19 November 2017

News Flash

३४७. आत्मनिवेदन

साक्षीभाव आला की आपण मायेच्या प्रभावाखाली कसं जगत आहोत, याची जाणीव होईल.

चैतन्य प्रेम | Updated: May 16, 2017 1:36 AM

 

साक्षीभाव आला की आपण मायेच्या प्रभावाखाली कसं जगत आहोत, याची जाणीव होईल. या जाणिवेनंच मायेच्या प्रभावातून सुटण्याची धडपड सुरू होईल. थोडक्यात साक्षीभाव आल्यानं आपल्या जगण्यातील मायेचं ज्ञान होईल. म्हणजेच आपल्या जगण्यातील जे अज्ञान आहे, त्याचं ज्ञान होईल. पण हे जे ज्ञान आणि अज्ञान आहे तेदेखील या जन्माच्या देहाभोवती केंद्रित जगण्यालाच चिकटून आहे! त्यामुळे ‘देहच मी’ ही जाणीव लोपली की हे ‘ज्ञान’ही संपेल, ‘अज्ञान’ही ओसरेल! मग काय उरेल? समर्थ म्हणतात, ‘‘हे च्यारी देह निरसितां विज्ञान। परब्रह्म तें।।’’ हे चारही देह म्हणजेच या चारही देहांचा पगडा ओसरेल तेव्हा एका परब्रह्माची जाणीव उरेल. हे ‘परब्रह्म’ म्हणजे सद्गुरूच! समर्थ रामदास ‘दासबोधा’च्या १७व्या दशकातील ‘तत्त्वनिरूपण’ नामक आठव्या समासात म्हणतात की, ‘‘विचारें चौदेहावेगळें केलें। मीपण तत्त्वांसरिसें गेलें। अनन्य आत्मनिवेदन जालें। परब्रह्मीं।।’’ साक्षीभाव हा विचाराच्या पाठबळाशिवाय दृढ होत नाही. पण मुळात ‘विचार’ म्हणजे, जो व्यापक अशा भगवंताशी जोडला आहे, म्हणजेच संकुचित ‘मी’च्या जोखडातून सुटून सर्वव्यापी भगवद्भावात स्थिर आहे तो! बाकी माणसाचा विचार हा त्याच्या देहभावालाच चिकटून असतो. मोह, आसक्ती वा भयापायी तो वेगानं अविचारातच रूपांतरित होतो. जेव्हा व्यापकाचं भान येतं तेव्हा व्यापकाच्या कृपेची जाण येते, मग भाव जागृत होतो. मग मूळ अज्ञान (कारण) उकलतंच नि त्यामुळे सूक्ष्म व स्थूल देहांच्या आसक्तीचा निरास होतोच, पण अनंत जन्माचं महाकारण असलेल्या वासनामोहांचीही जाणीव होते. पण एवढय़ानं ‘मी’पणा जात नाही! ज्या वासनेत आपला जन्म झाला त्या वासनेतून मुक्त होणं सोपं नाही. इथं मुक्त होण्याचा अर्थ वासनेच्या गुलामीतून मुक्त होता येणं, हा आहे, हे लक्षात घ्या. वासनेचा गुलाम होऊन त्यापायी ठेचकाळून दु:ख भोगण्यापेक्षा त्या वासनेवर ताबा मिळवून जगता आलं तर ते खरं स्वातंत्र्य. पण हे स्वबळावर शक्य आहे  का? सद्विचारांच्या आधारावर चार देहांची जण येईलही, मन त्यापासून विलग होऊ  लागेलही, पण ‘मी’पणा गेला नसल्यानं सूक्ष्मपणे सगळ्यांत अडकूनही ‘मी’ मनानं मुक्त झालो, असा भ्रम निर्माण होईल!  ‘मला तत्त्वाचं ज्ञान झालं आहे,’ या ज्ञानातल्या ‘मी’पणाचाही लोप व्हायला हवा असेल तर परब्रह्माशी अनन्य आत्मनिवेदन झालं पाहिजे! अर्थात सद्गुरूंशी पूर्ण एकरूपता साधली पाहिजे..  हा जो ‘आत्मनिवेदन’ शब्द आहे ना तो काय सूचित करतो? तर जसे आहात तसे सद्गुरूंला सामोरं जा.. जे नाही आहात ते दाखवायचा प्रयत्न करू नका, मन आणि चित्त प्रपंचात रुतलं असताना तोंडानं आत्मसाक्षात्कारासाठीच आपल्याकडे आलो आहे, असं पाखण्ड ठेवू नका. काही जण तर यापुढचं धाडस करतात आणि परमार्थाचाच मुखवटा धारण करून सद्गुरूंला प्रपंचात खेचू पाहतात! तुम्ही सांगाल तेच करीन, असा पवित्रा घेत प्रापंचिक बाबतीत काय करावं नि काय करू नये, तेवढंच विचारतात. म्हणजे प्रपंचात अडचणी नकोत! खरं आत्मनिवेदन म्हणजे खरी शरणागती.. जीवनाबद्दलची तक्रार संपणं.. जे आहे त्याचा स्वीकार करीत मन, चित्त सद्गुरू बोधातच रमणं! अशी स्थिती म्हणजे खऱ्या विचारांची स्थिती व खरा विचार सुरू होतो तेव्हाच खरा विवेकही अंगी बाणू लागतो. म्हणजे जीवनात अडीअडचणी असणारच. त्यांना सामोरं जाताना मनाची शक्ती टिकवून ठेवण्याची आणि येईल त्या परिस्थितीला तोंड देताना मनाचं समाधान आणि स्थिरता टिकवून ठेवण्याची प्रार्थना केवळ सद्गुरूंना केली पाहिजे, हे समजू लागणं हे विवेकाचं लक्षण आहे. या विवेकानं काय होतं? समर्थ म्हणतात, ‘‘विवेकें चुकला जन्ममृत्यू। नरदेहीं साधिलें महत्कृत्य। भक्तियोगें कृतकृत्य। सार्थक जालें।।’’

चैतन्य प्रेम

First Published on May 16, 2017 1:36 am

Web Title: samarth ramdas philosophy samarth ramdas dasbodh