हरीच्या कीर्तनाची म्हणजेच सद्गुरू अवतारांच्या चरित्रातील लीला प्रसंगांच्या श्रवणाची गोडी प्रथम लागली पाहिजे. ती कशी लागते किंवा लागेल, याचे एकच एक उत्तर देता येत नाही. कारण त्यासाठीचे सर्व उपाय आपल्याला तोवर अज्ञात असलेले आपले सद्गुरूच करीत असतात. ही गोडी लागेपर्यंतचं आपलं आयुष्य हे आधीच म्हटल्याप्रमाणे जगाच्या कीर्तनात सरलं असतं. या जगाचं कीर्तन आपण जे करतो त्याचा एकच हेतू असतो तो म्हणजे जगानं सदोदित आपल्याला अनुकूल राहावं. कारण जग अनुकूल असेल तरच अखंड सुरक्षित, सुखी, निश्चिन्त राहता येईल, असं आपल्याला वाटत असतं. त्यामुळे जगात सुख मिळवण्याच्या धडपडीत आकंठ बुडालेल्या मनाला हरीची.. अध्यात्माची ओढ वाटणं अशक्यच असतं. ओढ तर फार पुढची गोष्ट.. मुळात अध्यात्माचा असा काही मार्ग आहे आणि त्याद्वारे खरं अखंड सुख लाभून आत्मोद्धार साधला जातो, हेदेखील आपल्याला माहीत नसतं आणि माहीत असलं तरी त्यावर विश्वास नसतो. मग ही जाणीव केव्हा होते? तर जगाच्या कीर्तनातला फोलपणा कळू लागला की! जगाच्या पाठीमागे आजवर आपणं इतकं धावलो.. जगाला आपली, आपल्या ‘प्रेमा’ची पर्वाच नाही, ही जाणीव ज्या क्षणी होते त्या क्षणी हे कीर्तन ओसरू लागतं. ते लगेच थांबत मात्र नाही. कारण एक आधार सुटला तर लगेच आपण दुसरा आधार पकडतो आणि पुन्हा तो टिकवण्यासाठी पूर्वीच्याच आसक्तीनं त्यात गुंततो. तोही आधार सुटला तर तिसरा आधार.. सर्व आधार आपल्यासारखेच स्वार्थप्रेरित आणि म्हणूनच मर्यादित, अपूर्ण आहेत, हे सत्य हळूहळू कळू लागतं तेव्हा कुठं मनाला थोडी जाग येऊ लागते. मग जगात खरं सुख म्हणून काही आहे का, हा प्रश्न मनात प्रथमच डोकावतो. ते आपल्याला लाभेल का, ते कसं लाभेल, ते टिकेल का, असे अनेक प्रश्न मग मनात उत्पन्न होतात. हे प्रश्न म्हणजे जणू ठिणग्याच असतात. सुखाच्या शोधासाठी अंतरंगातला अग्नी त्या प्रज्वलित करीत असतात. मग या विषयावरची पुस्तकं वाचाविशी वाटतात. सद्गुरूंच्या अनेक अवतारांची चरित्रं वाचली जात असतात. त्यातील काही प्रसंग, काही वाक्य मनावर कोरली जातात. मग भगवद प्रेमानं भारलेला एखादा सच्चा साधक भेटला आणि त्याचा सहवास घडला तर आंतरिक भावसंस्कार दृढ होऊ लागतात. इथं साधक भेटणं महत्त्वाचं मानलं आहे. तथाकथित ‘धार्मिक’ किंवा ‘धर्मप्रेमी’, ‘धर्मवादी’ माणूस भेटून काही लाभ नाही. कारण धर्म जर जीवनात खऱ्या अर्थानं उतरलेला नसेल तर नुसता मी ज्या धर्मात जन्मलो तोच धर्म श्रेष्ठ आहे, हा वरपांगी गर्व बाळगण्यात काय हशील आहे? साधक हा धर्मातली कर्मकांड जाणत नसेल, धर्मकृत्यांचं शास्रोक्त ज्ञान त्याला नसेल, पण धर्माला अभिप्रेत असलेल्या व्यापकतेचा सहजस्पर्श त्याच्या जगण्याला असतो. मी इथं कर्मकांडांना किंवा धार्मिक कृत्यांना कमी लेखात नाही, पण जीवाला परमतत्त्वाची ओढ लावणं, हा त्यांचा मूळ हेतू त्यातून साधत नसेल तर ती धार्मिक कृत्य म्हणजे नुसता श्रम-पसारा ठरतात! तर जेव्हा खऱ्या, प्रामाणिक साधकाच्या सहवासात ‘रामा’च्या म्हणजे भगवंताच्या प्राप्तीचे जे प्रयत्न आहेत, त्यांचं प्रथम प्रेम लागतं. वाचन किंवा साधकाचा सहवास, या गोष्टी ‘रामा’चं प्रेम लागण्यापुरत्या आहेत. जर ते प्रेम लागलं नाही आणि नुसतं वाचनाचं किंवा ‘सत्संगा’चं प्रेम लागलं तरी काही उपयोग नाही. वेळ चांगला जाईल, पण हाती काही लागणार नाही! ‘मी’ची आवड नुसती बदलेल, पण ‘मी’ आणि ‘मी’पणा चिवटपणे टिकूनच राहील. आधी या ‘मी’ला जगाची आवड होती आता तो अध्यात्माची आवड लागल्याचं भासवत परमार्थाचाही प्रपंच करून टाकेल.. नव्हे त्यालाच ‘साधना’ समजू लागेल!

चैतन्य प्रेम

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!