दुसऱ्याच्या संपत्तीचा लोभ न धरणं आणि बळानं वा कपटानं दुसऱ्याचं धन वा वस्तू न लुटणं हे अस्तेय आहे. तर भौतिक वस्तूंच्या संग्रहाची ओढ न उरणं हा अपरिग्रह आहे. नामाच्या अभ्यासानं या गोष्टी कशा साध्य होतात, याचा थोडा विचार करू. नामानं जर सर्वात प्रथम कोणती गोष्ट होत असेल तर ती ही की, आहे त्या परिस्थितीला सामोरं जाताना मन स्थिर राहणं आणि त्या परिस्थितीचा स्वीकार करून कार्यरत राहणं!

एका पर्यावरणप्रेमी माणसाला एक आवड होती की, प्रवासात असताना तो रस्त्याच्या कडेला काही झाडांच्या बिया फेकत असे. आता कोणती बी कुठं पडेल हे काही सांगता येत नसे. एखादी बी अशा जागी पडे जिथं ऊन, पाणी आणि हवा सहज मिळत असे. एखादी बी अशा जागी पडे जिथं या गोष्टी सहज मिळण्याची शक्यता नसे. तसं माणसाचं जन्मदत्त जीवन. एखादा अशा घरात जन्मतो जिथं आर्थिक परिस्थिती उत्तम असते, त्याचं पालनपोषण उत्तम होतं. तर एखादा अशा घरी जन्मतो जिथं परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असते. शिक्षणापासून अनेक गोष्टींच्या प्राप्तीसाठी परिस्थितीशी संघर्ष करावा लागतो. तेव्हा बी कोणत्या जागी पडेल, हे जसं सांगता येत नाही तशीच कोणती परिस्थिती माझ्या वाटय़ाला येईल, हे माणसाला ठरवता येत नाही.. मात्र बी कोणत्याही जागी पडो, रोप वाढू लागतं. आपल्या जीवनशक्तीच्या जोरावर तग धरू पाहतं. अगदी त्याचप्रमाणे माणूस कोणत्याही परिस्थितीत जन्मला तरी तो तग धरू पाहतो, परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्नही करतो. फरक एकच.. बी कोणत्याही जागी पडो, ते जर गुलाबाचं असेल तर त्यातून गुलाबच उमलतात, पण काही वेळा खडतर परिस्थितीसमोर हताश होऊन किंवा उत्तम परिस्थितीनं शेफारून माणसाच्या जन्माला येऊनही माणूस आपलं स्वरूपभान गमावतो!

त्या स्वरूपभानाची जाणीव नामानं येते. मग मी जे काही मिळवीन ते परमात्म्यानं मला दिलेल्या क्षमतांच्या जोरावर, ही भावना होते. दुसऱ्याला काय काय मिळालं हे पाहात राहण्याची आवड संपते.  प्रयत्न करूनही जर मला हवीशी वाटणारी गोष्ट मिळत नसेल, तर एकतर प्रयत्नांत काही चूक घडत असली पाहिजे किंवा माझ्या इच्छेतच चूक असली पाहिजे, ही जाणीव नामानं सूक्ष्म झालेल्या मनातच निर्माण होऊ  शकते. मग अचूक प्रयत्न तरी कळतात किंवा त्या इच्छेतला फोलपणा तरी कळतो. एक मात्र घडतं की जे मिळवायचं ते प्रयत्नांच्या जोरावर, कपटानं किंवा बळानं दुसऱ्याकडून हिसकावून नव्हे, ही जाणीवही वाढत जाते. मग दुसऱ्याकडे जे आहे त्याचा लोभ, द्वेष आणि मत्सर वाटत नाही. उलट दुसऱ्याच्या यशाचाही आनंद वाटू लागतो. एवढंच नव्हे तर त्याला जीवनात यशस्वी होता यावं यासाठी, आपलं मन त्याच्या यशप्राप्तीच्या ओढीत गुंतून पडणार नाही इतपत, शक्य ते साह्यदेखील हातून घडतं.  मला जे काही मिळतं ते प्रारब्धानुसार आणि त्या प्रारब्धात अंतर्निहित असलेल्या माझ्या प्रयत्नानुसार, हेदेखील उमगू लागतं. मग हातून प्रयत्न होतात, पण तळमळ संपते. तगमग, काळजी आणि नकारात्मकता ओसरते. मन स्थिर, शांत होत आहे, हा अनुभव येऊ  लागतो. अस्तेयाचं तत्त्व अंगी बाणू लागतं. मग जे आहे त्यात समाधान वाटू लागतं. वस्तूंच्या संग्रहाची हौस कमी होत जाते. गरज आहे तेवढय़ाच वस्तू बाळगण्याची वृत्ती घडत जाते. त्यातही विशेष भाग असा की घर वस्तूंनी भरलं असलं तरी त्या वस्तू अंतर्मनाचा कब्जा घेत नाहीत! अंतरंगातला पसारा कमी होऊ  लागतो. अपरिग्रह ही खरी धारणा होते. अस्तेय आणि अपरिग्रह यामुळे मनाची समत्ववृत्ती निर्माण होते. नामाच्या स्मरणानं जी सूक्ष्मता मनाला प्राप्त होते त्यायोगे अहिंसा, सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह अशी अंतर्बा समानता निर्माण होते. हा ‘अंतर्बा’ शब्दही फार अर्थसूचक आहे बरं का!

चैतन्य प्रेम