14 August 2020

News Flash

Love Diaries : भले बुरे जे घडून गेले…(उत्तरार्ध)

अनघाच्या काळजाचा ठोका चुकला..

Love Diaries

अनघानं अमोलला फोन करण्याचा प्रयत्न केला.. मात्र फोन लागत नव्हता… अनघाला प्रचंड भीती वाटत होती… कोणाला फोन करायचा, काय करायचं… अनघाला काहीच सुचत नव्हतं.. टीव्हीवर बातम्या सुरुच होत्या.. मृतांचा आकडा वाढत होता आणि अनघाची अवस्था आणखी बिकट झाली.. थोड्या वेळानं घरातला फोन वाजला..

“हॅलो..” अनघाच्या तोंडून शब्ददेखील फुटत नव्हते..
“मी अमोघची आई बोलतेय.. अमोघ आला का घरी..?” अमोघच्या आईचा आवाज कित्येक महिन्यांनंतर अनघानं ऐकला होता.. आईच्या आवाजातदेखील काळजी आणि भीती होती..
“अजून नाही आलाय.. आणि आता ते टीव्हीवर..” अनघाला काहीच बोलवत नव्हतं..
“म्हणूनच फोन केला.. तू काळजी करु नकोस.. आम्ही येतो आता तुझ्याकडे.. व्यवस्थित असेल अमोघ.. देवापुढे दिवा लावते आणि लगेच येते..” अमोघच्या आईनं अनघाला धीर दिला… मात्र त्यांची अवस्थादेखील बिकट होती..
थोड्या वेळानं अनघाच्या बाबांचादेखील फोन आला.. त्यांनीदेखील अनघाला धीर दिला.. थोड्याच वेळात दोघांचेही आई-बाबा अनघाकडे आले.. अनघाची अवस्था अतिशय वाईट होती.. अनेकांना फोन केले.. मात्र काहीच समजत नव्हतं.. अनघाच्या मनात अनेक वाईट विचार येत होते.. अमोघ सुरक्षित असावा, अशी एकच प्रार्थना ती करत होती..
“स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की फर्स्ट क्लासच्या शेजारील डब्यांमधील काही जणांचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाला,” टीव्हीवर लाईव्ह रिपोर्टिंग सुरु होतं.. अनघाच्या काळजाचा ठोका चुकला..
जसजशी वेळ जात होती, तसतशी अनघाची काळजी वाढत होती.. अमोघ कुठे असेल, तो सुरक्षित असेल ना, असे अनेक प्रश्न तिच्या मनात येत होते..
“अनघा, थोडं खाऊन घेतेस का..? अमोघ येईल थोड्या वेळात..” अमोघच्या आईने अनघाला थोडा धीर देण्याचा प्रयत्न केला..
“नको आई.. अमोघ घरी आल्यावरच खाईन मी.. तुम्ही घ्या खाऊन..” अनघानं सासूबाईंना सांगितलं..

Love Diaries : भले बुरे जे घडून गेले…

अनघाच्या आई-बाबांनीदेखील तिला समजावण्याचा प्रयत्न केला.. मात्र अनघा काहीच ऐकत नव्हती.. मी तुला कधीही सोडून जाणार नाही, हे अमोघचं वचन अनघाला सारखं सारखं आठवत होतं..
तितक्यात घराची बेल वाजली.. अमोघ आला असेल, असं अनघाला वाटलं.. मात्र अमोघ काही आला नव्हता.. शेजारचे काका-काकू गावाहून परत आले होते आणि घरी गेल्यावर सर्वप्रथम बॉम्बस्फोटाची बातमी ऐकल्यावर त्यांनी अनघाकडे धाव घेतली होती..
अमोघला धावत ट्रेन पकडू नको, असं सांगितलं होतं.. मग अमोघनं जी ट्रेन पकडली, त्यातच स्फोट झाला नसेल ना..? अमोघ चर्चगेटच्या दिशेला असणारा पहिला फर्स्ट क्लासचा डबा पकडतो.. नेमका त्याच डब्यात स्फोट झाला नसेल ना..?, अशा प्रश्नांचं काहूर अनघाच्या डोक्यात माजलं.. रात्रीचे साडेआठ वाजले.. पुन्हा एकदा दरवाज्याची बेल वाजली..
अनघाची आई दरवाजा उघडायला उठली.. मात्र अनघानं आईला थांबवलं.. अनघानं दरवाजा उघडला.. समोर अमोघ उभा होता.. कपड्यांवर रक्ताचे डाग होते.. शर्ट आणि पँटची उजवी बाजू तर रक्ताने माखली होती.. अमोघला पाहताच अनघाने त्याला घट्ट मिठी मारली.. अनघाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या..

“अनू… रडायला काय झालं..? तुझा अमू अगदी व्यवस्थित आहे..” अमोघ अनघाचे अश्रू पुसत होता..
“तुला खरंच काही लागलं नाहीय ना..?” अनघानं कातरलेल्या आवाजात विचारलं..
“नाही गं.. मी अगदी व्यवस्थित आहे.. तू नको टेन्शन घेऊ.. चल आत..” अमोघ अनघाला घेऊन हॉलमध्ये आला.. अमोघला पाहताच अनघाच्या जीवात जीव आला होता..
अमोघला पाहताच आई बाबांच्या चेहऱ्यावरील काळजीचे ढग दूर झाले होते.. आपला लेक सुरक्षित घरी आला, याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर होतं.. अनघाच्या आई बाबांच्याही जीवात जीव आला होता.. अनघानं अमोघला पाणी आणून दिलं.. अमोघनं हात, पाय, तोंड धुतले आणि फ्रेश झाला.. दोघांच्या आई बाबांना पाहून अमोघला बरं वाटलं.. एका संकटाच्या चाहूलीनं दुरावलेले सारे एकत्र आले होते..
“बेटा, तू बरा आहेस ना..?” अमोघच्या आईच्या डोळ्यात अश्रू तरळले होते..
“हो ग.. खरंतर थोडक्यात वाचलो मी आज..” अमोघला घडलेला सर्व प्रकार डोळ्यासमोर दिसत होता..
“म्हणजे नेमकं काय झालं..? तुम्ही त्याच ट्रेनमध्ये होतात का..?” सासरेबुवांनी विचारलं..
“मी धावत ट्रेन पकडणार होतो.. फर्स्ट क्लासमध्ये चढणार होतो, तेव्हा अनघासोबतच फोनवर बोलत होतो, तिला सांगितलं होतं मी ट्रेन निघतेय प्लॅटफॉर्मवरुन.. पण धावत ट्रेन पकडू नको.. पुढच्या ट्रेननं ये म्हणाली ती.. म्हणून ती ट्रेन सोडली.. त्याच ट्रेनच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात माहिमजवळ स्फोट झाला..” अमोघला घडलेली घटना अगदी लख्ख आठवत होती..

“मग तू त्यानंतरची ट्रेन पकडलीस का..?” अमोघच्या बाबांनी प्रश्न केला..
“एक ट्रेन सोडल्यावर लगेच दुसरी ट्रेन आली.. तिच्या फर्स्ट क्लासमध्ये चढताना पटकन आठवलं की पास संपलाय.. आणि सकाळीच सेकण्ड क्लासचं तिकीट काढलंय.. त्यामुळे कधी नव्हे ते सेकण्ड क्लासमध्ये चढलो.. तिथे बसायला मिळालं.. आणि त्यामुळेच वाचलो खरं तर..” अमोघनं उत्तर दिलं..
“तुमच्या ट्रेनमध्ये काही झालं ना..?” अनघाच्या आईनं प्रश्न केला.. त्यांच्याही चेहऱ्यावर काळजी होती..
“माझी ट्रेन माटुंग्याजवळ असताना स्फोट झाला.. आज जर फर्स्ट क्लासमध्ये असतो, तर आता तुम्हाला कदाचित दिसलोच नसतो..” अमोघनं घडलेला सारा प्रकार सांगितला होता..
“देवाची कृपा म्हणून वाचला हो मुलगा आपला..” अमोघच्या आईच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या..
“बाजूच्या डब्यात स्फोट झाला.. काही जखमींना प्रवासी आणि पोलिसांच्या मदतीनं बाहेर काढलं.. काहींचा तर जागीच मृत्यू झाला.. त्यांचे मृतदेह बाहेर काढले.. रक्ताचा नुसता चिखल झाला होता..” अमोघच्या डोळ्यासमोरुन घडलेला प्रकार काही केल्या जात नव्हता..
अमोघची एकंदर स्थिती पाहता सगळ्यांनी स्फोटाविषयी आणखी काही बोलणं, विचारणं टाळलं.. अनघा तर शांतच होती.. ती फक्त अमोघला घट्ट बिलगून त्याच्या मिठीत शिरली होती.. अमोघ सुखरुप घरी आल्यानं तिचं सर्वस्वच घरी परतलं होतं.. काही नाट्यमय घडामोडींमुळे अमोघला जणू पुनर्जन्म मिळाला होता..

विशेष म्हणजे या एका घटनेमुळे अमोघ आणि अनघाचे आई बाबा घरी आले होते.. दोघांच्या आईबाबांनी एकमेकांशी संवाद साधला होता.. आईबाबांचा आपल्या लेकरांवर कायम जीव असतो, त्यांची माया कधीही आटत नाही, याचीच प्रचिती अमोघ आणि अनघाला आली होती.. एका धक्कादायक घटनेमुळे अमोघ आणि अनघाला आईबाबा परत मिळाले होते.. दोघांचं कुटुंब पूर्ण झालं होतं.. वाईटातून काहीतरी चांगलं घडतं असतं, याचा प्रत्यय दोघांना आला.. मात्र आजूबाजूला इतकं वाईट घडलं असताना आपण लग्नाचा वाढदिवस साजरा करु नये, असं दोघांना वाटलं.. कुटुंब तर परत मिळालं होतंच, त्यामुळे पुढे काहीतरी करता येईल, असा विचार दोघांनी आईबाबांना बोलून दाखवला.. आईबाबांनीदेखील त्या विचाराचं स्वागत केलं.. अमोघ आणि अनघाच्या आयुष्यातील एक घटना त्यांच्या संपूर्ण आयुष्यालाच कलाटणी देऊन गेली होती.. आणि एका नव्या प्रवासाची सुरुवात झाली होती..

(समाप्त)
– तीन फुल्या, तीन बदाम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2017 1:01 am

Web Title: exclusive love stories love diaries season two mumbai local train happy ending love stories
Next Stories
1 Love Diaries : भले बुरे जे घडून गेले…
2 Love Diaries : तू असतीस तर…(भाग ३)
3 Love Diaries : तू असतीस तर…(भाग २)
Just Now!
X