X

Love Diaries : लव्ह लोचा आणि ती… (उत्तरार्ध)

 “तुझ्या नजरेत मी काय पाहिलं कळत नाही, पण...

लैला आता पक्याच्या प्रपोजची वाट पाहत बसली होती. पण पक्याला अजूनही थेट व्यक्त होण्याचं धाडस काही होत नव्हतं. शेवटी त्याने प्रेम पत्रातूनच व्यक्त कारायचं, असा निश्चय केला. साहजिकच त्याने आपला हा मानस मित्रांजवळ सांगितला. यावेळी मित्रांनी त्याची चांगलीच शाळा घेतली. थेट बोलण्यापेक्षा तू कबूतराच्या जमान्यातील विचार कसा करु शकतो, अशी त्याची थट्टा करण्यात आली. पण म्हणतात ना माणूस प्रेमात असला की, थट्टा काय आणि कौतुक काय त्याला फारसा काही फरक पडत नाही. कारण तो आपल्याच नादात असतो. पक्याच असंच काहीसं झालं होतं. मित्रांच्या थट्टेकडे दुर्लक्ष करत त्याने पत्रंच योग्य असल्याचे स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली.

“मित्राहो कसं हाय, बोलताना काय आणि किती बोलाव? बोललेल तिच्यापर्यंत कितपत पोहचंल? हे प्रश्न निर्माण होण्यापेक्षा पत्रातून व्यक्त होणं किधीही चांगलं. याच कारण तिला आवडलेला आपलं एखाद वाक्य तिला पुन्हा उच्चारण्याचीही संधी मिळते राव.” पत्रामागच पक्याच लॉजिक ऐकून कोणतीही प्रतिक्रिया न देता राकेशने वहीचा कागद फाडला. रवीने खिशातला पेन पक्याच्या हातात दिला. आणि म्हणाला, उतरव काय उतरवायच ते एकदाच पण जे काय करायचं ते आजच कारण उद्या कधीच येत नाही. नेहमीप्रमाणे लैलाची एन्ट्री झाली अन् पक्याने तिच्या नजरेत नजर घालत पत्र लिहायला सुरुवात केली.  “तुझ्या नजरेत मी काय पाहिलं कळत नाही, पण गेल्या दीड महिन्यांपासून आपण एकमेकांशी खूप काही बोलतोय असं वाटत. आता फक्त तुला भेटायची इच्छा आहे. भेटशील ना…” पक्या थांबला. मित्रांच्या मैफलीत प्रायवेट वगैरे भानगड नसल्यामुळे त्यांनी त्याच्या हातातून पत्र हिसकावून घेतलं. त्यानं लिहिलेल्या दोन वाक्यामुळे पुन्हा हास्य पिकलं. अरे कुठे भेटणार यासाठी आता दुसरं पानं फाडायचं का? या मित्रांच्या प्रश्नावर हळूच मधूर आवाज आला. लायब्रेरीत? लैला नेहमीचा मार्ग बदलून पक्या आणि मित्रमंडळीच्या कट्याजवळच आली होती. सर्वजण एकदम शांत झाले. रवीने कट्ट्यावर जागा करुन देत अरे बस ना… तू कशी काय वाट चुकली, असा प्रश्न केला. लैला त्याच मंजूळ आवाजात पुन्हा म्हणाली, उशीर होतोय. दुपारी भेटू बाय, ती रवीसोबत बोलत असली तरी निशाणा पक्यावर होता.

लायब्रेरीत पक्याला अपेक्षेप्रमाणे होकार मिळाला. लैलाचं नव प्रेम सुरु झालं. आता लैला पक्यासोबत कॉलेजात बिनधास्त फिरु लागली. कोणाचीही तिला तमा नव्हती. या नव्या प्रेमात तिचे प्रतिकशी बोलणं कमी झालं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा प्रतिक कोण? हा प्रतिक तोच ज्याबद्दल मिनाक्षीनं लैलाला सावध करण्याचा प्रयत्न केला होता. लैलानं पक्यापूर्वी ज्या मुलाला होकार दिला त्याचचं नाव प्रतीक. प्रतीक आणि लैलाची ओळखही कॉलेजबाहेरच झाली होती. त्यामुळे कॉलजमध्ये भेटण्याचा दोघांचा योग कधी आलाच नाही. अर्थात पक्याला होकार दिल्यानंतरही त्यांच भेटणं सुरुच होत. सुट्टीचा प्रत्येक दिवस आजही ती प्रतीकसोबत असायची. तर कॉलेजमध्ये ती पक्यासोबत हिंडायची. तिच्या या थेऱ्यांची दोघांनाही कल्पना नव्हती. पण लैलाचा हा खेळ महिन्याभरातच प्रतीकच्या लक्षात आला. लैला सध्या आपल्यासोबत फारशी रमत नसल्याचं कारण शोधताना तिचं एका कॉलेजातल्या मुलासोबत प्रेमसंबंध सुरु असल्याचे त्याला समजले.

प्रतीक हा तापट डोक्याचा होता. लैलाच्या या वागण्यामुळे त्याची तळपायाची आग मस्तकाला पोहोचली. त्याने गल्लीतल्या चार पोरांना घेऊन थेट कॉलेज गाठले. तो कॅंटीन परिसरात गोंधळ घालत त्या मुलाची चौकशी करु लागला. अखेर त्याला लैलासोबत प्रेमप्रकरण सुरु असलेला प्रकाशची ओळख पटली. त्याला बघताच कोणताही विचार न करता प्रतीक आणि त्याच्यासोबतच्या चार जणांनी प्रकाशला मारहाण करण्यास सुरुवात केली. पक्याला आपल्याला ही लोक कशासाठी मारताहेत याचा काहीच पत्ता लागेना. त्यांचा राडा पाहून पक्याची मित्रमंडळी देखील कॅंटीनजवळ आली. त्यांनी पक्याला वाचवण्यासाठी कॉलेजमध्ये घुसलेल्या पोरांशी चार हात केले. दोन्ही गटांत राडा सुरु झाला. तासाभरानंतर कॉलेजमधील प्राध्यापकवर्ग तिथं जमा झाला. त्यांनी वॉचमनच्या मदतीने दोन्ही गटांमधील भांडणे थांबवली. या भांडणात कुणाच्या हाताला खरचटल होत. तर कुणाचं डोकं फुटलं होत. पक्याच्या नाकातून रक्त भळाभळा वाहत होतं. प्रतीकलाही डोक्याला मार लागला होता.

प्रतीक कॉलेजमध्ये नसल्यामुळे प्राध्यापकांनी त्याला चांगलेच धारेवर धरले. तुला आत कोणी येऊ दिलं.? कॉलेजचा आणि तुझा काय संबंध? असे प्रश्न प्राचार्य त्याला विचारु लागले. प्रश्नांचा भडीमार होत असताना तो मात्र जमलेल्या गर्दीत काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होता. त्याची नजर लैलाला शोधत होती. अखेर त्याला ती दिसली. तिच्याकडे पाहत प्रतीक म्हणाला, हिच्याशिवाय कोणी सांगू शकत नाही. ही सांगेल काय प्रकार सुरु आहे. तिलाच विचारा. प्रतीकच्या या शब्दांनी कॉलेजमधील सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. लैलासोबत असणारी तिची मैत्रीण अस्वस्थ झाली. लैला सर्वांसमोर काय सांगेल? याचा विचार ती करत होती. लैलावर मात्र याचा कोणताही परिणाम झाला नाही. ती नेहमीच्या तोऱ्यात पुढे आली. याच्याशी माझा काही संबंध नाही. यांना दोघांना मी आवडते यात माझा दोष नाही. हे लोक माझ्यापर्यंत आले. त्यांना वाटलं ते त्यांनी विचारलं. मला वाटल त्याप्रमाणे मी त्यांच्यासोबत वागले. यापेक्षा अधिक विचार करायची गरज नाही. …आणि हो मी अशी का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा कुणीही प्रयत्न करु नका, कळलं. या प्रकरणात आपला काहीच संबंध नसल्याचे सांगत लैला तिथून निघून गेली. तिच्या या उत्तराने सर्वच अवाकपणे तिच्याकडे पाहत राहिले. दोन गटांतील तरुणांनीही माना खाली टाकल्या. ती बदनाम झाली की जिंकली. याचा विचार तिची मैत्रीण मिनाक्षी आजही करते. मात्र ती सध्या काय करते? याविषयी ती काहीच बोलत नाही. प्रतीक आणि प्रकाशला ती बदलणार नाही हे कळून चुकलंय. त्यांनी तिचा नाद सोडलाय. एवढंच नाही तर प्रेम नाही तर लोचाही नाही हे दोघांनाही पटलंय.

(उत्तरार्ध)

– तीन फुल्या, तीन बदाम