… त्या दिवसापासून हळूहळू दोघांमध्ये प्रेम फुलू लागलं होतं. ती दहावीला होती त्यामुळे अभ्यासाचं निमित्त काढून ती स्वप्नीलकडे जायची, तो ही तिची शिकवणी घेण्याच्या निमित्ताने घरी यायचा.
” कल्याणी मी तूला मिस्ड कॉल देईन आईच्या फोनवर तेव्हा तू घरी येत जात” त्याने तिला सांगितलं होतं. त्यामुळे ती आईचा फोन काहीना काही निमित्त काढून बाजूलाच ठेवत होती. स्वप्नीलचा मिस्ड कॉल आला की ती लगेच त्यांच्या घरी जायची.
घरच्यांपासून चोरून त्यांच्या प्रेमाची कळी खुलू लागली होती. घरच्यांसमोर काहीच बोलता यायचे नाही त्यामुळे ते एकमेकांना चिठ्ठ्या लिहित. एक दिवस स्वप्नीलने खिशातून जाता जाता चिठ्ठी काढून तिच्या मांडीवर ठेवली. तिने ती हळूच उघडून पाहिली.
”घरच्यांसमोर मला तुझ्याशी काहीच बोलता येत नाही कल्याणी. मला तुझ्यासोबत खूप गप्पा मारायच्या आहेत. आज रात्री जेवण झाल्यावर टेरेसवर भेटतेस का? तिथे रात्री कोणी नसतं. जर तुझं उत्तर हो असेल तर मला माझ्या फोनवर एक मिस्ड कॉल दे”
स्वप्नीला भेटण्याची कल्पना तिला खूपच आवडली. त्याला होकार दिल्यापासून दोघांना एकमेकांशी बोलायला वेळच मिळाला नव्हता. आधी तो तिचा मित्र होता पण आता नातं बदललं होतं. तिला मनातून जाण्याची खूप इच्छा होती पण बाबांची तिला भीती वाटतं होती. वेळही कमी होता त्यामुळे तिने युक्ती शोधून काढली.
‘बाबा मी प्रियांकाकडे जाऊन आले,’ ती घाई गडबडीत बोलली.
”एवढ्या रात्री जाण्याची काय गरज आहे तिच्याकडे ? अभ्यास करत बस” बाबांनी नकार दिला. पण तिला कसंही करून जायचे होतं. नोट्स आणण्याचे कारण पुढे करत ती घरातून बाहेर पडायला यशस्वी झाली.

वर टेसेच्या कोप-यात स्वप्नील उभा होता. टेरेसवर लाईट नव्हती. काळाकुट्ट अंधार होता त्यामुळे कोणालाही ते दिसणार नव्हते, याची स्वप्नीलला पूर्ण खात्री होती. पाण्याच्या टाकीचा आडोसा पाहून तो बसला.
” तू इथे का बसला आहेस एवढ्या उंचावर?” तिने हळू आवाजात विचारले.
” असंच, तूही वर ये तुला काहीतरी दाखवायचे आहे.”
त्याने आपला हात कल्याणीला दिला. त्याच्या हातात हात ठेवत कल्याणीवर चढली. पहिल्यांदाच तिने त्याच्या हातात हात दिला होता. कल्याणी त्याचा बाजूला जाऊन बसली.
” अगं इतक्या लांब का बसली आहे, इथं कोणी तिसरं येणार नाही तू जवळ बसू शकते माझ्या” त्याने तिला थोडं चिडवण्याचा प्रयत्न केला. तशी कल्याणी त्याच्या बाजूला सरकली.
त्याने तिच्याकडे पाहिलं, कल्याणी लाजली. आपला एक हात त्याने हळूच तिच्या खांद्यावर ठेवला.
” स्वप्नील खांद्यावरचा हात काढ ना! कोणीतरी बघेल आपल्याला”
” इथे कोणीही येणार नाही म्हणून तर तुला इथे बोलावले आहे.” त्याने तिची भीती घालवण्याचा प्रयत्न केला.
”कल्याणी तू दहावी खूप चांगल्या मार्कांनी पास हो आणि माझ्या कॉलेजला अॅडमिशन घे म्हणजे चोरुन भेटण्याची वेळच आपल्यावर येणार नाही. माझ्या सगळ्या मित्रांना तुला भेटायची खूप इच्छा आहे.”
”काय तुझ्या मित्रांना? ते कसे मला ओळखतात?”
” कॉलेजमध्ये मी तुझा फोटो दाखवलाय. सगळ्यांना सांगितलं मी कमिटेड आहे.” तो लाजला.
” कल्याणी मी लग्न करणार तर तुझ्याशीच. किती छान ना! आपण बिल्डिंगमध्ये लग्न करू. तुला लांब माहेरी जाण्याची गरजच भासणार नाही. आईलाही तू आवडते म्हणजे तुझी सासू तुझा जाचही करणार नाही. ” त्याने तिला चिडवले.
त्यावर कल्याणी आणखी लाजली. चांदण्यात तिचा चेहरा उजळून निघाला. आपले लांब केस तिने वर बांधले होते. वा-यामुळे केसांच्या बटा हवेत उडत होत्या. त्याने हाताने तिच्या चेह-यावरची बट बाजूला केली आणि तिला किस केलं. खरंतर दोघंही पहिल्यांदाचं एकमेकांना किस करत होते. कल्याणी थोडी घाबरली होती पण स्वप्नीलने तिला सावरून घेतलं. आपण फार जास्त वेळ घालवत असल्याचे लक्षात आल्याने ती उठली.

”स्वप्नील हा दिवस माझ्या कायम लक्षात राहिल. आपण आठवड्यातून किमान एकदा तरी इथे भेटूयात, मला असा तुझ्यासोबत वेळ घालवायला नक्की आवडेल” असं म्हणत ती गडबडीत निघाली.
आता स्वप्नील आणि तिचा चिठ्ठयांचा खेळ सुरू झाला होता. कल्याणीकडे मोबाईल नसल्याने तो चिठ्ठीतूनच आपल्या भावना व्यक्त करायची. मग रात्री अभ्यासाचं निमित्त करून तिही पुस्तकातल्या चिठ्ठ्या वाचायची.
स्वप्नीलच्या सगळ्या चिठ्ठ्या तिने जपून ठेवल्या होत्या. हळूहळू स्वप्नील आणि तिच्यातले प्रेमाचं प्रकरण त्याच्या मित्रांला आणि बिल्डिंगमधल्या इतर मुलांना कळलं होतं. त्यांना आता तेवढंच निमित्त मिळालं. त्या दिवशी रविवार होता कल्याणी खाली उतरली. बिल्डिंगमधली सारी मुलं खाली खेळत होती.

” ए वहिनी आल्या, जरा हळू बँटिंग करा नाहीतर वहिनीला बॉल लागायचा” एक जोरात ओरडला. कल्याणीला सुरूवातीला बोलण्याचा रोख समजाला नाही.
” ए स्वप्नील जरा नीट खेळ ना नाहीतर तुझी विकेट पडायची” आणखी एक मित्र म्हटला. आता हे आपल्यालाच चिडवत असल्याने कल्याणी मात्र चांगलीच बावरली. आधी तिने फारसं मनावर घेतलं नाही पण नंतर मात्र बिल्डिंमधल्या मुलांचं खूपच अती होत चाललं होतं. इतर लोकांना कळेल आणि लोक आपल्याला नावं ठेवतील या भितीने तिला धडकी भरू लागली होती. बिल्डिंगमधल्या या टवाळखोर मुलांचं तोंड कसं बंद करायचं तिलाही कळत नव्हतं. एकदिवस तिने स्वप्नीलच्या कानावर सगळं प्रकरण घातलं.
”स्वप्नील तुझे मित्र आणि बिल्डिंगमधली काही मुलं मला तुझ्या नावाने चिडवतात, तुझ्या मित्रांपुरता ठिक होतं आता बिल्डिंगमधली इतर मुलही माझी छेड काढतात. जर बिल्डिंगमधल्या कोणी मोठ्यांनी ऐकलं तर माझी खूप बदनामी होईल. बाबांना कळलं तर मला खूप मारतील आणि तूझं माझं बोलणं कायमचं बंद करतील तू प्लीज समजाव त्यांना”’ कल्याणी रडू लागली. तिच्या डोळ्यातलं पाणी बघून स्वप्नीलला त्याच्या मित्रांचा आणि इतर मुलांचा खूपच राग आला. तो संध्याकाळी बिल्डिंगखाली उतरला, काही टवाळखोर आणि स्वप्नीलचे मित्रही त्यात उभे होते.

” तुम्ही का कल्याणीला माझ्या नावाने चिडवता, तिला नाही आवडत ते सगळं, ती चांगली मुलगी आहे प्लीज तिची बदनामी करू नका” शक्य तितक्या शांततेने त्याने सगळ्यांना सांगितलं.
”बदनामी काय, तुमच्यात लफडं सुरू आहे आपल्याला माहितीये ना, पक्की खबर आहे आपल्याला” शाळेत तीनदा नापास झालेल्या पक्या बोलला.
” आणि तुझ्या आयटमला बोलला तर काय झाला एवढा इश्यू करायला? प्यार किया तो डरना क्या?” पक्या पुन्हा बोलला.
”नीट बोल पक्या, तिला आयटम बोलू नकोस. कल्याणी नाव आहे तिचं” स्वप्नील रागात ओरडला.
”ओ राग आला छाव्याला, जा चिडवणार तुझ्या आयटमला काय करणार तू?” बाबू बोलला.
स्वप्नीलने थेट बाबूची कॉलर पकडली. पक्या बाबू आणि स्वप्नीलची मारामारीच होणार होती, पण कशीबशी स्वप्नीलच्या मित्रांनी भांडणं सोडवली. नंतर बिल्डिंगमधल्या कल्याणीच्या मैत्रिणीने तिला खाली घडलेला प्रकार सांगितला, तिचा भाऊ खालीच होता. आता मात्र कल्याणीला भीती वाटू लागली. बाबू आणि पक्या बिल्डिंगमधली वाया गेलेली मुलं होती. आई वडिलांना ते मुळीच ऐकायचे नाहीत, सतत बिल्डिंगखाली उभे राहून येणा-या जाणा-यांची छेड काढणं त्याचा ठरलेला उद्योग होता. त्यातून स्वप्नीलने त्यांच्या कॉलरला हात लावला म्हटल्यावर ते काहीतरी करणार याची तिला खात्री होती. पण काय करणार हे मात्र तिला कळत नव्हतं. हातात पुस्तक वाचता वाचता कधी डोळा लागला हे तिचं तिलाच कळलं नाही.

दुस-या दिवशी ती उशीरा उठली, एवढ्यात बिल्डिंगची बेल कोणीतरी जोरात वाजवली. आई किचनमधून ओरडत होती
” बघ कोण आलंय दारात. किती जोरात बेल वाजवतंय, आधी दार उघड”
कल्याणी बेडरूममधून धावत हॉलमध्ये गेली, तिने दरवाजा उघडला, एवढ्यात प्रियांका बाहेर उभी होती, तिची लहानपणापासूनची मैत्रिण होती ती. तिला स्वप्नील आणि कल्याणीमधलं सारं प्रेमप्रकरण माहिती होतं.
”आधी बाहेर ये तू, मला महत्त्वाचं बोलायचं आहे” तिने कल्याणीला बाहेर खेचलं.
”काय झालंय?”
” लिफ्टमध्ये, बिल्डिंगच्या तळमजल्याच्या भिंतीवर, बोर्डवर सगळीकडे तूझं नाव लिहिलंय” प्रियांका घाबरून म्हणाली.
”म्हणजे मला कळलं नाही?”
तिने कल्याणीच्या हाताला पकडून तिला लिफ्टमध्ये खेचलं, ”हे बघ.”
तिला धक्काच बसला. लिफ्टमध्ये ठिकठिकाणी बदाम काढून त्यात ” Swapnil loves kalyani” असं लिहिलं होतं. भिंतीवरही तेच होतं. फक्त ‘ए’ विंगच नाही ‘बी’ विंगमध्येही तोच प्रकार होता. ”१० वाजले होते, म्हणजे बिल्डिंगमधल्या सगळ्याच लोकांनी हे पाहिलं असणार” या विचारानेच तिला धडकी भरली, कल्याणीला रडू आलं. ती रडूच लागली.
”हे नक्कीच पक्या आणि बाबूचं काम असणार, काल स्वप्नीलने लफडं केलं ना!” प्रियांका म्हणाली.

” पण मी त्यांच काय वाईट केलं होतं, माझी अशी बदनामी का केली त्यांनी? मी आता काय करू ?” तिने रडत विचारलं.
”घाबरू नकोस. माझा दादा आणि स्वप्नील ‘बी’ विंगमधली नावं पुसतो आहे, आता कोणी येणार नाही. कोणी यायच्या आत आपण इथली नाव पुसू. ” दोघीही कामाला लागल्या. कल्याणीला धक्काच बसला होता, भितीने तिच्या पोटात गोळा येत होता. अर्थात हा प्रकार आपल्या घरात तरी कळला नसावा एवढीच ती प्रार्थना करत होती.
ती घरी आली, तिने घाईत तयारी केली आणि शाळेत निघून गेली. शाळेतही तिचं लक्ष लागत नव्हतं, एकतर दहावीचं वर्ष होतं, त्यातून स्वप्नीलमुळे आपण अभ्याकडे दुर्लक्ष करतोय तिला कळत होतं, पण त्याचबरोबर घरी कळलं तर काय होईल या भितीने तिचे पाय कापत होते. शेवटी ज्याची भिती होती तेच झालं.

बाबा कामावरून घरी येताना शेजारच्यांनी सकाळी घडलेला प्रकार बाबांच्या कानावर घातला होता.
”काय रे तुझ्या मुलीचे प्रताप पाहिलेत का?अख्या बिल्डिंगमध्ये तिच्या नावाच्या चर्चा आहेत. सगळीकडे स्वप्नील सोबत तिचे नाव लिहिले आहे. तुझी पोर वाया गेलीय. लक्ष ठेव जरा पोरीवर. या वयात नको ती लफडी कसली करते ती” शेजारच्या काकांनी कल्याणीच्या बाबांना ऐकवलं. हे ऐकून त्यांना मेल्याहूनही मेल्यासारखे झाले. तिच्या बाबांना हे बोलणं खूपच लागलं. बाबाचं मन ते, आपल्या मुलीची बदनामी झालीच शिवाय आपलीही मान तिने खाली घातली असंच त्यांना वाटू लागलं. ते कल्याणी घरी येण्याची वाटच बघत होते. आईही रागावली होती.

बाबांनी न विचारता तिला मारायला सुरूवात केली. बाबांनी का हात उगारला असणार याची कल्पना तिला आली होती. ”तूझं स्वप्नील सोबत काय सुरू आहे? शाळेत शिकायला जातेस की असले उद्योग करायला जाते.” बाबांना आणखी आवाज चढवत तिच्या कानाखाली वाजवली. कल्याणी मात्र बाबांचा मार खात होती. बाबा इथेच थांबले नाही त्यांनी कल्याणीच्या बॅगेचीही झडती घ्यायला सुरूवात केली. त्यात स्वप्नीलने लिहिलेल्या चिठ्ठ्या होत्या, बाबांचे डोकं आणखीच गरम झालं. बाबांचा मार खाऊन बिचारी कल्याणी तिथेच पडली होती, पण हे सारं प्रकरण इथेच थांबलं नाही, बाबांचं डोकं इतकं गरम होतं की या चिठ्ठ्या घेऊन ते थेट स्वप्नीलच्या घरीच गेले.
”माझ्या मुलीला पत्र लिहितो, घरी अभ्यास शिकवायला यायचास ना आणि असे उद्योग करतोस” स्वप्नीलच्या घरच्यांसमोरच तिच्या बाबांनी त्याच्या कानाखाली लगावली. स्वप्नील खाली मान घालून रडू लागला. आपल्या मुलाला हात लावल्याबरोबर स्वप्नीलचे बाबाही भडकले.

”काय झालंय माझ्या मुलावर का हात उगारलात?”
” विचारा तुमच्या मुलाला. माझ्या मुलीला नादी लावलंय त्याने. एवढ्या लहान वयात प्रेम करतोय, समजवा त्याला नाहीतर असा मार देईन त्याला की बारावीची परीक्षा द्यायला हात उरणार नाहीत त्याचे” कल्याणीचे बाबा पुन्हा स्वप्नीलला मारणार एवढ्यात त्याचेच बाबा त्यांच्या अंगावर धावून गेले. हा वाद खूपच वाढला. बिल्डिंगमधले अनेक जण आयता तमाशा बघायला जमले होते. पक्या. बाबू लांबून तोंडसूख घेत होते. शेवटी शेजा-यांनी समजावून कल्याणीच्या बाबांना घरी पाठवलं.
” या पुढे स्वप्नीलच्या घरी गेली तर बघ, तुझ्या बाबांचं मेलेलं तोंड बघशील, आधीच बिल्डिंगमध्ये बदनामी करून ठेवलीस तू माझी.” घरी येऊन बाबांनी कल्याणीला पुन्हा चोप दिला. तिच्यासाठी स्वप्नीलच्या घराचे दार कायमचे बंद झाले होते.
स्वप्नीलने अनेकदा कल्याणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. कोवळ्या वयात प्रेम केलं म्हणून काय झालं त्याचं ते पहिलं प्रेम होतं. पुढे अनेकवर्ष त्याने कल्याणीशी संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न केले, पण बाबांच्या भितीने कल्याणीने कधीच त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. आपल्यामुळे बाबांना खूप त्रास झाला होता त्या प्रकरणानंतर बाबांनी बिल्डिंगमधल्या लोकांशी बोलणं टाळलं होतं, कार्यक्रमालाही ते जाणं सोडून दिलं होतं, त्यांना मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं, कल्याणीला हे कळत होतं. आपल्यामुळे बाबांना आणखी त्रास होऊ नये म्हणून कल्याणीने स्वप्नीलचा विषय कायमचा मनातून काढून टाकला.

लग्नाला होकार देण्यापूर्वी स्वप्नीलने शेवटचा तिला मेसेज केला होता.
” कल्याणी आता त्या प्रसंगाला आठ एक वर्ष उलटली असतील. माझं आजही तुझ्यावर तितकच प्रेम आहे. फक्त एकदा हो म्हण तुझ्या बाबांना मनवण्याचा प्रयत्न करतो. मी लग्न करतोय ती फक्त एक तडजोड म्हणून. माझ्या मनात तूच होती आणि तूच राहशील. तू जर साथ दिली तर नक्कीच मी तूला खूप सुखात ठेवेन.” पण तिने वाचूनही त्याला रिप्लाय दिला नाही. त्याने अनेकदा तिला हेच मेसेज केले पण शेवटी मनात नसतानाही मनावर दगड ठेवून तिने त्याला नकार दिला. आता आठवड्याभरानंतर त्याचं लग्न होतं. जर ते प्रकरण झालंच नसतं तर आज बिल्डिंगमध्ये पुन्हा एकदा आपलं नाव लिहिलं गेलं असतं. पण यावेळी बदामात ‘swapnil love kalyani’ असं न लिहिता ‘swapnil weds kalyani’ लिहिलं असतं… पण आता वेळ निघून गेली होती.

(उत्तरार्ध)
तीन फुल्या, तीन बदाम

 

© सर्व हक्क सुरक्षित