20 November 2017

News Flash

४२१. शेंगदाणे आणि राजगिरा!

प्रत्येक व्यक्ती ही स्वत:च्या सुखाला अग्रक्रम देणारीच असते

ऑनलाइन टीम | Updated: August 30, 2017 2:35 AM

जीवनात येणाऱ्या  व्यक्तींमध्ये आपण सुख शोधण्याची धडपड करतो. व्यक्ती आणि वस्तू आपल्या सुखाचा आधार असतात. पण या वस्तू वा व्यक्ती या काळाच्याच आधीन असतात. त्यामुळे बदल, झीज, हानी हा काळाचा परिणाम त्यांच्यावर होतो. त्यामुळे त्यांच्या आधारावर अवलंबून असलेलं सुख हे अस्थिरच असतं. बरं वस्तू निर्जीव असतात, पण व्यक्ती म्हणजे स्वतंत्र भावविश्व असतं. ज्याची त्याची स्वतंत्र भासणारी कल्पना, धारणा आणि भावना असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती ही स्वत:च्या सुखाला अग्रक्रम देणारीच असते. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला आपल्या सुखाचा आधार मानणं अवास्तविक असतं. ही जाण आपली आपल्याला येत नाही.

सद्गुरूंच्या बोधातून ही समज येते. जे जे दृश्य आहे ते ते ओसरणारं आहे. त्यामुळे त्यात जीव गुंतवून जगणं म्हणजे सतत अशाश्वत अशा आधाराला शाश्वत मानून विसंबून राहणं आहे. व्यक्तिमात्रावर, वस्तुमात्रावर प्रेम जरूर करावं, पण त्यात गुंतून राहू नये, ही समज सद्गुरूच बिंबवतात. गंमत म्हणजे आपलं ‘प्रेम’ही असं असतं की, एकदा गुंतणं थांबलं की आपल्याला प्रेम करणंही साधत नाही! कारण आपण खरं प्रेम करीतच नाही. आपलं प्रेम म्हणजे सौदा असतो. मी अमुक केलं तर मला अमुक मिळालंच पाहिजे, ही वृत्ती असते. ते मिळतंय की नाही, इकडे सततची नजर म्हणजे गुंतणं असतं! प्रेम आहे ना? मग ते करीत राहून मोकळं राहा, ही वृत्ती नसते. आपण जेवढं प्रेम केलं तेवढी त्याची परतफेडही झालीच पाहिजे, या भावनेनुसारचा सततचा पहारा म्हणजे आपलं प्रेम असतं. गुंतायचं नाही आणि प्रेम तेवढं करायचं म्हणजे पहारा थांबवायचा, तराजू बाजूला ठेवून द्यायचा, सौदा नाही-अपेक्षा नाही! अशा प्रेमात आपल्याला कुठे गोडी वाटते! तेव्हा प्रेमाच्या अशा भ्रामक धारणेतून, कल्पनेतून सद्गुरू आपल्याला सोडवतात. जगात कर्तव्य जरूर करा, प्रेम जरूर करा, पण कुठंही अडकू नका, गुरफटू नका, गुंतू नका. कारण जिथं गुंतणं आहे तिथं अखेरीस गुंताच आहे.

जिथं गुरफटणं आहे तिथं फरफटणंच आहे, जिथं अडकणं आहे तिथं मनाचं तडकणंच आहे! खरं प्रेम माणसाला निस्वार्थ करील, स्वतंत्र करील, आत्मनिर्भर करील. जे परावलंबी करतं, परतंत्र करतं आणि स्वार्थप्रेरित करतं ते प्रेम नसतं. ते मनोनिर्मित, मनोकल्पित भावनेचं प्रसरण असतं. तेव्हा सद्गुरू मला अंतर्मुख व्हायला शिकवतात. जीवनाचं, त्यातल्या माणसांचं, वस्तूंचं खरं अशाश्वत स्वरूप काय आहे, हे दाखवतात. या वस्तू-व्यक्तींच्या आधारावर जे जे ‘सुख’ मिळालं त्यानं तृप्ती नव्हे अतृप्तीच वाढत गेली, हे जाणवून देतात. खरं शाश्वत सुख हे जे शाश्वत आहे त्याच्याच आधारावर शक्य आहे, याची जाण निर्माण करीत अशाश्वत काय आहे, याचा शोध घ्यायची प्रेरणा देतात. कारण शाश्वत काय आहे, हे शोधण्याचा सोपा मार्ग म्हणजे अशाश्वत काय आहे, हे आधी पाहणं हाच आहे. श्रीगोंदवलेकर महाराजांचं एक रूपक आठवतं. समजा एकत्र झालेले शेंगदाणे आणि राजगिरा वेगळं करायचं असेल, तर आपण प्रथम शेंगदाणे वेगळे काढतो. राजगिरा आपोआप वेगळा होतोच. म्हणजेच, स्थूल जे आहे ते ओळखणं, वेगळं करणं सोपं असतं. एकदा ते वेगळं केलं की सूक्ष्म जे आहे ते असतंच आणि उमगतंच! अगदी त्याचप्रमाणे अशाश्वत जे जे आहे ते वेगळं केलं की जे शाश्वत आहे ते आपोआप जाणवू लागेल! मग लक्षात येईल की जगणं अशाश्वत आहे.. जगण्याची शाश्वती नाही, पण जीवन-प्रवाह शाश्वत आहे.. ते जीवन ज्या चतन्य शक्तीच्या आधारावर उमलतं ती चतन्य शक्ती शाश्वत आहे. परमात्मा हे त्या शक्तीचं निराकार रूप आहे आणि त्या एकातच जो सदैव लीन असलेला सद्गुरू हे त्या शक्तीचं साकार रूप आहे!

-चैतन्य प्रेम

 

First Published on August 30, 2017 2:35 am

Web Title: thoughts of love and happiness