News Flash

१४३. भक्त-रक्षण

व्यावहारिक जगातल्या व्यावहारिक गोष्टीच्या सिद्धतेसाठीही इतकं अवधान आवश्यक असतं आणि ते शक्यही असतं

 

अंत:करणात विकार किंवा देहगत वासना उसळल्या तरीही नामस्मरण सोडता न येणं, हे सोपं जाऊ दे, शक्य तरी आहे का? तर अर्थातच ते सोपं नाही, पण तरीही विकार आणि वासनांच्या प्रभावातून दूर झाल्याशिवाय   व्यावहारिक जगातदेखील कोणतीही ‘साधना’ होऊच शकत नाही. एखादा मोठा शोध लागतो, त्यासाठी त्या शास्त्रज्ञानं जी तपस्या केली असते, त्याच्या मनाची जी धारणा तयार झाली असते, ती त्यानं स्वत:च्या मनोवेगांवर ताबा मिळवल्याशिवाय शक्य असते का? बरं. तेही जाऊ दे एकवेळ. समजा त्याच्या डोक्यात त्याच्या संशोधनाचेच विचार घोळत आहेत. तर तो मित्रांसोबत पार्टीही करील, पत्नीबरोबर रममाणही होईल, मुलांबरोबर खेळण्याचा आनंदही लुटेल, तरीही त्याच्या मनातला संशोधनाचा विचार कधीच दुरावणार नाही. मग जर व्यावहारिक जगातल्या व्यावहारिक गोष्टीच्या सिद्धतेसाठीही इतकं अवधान आवश्यक असतं आणि ते शक्यही असतं, तर नामसाधनेत ते शक्य का नसावं? यातली खरी अडचण ही आहे की आध्यात्मिक साधनेला पावित्र्याचं स्वाभाविक वलय आहे आणि देहगत विकारांची पूर्ती ही कितीही स्वाभाविक वाटली तरी तिची सांगड साधनेसारख्या पवित्र गोष्टीशी घालणं मनाला कदापि पटणारं नाही. पण जर अगदी सूक्ष्मपणे विचार केला की जाणवेल, आपलं मन विकारांपासून, वासना अर्थात कामनांपासून कधीच मुक्त नसतं. मन तसं मुक्त झालं की मग मी साधना करीन, असं म्हटलं तर साधना कधीच होणार नाही. त्यामुळेच समर्थ सांगत आहेत, बाबा रे.. मनात कोणतेही शुद्ध-अशुद्ध, पवित्र-अपवित्र विचार येऊ देत, नामाला सोडू नकोस. नामस्मरणाला सोडू नकोस. या मुद्दय़ावरच मनोबोधाच्या २९व्या श्लोकाचा सांधा जुळत आहे! २८व्या श्लोकात आपण पाहिलं की, जो नेमस्त आहे, नेमात सदोदित रत आहे त्यालाच सद्गुरू कसा पाठीराखा आहे, याचा सत्यत्वानं अनुभव येईल. मग हा नेम म्हणजे काय त्याचा विचार आपण गेला आठवडाभर केला आणि या नेमातल्या सातत्याचंच फळ २९वा श्लोक सांगतो! हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ पुन्हा एकदा पाहू. श्लोक असा आहे:

पदीं राघवाचे सदा ब्रीद गाजे।

बळें भक्तरीपूशिरीं कांबि वाजे।

पुरी वाहिली सर्व जेणें विमानीं।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।। २९।।

प्रचलित अर्थ : रामाच्या पायातला तोडर भक्तरक्षण करण्याचे रामाचे ब्रीद त्रिभुवनाला गर्जून सांगत आहे. भक्तांचे जे शत्रू असतील त्यांच्या मस्तकावर रामाच्या हातातला धनुष्यदंड ताडकन् बसतो आणि त्या शत्रूंचा चुराडा होतो. रामाचा दरारा असा आहे की काळाची सत्ता असूनही अयोध्यापुरीतील सर्व लोकांना रामाने विमानातून आपल्या साकेत धामी कायमचे नेले.

आपण काय पाहिलं? जो सदोदित नेमात आहे, नेमस्त आहे त्याचं सद्गुरू रक्षण करीत असतात, त्याची पाठराखण करीत असतात. आता विकारांच्या झंझावातात असूनही जेव्हा साधक नामालाच चिकटून राहाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सद्गुरू काय करतो, हे या श्लोकात अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे! ज्याच्या मुखी सदोदित त्या भगवंताचंच नाम गर्जत आहे, ज्याची पावलं सदोदित सद्गुरूने दाखवलेल्याच मार्गावर पडत आहेत, अशा साधकाचं वर्णन म्हणजे.. पदीं राघवाचे सदा ब्रीद गाजे! हा भक्त सदोदित रामनामातच दंग आहे, सद्गुरूप्रदत्त साधनेतच दंग आहे.. अशी ज्याची अवस्था आहे त्याच्या शत्रूंवर हा सद्गुरूच नेम धरतो आणि त्या शत्रूंचा नि:पात करतो! बळें भक्तरीपूशिरीं कांबि वाजे! या दोन्ही चरणांचा अर्थ फार गूढ आहे आणि सद्गुरूंच्या कार्याची महती सांगणारा आहे. आता भगवंतावाचून जो कदापि विभक्त राहू इच्छित नाही, त्याचे शत्रू तरी कोण आहेत हो?

-चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2016 3:35 am

Web Title: sant ramdas swami philosophy 11
Next Stories
1 १४२. नेम-साधना : ५
2 १४१. नेम-साधना : ४
3 १४०. नेम-साधना : ३
Just Now!
X