घरात गेल्या गेल्या आईची प्रश्नांची सरबत्ती नेहमीप्रमाणे सुरु झाली. लहान भाऊ ताई मला हे करुन दाखव म्हणत पुढे आला. तर आजी तिच्या तुटलेल्या चष्म्याची काडी दाखवत होती. घरातली मोठी मुलगी असल्याने ती आल्यावर घरातल्या सगळ्यांना काय सांगू नी काय नको होऊन जात असे. तिला मात्र कोणाशीच काहीच बोलायचा मूड नव्हता. अगदी कोणाचं काही ऐकायचाही. पण असे वागून चालणार नव्हते कारण आपल्याला काय झालंय असं जर कोणी विचारलं तर सांगायला ठोस कारणही जवळ नव्हते. आणि खोटं बोलायचंच झालं तर घरातले लोक चेहऱ्यावरुन आपण खोटं बोलतोय हे अगदी सहज ओळखतात याचीही तिला जाणीव होती. तितक्यात तिची शेजारची जिवश्च कंठश्च मैत्रीणही आली. जगातली कोणताही गोष्ट या दोघी एकमेकींशी बोलत नाहीत असं नाही. तासन्तास, दिवसरात्रही कमी पडतील अशी त्यांची मैत्री. मात्र तरीही ऋचाला आता तिच्याशी काहीच बोलावेसे वाटत नव्हते. अचानक असे काय झाले हे न कळाल्याने नम्रताही २ मिनिटे बोलून आपल्या घरी निघून गेली.

Love Diaries : हुरहूर, त्याची आणि तिचीही…

शून्यात बघत बसलेल्या ऋचाच्या डोक्यातून तो कुठे असेल, काय झाले असेल हा विचार मात्र काही केल्या जात नव्हता. कॉलेजला कधीच दांडी न मारणारा, अगदी रविवारी आणि सुटीच्या दिवशीही कट्ट्यावर न चुकता येणारा तो अचानक का बरं आला नसेल, या प्रश्नाने तिचे डोकं भणभणायला लागलं होतं. बरं कोणाकडे चौकशी करावी तर मध्यस्थी करेल असं कोणीच ओळखीचं नव्हतं. एकतर उद्याच्या दिवसाची वाट पाहण्याशिवाय पर्यायही नव्हता. संध्याकाळची कातरवेळ जसजशी जवळ आली तसतशी तिची चिंता आणखीनच वाढायला लागली. त्याच्या न येण्याने तिचे आयुष्य व्यापून टाकले होते. एरवी खरंतर तिने त्याचा कधीच इतका विचार केला नव्हता. तो कॉलेजमध्ये रोज दिसायचा, फारतर तिला पाहायला तो खास त्यांच्या ग्रुपसमोरुन जायचा इतकाच काय तो या दोघांचा मूकसंवाद. पण आज मात्र त्यांच्या एका दिवसाच्या न दिसण्याने आपण इतके कावरेबावरे होऊ असे तिला कधी स्वप्तानही वाटले नव्हते. घरातील सगळ्यांना एव्हाना काहीतरी बिनसलंय हे कळालं होतं. मात्र काय करावं हे न कळाल्यानं कोणीच तिला काही विचारलं नाही आणि तीही सांगायला गेली नाही. घरात पसरलेली स्मशान शांतता मात्र जाणवण्याइतपत होती. कधी एकदा आजची रात्र सरते आणि उद्याचा दिवस उजाडतो असे तिला झाले होते. कधीच एकमेकांशी न बोललेले एकमेकांना चेहऱ्याशिवाय न ओळखणारे हे दोन जीव अचानक इतके कसे काय जवळ येऊ शकतात, असा विचार करतच रात्रीचे तीन कधी वाजले तिचे तिलाच कळले नाही. अखेर काही तासांसाठी तिचा डोळा लागला खरा.

एरवी ७ च्या ठोक्याला न चुकता जाग येणाऱ्या ऋचाला आज घडाळ्यात ९ वाजले तरी जाग आली नाही. कधी नव्हे ते इतकी झोपलीये म्हणून आई आणि आजीनेही तिला उठवले नाही. मग ९ वाजता बेडमधून बाहेर येत तिने भराभर आवरायला घेतले. पुढच्या अर्ध्या तासात स्वारी आवरुन तयार. आईने केलेला नाश्तादेखील न खाता ती तशीच घाईत पायात चप्पल सरकावत निघूनही गेली. कधी एकदा कॉलेजला पोहोचते असे तिला झाले होते. आज तरी तो नक्की येईल या आशेने ती जवळपास धावतच कॉलेजला पोहोचली. एरवी सिनसिअरपणे किमान पहिली दोन ते तीन लेक्चर करणारी ऋचा आज लेक्चरला न जाता आल्यापासूनच कट्टयावर बसून राहिली. आता येईल, मग येईल असे करत जवळपास एक तास होत आला तरी काही तो दिसेना. मग सई आणि मनालीही कट्ट्यावर आल्या. ऋचाचे नेमके काय चालले आहे म्हणून त्यांनी तिला जरा खोपच्यात पण घेतले. पण उघडपणे काही बोलतील तर त्या बाई कसल्या ना. मग तिथेच काहीवेळ टाईमपास करुन निघायचे ठरले. मात्र मॅडमना काही इतक्यात निघायचा मूड नव्हता. पण या दोघींना मात्र जर्मनच्या क्लासला जायचे असल्याने त्यांनी निघायचे ठरवले. इतरवेळी टॉयलेटला जातानाही सोबत लागणारी ऋचा अशी एकटी कट्ट्यावर बसायला कशी काय तयार झाली हे काही केल्या या दोघींना कळेना. पण काहीतरी शिजतंय याचा विचार करतच त्या तिला बाय करुन आपल्या कामाला निघून गेल्या. आता काय मॅडम पुन्हा एकट्याच इकडे-तिकडे बघत बसलेल्या. एव्हाना तो तर नाहीच पण त्याच्या ग्रुपमधलेही कोणी आले नव्हते. शेवटी एक चक्कर मारुन यावी म्हणून ऋचा कट्ट्यावरुन उठली तर तितक्यात तिला त्याचा एक मित्र दिसला.

(क्रमश:)
– तीन फुल्या, तीन बदाम