07 April 2020

News Flash

१. पडछाया

एक माणूस रस्त्यानं चालला होता. अचानक त्याचं लक्ष सावलीकडे गेलं.

आपली सावली आता सुबक रस्त्यावर पडते आहे, एवढंच काय ते सुख होतं! काळ जाऊ लागला.

एक माणूस रस्त्यानं चालला होता. अचानक त्याचं लक्ष सावलीकडे गेलं. आपण सुबक गुळगुळीत रस्त्यावरून चालत आहोत. आपली सावली मात्र रस्त्याकडेच्या ओबढधोबड दगडांवर, खाचखळग्यांत, काटय़ाकुटय़ांत आणि अनेकदा गटारांतही पडत आहे, हे पाहून त्याला फार वाईट वाटलं. बिचाऱ्या सावलीला किती हा त्रास? मग तो स्वत: रस्त्याकडेच्या ओबडधोबड दगडांतून, खाचखळग्यांतू, काटय़ाकुटय़ांतून आणि अनेकदा गटारातूनही चालू लागला. आपली सावली आता सुबक रस्त्यावर पडते आहे, एवढंच काय ते सुख होतं! काळ जाऊ लागला. दर दिवसाचा हा क्रम मात्र कायम होता. हळूहळू मात्र त्याला दु:ख वाटू लागलं. आपण आपल्या सावलीला इतकं जपतो, तिची इतकी काळजी घेतो, तरी आपल्याच वाटय़ाला इतकं दु:खं का? आपल्याच नशिबी दगडधोंडय़ांत ठेचकाळणं का? काटय़ाकुटय़ांचं रूतणं का? गटारातल्या घाणीनं माखणं का? सावलीच्या सुखासाठी तळमळणाऱ्या माझ्यासारख्याच्या जीवनात सुख का नाही? समाधान का नाही?
आपलीही अशीच गत नाही का? देहाची जशी सावली तशाच भ्रम, मोह, आसक्ती या देहबुद्धीच्या सावल्याच नाहीत का? या भ्रम, मोह आणि आसक्तीतून ‘मी’ आणि ‘माझे’पणानं आपण माणसांमध्ये गुंतत राहातो, भौतिकाच्या आधारात अडकून पडतो.. हा सारा सावल्यांचाच तर खेळ आहे.. सावलीची काळजी घेत काटय़ाकुटय़ांत ठेचकाळणाऱ्या त्या माणसाप्रमाणे या देहबुद्धीच्या सावल्यांच्या सुखासाठी धडपडण्यात आयुष्य सरत आहे, पण ही सावली ज्याची आहे त्याच्या खऱ्या सुखाची प्राप्ती कशी होईल, याचं भान तरी आहे का? सावली खरी की ती ज्याची आहे तो खरा?
सावली देहासोबत आहे खरी, पण ती खरी नाही.. मिथ्याच आहे.. अगदी त्याचप्रमाणे या देहासोबत जन्मलेली नाती; मग ती रक्ताची असोत की मनाची असोत.. हा देह ज्या जगात वावरतो ते जग.. हा देह ज्या परिस्थितीत जगत असतो ती परिस्थिती.. हे सारंही ‘मी’ आहे म्हणूनच त्या ‘मी’सोबत सावलीसारखं आहे.. या सावल्यांच्या खेळात आपण किती गुंततो.. किती भरडले जातो.. हा गुंता उत्पन्न होतो तो मनातच.. मनच तो वाढवत राहातं.. त्यामुळे सावलीचं सावलीपण जाणून ती सावली ज्याची आहे, त्या ‘मी’च्या खऱ्या अखंड सुखप्राप्तीसाठी, खऱ्या कल्याणासाठी खरे प्रयत्न करायचे असतील, तर मनालाच हाताशी धरावं लागतं. खरा आधार, खरा मार्ग, खरी साधना याशिवाय खरं सुख, खरं कल्याण लाभूच शकत नाही. त्या खऱ्या सुखाच्या प्राप्तीसाठी खऱ्या आधाराचा, खऱ्या मार्गाचा, खऱ्या साधनेचा योग मनाला घडावा लागतो. श्रीसमर्थ रामदास स्वामींनी ‘मनाचे श्लोक’ अवतरित करून हाच मनोयोग प्रकाशित केला आहे. आपल्या वर्षभराच्या चिंतनाचा हाच विषय आहे.

– चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2016 4:43 am

Web Title: shadow of human
Just Now!
X