News Flash

Love Diaries : भले बुरे जे घडून गेले…

बातमी ऐकून अनघाच्या पायाखालची वाळूच सरकली..

exclusive love stoies
Love Diaries

नेहमीप्रमाणे आजही ऑफिसमधून वेळेवर निघायचं असा विचार अमोघनं केला होता.. अन् नेहमीप्रमाणेच त्याचा विचार काही प्रत्यक्षात आला नव्हता.. किमान आज तरी वेळेवर घरी पोहोचावं, अशी त्याची इच्छा होती.. मात्र ऑफिसमधील कामाच्या व्यापामुळे ते शक्य झालं नव्हतं.. अमोघनं घाईघाईत चर्चगेट स्टेशनला जाण्यासाठी टॅक्सी पकडली.. टॅक्सी चर्चगेटला पोहोचताच अनघाचा फोन आला.. अनघा थोडी चिडली होती.. तिने अनेकदा फोन करुनदेखील अमोघ काही फोन उचलत नव्हता.. अखेर चर्चगेटला पोहोचता पोहोचता अनघानं पुन्हा फोन केला.. यावेळी मात्र अमोघनं अनघाचा फोन उचलला होता..

“अरे काय चाललंय..? कितीदा फोन करतेय..? फोन का नाही उचलत तू..? आणि कुठे आहेस तू..?” अनघाच्या बोलण्यातून तिची चिडचिड जाणवत होती..
“मॅडम, चर्चगेटला पोहोचलोय.. प्लीज ओरडू नका.. मला माहितीये उशीर झालाय.. तोही चांगला तासभर.. पण तुला माहितीये ना माझ्या ऑफिसमधली स्थिती.. मी फास्ट ट्रेननं पोहोचतो तासाभरात..” अमोघनं समजावण्याचा प्रयत्न केला..
“किमान आज तरी लवकर येशील असं वाटलं होतं मला.. पण तू ना.. जाऊ दे मला ना तुझ्याशी बोलायचंच नाहीये..” अनघा खरंच खूप चिडली होती..
“प्लीज.. असं नको ना करु.. नको ना चिडू.. मला माहितीये आजचा दिवस खूप स्पेशल आहे.. पण खरंच ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग होती…” अमोघ अनघाला समजवण्याचा प्रयत्न करत होता… मात्र ती काहीही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हती..
“हा रुसवा सोड सखे… पुरे हा बहाणा… सोड ना अबोला…” अमोघ चर्चगेट स्टेशनच्या गर्दीत चक्क गाणं गाऊ लागला..
“अरे ए तुला वेड लागलंय का..? कुठेही काय सुरु होतोस.. लवकर ये घरी.. मी वाट पाहतेय..” अमोलच्या त्या अचानक गायनानं अनघाचा राग कुठच्या कुठे पळून गेला होता..
“लवकर येतो.. बोरिवली फास्ट बहुदा निघतेय.. हॉर्न दिलाय.. मी पळतो.. ट्रेन पकडल्यावर बोलतो तुझ्यासोबत…” अमोघ घाईघाईत म्हणाला…
“धावत ट्रेन पकडू नकोस.. बाजूच्या प्लॅटफॉर्मवर येईल दुसरी ट्रेन..” अनघानं लगेच उत्तर दिलं.. अमोघ पळायचा थांबला.. प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरुन ट्रेन निघून गेली होती.. अमोघला लगेच तीन नंबरवर दुसरी ट्रेन मिळाली..
“सोडली मी ती ट्रेन.. दुसरी ट्रेन मिळाली.. फास्टच आहे.. येईन दीड तासात..” अमोघनं अनघाला सांगितलं..
“ओके.. मी काहीतरी छान जेवण करते.. तू सांभाळून ये.. वाट बघतेय.. लव्ह यू हबी..” अनघानं फोन ठेवला..

———————————————————————————–

अमोघ आणि अनघा… नावाच्या उच्चारातच तसं बरंचसं साम्य.. मात्र हे एक साम्य सोडलं तर दोघांच्या आयुष्यात फारसं काहीचं साम्य नव्हतं… अनघा अगदी लाडात वाढलेली… दोन मोठ्या बहिणीनंतरचं शेंडेफळ.. बाबांचं वय झाल्यावर त्यांना काम झेपतं नव्हतं.. तेव्हा दोन्ही बहिणींनीच कुटुंबाला आधार दिला.. त्या तुलनेत अनघावर फारशा जबाबदाऱ्या नव्हत्या.. मात्र दोन्ही बहिणींच्या धाकामुळे अनघा बेलगाम झाली नाही.. करिअरची सुरुवातच एका मल्टिनॅशनल कंपनीतून झाल्यानं सगळं काही व्यवस्थित होतं..

अमोघचं मात्र तसं नव्हतं.. अमोघला एकच भाऊ आणि तोही लहान.. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर खूपच आधी आली.. आणि त्यालाही जबाबदारीची जाण होती.. अनघाला आधीपासूनच जे हवं ते मिळतं गेलं.. अमोघचं तसं नव्हतं.. त्यामुळेच की काय, त्याला सगळ्या गोष्टींची, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांची जाणीव होती.. अमोघच्या घरची स्थिती अनघा इतकी चांगली नव्हती.. त्यात आपल्याकडे प्रेमापेक्षाही अत्यंत महत्त्वाचा असलेला जात हा देखील अडसर होता.. त्यामुळेच ज्यावेळी दोघांनी नात्याबद्दल घरी सांगितल्यावर मोठा गहजब झाला.. मात्र तरीही दोघे आपल्या निर्णयावर ठाम होते.. अखेरीस प्रकरण टोकाला गेल्यावर ‘तुम्हाला काय करायचंय ते करा.. आम्ही तुम्हाला मेलो आणि तुम्ही आम्हाला मेलात,’ असं घरच्यांनी सुनावलं.. दोघांनी घरच्यांना समजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.. मात्र तरीही दोन्हीकडच्यांनी जराही ऐकून घेतलं नाही…

——————————————————————————-

अमोघची ट्रेन सुरु झाली.. अमोघ आणि अनघाच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस होता.. मात्र घरच्यांचा फोन काही आला नाही… घरच्यांचा राग काही शमला नव्हता.. घरच्यांनी असं अंतर ठेवल्यामुळे अमोघ आणि अनघामधलं अंतर मात्र खूप कमी झालं होतं.. किंबहुना त्यांच्या दोघांमध्ये अंतरच नव्हतं.. आपल्या दोघांनाच एकमेकांना सांभाळायचंय, याची जाणीव असल्यानं दोघं एकमेकांची खूप काळजी घ्यायचे.. भांडण झालंच तर सोडवायला कोणी येणार नाही, हे माहिती असल्यानं दोघं फार ताणून न धरता ‘सॉरी’ बोलून मोकळे व्हायचे… आणि हे अगदी लग्नाच्या आधीपासून असंच होतं.. अमोघला अनघासोबतचा प्रवास अगदी व्यवस्थित आठवत होता..

———————————————————————————-

तीन वर्षांपूर्वी…
“अगं किती उशीर..? आहेस कुठे तू..? मी आलो अंधेरी स्टेशनला.. नेहमीच्या जागेवर उभा आहे.. तू पोहोचलीस का स्टेशनला..?” अमोघनं थोडा रागवला होता..
“अमोघ.. खूप ट्रॅफिक आहे.. बस १० मिनिटांत हायवेला पोहोचेल.. मग तिथून स्टेशन..” अनघा सौम्यपणे म्हणाली..
“म्हणजे अजून २० मिनिटं लागणार.. त्यात ट्रॅफिक.. काय यार अनघा..” अमोघची थोडी चीडचीड होत होती..
“तुला सुट्टी असूनही तू ट्रेनचा प्रवास करुन माझ्यासाठी आलास, त्याबद्दल खरंच थँक्स.. आणि ट्रॅफिकचं तुला माहितीच आहे.. पण डोन्ट वरी.. जितका वेळ मी बसमध्ये आहे, तितका वेळ आपण फोनवर गप्पा मारु.. त्यात काय एवढं..” अनघा प्रेमानं म्हणाली..
हे असं अनेकदा घडायचं.. अमोघला आठवड्याच्या मध्ये कधीही सुट्टी असायची.. शनिवारी, रविवारी ऑफिस असायचं.. अनघाला मात्र शनिवार, रविवार सुट्टी.. त्यामुळे मग आठवड्याच्या मध्ये सुट्टी असताना अमोघ अनघाला भेटायला यायचा.. अनघाला ट्रॅफिकमुळे उशीर झाला की मग तोपर्यंत दोघे फोनवर बोलायचे.. मात्र खूप वेळ थांबावं लागतं, याची तक्रार ना कधी अमोघनं केली, ना बसमध्ये गर्दीत उभं राहून बोलणं त्रासदायक वाटतं, असं कधी अनघानं म्हटलं..

———————————————————————

अमोघ विचारात गढून गेला होता.. ट्रेनने मुंबई सेंट्रल सोडल्यावर वेग धरला.. अमोघ तितक्याच वेगात भूतकाळात निघून गेला होता.. अनघासोबतची पहिली भेट त्याला आठवू लागली.. कॉलेजमध्ये अनघा फर्स्ट इयरला असताना एका युनिट टेस्टला अमोघच्या बाजूला बसली होती.. अमोघ त्यावेळी सेकण्ड इयरला होता.. गुलाबी कुर्ता घातलेल्या अनघाला पाहून अमोघची नजर काही वेळ तिच्यावर स्थिरावली.. पहिल्याच भेटीत नाव विचारणं अमोघला मूर्खपणाचं वाटलं.. मात्र यावेळी कॉलेजच्या आयडीनं मदत केली.. अमोघनं अनघाच्या गळ्यातलं आयडी पाहिलं.. मनातल्या दोघांची नावं एकत्र कशी वाटतील, याचा विचार अमोघच्या वेड्या मनानं केला..

दोघांचे वर्ग वेगळे असल्यामुळे अमोघला बोलायची फारशी संधी मिळायची नाही.. मात्र तिच्या काही मैत्रिणींशी बोलून तिच्यापर्यंत योग्य तो मेसेज पाठवण्याची व्यवस्था अमोघनं केली.. मात्र त्याचा परिणाम उलटाच झाला.. ‘अशा’ मुलापासून आपण दूर राहिलेलंच बरं, असा विचार अनघानं केला आणि ती अमोघपासून चार हात लांब राहू लागली..

एकदा दुपारी कॉलेजवरुन घरी गेल्यावर काही वेळानं अनघाला फोन केला.. अनघा लेक्चरनंतर लगेच घरी यायची… घरी यायचं, जेवायचं आणि दोन ते चार वेळेत छान झोपायचं, हा अनघाचा ठरलेला कार्यक्रम.. अमोघ आणि अनघाची मैत्री नवीच होती.. त्यामुळे त्याला या ‘झोपेच्या’ कार्यक्रमाची माहिती नव्हती.. त्यामुळेच त्यानं अनघाला फोन केला.. विशेष म्हणजे एरव्ही दुपारी २ ते ४ मध्ये कोणाचेही फोन न घेणाऱ्या अनघानं अमोघचा फोन रिसीव्ह केला..

“काय झालं बोलं..?” अनघाच्या आवाजात झोप जाणवत होती..
“मी आईसोबत मावशीकडे चाललोय मिरारोडला.. बऱ्याच दिवसांनी त्या भागात जातोय.. तू तिथेच राहतेस हे माहितीये.. म्हणून तुला फोन केला.. पण तू झोपली आहेस ना, तर मग ठेवतो फोन..” अमोघ म्हणाला..
“झोपले होते.. आता झोपमोड झालीच आहे.. बोल तू.. नेमका कुठे आहेस…?” यानंतर अनघानं अमोघला व्यवस्थित मार्गदर्शन केलं.. अमोघ आईसोबत मावशीकडे पोहोचला.. मात्र अनघा आपल्यासोबत इतकं व्यवस्थित बोलतेय, याचा त्याला प्रचंड आनंद झाला होता.. त्यामुळेच मावशीकडे गेल्यावर त्याने अनघासोबत एसएमएसवर बोलण्यास सुरुवात केली.. विशेष म्हणजे अनघा मेसेजला रिप्लाय देत होती.. अनघामधला हा बदल अमोघसाठी सुखद धक्का होता.. अमोघला बोट दिल्यावर तो हात पकडेल आणि दोघांमध्ये एक नातं निर्माण होईल, याची त्यावेळी अनघाला पुसटशीही कल्पना नव्हती..

————————————————————————————

ट्रेननं घरी निघालेल्या अमोघच्या मनात आठवणी तरळत होत्या.. अनघासोबतचा सुंदर प्रवास त्याच्या डोळ्यापुढे होता.. तर दुसरीकडे अनघा घरी तयारी करत होती.. अनघानं अमोघच्या आवडीचा मेन्यू केला होता.. घर आवरुन अनघानं थोड्या वेळासाठी टीव्ही सुरु केला..
चर्चगेटहून बोरिवलीला येणाऱ्या ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट, २५ जणांचा मृत्यू, गर्दीच्या वेळी स्फोट झाल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती, अशी बातमी अनघानं ऐकली.. थोड्या वेळानं आणखीही काही लोकल गाड्यांमध्ये स्फोट झाल्याच्या बातम्या येत होत्या.. विशेष म्हणजे सर्व स्फोट फर्स्ट क्लासच्या डब्यात झाले होते.. आणि अमोघदेखील फर्स्ट क्लासनेच प्रवास करायचा.. बातमी ऐकून अनघाच्या पायाखालची वाळूच सरकली.. अनघाला मोठा धक्का बसला.. तिला काहीच सुचेनासं झालं..

(पूर्वार्ध)
– तीन फुल्या, तीन बदाम

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2017 1:01 am

Web Title: exclusive love stories love diaries season two mumbai local train blast happy ending love stories
Next Stories
1 Love Diaries : तू असतीस तर…(भाग ३)
2 Love Diaries : तू असतीस तर…(भाग २)
3 Love Diaries : तू असतीस तर…
Just Now!
X