समर्थ सांगतात, ‘‘जनीं सूखसंवाद सूखें करावा!’’ संतजनांशी तर्क आणि विकल्प लढवीत वादविवाद तर घालूच नये, पण ‘सूखें’ ‘सूखसंवाद’ही करावा! आता या दोन्हीत ‘सुख’ हा शब्द ‘सूख’ असा दीर्घ आला आहे. म्हणजे हे सुख दीर्घ टिकणारं आहे, अखंड टिकणारं आहे.. दीर्घ टिकणाऱ्या सुखाची प्राप्ती कशी व्हावी, यासाठी सज्जनांशी जो संवाद साधायचा आहे तो साधताना साधकाची आंतरिक स्थिती कशी असली पाहिजे, याचं ‘सूखें करावा,’ हे सूचन आहे. भौतिकात काही मिळवायचं आहे, मनातली आस सुकून गेली असली पाहिजे. उलट भौतिकातलं कितीही आणि काहीही मिळालं तरी त्यातून अखंड टिकणारं सुख काही लाभत नाही, ही जाणीवही झाली असली पाहिजे. आता ही जाणीव काय अचानक किंवा एकदम निर्माण होते का? तर नाही.. आणि म्हणूनच तर आधीच्या श्लोकात सज्जनांच्या योगानं भौतिकाकडे ओढ असलेल्या मनाला त्याचे क्रियाकलाप पालटण्यास समर्थानी बजावलं आहे. (मना सर्वदा सज्जनाचेनि योगें। क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे।). म्हणजेच आता जर मनाच्या सवयी बदलण्याचा अभ्यास सुरू झाला असेल, तर खऱ्या सुखाच्या प्राप्तीचा उपाय विचारताना मनातल्या सुखाच्या भ्रामक कल्पनाही बदलल्या असल्या पाहिजेत. भौतिकाचा, जगाचा प्रभाव इतक्यात संपणार नाही, हे खरं. उलट आपल्या साधनेत, अभ्यासात हे जग वारंवार मोडता घालू लागेल. आपल्या मनात खोलवर असलेले अनेक संस्कार उफाळून येतील आणि त्या झंझावातात तग धरणं कठीणही वाटेल. पण या सर्वावर मात करण्यासाठी एकच आधार आहे तो म्हणजे संतजनांचा संग! आणि आधीच म्हटल्याप्रमाणे हा जो संग आहे तो केवळ देहावर अवलंबून नाही. खऱ्या सज्जनाचा सहवास मिळणं, कळणं आणि टिकणं हे कठीणच आहे. तेव्हा त्यांचा जो बोध आहे, त्याचा संग हा खरा संग आहे. हा खरा योग आहे. तो साधण्याचा अभ्यास सुरू असेल तर जगाचा प्रभाव संपला नसला तरी त्या जगामागे, सुखाच्या भ्रामक कल्पनांमागे वाहवत जाणं तरी कमी होऊ लागलं असेल. तेव्हा अखंड टिकणाऱ्या सुखासाठीचा संवाद साधताना, आपल्या मनातल्या सुखाच्या व्याख्या तुटल्या पाहिजेत. अमुक एक झालं तरच मी सुखी होईन, अमुक टळलं तरच मी सुखी होईन.. अशा कारणांवर अवलंबून असलेल्या सुखाच्या व्याख्या संपल्या पाहिजेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उलट परिस्थिती कोणतीही आली तरी सुखी राहाता येतं, हा संतजनांचा अनुभव माझाही अनुभव व्हावा.. म्हणजेच आंतरिक सुख अखंड टिकावं, कोणत्याही परिस्थितीत टिकावं, ही स्थिती प्राप्त होण्यासाठी काय उपाय केला पाहिजे, कोणती साधना केली पाहिजे, कोणता अभ्यास केला पाहिजे, हे विचारताना आपला पवित्रा अत्यंत प्रामाणिक असला पाहिजे. प्रश्न तर विचारतोय, पण उत्तर ऐकण्यात फारसं स्वारस्य नाही. त्या उत्तरानुसार स्वत:मध्ये बदल घडवण्यात स्वारस्य नाही, असं जर असेल तर त्या ‘सुखसंवादा’ला काय अर्थ आहे? त्याचा काय उपयोग आहे? केवळ तात्पुरता बौद्धिक आनंद घ्यायचा आणि तिथून पाय निघताच पूर्ववत निर्बुद्ध व्हायचं, असं असेल तर तो सत्संग निर्थक आहे! सज्जनांकडून सुखप्राप्तीचा मार्ग कळला, साधना समजली, अभ्यास कोणता आणि कसा करायचा, हे उमजलं, पण त्या कशावरही विश्वासच बसला नाही तरी काय उपयोग? संतांना ते जमलं कारण ते अवतारीच होते हो, ही ढाल वापरून निष्क्रिय राहाण्यात काय हंशील? मला उत्तम पोहोण्याची इच्छा आहे, पण मी पाण्यात म्हणून कधी उतरणार नाही.. किनारा सोडणार नाही.. असाच ठाम निश्चय असेल तर पोहोणं जमणार नाही आणि अखेर बुडावच लागणार!  तेव्हा सज्जनांच्या संगतीचा योग लाभला आहे, तर खरा लाभ घ्या. खऱ्या सुखाच्या प्राप्तीसाठीचा खरा उपाय विचारा आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करा!

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Status of eternal happiness
First published on: 03-07-2017 at 01:08 IST