आपलं खरं  प्रेम स्वतवरच आहे. ‘मी’ सुखी असावं, सदोदित आनंदी राहावं, सदोदित निश्चिंत राहावं, हीच स्वाभाविक जन्मजात इच्छा. या ‘मी’च्या सुखप्राप्तीचा..  त्यासाठीच्या प्रयत्नांचा एकमेव आधार माझा देहच आहे; म्हणून या देहावरही माझं जन्मजात प्रेम आहे. मला लाभलेला देह हा माझ्या जगण्याचा, जीवन-व्यवहाराचा एकमेव आधार आहे आणि म्हणून देहसुख हेच खरं सुख आपण मानतो. आता असं असलं तरी सुख देहाला मिळत नसतं, हे आपण मागेच पाहिलं होतं. आपण ‘नेत्रसुखद’ असा शब्द वापरतो.. पण डोळे हे केवळ पाहण्याचं उपकरण आहेत. डोळ्यांना पाहण्याचं सुख-दुख नाही. डोळे निसर्गाचं सौंदर्य जसं पाहतात तसंच त्याचं रौद्र रूपही पाहतात. पण या दोन्हीतलं सुखद काय आणि क्लेशकारक काय, ही जाणीव डोळ्यांना नसते. तेव्हा जे पाहून मनाला ‘सुख’ वाटतं त्याला आपण ‘नेत्रसुखद’ म्हणतो! थोडक्यात, देहाला जरी ‘सुख’ मिळतं असं आपण मानत असलो तरी देहाच्या माध्यमातून मनालाच जे सुखाचं वाटतं ते ‘देहसुखा’चं आहे, ही आपली धारणा असते. त्यामुळे आपल्या जगण्याचा, असण्याचा, अस्तित्वाचा आधार देहच आहे, या सहज धारणेतून आपण देहावर ‘प्रेम’ करीत असतो. हा देह सुरक्षित राहावा म्हणून जग सुरक्षित राहावं, असं आपल्याला वाटत असतं. या देहाचा भवताल सुरक्षित असावा याच भावनेतून आपलं जगावर प्रेम असतं. तेव्हा देहावर आपलं प्रेम असल्याचं आपण मानत असलो तरी आपलं खरं प्रेम आपल्या मनावरच असतं आणि मनाच्या आवडीलाच आपण प्राधान्य देत असतो. त्यामुळे अनेकदा देहाला हानिकारक असूनही मनाला जे आवडत असेल ते मिळवण्यासाठी आपण देहाची पर्वाही करीत नाही. मनाची आवड पूर्ण करण्यासाठीच देहाची सर्व शक्ती आपण पणाला लावतो. तेव्हा जगणं मनाभोवतीच केंद्रित असताना आणि मनाच्याच अखंड प्रेमात ‘मी’ बुडालो असताना रामावर प्रेम करणं मला कसं साधेल? त्यासाठी मनाकडेच समर्थ लक्ष देत आहेत. मनाला जे आवडतं त्याच्या प्राप्तीसाठी देहदुखाचीही पर्वा आपण करीत नाही, मग त्या मनाला जर ‘रामा’ची आवड लागली तर? म्हणून मनाची आवड बदलण्याचं महत्कार्य साधण्यासाठीच हा मनुष्यजन्म लाभला आहे, हे समर्थ सांगतात. कारण माणूस जसा मनाचा गुलाम होतो तसाच तो ही गुलामी संपवूही शकतो. जे खऱ्या हिताचं आहे अर्थात श्रेयस आहे त्याचं प्रेम माणसाला लागू शकतं.. आणि जे अहिताचं असूनही प्रेयस म्हणजे प्रिय होतं, आवडीचं होतं त्याची आवड सुटूही शकते. त्यासाठी मनाला जागं करावं लागतं, सदोदित जागृत ठेवावं लागतं, घडवावं लागतं, वळण द्यावं लागतं. हे केवळ अध्यात्माच्या पुरतंच मर्यादित नाही बरं का! मोठमोठे शोध लावणाऱ्या संशोधकांनाही मनाच्या कित्येक आवडींचा त्याग करावाच लागला आहे.

तर  या मनाला रामाची म्हणजे भगवंताची काही खरी आवड नाही. आपलं आयुष्य आपल्या मनाजोगतं व्हावं यासाठी माणूस देवावर ‘श्रद्धा’ ठेवतो, देवावर ‘प्रेम’ करतो! तेव्हा या मनाला खरी आवड स्वतचीच आहे. ती आवड बदलून त्याला भगवंताची खरी आवड लागावी, त्याच्या अंतकरणातली शुद्ध श्रद्धा जागी व्हावी आणि भगवंतावर खरं प्रेम करणं त्याला साधावं यासाठीच साधनेचा सर्व व्याप आहे! या प्रेमाचं बीज मनात रुजविण्याच्या प्रक्रियेची सुरुवात होते ती श्रवण आणि मननानं. अर्थात हे श्रवण म्हणजे नुसतं कानांनी ऐकणं नाही. ज्ञानेंद्रियांनी ग्रहण केलं जाणारं सर्व त्यात अभिप्रेत आहे. कारण याच ज्ञानेंद्रियांनी आपण मनाला आधारवत भासणाऱ्या जगाला आत घेतलं आहे, हृदयात स्थान दिलं आहे. त्याजागी भगवंताचं प्रेम रुजविण्यासाठी जगाचं कीर्तन थांबवून हरीचं कीर्तन सुरू करायचं आहे!

chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….

चैतन्य प्रेम