अंतर्बाह्य़ एकाच परमतत्त्वाचं दर्शन सद्गुरूंना घडत असतं.. नव्हे आपणच सर्वत्र भरून आहोत, हीच त्यांची जाणीव असते, असं श्रीनिसर्गदत्त महाराजांनी एके ठिकाणी म्हटलं होतं. पण असं असूनही ते या जगात वावरतात कसे? तर ‘‘जनीं जाणता भक्त होऊनि राहें। ’’ संपूर्ण ज्ञान त्यांच्या आधारानंच टिकत असूनही ते या जगात ज्ञान्याच्या भूमिकेत नव्हे, तर भक्ताच्याच भूमिकेत वावरतात! ‘गुरूगीते’त सद्गुरू हे ‘‘ज्ञानशक्ति समारूढ’’ आहेत असं म्हटलं आहे. म्हणजे ज्ञान आणि शक्तीवर ते आरूढ आहेत. आणखी एका श्लोकात म्हटलं आहे की, ‘‘न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तप:। तत्त्वज्ञानात्परं नाऽस्ति तस्मै श्री गुरवे नम:’’ सद्गुरूपेक्षा तत्त्व अधिक नाही, तप अधिक नाही, गुरू तत्त्वज्ञानाहून अधिक असं या जगात काही नाही! ‘ज्ञान’ हा शब्द दोन अर्थानी वापरला जातो. आपल्याला अमुक गोष्टीचं ज्ञान झालं, असं आपण म्हणतो तेव्हा आकलन किंवा जाणीव अभिप्रेत असते. त्याचबरोबर कोणत्याही गोष्टीचं यथातथ्य आकलन करून देणारी जी जाणीव आहे तीदेखील ज्ञान आहे. ज्ञानाचे हे दोन्ही स्तर भौतिकाशीच जोडलेले आहेत. त्या भौतिक ज्ञानातून अनेक शोध लागले आणि जगाचा विस्तार अधिक व्यापक झाला. तरीही बाह्य़ परिस्थिती कितीही पालटली, विकसित झाली, सोयीसुविधांनी युक्त झाली तरी आपल्याला जीवनात नेमकं काय हवं आहे, काय साधायचं आहे, खरी तृप्ती, खरं समाधान कोणतं आणि ते कसं लाभावं; याचं ज्ञान जोवर होत नाही तोवर माणसाची अतृप्ती संपत नाही. अतृप्ती आहे तोवर इच्छांची, हवं-नकोपणाची वावटळ आहे. त्या वावटळीमुळे भौतिक ज्ञानावरही अज्ञानाचं मळभ पसरलं आहे. त्यामुळे भौतिक ज्ञानापेक्षाही आत्मज्ञान खरं आहे. माणसाच्या निवाऱ्याच्या, वाहतुकीच्या, सेवनाच्या, सुखप्राप्तीच्या साधनांचं बाह्य़ रूप, दृश्य रूप कितीही सुबक झालं असलं तरी त्याचं आंतरिक वासनारूप आदिमानवासारखंच राहीलं आहे. त्यामुळे तीच भीती, तीच काळजी, तीच आस, तोच हव्यास, तीच तळमळ, तीच तडफड त्याच्या अंतरंगात कायम आहे. त्याची पाशवी मनोवृत्ती समाजात दबून असली तरी संधी मिळताच ती उफाळून येते. त्यामुळे खरं आत्मज्ञान जोवर होत नाही, जगण्याचा खरा हेतू ज्यायोगे गवसतं असं आंतरिक ज्ञान जोवर होत नाही तोवर जगण्यातलं अज्ञान आणि दु:ख काही ओसरत नाही. हे ज्ञान केवळ सद्गुरूंच्याच आधारानं लाभतं.  पण हे सद्गुरू कसे वावरतात? तर ‘‘अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया। चक्षुरून्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नम:।।’’ म्हणजे ज्ञानशलाका माझ्या नेत्रात घालून माझ्या जगण्यातला अज्ञानाचा अंध:कार दूर सारण्याचं सामथ्र्य असूनही ते ज्ञातेपणा दाखवत जगत नाहीत! ते भगवंताचा दास म्हणूनच या जगात वावरतात!! स्वत:ला त्या परमात्म्याचा तुच्छ दासच म्हणवतात!! कारण अनंत काळापासून खऱ्या आत्मसुखापासून विभक्त झालेल्या जिवांना खरी भक्ती शिकवणाऱ्या खऱ्या भक्ताचाच संग लाभण्याची गरज असते. ‘गुरूचालिसे’त म्हटलं आहे की, ‘‘स्वयं मूल बपु बनि जिमि दासा।। भगति रीती निज करत प्रकासा।।’’ म्हणजे हे सद्गुरो, तूच मूळस्वरूप असूनही दास बनून, त्या भगवंताची भक्ती करीत तुझीच दिव्य भक्ती कशी करायची, हे प्रकाशित करतोस! हा सद्गुरू कसा आहे? ‘गुरूचालिसा’त म्हटलं आहे, ‘‘जय सद्गुरू श्री परम उदारा। नर तनु स्वयं राम अवतारा।। नरहिं नरत्व छुडावन हेतू। भए मनुज तनु कृपा निकेतू।।’’ हे परम उदार सद्गुरो, मनुष्य रूपात प्रकटलेले ते परमतत्त्व तूच आहेस. मनुष्याला त्याच्या  मनाच्या गुंत्यातून सोडविण्यासाठी तू मनुष्यरूपात अवतरला आहेस!

चैतन्य प्रेम