“राहुलच्या साखरपुड्याला येणारेस ना तू…?” ब्रेकफास्ट सुरू असताना आईनं नीरजला विचारलं. त्याचं उत्तर काय असेल, हे तिला माहिती होतं. तरीही तिनं न राहवून प्रश्न विचारलाच… शेवटी आईचंच काळीज… मुलानं कधीतरी आपल्याला हवं तसं उत्तर द्यावं, अशी तिची इच्छा होती.

“आई तुला माहितीये ना… माझी कॉन्फरन्स आहे त्यादिवशी… मला नाही जमणार… मी नंतर त्या दोघांना भेटायला जाईन…” नीरजनं कॉफीचा कप टेबलवर ठेवला. मोबाईलमध्ये मेसेज चेक केले आणि तो बेसिनकडं गेला.

झिब्बानं टेबलवरच्या प्लेट्स उचलल्या आणि ती ड्राय बाल्कनीकडं गेली.

घड्याळात सव्वानऊ वाजले होते… नीरजची निघण्याची वेळ झाली होती. आईनं डबा टी पॉयवर ठेवला.

नीरजनं डबा उचलून गाडीत ठेवला आणि तो कारमध्ये बसला. पार्किंगमधून गाडी मागं घेताना नीरजला दिवसभरच्या मीटिंग्ज, त्याचे पॉईंट्स आठवत होते. आजचा दिवस पूर्ण पॅक असणार हे त्याला माहिती होतं. ड्रायव्हिंग सुरू करण्याआधी त्यानं उर्वीला फोन लावला…

“हॅलो, कुठं आहेस तू?”

“निघालीये घरातून… २० मिनिटांत पोहोचेन ऑफिसमध्ये…” उर्वीनं सांगितलं.

“मीटिंग्जची तयारी झालीये ना… आपल्या दोघांना १२ वाजेपर्यंत पोहोचलं पाहिजे मेहतांकडं…”

“हो… मी काल संध्याकाळीच सगळं रेडी करून ठेवलंय. बॅकअपही घेतलाय पेन ड्राईव्हमध्ये…” उर्वीचं उत्तर त्याला अगदी अपेक्षित होतं.

नीरजसोबत तीन वर्षांपासून काम करत असल्यामुळं त्याला काय हवं काय नकोय, हे उर्वीला नीट माहिती होतं. यावेळी त्याचा फोनही तिला अपेक्षितच होता.

नीरजनं गाडी स्टार्ट केली आणि बाणेरची वाट पकडली.

…………………………..

नीरजचं घरातलं वागणं दिवसेंदिवस तुटक होत चाललं होतं… घरातल्या कोणत्याच गोष्टीत तो सहभागी होत नव्हता. खरंतर याची त्याच्या आईला काळजी होती. करिअरमध्ये सेटल होऊन पाच वर्षे झाल्यानंतरही आयुष्यात सेटल होण्याबद्दल तो काहीच बोलत नव्हता. आई-बाबांनी किंवा इतर नातेवाईकांनी पुढाकार घेतला तरी त्याला तो फारसा प्रतिसाद देत नव्हता. दरवेळी विषय टाळायचा आणि प्रसंग हाताबाहेर जात असल्याचं लक्षात आल्यावर माझ्या लग्नाचा निर्णय मला घेऊ द्या, असं सांगून निघून जायचा.

नीरज आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. अगदी सुखवस्तू घरातला. लहानपणापासून लाडात वाढलेला असला तरी आजूबाजूच्या परिस्थितीची त्याला पूर्ण माहिती होती. आई-बाबांच्या जीवावर उड्या मारण्यात त्याला किंचितही रस नव्हता. त्यामुळं स्वतःच्या हिमतीवर स्वतःच आयुष्य जगण्याचं त्यानं कॉलेजमध्येच निश्चित केलं होतं. मनातील भावनांपेक्षा डोक्यातील विचारांना त्याच्या लेखी जास्त महत्त्व. आपले निर्णय आपणच घ्यायचे आणि त्यावर शेवटपर्यंत ठाम राहायचं हे सुद्धा नीरजच्या स्वभावाचं आणखी एक वैशिष्ट्य…

नीरजच्या वागण्यामुळं आई-बाबांनी त्याच्यासाठी स्थळं शोधणं बंदच केलं होतं. हा काही लग्न करेल, असं वाटत नाही. हे मनातल्या मनात समजून घेऊन आईनं फारसे प्रयत्न न करण्याचं ठरवलं होतं.

“काकू, अजून किती दिवस तुम्ही काम करणार… सुनबाई आणा लवकर… बोला की दादांशी परत एकदा…” झिब्बानं घासून आणलेली भांडी ओट्यावर ठेवताना पुन्हा त्याच विषयाला हात घातला. दादा काही लग्न करायला तयार होणार नाही हे तिला माहिती होतं. पण तरीसुद्धा काकूंच्या तब्येतीकडं बघून तिनं पुन्हा हा प्रश्न विचारला होता. काकूंनी सुद्धा तिच्या प्रश्नाला उत्तर देण्यापेक्षा तिची भावना समजून घेऊन फक्त स्मितहास्य केलं.

………………………………

ऑफिसमध्ये आल्यावर नीरजनं उर्वीला केबिनमध्ये बोलावलं. त्यानं परत एकदा उर्वीच्या तयारीवर नजर टाकली. प्रेझेंटेशनही बघितलं. काही बदल करण्यासारखं नव्हतंच. काल ज्याप्रमाणे दोघांमध्ये बोलणं झालं होतं. त्याप्रमाणं उर्वीनं अगदी सगळं व्यवस्थित तयार केलं होतं.

“व्हेरी गुड…एकदम मला हवी तशी सगळी तयारी केलीयेस. थॅंक यू” नीरजनं तिच्याकडं बघत स्माईल केलं.

“साडेअकराला निघूया ना आपण…” उर्वीच्या प्रश्नाला नीरजनं होकारार्थी उत्तर दिलं.

दोघं एकदमच बिल्डिंगमधून खाली उतरले. नीरजनं गाडी पार्किंगमधून काढली. त्याच्या शेजारच्या सीटवर उर्वी बसली.

नीरजनं रेडिओ ऑन केला.

‘आजकल पाँव जमीं पर नहीं पडते मेरे…’ गाणं लागलं होतं. नीरजनं आवाज थोडा कमी केला आणि गाडी पाषणाच्या दिशेनं नेण्यास सुरुवात केली.

काही अंतर पुढं गेल्यावरच उर्वीचा मोबाईल वाजू लागला… डिस्प्लेवर नाव बघताच तिनं लगेचच फोन कट केला. त्या फोननंतर ती थोडी अस्वस्थ झाली.

काही वेळानं पुन्हा मोबाईल वाजू लागला. तिनं लगेचच फोन कट केला आणि हातातल्या रुमालानं चेहरा पुसण्यास सुरुवात केली.

गाडी चालवता चालवता नीरज उर्वीची अस्वस्थता बघत होता. काहीतरी गडबड झालीये. हे त्याच्या लक्षात आलं होतं. पण त्यानं लगेचच काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मूड चेंज व्हावा म्हणून त्यानं रेडिओचा चॅनेल बदलला…

मोबाईल पुन्हा वाजू लागला…

“उर्वी, कुणाचा कॉल आहे…?”, नीरजनं विचारलं.

“बाबांचा…”

“मग घे ना… काय झालंय… काही प्रॉब्लेम आहे का… तू फोन का घेत नाहीयेस…”

“नीरजला काही वेगळं वाटायला नको…” म्हणून तिनं फोन उचलला…

“उर्वी, फोन का कट करतीयेस.” पलीकडून बाबा विचारत होते.

“बाबा, मी मीटिंगसाठी निघालीये. आपण नंतर बोलू या का… मी फ्री झाले की तुम्हाला फोन करते…”

“मला फक्त एवढंच सांग… घेतला का तू निर्णय… दोन दिवस मी तुझ्यासाठी थांबलोय.”, बाबा विचारत होते.

“बाबा, मी तुम्हाला थोड्या वेळानं फोन करते. मी आत्ता गडबडीत आहे”, उर्वीनं पुन्हा विषय टाळण्याचा प्रयत्न केला.

उर्वी डिस्टर्ब झाली होती. नीरजनंही हे ऑब्झर्व्ह केलं होतं. काय झालंय हे त्यानं तिला विचारलं. पण तिनं काहीच सांगितलं नाही.

…………………………..

मीटिंग संपल्यावर परत येतानाही उर्वी डिस्टर्बच होती. अपेक्षेप्रमाणं मीटिंग झाल्यानंतरही उर्वी नॉर्मल झाली नव्हती. ती सारखी सारखी मोबाईल चेक करत होती… बाहेर बघत होती… परत मोबाईलच्या डिस्प्लेकडे बघत होती… नीरज गाडी चालवता चालवता हे सगळं बघत होता. त्यानं आल्या रस्त्यानं परत न जाता गाडी विद्यापीठाकडं वळवली.

“आपण इकडं कुठं चाललोय…” उर्वीनं विचारलं.

“कॉफी घेऊ कॅंटिनमध्ये… मला इथली कॉफी खूप आवडते…” उर्वीच्या प्रश्नाला उत्तर दिल्यावर नीरजनं गाडी कडेला घेतली आणि पार्क केली.

उर्वी आणि नीरज पहिल्यांदाच अशा पद्धतीने बाहेर कॉफी घेत होते. त्यामुळं ती थोडी अवघडली होती.

“अण्णा, दो कडक कॉफी…” नीरजनं ऑर्डर दिली.

“कॉलेजमध्ये असताना मी अधूनमधून इथं कॉफी प्यायला यायचो… अण्णाकडचे साउथ इंडियन पदार्थही खूप छान असतात…” नीरज सांगत होता. त्यावेळी संध्याकाळी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून खूप छान वाटायचं. आम्ही बराचवेळी इथं बसून राहायचो. वेळ कसा निघून जायचा कळायचंच नाही… नीरजच्या बोलण्याला उर्वी केवळ चेहऱ्यांच्या हावभावांतूनच उत्तर देत होती. पण ती काहीच बोलत नव्हती.

खरंतर उर्वीचा मूड चेंज करण्यासाठी नीरज विद्यापीठात आला होता. पण ती अजून डिस्टर्बच असल्याचं बघितल्यावर त्यानं न राहवून परत तिला प्रश्न विचारला.

“उर्वी, काय झालंय? बाबांचा फोन आल्यापासून तू डिस्टर्ब झालीयेस. मीटिंगमध्ये पण तू नॉर्मल नव्हती. मीटिंग झाल्यावरही तू नेहमीसारखी दिसत नाहीये. काही प्रॉब्लेम झालाय का? मी काही मदत करू शकतो का?”

थोडावेळ ती काहीच बोलली नाही…

“आपण निघूया का…?” उर्वीनं विचारलं.

“बरं… मी बिल पेड करून आलो…” नीरज उठला आणि काऊंटरच्या दिशेने गेला.

नीरज आणि उर्वी पुन्हा कारमध्ये बसले आणि गाडी ऑफिसच्या दिशेने निघाली. परतीच्या प्रवासातही ती काहीच बोलली नाही. नीरजनंही पुन्हा काहीच प्रश्न विचारला नाही. पण ती का डिस्टर्ब झालीये. हे न कळल्यानं तो अस्वस्थ झाला होता. पण त्यानं चेहऱ्यावर काहीच दाखवलं नाही.

ऑफिसमध्ये पोहोचल्यावर उर्वीनं डेस्कवरच्या वस्तू आवरून निघण्याची तयारी केली. नीरज केबिनमधून हे सगळं बघत होता.

“मी जरा लवकर निघते.” तिनं इंटरकॉमवरून नीरजला सांगितलं.

“हो अगदी… काही वाटलं तर मला फोन कर…”

उर्वीनं पर्स उचलली आणि ती मेन डोअरच्या दिशेने निघून गेली.

(क्रमशः)

– तीन फुल्या, तीन बदाम

© सर्व हक्क सुरक्षित