हळूहळू स्वरुप सावरु लागला होता.. मात्र तरीही तो वारंवार फोन चेक करायचा.. सुरभी नेमकी कुठे गेली?, ती कुठे असेल?, बरी असेल ना?, तिला काही झालं तर नसेल?, असे विचार वारंवार स्वरुपच्या डोक्यात यायचे.. त्यातच दारुच्या अॅडिक्शनमधून सुरभी पूर्णपणे बाहेर आली नव्हती.. त्यामुळं सुरभीचा विचार करुन स्वरुपची अवस्था अतिशय वाईट झाली होती.. स्वरुप दररोज सुरभीला कॉल करायचा.. मात्र सुरभीचा नंबर कायम स्विच ऑफ असायचा.. सुरभी अचानक मला सोडून कशी काय जाऊ शकते, तिनं तर मला प्रॉमिस केलं होतं.. असे विचार स्वरुपच्या डोक्यात घोळत होते..

स्वरुपच्या स्थितीमुळं आई-बाबादेखील टेन्शनमध्ये होते.. मात्र आपल्या एकुलत्या एका मुलाला यातून बाहेर काढायचं, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते.. त्यामुळं विकेन्डला फिरण्याचे प्लान्स केले जात होते.. स्वरुपला एकटं ठेवायचं नाही, कायम त्याच्यासोबत राहायचं, असे दोघांनीही ठरवलं होतं.. स्वरुप काही दिवसांनंचर थोडा नॉर्मल झाला होता.. मात्र त्याच्या दिवसाची सुरुवात आणि अखेर सुरभीच्या विचारानेच व्हायचा.. पदरी निराशा पडणार हे माहित असूनही स्वरुप रोज सुरभीला फोन करायचा.. तिच्या घरी जाऊन यायचा.. दाराला कुलूप असायचं.. वर्षभराचा कालावधी असाच गेला..

स्वरुपचे प्रमोशन झालं होतं.. त्याच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली होती.. त्यासाठी त्याला काही वर्षे जर्मनीला जावं लागणारं होतं.. तसंही आता इथे काही राहिलेलं नाही, हा विचार करुन स्वरुपनं प्रमोशन स्वीकारलं.. आई वडिलांना प्रचंड आनंद झाला.. पण सुरभी अचानक आयुष्यातून गेल्याने मानसिकदृष्ट्या खचलेला आपला मुलगा इतक्या कोसांवर, अनोळखी माणसांमध्ये राहू शकले का, याबद्दल स्वरुपच्या आई-वडिलांना शाश्वती नव्हती.. कारण सुरभी नसली, तरी तिच्या आठवणी होत्या.. त्याच आठवणींच्या अॅडिक्शनमध्ये स्वरुप जगत होता..

अखेर तो दिवस उजाडला.. फ्लाईट पकडण्यासाठी स्वरुप एअरपोर्टला आला.. सोबत आई-बाबादेखील होते.. अंतरादेखील होती.. कॉलेजमध्ये अंतरासोबत कायम दिसणारी आणि त्यानंतर स्वरुपच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून गेलेली सुरभी मात्र तिथे नव्हती.. मागं काहीतरी राहून जातंय, असं वारंवार स्वरुपला वाटतं होतं..

स्वरुप सगळ्यांचा निरोप घेत होता.. आईला, अंतराला बाय म्हणून झाल्यावर स्वरुप बाबांना शोधू लागला.. बाबा जवळच्या अंतरावर मॅगझिन्स चाळत फोनवर बोलत होते.. स्वरुपनं हाक मारल्यावर ते दोन मिनिटांत त्याच्याजवळ आले.. सर्वांना निरोप देताना स्वरुपचा कंठ दाटून आला.. स्वरुप चालू लागला होता.. डोळे पाणावले होते.. आपण खूप काहीतरी कायमच सोडून जातोय की काय, या विचाराने अश्रू ओघळू लागले होते..

“स्वरुप…” मागून आवाज आला.. विचारात बुडून गेलेल्या स्वरुपनं मागं वळून पाहिलं.. आई बाबा आणि अंतरा दिसत होते.. पण ते देखील मागेच पाहात होते.. तो आवाज सुरभीचा होता.. सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.. फ्लाईटसाठी घोषणा होत होती.. मात्र स्वरुपला त्याचं भान नव्हतं.. स्वरुप वर्षभरानंतर तो त्याच्या सुरभीला पाहात होता… सुरभीनं थेट धावत येऊन त्याला मिठी मारली..

“तू होतीस कुठे? काय करत होतीस? फोन कुठं आहे? अगं एकदा पण कॉल करता येत नाही का?”, स्वरुपनं प्रश्नांचा भडीमार केला..
“बाबांनी प्रॉमिस घेतलं होतं म्हणून तुझ्यापासून दूर गेले होते.. स्वरुपला तू कधीही भेटणार नाहीस.. त्याला त्याचं आयुष्य जगू दे.. त्यानं खूप मोठं व्हावं, अशी त्यांची इच्छा असल्याचं म्हटलं होतं त्यांनी.. म्हणून काहीही न सांगता निघून गेले होते रे..” सुरभीचा कंठ दाटून आला होता.. स्वरुपपासून दूर राहणं तिला किती कठीण गेलंय, हे तिच्या प्रत्येक शब्दांमधून समजतं होतं..

“बाबा, तुम्ही असं का वागलात? माझी काय अवस्था झाली होती, तुम्ही पाहिलीत ना?” स्वरुपनं रागारागानेच बाबांना विचारलं..
“माहितीय रे स्वरुप.. अरे बाप आहे मी तुझा.. तुझी अवस्था समजत होती मला.. मात्र तुम्हा दोघांचे स्वभाव निराळे.. त्यात मध्येच तुमच्यात निर्माण झाला दुरावा.. मग सुरभीला झालेलं दारुचं अॅडिक्शन.. त्यामुळं तिची झालेली अवस्था.. याची मला जास्त चिंता होती..”, बाबांच्या मनातदेखील भावना दाटून आल्या होत्या..

“म्हणून तुम्ही आम्हाला वेगळं केलंत?” स्वरुपचा राग शांत झाला नव्हता..

“हो.. वेगळं केलं मी तुम्हाला.. कारण मला माझ्या स्वरुपसाठी सुरभी योग्य वाटत नव्हती.. तुमचे भिन्न स्वभाव, घरातील वेगळी परिस्थिती, सुरभीनं स्वत:ची करुन घेतलेली अवस्था यामुळं तुमचं भविष्य फार काही चांगलं वाटतं नव्हतं मला.. म्हणून मी तुम्हाला वेगळं केलं.. त्यासाठी अगदी सुरभीला शपथदेखील घातली स्वत:ची.. आणि ती बिचारी माझ्या शब्दाखातर, मी दिलेल्या शपथेखातर निघून गेली तुझ्यापासून दूर..” बाबांच्या आवाजात, चेहऱ्यावर पश्चातापाची भावना होती..

“आता मी गेलो असतो तर..? माझी आणि सुरभीची कधीही भेट झाली नसती बाबा..? तुम्ही हे काय केलंत बाबा?” स्वरुपचा राग अनावर झाला होता.. तेवढ्यात सुरभीनं स्वरुपला मिठी मारली.. स्वरुप थोडा शांत झाला.. स्वरुपच्या आईला आणि अंतराला काय बोलावं तेच समजतं नव्हतं..

“सुरभीला मधल्या काळात दारुचं अॅडिक्शन होतं.. मात्र त्यापेक्षाही कित्येक पट जास्त तिला तुझं आणि तुला तिचं अॅडिक्शन आहे, हे इतक्या कालावधीत जाणवलं रे मला स्वरुप.. सुरभीकडून वचन घेतलं तेव्हाची तिची अवस्था आणि गेल्या काही महिन्यांपासून तुझी झालेली अवस्था सारखी डोळ्यांसमोर येत होती.. तुम्हाला वेगळं करणं म्हणजे तुमच्यातल्या तुम्हालाच संपवणं, असं वारंवार वाटतं होतं..” बाबांच्या डोळ्यात आता अश्रू तरळले होते.. “म्हणून विचार केला एक वेळ स्वरुप जर्मनीला गेला नाही तरी चालेल.. इथेही त्याचं सर्व व्यवस्थित होईल.. कारण इथे त्याला सुरभीची आणि सुरभीला त्याची गरज आहे…”

“आपण कायमस्वरुपी एकमेकांपासून दूर जाऊ नये, याची काळजी घेतलीये बाबांनी..” सुरभीनं स्वरुपला समजवण्याचा प्रयत्न केला..
“म्हणजे?” आता स्वरुपसोबत आई आणि अंतरादेखील गोंधळले होते..

“मी तुझ्यापासून दूर गेले होते.. कोणाच्याही संपर्कात नव्हते.. मात्र बाबांना तुझी अवस्था कळत होती.. तू जर्मनीला जाणार होतास.. मात्र तू तिथे राहू शकणार नाहीस, याची बाबांना खात्री होती.. तुझ्या मनाची परिस्थिती काय होती, हे त्यांना समजलं होतं.. त्यामुळेच त्यांनी काल मला फोन केला.. माझ्या मुलानं परदेशात जावं, हे माझं स्वप्न आहे.. मात्र मुलाला परदेशात पाठवलं आणि मुलगा कायमचा गेला, असं व्हायला नको.. म्हणून त्यांनी मला कालच फोन केला.. तेव्हा मी मामाकडं होते पुण्याला.. आजच सकाळी मुंबईत आले आणि आता थेट एअरपोर्टला.. आपल्या दोघांना एकमेकांची किती गरज आहे, हे बाबांच्या लक्षात आलं आणि म्हणूनच आज आपण एकत्र येऊ शकलो.. त्यामुळं आपल्याला वेगळं करणाऱ्या बाबांनी आपल्याला एकत्र आणलंय, हे विसरु नको स्वरुप..” सुरभीच्या या स्पष्टीकरणामुळं संपूर्ण गुंता सुटला होता..

स्वरुपनं सर्व काही विसरुन बाबांना मिठी मारली… आईदेखील बाप-लेकांच्या मिठीत शिरली.. बाबांनी अगदी प्रेमानं सुरभीला सर्वांजवळ बोलावलं.. “सूनबाई आल्या.. आता फॅमिली कम्प्लिट.. आता चौघेही छान आनंदात राहू”, असं म्हणताना बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहात होता आणि डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहू लागले होते.. अनेक महिन्यांपासूनच ओझं बाबांच्या डोक्यावरुन उतरलं होतं.. समोर असलेल्या अंतरानं हा परफेक्ट फॅमिली फोटो तिच्या मोबाईलमध्ये क्लिक केला होता…

– तीन फुल्या, तीन बदाम

 

© सर्व हक्क सुरक्षित