04 July 2020

News Flash

Happy Chocolate Day: माझिया प्रियाला प्रित कळेना…

१० वर्षांपूर्वी अमोघ आणि अनन्या पहिल्यांदा भेटले होते..

Love Diaries : प्रेमकथा

सनई चौघड्याचे सूर निनादत होते.. संपूर्ण हॉल माणसांनी भरुन गेला होता.. अमोघ अवघ्या काही वेळातच स्टेजवर येणार होता.. अनन्या स्टेजकडे डोळे लावून बसली होती.. आजूबाजूला सर्वत्र घाई गडबड सुरू असताना अनन्या भूतकाळात गेली.. अमोघ सोबतची पहिली भेट तिला आजही अगदी व्यवस्थित आठवत होती..

१० वर्षांपूर्वी अमोघ आणि अनन्या पहिल्यांदा भेटले होते.. भेटले म्हणण्यापेक्षा एकमेकांची नजराजनर झाली होती.. अमोघनं सिनियर कॉलेजला अॅडमिशन घेतलं होतं.. वर्ग शोधता शोधता उशीर झाल्यामुळे पहिल्याच दिवशी उशीर झाला होता.. अनन्या अकरावी,

बारावीलादेखील त्याच कॉलेजला असल्यानं तिला संपूर्ण कॉलेज ओळखीचं होतं.. अनन्या पहिल्या बेंचवरच बसली होती.. तितक्यात ‘मे आय कमिंग…’ असं विचारत अमोघ वर्गात आला.. काहीसा गोंधळलेला अमोघचा चेहरा अनन्याच्या कायम लक्षात राहिला.. पुढच्या बेंचवर जागा नसल्याने अमोघ मागे जाऊन बसला.. जाताना अमोघ आणि अनन्याची नजरानजर झाली..

पुढे एकाच प्रोजेक्ट ग्रुपमध्ये असल्याने अमोघ आणि अनन्याची ओळख झाली.. अनन्या दिसायला सुंदर.. सडपातळ बांधा.. मध्यम उंची.. जीन्स टॉप घालणारी.. फारशी फॅशन नाही.. मात्र चारचौघीत उठून दिसणारी.. मेक अप न करताही अतिशय सुंदर दिसणारी.. अमोघही तसा साधा.. फारशी फॅशन नाही.. आपण कॉलेजमध्ये अभ्यास करायला येतो.. कोणाला इम्प्रेस करायला नाही, या विचारांचा अमोघ कायम जीन्स आणि शर्टमध्ये कॉलेजमध्ये यायचा.. मात्र एकदा अमोघने प्रिंट असलेला टी शर्ट घातला होता आणि तेव्हापासूनच अमोघ आणि अनन्या एकमेकांशी बोलायला लागले..

‘ए हा टी-शर्ट छान आहे.. तू जनरली नाही घालत ना टी-शर्ट?’ अनघा म्हणाली.. यातून ती अमोघला ऑब्जर्व्ह करते हे कळून येत होतं.. मात्र ते अमोघच्या लक्षात आलं नाही..

‘फारसे नाहीयत टी-शर्ट.. हे टी-शर्ट मित्रांनी प्रिंट केलंय.. त्यावरचं वाक्यदेखील त्यांचंच आहे.. म्हणून घातलंय..’ अमोघचं उत्तर ऐकताच अनन्या त्याच्या टी-शर्टवरचं वाक्य वाचू लागली..

‘काय लिहिलंय..? गैरसमज हे मॅगीसारखे असतात.. लगेच होतात.. अमोघ हे भारी आहे..’ अनघाच्या चेहऱ्यावर हसू फुललं होतं..
‘आपले मित्रच भारी आहेत..’ अमोघ म्हणाला.. मात्र का कुणास ठाऊक त्यापुढे तो काहीच बोलला नाही..
एकाच प्रोजेक्ट ग्रुपमध्ये असल्याने अमोघ आणि अनन्या अनेकदा सोबत असायचे.. अमोघ तसा हुशार होता.. नवनव्या संकल्पना त्याला अगदी पटकन सुचायच्या.. त्याचं कम्युनिकेशन स्किल अगदी उत्तम होतं.. त्यामुळे अमोघ म्हणजे वर्गातलं एक स्मार्ट व्यक्तिमत्त्व होतं.. शिक्षक त्याला अगदी व्यवस्थित ओळखायचे.. मात्र प्रेजेंटेशनच्यावेळी न अडखळता, सलग बोलणारा अमोघ इतरवेळी गप्प असायचा.. लेक्चर्स झाली, प्रोजेक्ट डिस्कशन संपली की अमोघ लगेच घरी जायला निघायचा.. त्यामुळे अमोघ नेमका कसा आहे, कोणता अमोघ खरा आहे, असे प्रश्न अनन्याला पडायचे.. एक दिवस असाच अमोघ घरी जायला निघाला होता.. तेवढ्यात अनन्या अमोघच्या समोर आली..

‘घरी निघालायस?’ अनन्याने संवाद सुरू केला..

‘हो’, एकाच शब्दात अमोघने उत्तर दिलं..

‘तू बोरिवलीला राहतोस ना..?’ अनन्याने संवाद सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला..

‘हो..’ अमोघने कमीतकमी संवाद होईल, याची काळजी घेतली..

‘मी पण बोरिवलीला राहते.. तू ट्रेननेच जाणार ना? चल ना आपण सोबत जाऊ..’ अनन्या नेहमीप्रमाणे हसत म्हणाली.. अमोघ शांत होता..

‘तुला नाही चालणार का? नको जाऊया का सोबत?’ अनन्याने शांतपणे विचारलं..

‘ठिक आहे.. चल..’ अमोघ म्हणाला.. अमोघ आणि अनन्या पहिल्यांदाच एकत्र प्रवास करणार होते.. मात्र प्रवासातदेखील अमोघ फारसं बोलला नाही.. मात्र अमोघच्या आयडीवरुन तो दोन वर्षे मोठा असल्याचं अनन्याला समजलं होतं.. मात्र इतका हुशार मुलगा दोन वर्षे नापास होईल, यावर अनन्याचा विश्वास बसत नव्हता.. मात्र अमोघचा अबोल स्वभाव पाहता तो इतक्या लवकर काही सांगेल, असं अनन्याला वाटत नव्हतं.. ट्रेनमध्येही अमोघ शांतच होता.. अनन्या अधे मधे बोलत होती.. अमोघ त्या प्रश्नांची मोजक्या शब्दांमध्ये उत्तरं देत होता..

अमोघचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, हे एव्हाना अनन्याच्या लक्षात आलं होतं.. कॉलेज प्रोजेक्ट, प्रेजेंटेशन्सवेळी व्यवस्थित बोलणारा अमोघ हाच का, असा प्रश्न पडावा, इतका तो शांत होता.. अनन्या दररोज अमोघसोबतच ट्रेनने बोरिवलीपर्यंत यायची.. ते एकाच परिसरात राहात होते.. थोड्या दिवसांनी ते एकत्रच कॉलेजला जाऊ लागले..

‘अमोघ तू दोन वर्षांनी मोठा आहेस ना..? एक दिवस अनन्याने कॉलेजला जाताना न राहवून विचारलं..
‘तुला कसं समजलं..?’ अमोघच्या चेहऱ्यावर प्रश्न होता..

‘अमोघ, आपल्या आयडीवर बर्थ डेट असते.. आणि तू शहाण्या बाळासारखं ते आयडी नेहमी घालतोस.. त्यामुळे समजलं..’ अनन्यानं वातावरण हलकं फुलकं करण्याचा प्रयत्न केला..

‘अच्छा.. बरोबर आहे..’ अमोघने मोजक्या शब्दात प्रत्युत्तर दिले..

‘नेमकं काय झालं होतं? काही मेजर प्रॉब्लेम आहे का?’ अनन्याने आस्थेवाईकपणे विचारलं..
‘थोडे प्रॉब्लेम झाले होते.. त्यामुळे दोन वर्षे वाया गेली.. पण कधी कधी चांगलंच असतं ना.. कोण आपलं कोण परकं ते कळतं.. वाईट दिवस आल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही..’ अमोघ व्यक्त होत होता.. नेहमी अगदी मोजक्या शब्दांमध्ये बोलणारा अमोघ पहिल्यांदा मोकळा होत होता..

‘नेमकं काय झालं दोन वर्षांत अमोघ?’ अनन्याने प्रेमळपणे विचारले.. इतका आपलेपणा अमोघने दोन वर्षांमध्ये एकदाही अनुभवला नव्हता..

‘बरंच काही.. दोन वर्षांपूर्वी सर्वकाही होतं.. एक हसरं कुटुंब.. खूप मित्र.. त्यांच्यासोबत धम्माल.. दहावीला चांगले मार्क्स मिळाले होते.. इंजिनियरिंग करायचं होतं.. म्हणून सायन्सला अॅडमिशन घेतलं.. तिथेही छान मित्र मिळाले.. सर्वकाही सुरळीत सुरू होतं.. मात्र त्यानंतर आयुष्य इतक्या वेगानं बदललं.. सूर्याच्या लख्ख प्रकाशात चालताना अचानक सूर्य, त्याचा प्रकाश सर्वकाही लुप्त व्हावं आणि पुढची वाट अंधारुन जावी, असं वाटू लागलं.. आई-बाबा वेगळे झाले.. त्यामुळे माझं लक्ष कशातच लागेना.. मित्रही दुरावले.. इतका खचलो की

इंजिनियरिंग जमेल असं वाटतं नव्हतं.. सायन्स कठीण जाऊ लागलं.. तिथे इंजिनियरिंग काय जमणार? अॅडमिशन तरी मिळेल का? असं वाटू लागलं आणि म्हणून बारावीनंतर बीएमएमला अॅडमिशन घेतलं..’ अमोघ रिता झाला होता.. मनात साठवून ठेवलेलं सर्वकाही बाहेर आलं होतं..

एका व्यक्तीचं आयुष्य इतक्या कमी वेळात असं बदलू शकतं, याची कल्पनादेखील अनन्याने केली नव्हती.. अनन्यानं अमोघचं डोकं खांद्यावर ठेवलं.. त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसले.. अमोघ व्यक्त झाला, त्यानं मन मोकळं केलं, त्यामुळे अनन्याला बरं वाटत होतं.. अमोघची मनःस्थितीदेखील काहीशी तशीच होती..

आयुष्यात घडलेल्या त्या घटनांनंतर अमोघने मैत्री वगैरे करणं बंद केलं होतं.. इंजिनियरिंग करता आलं नाही.. मात्र आपल्यातल्या क्रिएटिव्हिटीच्या जोरावर अॅडव्हर्टायझिंगमध्ये चांगलं करिअर करायचं त्यानं ठरवलं होतं.. आता अनन्यादेखील सोबत होती.. अनन्या मोकळ्या स्वभावाची होती, तरी तिच्या आसपास मित्रमैत्रिणींचा गोतावळा नव्हता.. प्रोजेक्ट ग्रुप सोडला तर ती फारशी कुणाशी बोलायची नाही.. कायम आनंदी असायची.. मात्र त्यासाठी कोणी सोबत असायला हवं, असं काही नव्हतं.. मात्र आता अमोघ कायम तिच्यासोबत असायचा.. त्या दोघांना एकमेकांचा सहवास आवडायचा..

‘अमोघ तुला फोटोग्राफी आवडते ना?’ एकदा सहज कॉलेजमधून घरी जाता जाता अनन्यानं विचारलं..

‘हो.. पण हे तुला कसं कळलं..? हे मी आयडी कार्डवर लिहिलेलं नाही..’ गमतीच्या स्वरात अमोघ म्हणाला..

‘अरे, तुझं फेसबुक प्रोफाईल चेक केलं.. थोडे जुने फोटो पाहिले.. त्यावरुन कळलं..’ अनन्या म्हणाली..

‘अच्छा.. फेसबुक प्रोफाईल पण चेक करुन झालंय का..?’ अमोघनं उत्तर दिलं..

‘हो.. केलं मी चेक.. तू इतका कमी बोलतोस की मला असा शोध घ्यावा लागतो.. तू कायम मनमोकळेपणाने बोलत जा माझ्यासोबत.. मित्र दुरावले म्हणून माझ्यासोबत असं वागणार का? मी नाही जाणार तुला सोडून..’ अनन्याच्या बोलण्यात विश्वास होता.. तिच्या मनातली भावना तिनं अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली होती..

‘हो मला फोटोग्राफी आवडते.. जायचंय का कुठे बाहेर फोटोग्राफीला?’ अमोघने अनन्याला थेट मुद्यावर आणलं..
‘हो.. जाऊ या ना.. नॅशनल पार्क.. दोघांना जवळ आहे..’ अनन्याने पर्याय सुचवला..

दोन वर्षांपासून प्रचंड डिप्रेशनमध्ये असणारा अमोघ नॉर्मल होऊ लागला होता.. स्वत:कडे लक्ष देऊ लागला होता.. फोटोग्राफी पुन्हा सुरू झाली होती.. हे सर्व पाहून अमोघच्या आईला प्रचंड आनंद झाला होता.. तिलादेखील जगण्याचं बळ मिळालं होतं.. अमोघच्या बोलण्यात वारंवार अनन्याचा उल्लेख असायचा.. त्यामुळे याच मुलीमुळे अमोघ पुन्हा जिद्दीने उभा राहिला आहे, हे अमोघच्या आईला समजलं होतं.. अनन्या बऱ्याचदा घरीदेखील यायची.. मनमिळाऊ स्वभावाची अनन्या अमोघच्या आईला खूप आवडली..

हळूहळू दिवस पुढे सरकू लागले.. अमोघ आणि अनन्याची मैत्री आणखी घट्ट होत गेली.. कॉलेजमधल्या अनेकांना त्या दोघांचं अफेअर सुरू आहे, असं वाटू लागलं.. दिवसाची सुरूवात एकत्र ते अगदी रात्रीच्या जेवणानंतर वॉक असा दिनक्रम सुरू होता.. सुरुवातीला अबोल असलेला अमोघ आता छान बोलायचा.. गप्पा मारायचा.. अनन्या आणि अमोघ एकमेकांचे सर्व काही झाले होते.. आता तर अमोघच्या चेहऱ्याकडे पाहूनदेखील अनन्याला सर्व समजायचं.. आणि अनन्याच्या आवाजातला चढउतार अमोघला सर्व सांगून जायचा.. अमोघ आणि अनन्या एकमेकांच्या खूप जवळ आले होते..

‘अनन्या, ए अनन्या.. चल लवकर स्टेजवर.. अमोघ आला..’ अनन्याची आई हाका मारत होती.. अनन्या अचानक भानावर आली.. अमोघ खरोखरच स्टेजवर आला होता.. फ्लॅशबॅकमध्ये हरवून गेलेली अनन्या स्टेजवर गेली.. अमोघची आईदेखील स्टेजवर होती.. हॉलमध्ये अक्षता वाटल्या जात होत्या.. अमोघच्या आईला पाहताच अनन्या त्यांच्याजवळ गेली.. गेल्या ५ वर्षांपासून घरी येणं जाणं असल्यामुळे अमोघची आई कधीच अनन्याची आई झाली होती.. अमोघच्या आईजवळ गेल्यावर अनन्याला अश्रू अनावर झाले होते..

‘काकी, मला तुमची सून व्हायला खूप आवडलं असतं..’ हे एकच वाक्य अनन्या अमोघच्या आईच्या कानात म्हणाली होती.. अमोघच्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते.. आई आणि अनन्याकडे पाहात असलेल्या अमोघला नेमकं काय झालंय हे समजलं होतं.. अनन्या स्टेजवरुन उतरुन निघून जात होती.. एक चांगला मित्र आणि मैत्रीण गमावू नये, यासाठी कायम शांत राहल्याने अमोघ आणि अनन्याने आयुष्याचा जोडीदार गमावला होता..

– तीन फुल्या, तीन बदाम

 

© सर्व हक्क सुरक्षित

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2018 1:15 am

Web Title: exclusive marathi love stories love in college sad stories mumbai
Next Stories
1 Love Diaries : आजही तिची आठवण येते…
2 Love Diaries : दृष्ट लागण्याजोगे सारे…(उत्तरार्ध)
3 Love Diaries : दृष्ट लागण्याजोगे सारे…
Just Now!
X