‘मनोबोधा’च्या १५१व्या श्लोकाच्या पहिल्या दोन चरणांत समर्थ रामदास एक मोठं आध्यात्मिक सत्य.. रहस्य सांगत आहेत. हे चरण पुन्हा एकदा वाचू.. समर्थ म्हणतात, ‘‘खरें शोधितां शोधितां शोधताहे। मना बोधितां बोधितां बोधताहे।।’’ आता आधीच सांगितल्याप्रमाणे या दोन चरणांत असं काय रहस्य लपलं आहे, हे पटकन कळत नाही. पण इथं शोधणं आणि बोधणं, या दोन क्रियांचा त्रिवार उल्लेख आहे. ‘शोधितां शोधितां शोधताहे,’ या चरणात दोनदा ‘शोधितां’ हा शब्द का आला आहे? तसंच, ‘बोधितां बोधितां बोधताहे,’ यात ‘बोधितां’ हा शब्द दोनदा का आला आहे? तर, पुन्हा हे दोन चरण नीट वाचू आणि त्याआधी गेल्या काही श्लोकांचा विषयही लक्षात घेऊ. ‘मना संत आनंत शोधूनि पाहे,’ हे गेल्या काही श्लोकांचं सूत्र होतं. म्हणजेच हे मना, संतजनांचा सहवास साधून घे, पण त्यायोगे त्या संतांमध्येही जो अनंत आहे, जो खरा सद्गुरू आहे, त्याच्या प्राप्तीची इच्छा धर. त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर. त्याचा शोध घे. आता काहींना वाटेल की, सद्गुरूंचा शोध आपल्या बुद्धीनुसार घेऊ नका, असंही एकदा सांगितलं गेलं होतं, मग इथं पुन्हा शोधावर भर का? तर सूक्ष्म फरक असा की, जो सत्संगरहित आहे किंवा बोधापासून वंचित आहे, तो स्वबळावर असा शोध घेऊ शकत नाही. पण जो सत्संगात आहे, संतजनांचा बोध जो ऐकतो, त्याच्या मनात या शोधाची एक पृष्ठभूमी तयार झाली असते. मग असा साधक अनेक ग्रंथ वाचतो, त्यातून काही भावसंस्कार ग्रहण करतो, संतजनांच्या सहवासात राहून अध्यात्माचे अनेक संस्कार ग्रहण करीत असतो.. पण तरी हे सारं अपूर्णच असतं. त्या अपूर्णत्वाचं भान मात्र आलं असतं आणि त्यासाठीच पूर्णत्वाची ओढ जागी झाली असते. त्या ओढीतूनच शोध सुरू झाला असतो. जीवनातल्या एकूणच अपूर्णतेचं कारण उकलण्यापासून हा शोध सुरू होतो. या अशाश्वत जीवनात काही शाश्वत आहे का, अंतिम सत्य म्हणून काही आहे का, या प्रश्नापासून हा शोध  सुरू होतो. हा शोध जेव्हा सुरू होतो तेव्हा काय घडतं? समर्थ सांगतात, ‘‘खरें शोधितां शोधितां शोधताहे।’’ जीवनातलं सत्य जेव्हा शोधायला सुरुवात होते (खरें शोधितां) तेव्हा हा शोध घेणाऱ्याचा शोध ते सत्यच घेऊ लागतं (शोधितां शोधताहे)! जो सद्गुरूचा खऱ्या तळमळीनं शोध सुरू करतो तेव्हा खरा सद्गुरूच या शोधकर्त्यांचा शोध घेतो! हा तळमळीनं शोध घेणारा जेव्हा संतजनांचा जो काही बोध आहे तो ग्रहण करून आपल्या मनाला बोधाशी एकरूप करू पाहतो (मना बोधितां) तेव्हा हा बोध आत्मसात करू पाहणाऱ्याला त्याच्या अंतर्मनातून तो सद्गुरूच बोध करू लागतो (बोधितां बोधताहे)! आता हे पटकन समजणार नाही, पण ज्यांना ज्यांना सद्गुरूप्राप्तीची ओढ होती आणि सद्गुरूंपर्यंत पोहोचता आलं त्यांना हे स्वानुभवावरून पटेल. आता आणखी एक विशेष गोष्ट अशी की, हा सद्गुरू देहातलाच असेल, असंही नाही. काहीजण अनपेक्षितपणे कुठल्यातरी सद्गुरूच्या समाधीस्थानीही पोहोचले असतील आणि तिथेही आपल्याला सद्गुरू मिळाला, हा भाव मनात जागा झाला असेल. या गावाचं नावही आपण कधी ऐकलं नव्हतं, सहज म्हणून आलो आणि आजवर जे शोधत होतो ते समाधान इथं आहे, असं जाणवलं, हा त्यांचा अनुभव असेल. नंतर तर, आपण इथं ‘सहज’ आलो, असं वाटत असलं, तरी ते येणं जणू घडवलं गेल्यासारखं, पूर्वनियोजन केल्यासारखंच झालं आहे, असंही वाटू लागेल. त्याच सद्गुरूंचा बोध आधीही ऐकला होता, वाचला होता, पण आता तो अधिक नीटपणे कळू लागला आहे, असंही वाटू लागतं. कारण शोध घेणाऱ्याचा शोध तोच पूर्ण करतो आणि बोधाची आस असलेल्याला आतून बोध तोच करवत असतो, हेच खरं!

चैतन्य प्रेम