25 February 2021

News Flash

१९०. मौनाची भाषा

नाम हेच मौन आहे! समर्थ म्हणतात त्याप्रमाणे जाता-येता, खाता-पिता..

नाम हेच मौन आहे! समर्थ म्हणतात त्याप्रमाणे जाता-येता, खाता-पिता.. सर्व क्रिया करताना अंतरंगात नामस्मरणाचा अभ्यास व्हावा. तो जसजसा चिकाटीनं होईल तसतसं खरं मौन साधू लागेल. आपलं मौन कसं असतं? तोंडानं फक्त उच्चार नाही, पण मनात अनंत विचारांचा झंझावात सुरू आहे! जेव्हा मनात नामस्मरण सुरू होईल तेव्हा मग तोंडानं व्यवहाराचं किती का बोललं जात असलं आणि जगात कितीही कर्तव्यर्कम पार पाडत असलो तरी आंतरिक मौन सुरूच राहील! तर ‘रघूनायकावीण बोलों नको हो।’चा अधिक खोल अर्थ नामाशिवाय कशाचंच चिंतन नको, हा आहे. असं नाम अंतरंगात सदोदित चालावं, यासाठीचा ध्यासपूर्वक अभ्यास सुरू राहो, हे सांगताना समर्थ म्हणतात- ‘‘सदा मानसीं तो निजध्यास राहो।।’’ आता मनोबोधाच्या पुढील ४४व्या श्लोकात हाच अभ्यास अधिक खोलवर नेण्यास समर्थ सुचवीत आहेत. हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. हा श्लोक असा आहे:

मना रे जनीं मौन्यमुद्रा धरावी।

कथा आदरें राघवाची करावी।

नसे राम ते धाम सोडूनि द्यावें।

सुखालागिं आरण्य सेवीत जावें।। ४४।।

प्रचलित अर्थ: हे मना, वाणीने रामनामाचा उच्चार कर, आदरपूर्वक राघवाचं कथाकीर्तन कर, नाहीतर जनात मौन धरून राहा. ज्या घरात रामभक्तीचा उल्हास नाही तिथं पाऊल टाकू नकोस, खुशाल अरण्यात जाऊन रामसुख भोगीत जा.

आता मननार्थाकडे वळू. इथं पहिल्या दोन चरणांत दोन गोष्टी सांगितल्या आहेत आणि ती दोन टोकं आहेत! एकतर मौन पाळायचं आहे किंवा अत्यंत आदरपूर्वक राघवाची कथा करायची आहे, राघवाच्याच गोष्टी बोलायच्या आहेत! मौनाभ्यासाचंच सूचन यात आहे. मौनाबद्दल श्रीगोंदवलेकर महाराज एकदा म्हणाले की, ‘‘प्रथम काहीही बोलण्यापूर्वी, हे बोलणं आवश्यक आहे का, याचा विचार करावा. जर आवश्यक असेल तरच बोलावं. एवढं साधलं तरी आपलं निम्मं बोलणं कमी होईल!’’ म्हणजे खरं तर आपण गरजेशिवाय किती बरळत असतो, ते आपणच आपल्या बोलण्याकडे नीट लक्ष दिलं तर आपल्याच लक्षात येतं! दुसऱ्याला सहज दुखावणारं, दुसऱ्याची सहज निंदा करणारं आणि आत्मस्तुतीत रमणारं बोलणं आपल्या मुखातून सतत प्रसवत असतं. ते आवरायला आधी सांगितलं आहे. तेव्हा समर्थ या दोन चरणात सांगतात की बाबा रे एकतर राघवाची कथा कर.. आता राघवाची कथा म्हणजे काय? तर तुझ्या बोलण्याला शाश्वताचा, तथ्याचा, सत्याचा स्पर्श असू दे! एकतर तथ्यपूर्ण असंच बोल किंवा मग मौनच बाळग, असा हा सल्ला आहे.  आता तथ्यपूर्ण बोलण्याची आणि तथ्यपूर्ण वागण्याची एक बाजूही लक्षात ठेवायची आहे. समर्थानी लहान मुलांना एक  पत्र पाठविलं होतं. त्यात म्हटलं होतं, ‘‘बरें सत्य बोला, यथातथ्य चाला!’’ इथं ‘बरें सत्य’ म्हणजे आवडेल असं सत्य.. सत्य बोला, पण बरं म्हणजे आवडेल अशा शब्दांत बोला, पण चाला मात्र यथा तथ्य! तथ्याला धरून चाला. अर्थात बोलणं सत्यपूर्ण, पण दुसऱ्याला आवडेल अशा, तो दुखावणार नाही अशा शब्दांत असावं, पण आचरण मात्र सद्गुरूंना आवडेल असं असावं! श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत, ‘‘जग काय म्हणेल, या विचारानं वागणं हा प्रपंच आणि भगवंत काय म्हणेल, या विचारानं वागणं हा परमार्थ!’’ तेव्हा बोलण्यापेक्षा कृतीच महत्त्वाची असते आणि कृतीशिवाय जगणं नसल्यानं ती सत्याला धरून राखण्याचा अभ्यास अनिवार्य आहे. आता मग प्रश्न येईल, बोलणंही सत्याला धरूनच का नसावं? सत्य दडपणारं मौनही चुकीचंच नाही का?

– चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 3:46 am

Web Title: samarth ramdas philosophy 91
Next Stories
1 १८९. बोल
2 १८८. प्रेम : ३
3 १८७. प्रेम : २
Just Now!
X