क्षणाक्षणानं जीवन सरत आहे. गेलेला क्षण पुन्हा कधीच परत मिळवता येत नाही. हा अनुभव असूनही आपल्याला प्रत्येक क्षणाचं खरं मोल उमगत नाही. आपण अनवधानानंच जगत असतो आणि क्षण सरला की आपलं अवधान जागं होतं! मग आपण असं बोलायला नको होतं, असं वागायला नको होतं, ही जाणीव होते. थोडक्यात वर्तमानात आपण सजगपणे वावरत नाही. वर्तमान हा भूतकाळ झाला की मग आपण जागं होतो. अगदी त्याचप्रमाणे भविष्याच्या अवास्तव चिंतनात रमतानाही वर्तमानाकडे आपलं दुर्लक्षच होतं. तेव्हा साधनपंथावर आलो, सद्गुरबोधाशी परिचय होऊ लागला एवढय़ानं काही वर्तमानात तो बोध उतरवण्याची जाणीव जागी होतं नाही. उच्च बोध ऐकून, वाचून, दुसऱ्याला सांगूनही आपण बेसावधपणेच जगत राहातो. आयुष्यातले क्षण बेसावधपणे वाया घालवत राहातो. जी घडी अशाश्वताच्या चिंतनात गेली ती व्यर्थच गेली. कारण अशाश्वताच्या चिंतनातून अशाश्वताचीच ओढ पक्की होते. ही ओढ स्वस्थ बसू देत नाही. ती अशाश्वताच्या प्राप्तीसाठी देहाला जुंपून टाकते. त्यामुळे जी घडी अशाश्वताच्या चिंतनात सरते ती आयुष्यातले भावी क्षणही वायाच घालवू लागते! म्हणूनच समर्थ सांगतात की, ‘‘मना जे घडीं राघवेंवीण गेली। जनीं आपुली ते तुवां हानि केली।’’ हे साधका, या आधीपर्यंत तुझ्या मनाला अशाश्वताच्या चिंतनाची, मननाची, विचाराची, कल्पनेची सवय जडली होती. ती तोडण्याचा उपाय सद्गुरूचिंतन, सद्गुरूमनन, सद्गुरूस्मरण हाच आहे. त्यामुळे मनाला त्या चिंतन, मनन, स्मरणाकडे वळविण्याचे प्रयत्नच आयुष्य सार्थकी लावणारे आहेत. शाश्वताच्या प्राप्तीतूनच शाश्वत समाधान लाभू शकतं. अशाश्वत कितीही जमा केलं तरी त्या आधारानं शाश्वत समाधान लाभत नाही. उलट अशाश्वताच्या पसाऱ्यातही मन जर शाश्वताच्या ओढीनं भारलं तर शाश्वत समाधानाची वाट सापडते. त्या वाटेनं चालणंही साधू लागतं. त्यामुळे ज्या भौतिक परीघात तू जगत आहेस तो सोडायला नको, त्या परिघातली कर्तव्यं टाळायला नकोत.. ते सारं करीत असताना, त्याच परीघात राहूनच तू मन शाश्वत तत्त्वाशी जोडण्याचा प्रयत्न कर. असं केलं नाहीस तर सत्संगतीत राहूनही तू स्वत:ची हानीच केलीस, असं होईल. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत ना? ‘‘जगाचा घात करणारा एकवेळ परवडला, कारण जग स्वत:ला सांभाळून घेईल, पण स्वत:चा जो घात करतो त्याला कोण सांभाळणार?’’ तेव्हा अनमोल मनुष्यजन्मातील लाखमोलाचा असा प्रत्येक क्षण बेसावधपणे वाया दवडू नकोस. बेपर्वाईनं आत्मघात करू नकोस! सद्गुरूंच्या बोधानुरूप जगणं हेच अनंत दु:खांनी भरलेलं आहे. त्या बोधाच्या आधारावर जगण्याचा अभ्यासच खरा उपयोगी आहे. रस्ता खाचखळग्यांचा, काटय़ाकुटय़ांचा असला तरी हातात कंदील, विजेरी असेल तर त्या रस्त्यानंही न ठेचकाळता चालता येतं. रस्ता पार करता येतो. अगदी त्याचप्रमाणे जीवनाचा रस्ता कितीही अडचणीचा असला तरी सद्गुरूबोधाच्या प्रकाशात निर्धोकपणे चालता येतं. या बोधाचा आधार नसेल तर जगण्यात शीण आहे!.. ‘‘रघूनायकावीण तो सीण आहे।’’ असा शीण वाटय़ाला येऊ नये असं ज्याला वाटतं तोच आपल्या आंतरिक स्थितीबाबत अत्यंत दक्ष राहून लक्ष्याकडे दृष्टी ठेवून जगत असतो.. ‘‘जनीं दक्ष तो लक्ष्य लाऊनि पाहे।।’’ जगण्यातल्या प्रत्येक गोष्टीला तो लक्ष्यानुरूप ताडून पाहातो आणि तिला जेवढं द्यायचं तेवढंच महत्त्व देतो! आता ज्या सद्गुरूंच्या बोधानुरूप जगायचं आहे त्या सद्गुरूंचं स्वरूप तरी कसं आहे? त्या स्वरूपाचंच वर्णन समर्थ आता ४७व्या श्लोकापासून करीत आहेत!

चैतन्य प्रेम