मुक्ताला तसा पटकन राग येत नाही. पण आलाच तर तो राग तिच्या डोक्यातून फार काळ जात नाही. त्या रागातच ती तिच्या दुसऱ्या ग्रुपला भेटायला स्कुटी घेऊन गेली होती. मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवल्यावर घरी येताना तिच्यासोबत कोणीही नव्हते. त्यामुळे अर्थात पुन्हा माऊलीच्या त्या वागण्याचा विचार डोक्यात आला. हायवेवरून गाडी चालवत असताना अचानक पाऊस सुरू झाला. मुंबईतल्या पहिल्या पावसात रस्त्यावर पाणी आणि पेट्रोलमुळे गाड्या घसरण्याची शक्यता अधिक असते. तिच्याबाबतीतही तेच झाले, डोक्यात माऊलीचे विचार असताना ती सवयीने स्कुटी चालवत होती आणि एका ठिकाणी येऊन तिची स्कुटी हायवेवर स्कीड झाली. ती कित्येक मीटर फरफटत गेली. मागून येणाऱ्या गाड्यांनी करकचून ब्रेक दाबला आणि सर्व गाड्या थांबल्या. हेल्मेट तुटलं, उजवी बाजू पुरती सोलवटली गेली. गुडघ्यावर स्कुटीचा भार पडल्यामुळे जास्त मार गुडघ्याला लागला होता. रक्ताने माखलेला तो गुडघा आणि तुटलेली स्कुटर घेऊन मुक्ता एकटीच मालाड ते बोरीवली प्रवास करत कशीबशी घरी पोहोचली. घरी गेल्यावर जो काही ओरडा मिळतो तो सगळा खाऊन झाल्यावर तिच्या गुडघ्यावर हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करावे लागणार होते. या सगळ्यात ती एक महिना अंथरुणावरुन उठूही शकत नव्हती. तिकडे माऊली २ महिने पाय वर करुन बेडवर होता तर इथे मुक्ता साधं चालूही शकत नव्हती.

Love Diaries : अन् माऊलीने मुक्ताचा हात सोडला… (भाग १)

What Ajit Pawar said?
अजित पवार स्पष्टच बोलले, “काल-परवा प्रतिभा काकीला प्रचारात पाहिलं आणि मी कपाळावरच हात मारला”
reservation in indian constitution to bring equality in society
संविधानभान : समतेची बिकट वाट
Nutritious but tasty Makhana Uttapam Try this recipe once
पौष्टिक पण चविष्ट असा मखाना उत्तपा! एकदा खाऊन तर पाहा, ही घ्या रेसिपी
rajiv bajaj, change does not come from slogans
“मेक इन इंडिया, विकसित भारत घोषणाबाजीने बदल घडत नाही!”, असं का म्हणाले राजीव बजाज…

माऊलीला तिची ही अवस्था कळल्यावर तोही घाबरला. त्याने मुक्ताला फोन लावण्याचा खूप प्रयत्न केला पण तिने त्याचा एकही कॉल उचलला नाही किंवा त्याच्या मेसेजना रिप्लायही दिला नाही. तो मित्रांकरवी तिच्या तब्येतीबद्दल विचारत राहायचा. तिला टेन्शन नको म्हणूनच मी सांगितलं नाही. ‘मला काय माहिती ती एवढं टेन्शन घेईल की स्वतःचाही पाय मोडून बसेल,’ असा विचार त्याच्या मनात आला. पण तिचा राग काही जाता जाईना. त्या दोघांमध्ये नेहमीप्रमाणे ६ महिन्यांनंतर पुन्हा भांडण झालं होतं आणि ते एकमेकांशी बोलत नव्हते. या अपघातात मुक्ताचा फोन तुटला होता म्हणून माऊलीने तिच्यासाठी खास नवीन मोबाइल घेतला. पण तो तिला द्यायची हिंमत त्याच्यात होत नव्हती, म्हणून त्याने ग्रुपमधल्या एका मैत्रिणी करवी तो तिला दिला. तिने त्या मोबाइलला स्पष्ट नकार दिला. ‘मी एवढी कमावते की मी माझ्यासाठी मोबाइल घेऊ शकते. मला दुसऱ्यांनी दिलेल्या गोष्टींची गरज नाही,’ अशा ठाम शब्दांत तिने तो मोबाइल घ्यायला नकार दिला. पण नंतर नेहमीप्रमाणे त्याच्या शब्दात ती अडकली गेली आणि तो मोबाइल घेतला. पुन्हा एकदा त्यांच्या नात्याला हसत हसत सुरूवात झाली होती. प्रत्येक महिन्यात ते त्याच्या अपघाताची तारीख आणि तिच्या अपघाताच्या तारखेला एकमेकांना त्या दिवसांची आठवण करुन द्यायचे. त्या दोन अपघातांमुळे ते आधी नव्हते इतके भावनिकरित्या एकमेकांच्या जवळ आले होते. तिला माहिती होतं की माऊली आणि तिच्यात एक वेगळं नातं आहे पण तो ते मान्य करणार नाही म्हणून तिने नंतर त्याला कधीच विचारलं नव्हतं. गेली कित्येक वर्षे ती त्याच्या बाजूला ठामपणे उभी होती. ग्रुपमध्ये अनेक भांडणं झाली प्रत्येकाने तिला त्याला पाठीशी घालू नको असा सल्ला दिला. पण तरीही तिने त्याची साथ कधीही सोडली नाही.

मुक्ताला एव्हाना घरी लग्नाबद्दल विचारणा करण्यात आली होती. तिने अरेंज मॅरेजला होकार दिला होता. अचानक एक दिवस माऊलीने तिला त्याच्या मनातल्या भावना सांगितल्या. मुक्ताने तरीही त्याला विचार करायला सांगितले. तिचं जरी त्याच्यावर प्रेम असलं तरी तिने त्याला विचार करायला सांगितला होता. तेव्हा त्याने जन्मभर साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. ‘आयुष्यात तुझी साथ कधीही सोडणार नाही,’ असं वचन त्याने मुक्ताला दिलं होतं. दोघांची छोटीशी लव्हस्टोरीही सुरू झाली होती. दोघंही खूप खूश होते. उठल्यावर व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंगचा मेसेज करायचे ऑफिसला जायला निघाले की दिवसभर तसे फारसे मेसेज न करता ऑफिसमधून निघाल्यानंतरच तासन् तास गप्पा मारायचे. अगदी पहाटे ३ पर्यंतही त्यांच्या गप्पा रंगायच्या. यात भूतकाळातल्या आठवणींपासून ते भविष्यातल्या संसाराच्या स्वप्नांपर्यंत ते दोघं बोलायचे. पण मुक्ताच्या घरच्यांनी एक मुलगा फार आधी पसंत केला होता. त्या मुलाकडूनही होकार आला होता. त्यामुळे मुक्ताचे आई- बाबा त्या मुलाच्या कुटुंबियांना भेटायला जाणार होते. मुक्ताला हे जेव्हा कळलं तेव्हा तिने घरी माऊलीबद्दल सांगितले. तिच्या घरच्यांकडून विरोध नव्हताच. एवढं उशिरा का सांगितलं यावरु तिला बोलणी खावी लागली होती. मुक्ताच्या एका सांगण्यावरुन तिच्या आई- बाबांनी ते ठरणारं लग्न मोडलं होतं. शेवटी मुलीचं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशी लग्न करुन दिलं तर चांगलं आहे, असा त्यांचा भाबडा विश्वास होता. आता माऊलीच्या घरी सांगायची वेळ होती. माऊलीने त्याच्या घरी मुक्ताबद्दल सांगितलं आणि त्यांच्या घरीजणू बॉम्ब पडला अशीच अवस्था झाली. आई-बाबांनी आपल्या जातीची नाही म्हणून स्पष्ट नकार दिला. एक तर ती किंवा आम्ही असे दोन पर्याय त्याला दिले. तिच्यासोबत जायचं असेल तर तुला हे घर तुटेल… याचसाठी मोठं केलं का आम्ही तुला?… समाजात आम्ही काय तोंड दाखवणार?… आपल्या कुलदेवीच्या गाभाऱ्यात आपल्याला प्रवेश मिळणार नाही याचा विचार कर… असे एक ना अनेक इमोशनल प्रश्न त्या दोघांवर येत होते.

Love Diaries : अन् माऊलीने मुक्ताचा हात सोडला… (भाग २)

माऊलीचे आई-बाबा ज्या कारणांसाठी नकार देत होते ती कारणं किती फोल आहेत ते दोघांनाही माहित होतं. मुक्ता तरी त्याला धीर द्यायचं काम करत होती. एवढ्या पुढे येऊन माघार घ्यायची नाही हे तिनं ठरवलं होतं. कितीही वेळ लागला तरी माऊलीच्या घरून होकार घ्यायचाच असा निश्चय तिने केला होता. कठीण परिस्थितीत नांगी टाकण्याचा तिचा स्वभाव कधीच नव्हता. घरच्यांनाही तिने याबद्दल सांगून त्यांची परवानगी मिळवली होती. मुक्ताने त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. आपण त्यांना थोडा वेळ देऊ.. होतील ते शांत… प्रत्येक मुद्दा पटवून देऊ. पण माऊलीच्या मनात काही वेगळंच होतं.

एक दिवस दोघंही भेटले असता, ‘तुझ्याशी लग्न केलं तर घरचे तुटतील आणि त्यामुळे मी खूश राहणार नाही. त्यामुळे तुझ्या आई- बाबांना मुलगा शोधायला सांग,’ असं सांगून तो मोकळा झाला. त्याच्यासाठी ते सोपं होतं की नाही माहिती नाही पण अवघ्या दोन आठवड्यांमध्ये त्याने हा निर्णय घेऊन टाकला होता. ज्या मुक्ताने त्याच्यासाठी एवढी वर्षे वाट पाहिली आज तो, ‘मला सोडून दुसऱ्याशी लग्न कर…’ हे सांगायला आला होता… जिने गेल्या पाच वर्षांत एकदाही त्याची साथ सोडली नव्हती तो आई-बाबांच्या दोन आठवड्यांच्या विरोधापुढे नमतं घेत तिचा धरलेला हात कायमचा सोडायला आला होता… त्याच्यासोबतच्या संसाराची स्वप्न पाहिलेल्या त्या डोळ्यांना दुसऱ्या बरोबर संसार थाट हे सांगायला तो आला होता… जसा तो आला तसा मनात आधीच ठरवून आणि पाठ करुन आलेला संदेश मुक्तापर्यंत पोहोचवला आणि गेला. जात, समाज, देव आणि त्याचं कुटुंब यासाठी त्याने एका जिवंत मुलीला मरण यातना दिल्या. ज्या गोष्टींचा विरोध तिने इतरांची लग्न लावण्यासाठी केला आज त्याच गोष्टीची मुक्ता बळी पडली होती. माऊलीवर डोळे बंद करुन विश्वास ठेवणाऱ्या मुलीचे कायमचे डोळे उघडून तो गेला. आंधळा विश्वास ठेवल्यावर काय होतं याचा धडा देऊन तो गेला.

गाभाऱ्यात प्रवेश मिळावा म्हणून प्रेमाला नाकारलं. घरून कोणाचाही पाठींबा मिळणार नाही हे दोन आठवड्याच्या नकारात त्याच्या मनाने एवढं पक्क केलं की त्यानंतर तलवार खाली ठेवत सरळ शरणागती पत्करली. या सगळ्यात मुक्ताच्या मनाचा विचार कोण करणार? ज्या आई- बाबांनी मुलीच्या एका सांगण्यावरून ठरणारं लग्न मोडलं त्या आई-बाबांना ती काय उत्तर देणार? ज्या मुलासाठी तू एवढं काही केलंस तो तुझ्यासाठी किमान उभा ही राहू शकला नाही या प्रश्नाचं उत्तर ती स्वतःलाच काय देणार होती? या सगळ्यात तिच्या घरच्यांची काय चूक? तिने केलेल्या प्रेमाची शिक्षा आज तेही भोगतात.

आता मुक्ता आधीसारखी राहिली नाही. घरात असल्यावर तोंडाचा पट्टा नेहमी चालूच असणाऱ्या मुक्ताला आता काही तरी बोल असं म्हणावं लागतं. तिच्या वहिनीकडे तिने पाहिलं तरी तिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही. तिची वहिनी तिच्या बाजूला तासन् तास बसून असते. तिची ८५ वर्षांची आजी तिची अवस्था पाहून रडते. आई-बाबांच्या चेहऱ्यावर तिच्यासाठीचं दुःख लख्ख दिसतं. तिला हे सगळं कळतं पण तरीही ती काही करु शकत नाही याचंही तिला दुःख वाटतं. ‘अशी माझ्याकडून काय चूक झाली की मी या सगळ्यांना एवढा त्रास देते?’ हा एकच प्रश्न तिच्या मनात असतो. ज्या व्यक्तींनी आपल्यावर एवढा विश्वास ठेवला त्यांना आपण अशा पद्धतीचं दुःख द्यायला नको होतं, असं तिला सारखं वाटत राहतं पण या सगळ्यात तिची तरी काय चूक होती.

तिने फक्त प्रेम केलं होतं. ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्याकडून फक्त आयुष्यभराची साथ मागितली होती. तिला त्याच्या मोबदल्यात हे मिळेल अशी अपेक्षाही तिने कधी केली नव्हती. आपण ज्या व्यक्तीवर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास ठेवतो त्या व्यक्तीने आयुष्याच्या मध्यावर हात सोडला तर ते दुःख मरण यातनेपेक्षा कमी नसतं. मुक्ता त्या मरण यातना भोगतेय. या सर्वातून आपला स्वतःवरचा विश्वास पुरता हलतो. मुक्ताचंही तसंच झालं. तिचे मित्र-मैत्रिणी सांगत असतानाही तिने माऊलीचा हात कधीच सोडला नाही. एवढंच काय तर, ‘मी तुझा हात कधीही सोडणार नाही’ या त्याच्या एका शब्दावर विश्वास ठेवून तिने तिचं ठरलेलं लग्न मोडलं. पण या बदल्यात आता तिच्या पदरात अंधःकारच पडला. जेव्हा त्याला निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा नात्याला वेळ न देता त्याने तो निर्णय अवघ्या दोन आठवड्यात घेतला, याचं मुक्ताला सर्वाधिक दुःख होतं. प्रत्येक गोष्टीला योग्य ती वेळ द्यावी लागते ती वेळ तो देऊ शकला नाही याचं तिला वाईट वाटतं. आयुष्यभराची शिकवण देऊन तो गेला. या प्रवासात तिने ग्रुपमधल्या अनेकांना अजाणतेपणी दुखावलं होतं. आज तिच माणसं तिच्या मागे ठामपणे उभी राहिलेली तिने पाहिली. काय कमावलं आणि काय गमावलं याची तिला आता पूर्ण कल्पना आलीये.

‘देवाने मला दोन देणग्या दिल्या त्यातली एक म्हणजे माणसं जोडून ठेवणं आणि दुसरी म्हणजे हासू,’ या देणग्या आता तिच्या आयुष्यातून हद्दपार झाल्या आहेत. तिला कोणालाही भेटू नये असं वाटतं आणि हसणं ती विसरलीच आहे. आता ती घरच्यांसाठी आणि बाहेरच्यांना कळू नये म्हणून चेहऱ्यावर आनंदी असल्याचं मास्क लावून ऑफिसला जाते आणि काम करुन परत घरी येते. ऑफिसमध्येही तिच्या हसण्यावर काही कारणांमुळे बंदी आल्यामुळे किमान तिथे हसण्याचा अभिनय तिला सध्या करावा लागत नाही यातच ती खूश आहे. आता तिला फारसं काही वाटेनासं झालंय. रात्री पाठ टेकायला म्हणून झोपते पण डोळ्याला डोळा लागत नाही. अनेकदा झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात.

‘पांडुरंगा माझं आणि अजयचं लग्न होईल ना?’ हा एकच प्रश्न ती गेली पाच वर्षे त्या विधात्याला विचारत होती. त्या प्रश्नाचं उत्तर त्याने माऊलीच्याच रुपात येऊन मुक्ताला दिलं. लग्नानंतर त्याने तुला एकटे पाडले असते तर असा प्रश्न जेव्हा मुक्ताची आई तिला विचारते तेव्हा तिच्याकडे उत्तर नसतं. अर्थात त्या प्रश्नाचं उत्तर ही तिच्या आईकडे होतं ते म्हणजे त्या पांडुरंगाची पुण्याई की तुला हे आधी कळलं नाही तर मग काय केलं असतं.. आईचं भाबडं मन या विचाराने जरासं सुखावतं की आधीकळलं म्हणून ठीक झालं. पण मुक्ताच्या मनातली वेदना कोणाला दिसत नाही. ती कोणाला कळावी अशी आता तिची अपेक्षाही नाही.. ती फक्त जगतेय.. श्वास आहे… कुटुंब आहे आणि एक आई आहे जिचा जीव आपल्या मुलीचं चांगलं होईल ना… ती यातून बाहेर पडेल ना… या काळजीत तुटनाता ती दररोज पाहतेय…

(समाप्त)
– तीन फुल्या, तीन बदाम