प्रत्यक्ष ज्ञानस्वरूप असूनही भगवंताची भक्ती शिकवण्यासाठी सद्गुरू हे जाणत्या भक्ताच्या रूपात वावरतात. श्रीगोंदवलेकर महाराजांना एका साधकानं प्रापंचिक गोष्टीविषयी साकडं घातलं. महाराज म्हणाले की, ‘‘राम कृपा करील तर काय न होईल?’’ त्यानं वेगवेगळ्या शब्दांत तेच मागणं मागितलं आणि श्रीमहाराजांनीही दरवेळी राम करील तर होईल, असंच सांगितलं. अखेर तो म्हणाला, ‘‘महाराज तुमच्या कृपेनंच होईल, असं सांगाल तर मला त्यावर महाराज म्हणाले, ‘‘जे बोलून मी जन्मभर माझी जिभ विटाळली नाही, ते आता कसं बोलू?’’ तेव्हा  सर्वसमर्थ असूनही आणि अशाश्वतात न गुंतवणारं भौतिकातलं सारं काही त्यांच्याच कृपेनं सहजसाध्य होत असूनही सद्गुरू कधीही कर्तेपणा घेत नाहीत. कर्ता भगवंतच आहे, हेच बिंबवत राहातात. प्रयत्न करणं माणसाच्या हातात आहे आणि त्यानं कर्तव्यं न टाळता सर्व प्रयत्न करावेत, पण कर्तेपणानं उन्मत्त होऊ नये, हेच ते सदोदित बिंबवतात. म्हणजेच भौतिकातल्या कोणत्याही प्रगतीमुळे साधकानं भगवंतापासून मनानं विभक्त होऊ नये, याकडे त्यांचं काटेकोर लक्ष असतं. भगवंतापासून अनंत जन्म विमुख असलेल्या जिवाला भगवंताचा भक्त बनविण्याची त्यांची प्रक्रिया अखंड सुरू असते. आपण सर्व या मार्गाकडे कसे वळलो, हे आठवून पाहिलं तरी जाणवेल की मुळात या मार्गावर पहिलं पाऊल टाकावंसं वाटावं, यासाठीही किती गोष्टी घडाव्या लागल्या! आता पाऊल टाकलं खरं, पण मी चालतंही राहावं यासाठी सद्गुरू सदोदित किती कष्ट घेतात, ते कळणंही आकलनापलीकडचंच आहे. माझ्या चित्तावर अनंत जन्मांचे संस्कार असतात. अनंत विकार, अनंत वासना आणि वाईट सवयींनी मी बरबटलो असतो. माझ्यातल्या या दोष आणि विकारांकडे ते पाहात नाहीत, उलट माझ्यातल्या एखाद्या क्षीण अशा गुणाकडेच ते लक्ष देतात आणि तो गुण फुलवत मला साधनेकडे वळवत राहातात. ही प्रक्रिया ४७व्या श्लोकाच्या तिसऱ्या चरणात सांगितली आहे.. ‘‘गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा।’’ सद्गुरू कसे आहेत? ते ‘गुणी प्रीति राखे’ म्हणजे माझ्यातल्या एखाद्या गुणावर प्रेम करतात, त्या गुणाचं कौतुक करतात, त्याला फुलवतात आणि मग ‘क्रमू साधनाचा’ त्या गुणाच्याच जोरावर मला साधनेच्या क्रमाकडे वळवतात! अनेक सद्गुरू चरित्रांचा धांडोळा घेतला तरी असे अनेक प्रसंग आढळतील. माझ्या एका गुरुबंधूच्या बोलण्याची तऱ्हा मला आवडत नसे आणि म्हणून त्यांच्याबरोबर गुरुजींच्या गावी जायलाही मला आवडत नसे. एकदा मी गुरुजींना ही गोष्ट सांगितली. त्यावर हसून त्यांनी विचारलं, ‘‘मी तुम्हा सर्वाच्या किती दोषांकडे दुर्लक्ष करतो?’’ मी म्हणालो, ‘‘अनंत! आम्ही सारेच तर दोषांची खाण आहोत.’’ त्यावर मग गुरुजींनी प्रेमानं विचारलं, ‘‘मग तुम्ही त्यांच्यातल्या एवढय़ा दोषाकडे दुर्लक्ष करू शकत नाही का?’’ श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात एक प्रसंग आहे. दोन साधकांमधील भांडण एकदा विकोपाला गेलं तेव्हा त्यातील एकजण महाराजांकडे गेला आणि म्हणाला, ‘‘महाराज ही असली तापट माणसं तुम्ही कशाला पदरी बाळगता? ती तुम्हाला कमीपणा आणतात!’’ महाराज काय म्हणाले? ‘‘तो तापट असेलही, पण रामाच्या चरणी आला आहे ना? तो नाम घेत आहे ना? मग त्याच्याकडे रामाचं लक्ष आहेच. त्यामुळे आज ना उद्या त्याच्यात पालट होईल आणि त्याचं खरं हित साधलं जाईल. बाकी माझं सारं रामाचंच असल्यानं अशी माणसं मला कमीपणा आणतात का त्याची चिंताही रामालाच आहे!’’ आता साधनारत राहाणं हा गुण आहेच, पण आपल्याला वाटेल की अनंत विकार असताना नुसती साधना करीत राहण्याचा काय उपयोग? विकारही आपणच कमी करायला नकोत का?

-चैतन्य प्रेम