जीवन जर सद्गुरूंच्या बोधानुरूप व्यतीत केलं नाही आणि ‘मी’पणाच्या गुर्मीत घालवू लागलो, तर व्यर्थ यातना वाटय़ाला येतील (अहंतागुणें यातना ते फुकाची।) आणि जीवनाच्या अखेरीसही मनाला दैन्यताच झाकोळून टाकेल (पुढें अंत येईल तो दैन्यवाणा।), असं समर्थ सांगत आहेत.

जोवर देहाच्या क्षमता आहेत, देह सक्षम आहे, तोवर मनमानी सुरू असते. देहाच्या क्षमतांचा बेजबाबदार गैरवापर आपण करीत असतो. वय वाढत जातं तशा या देहाच्या क्षमता हळूहळू मावळू लागतात. डोळ्यांना पूर्वीसारखं दिसत नाही, कानांनी पूर्वीसारखं ऐकता येत नाही, बोलण्याची शक्तीही क्षीण होते.. आणि हे वाईट नसतं बरं का!

गोंदवलेकर महाराज तर म्हणत की, म्हातारपणी कमी दिसू लागणं, हेही स्वाभाविकच आहे! वय वाढूनही देहाच्या क्षमता जर कमी झाल्या नसतील, तर त्यात काही तरी अस्वाभाविक मानलं पाहिजे. उलट देहच आपल्याला सांगत असतो की, आयुष्यभर खूप बडबड केली, आता कमी बोलावं म्हणून बोलण्याची शक्तीच कमी केली आहे! अगदी त्याचप्रमाणं आयुष्यभर खूप काही पाहिलं, खूप काही ऐकलं म्हणून आता कमी पाहिलं जावं आणि कमी ऐकलं जावं यासाठी डोळे आणि कानांच्या क्षमता कमी झाल्या आहेत! जर आजवर जे काही बोललो, पाहिलं, ऐकलं त्यानं तृप्ती झाली असेल, तर या क्षमता कमी होऊनही खंत वाटणार नाही; पण जर अजून पाहण्याची, अजून बोलण्याची, अजून ऐकण्याची तृप्ती झालीच नसेल.. त्यासाठी जीव तळमळत असेल, तर मनाला दैन्यताच झाकोळून टाकणार.

जर मुखी नाम ‘आलं’ असेल, अर्थात सद्गुरूंच्या बोधानुरूप जीवन जगण्याचा अभ्यास प्रामाणिकपणे केला असेल तरच अतृप्तीचा असा लवलेशही उरणार नाही. त्यामुळे तुम्ही सर्वात असूनही कशातच मनानं गुंतले नसाल, सर्वाचे असूनही कुणाचेच नसाल आणि सर्वत्र फिरताना दिसत असूनही मनानं एका सद्गुरू बोधावर स्थिर असाल. मनाची हाव आणि धाव ओसरत असेल. यावर कुणी म्हणेल की, मग जगातली आपली कर्तव्यं करायची नाहीत का? श्रीनिसर्गदत्त महाराज यांनी वापरलेल्या रूपकाची इथं आठवण होते. ते म्हणाले की, आरशात अनंत गोष्टी प्रतिबिंबित होत असूनही आरसा त्या गोष्टींनी लिप्त होत नाही. त्या गोष्टींचे ठसे आरसा पकडून ठेवत नाही. तो सदोदित स्वच्छच राहतो.

सद्गुरू बोधानं तयार झालेल्या मनाची तशी स्थिती होईल. आपण अज्ञान-भ्रम आणि मोहामुळे, मनात प्रतिबिंबित होणाऱ्या आवडत्या गोष्टींचे ठसे कायम राखण्याचा, टिकवण्याचा प्रयत्न करीत असतो. ज्या गोष्टींनी आपल्यावर आंतरिक आघात केलेले असतात, त्या ठशांनाही आपण कुरवाळत राहतो. हा भ्रम सद्गुरू बोधानंच दूर होतो. जगाचं खरं स्वरूप उमगू लागतं. मग जगात आसक्तीनं अडकणं थांबतं.

असं झालं नाही तर अतृप्ती आणि देहाच्या ओसरत चाललेल्या क्षमता यामुळे जीवनात दैन्यता विसावू लागेल. अशी दैन्यता नको असेल तर जीवन ‘मी’पणानं जगणं सोडून द्या. जीवनाची सूत्रं सद्गुरूकडे सोपवा. राणा म्हणजे आपल्या जीवनाचे राजे तुम्ही नव्हेत, तर सद्गुरू आहेत, हे जाणून त्यांच्या बोधानुसार जगण्याला अग्रक्रम द्या.

या प्रक्रियेची सुरुवात ‘हरिनामा’पासून आहे. हरी म्हणजे सर्व भवदु:खांचं हरण करणारा सद्गुरू आणि त्याचं ‘नाम’ म्हणजे त्यांनी सांगितलेली साधना! ही साधनाच तारून नेईल. समर्थ रामदास विरचित ‘मनोबोधा’चा पुढचा म्हणजे ९८वा श्लोक या ‘तारण्याची’ व्याप्ती मांडतो. त्या श्लोकाकडे आता वळू.

चैतन्य प्रेम