांपासून सांगायला सुरुवात करीत आहेत. हे चरण असे आहेत.. रघूनायकावीण बोलों नको हो। सदा मानसीं तो निजध्यास राहो।। हे मना, सद्गुरू भक्ती तुला साधायची आहे ना? मग एक कर.. त्या सद्गुरूशिवाय अन्य काहीच बोलू नकोस आणि मनामध्ये सदोदित त्याचाच निजध्यास राहू दे! आता सद्गुरूशिवाय काही बोलायचंच नाही, याचा अर्थ काय? याचा अर्थ नेमका समजला नाही तर रोगापेक्षा इलाज भयंकर, अशी अवस्था ओढवण्याचा मोठाच धोका असतो! हा मौनाचा अभ्यास आहे का? तर खरं मौन म्हणजे काय, याचंही जर आकलन झालं नाही तरी गोंधळ वाढतच जातो. मनात केवळ सद्गुरूचाच निजध्यास राखायचा म्हणजे तरी काय, याचंही आकलन नीट झालं नाही तरी दिशाभ्रम होण्याचाही धोका असतो!

-चैतन्य प्रेम