नवरा होणे सोपे नाही…

नवरा-बायकोच्या आयुष्यातील मजेशीर किस्सा. सकाळी नवऱ्याने आपल्या बायकोला उठवलं.

नवरा :- चल उठ. आपण योगा क्लासला जाऊया.

बायको :- का हो… मी तुम्हाला एवढी लट्ठ दिसते की काय ?

नवरा :- तसं नाही गं. योगा हे निरोगी राहण्यासाठी, आपल्या फिटनेससाठी छान असतं.

बायको :- म्हणजे मी अनफिट आहे. आजारी आहे. असं म्हणायचंय तुम्हाला.

नवरा :- राहू दे, नसेल उठायचं तर!

बायको :- याचा अर्थ काय ? तुम्ही मला आळशी समजता की काय ?

नवरा :- हे बघ, तुझा गैरसमज होतोय.

बायको :- अरे देवा! म्हणजे मला अक्कलच नाही. इतकी वर्ष झालीत आपल्या लग्नाला आणि तुम्ही म्हणताय की, मी तुम्हाला समजूं शकले नाही. माझा गैरसमज होतोय.

नवरा :- अगं मी तसं म्हणलं का…?

बायको :- म्हणजे, मी खोटं बोलतेय ?

नवरा :- ओके! ओके! जाऊ दे, सकाळी-सकाळी वाद कशाला ?

बायको :- मी वाद घालते ? मी वाद घालते ? तुम्हाला वाटतयं मी भांडखोर आहे?

नवरा :- ठीक आहे, मी ही जात नाही फिरायला. योगा कॅन्सल.

बायको :- बघितलत, मुळात तुम्हाला जायचंच नव्हतं. फक्त माझ्या डोक्यावर खापर फोडायचं होतं.

नवरा :- बरं, मी एकटाच जातो. तू झोप आनंदात.

बायको :- जा जा… एकटेच जा. तसंही तुम्ही एकटेच सगळी मौज करता. कधी माझी फिकिर केलीय का तुम्ही.

नवरा :- आता माझं डोकं गरगरतंय, चक्कर येतेय मला.

बायको :- येणारच. स्वार्थी आहात तुम्ही. नेहमी स्वत: पुरताच विचार करता नां. बायकोच्या आरोग्याची अजिबात काळजी नाही तुम्हाला. चक्कर येणारच!

नवरा मौन…

नवरा (मनाशीच) माझं चुकलं कुठे ?