नामाच्या अभ्यासानं खरा आंतरिक पालट झाला की बाह्य़ पालटाला वेळ लागत नाही, पण अधेमधे उसळणाऱ्या माझ्याच सुप्त विरोधामुळे हा आंतरिक पालटच खूप वेळ घेत असतो. अस्तेय आणि अपरिग्रह हे दोन टप्प्पे तर मोठय़ा परीक्षेचे असतात. दुसऱ्याकडे जे आहे त्याचा लोभ न वाटणं आणि आपल्याकडे जे आहे त्यात समाधान वाटणं, हे ते टप्पे आहेत. नामाच्या प्रामाणिक अभ्यासानं ही स्थिती येऊ  लागते आणि मग यमातलं जे पाचवं तत्त्व ‘ब्रह्मचर्य’ ती स्थिती साधते. ब्रह्मचर्य म्हणजे परमभावातच विचरण करणं. आता सद्गुरू हाच परब्रह्म आहे आणि सद्गुरूभावात स्थित होणं, हेच ब्रह्मचर्य आहे, ही जाणीवही नामानंच साधेल आणि खरं ब्रह्मचर्य आचरणात येईल. मग नामानं आपल्या जगण्याचं निरीक्षण-परीक्षण सुरू होतं. स्नानानं शरीर स्वच्छ करतो खरं, पण शरीरासारखंच मनही स्वच्छ व्हायला हवं, ही तळमळ वाढत जाते. त्यातून अंतर्मन स्वच्छ होणं हा ‘शौच’ नावाचा पहिला नियम साधण्याचा प्रामाणिक अभ्यास सुरू होतो. आपलं मन खऱ्या अर्थानं निर्मळ नाही आणि म्हणून मनाच्या ताब्यात राहून आपण बोलू नये ते बोलतो, करू नये ते करतो आणि वागू नये तसं वागतो, हे जाणवू लागतं. मग जीवन देहबुद्धीनुसार नव्हे, तर आत्मबुद्धीच्या प्रकाशात जगू लागावं, ही इच्छा होते. त्या आत्मबुद्धीच्या प्राप्तीसाठी साधना सुरू होते. या साधनेसाठी देहाला आणि मनाला जे जे कष्ट होतील, ते ते स्वीकारण्यास मन तयार होतं. जो सदैव आत्मस्वरूपाशी एकरूप आहे, परमभावात निमग्न आहे, त्याच्याच आधारावर आत्मबुद्धी जागी होईल, ही जाणीव होते.

अशा आत्मस्थ सद्गुरू बोधानुसार आचरणाचा अभ्यास सुरू होतो. त्यांच्या कृपायोगे जे जे प्राप्त झालं आहे त्यात तृप्ती वाटू लागते. तप आणि संतोष, हे दोन नियम यायोगे आचरणात येतात. या आत्मबुद्धीच्या प्राप्तीचा जो जो उपाय संतांच्या ग्रंथातून वर्णिला आहे, तो तो अमलात आणण्यासाठीचा ‘स्वाध्याय’ सुरू होतो. मग सद्गुरूच्या रूपाचं अनुसंधान सुरू होतं आणि ईश्वर प्रणिधान हा पाचवा नियमही आचरणात येतो. एकदा ही मनाची बैठक तयार झाली की यालाच ‘आसन’ सिद्ध झालं, असं म्हणतात. मग सद्गुरूंचा विचार तोच माझा विचार, त्यांची इच्छा तीच माझी इच्छा, त्यांचा हेतू तोच माझा हेतू, अशी आंतरिक समता झाली की प्राण अधीर होणं थांबतं आणि ‘प्राणायाम’ सिद्ध होतो. मग बहिर्मुख मन अंतर्मुख होऊ  लागतं. या अंतर्यात्रेच्या आड जे काही येतं, त्याचा त्याग करणारा ‘प्रत्याहार’ साधतो. मग काया, वाचा आणि मनानं एका सद्गुरू मार्गानं जाण्याचा अटळ निर्धार होतो. हीच खरी धारणा. मग सदोदित एकच ध्यास अर्थात ‘ध्यान’ सहजतेनं साधतं. मग पूर्ण आंतरिक समानतेची अशी खरी समाधी स्थिती लाभते.

तर एका नामानंच असा भक्ती-योग साध्य असताना ते नाम सोडून साधनेची अन्य आटाआटी कशाला, असाच सवाल करीत समर्थ जणू म्हणत आहेत की, ‘‘जया नावडे नाम त्या यम जाची!’’ पण साधंसोपं नाम घेऊन काय साधणार, असंच मनाला वाटतं. त्यावर सावध करताना समर्थ म्हणतात, ‘‘विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची!’’ साधनेचं दृश्यरूप किंवा बाह्य़रूप महत्त्वाचं नाही, ती साधना जो सूक्ष्म आंतरिक पालट घडवत असते, तो महत्त्वाचा आहे. तेव्हा एवढय़ाशा नामानं काय होणार, असं वाटलं तर तर्काची मालिकाच सुरू होईल. तर्कानं वितर्क, वितर्कानं कुतर्क अशी गत होईल. मग जीवनातून उरलंसुरलं समाधान तर ओसरेलच, पण त्या समाधानाचा मार्गही कायमचा बंद होईल. जीवनाला नरकाची दशा प्राप्त होईल. उंदीर जसं ‘ची ची’ करतो तसा कुतर्कानं तयार झालेला कुबुद्धीचा उंदीर सदोदित मन, चित्त आणि बुद्धी कुरतडत राहील.

चैतन्य प्रेम