11 December 2017

News Flash

Love Diaries : आठवणींची ‘सर्जरी’ (भाग- २)

अरे कोणी लवकर सक्सेसफुल होतं, कोणाला थोडा वेळा लागतो.. त्यात काय एवढं..?

मुंबई | Updated: March 24, 2017 5:08 PM

Love Diaries : प्रेमकथा

लास्ट इयरला असताना नचिकेत आणि अभिलाषाचं नातं जवळपास तुटलं होतं.. अभिलाषाचं अभ्यासाकडे लक्ष दे, असं वारंवार सांगणं, नचिकेतला त्रासदायक वाटतं होतं.. मात्र तरीही अभिलाषाचा सहवास नचिकेतला हवा होता.. अभिलाषादेखील नचिकेतमध्ये गुंतली होती.. परीक्षा संपल्यानंतर तिला वारंवार याची जाणीव होऊ लागली.. तिनं पुढाकार घेतला.. त्यानंतर नचिकेत आणि अभिलाषाची भेट झाली..

‘इतक्या दिवसांमध्ये एकदाही माझी आठवण नाही आली..?’ नचिकेतनं अभिलाषाला विचारलं..

‘आली ना.. म्हणूनच तर तुला फोन केला.. राहवलं नाही म्हणून मग भेटायला आले..’ अभिलाषानं उत्तर दिलं..
‘तुला माहितीय का काय अवस्था झाली होती माझी तू नसताना..?’ नचिकेतच्या डोळ्यात अश्रू होते..

‘मला कल्पना आहे रे.. आणि नसती तरीही तुझ्या डोळ्यात दाटून आलेल्या भावनांनी ती करुन दिली असती..’ अभिलाषालादेखील अश्रू अनावर झाले होते.. अभिलाषा आणि नचिकेतनं यापुढे कधीही एकमेकांना सोडून न जाण्याचं वचन दिलं..

पुढे परीक्षेचा निकाल लागला.. अभिलाषा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली.. नचिकेत मात्र जेमतेम गुणांनी पास झाला.. अभिलाषाला लगेचच एका मोठ्या बँकेत नोकरी मिळाली.. नचिकेत मात्र धडपडत होता.. मात्र दिशा काही सापडत नव्हती.. या परिस्थितीतही अभिलाषा त्याच्यासोबत होती.. ही एकच गोष्ट नचिकेतला सावरुन धरत होती..

नचिकेत दररोज अंधेरील अभिलाषाला ऑफिसहून आणायला जायचा.. अभिलाषादेखील नचिकेतला शक्य तितका वेळ द्यायची.. दोघेही फिरायला जायचे.. अभिलाषाला चांगला पगार होता.. नचिकेतसोबत रिसॉर्ट, वॉटर पार्क, हॉटेलमध्ये जाणं व्हायचं.. या सगळ्या ठिकाणचा सर्व खर्च अभिलाषाच करत होती.. तिनं ही गोष्ट कधीही बोलून दाखवली नाही.. किंबहुना अशी कोणतीही गोष्ट तिच्या मनातदेखील आली नाही..

‘असं किती वेळ तू मला सावरत राहणार आहेस अभिलाषा..?’ नचिकेत एके दिवशी अभिलाषाला म्हणाला..

‘जोपर्यंत तू सावरत नाहीस..’ अभिलाषानं मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं..

‘मी आयुष्यात काही करेन, असं वाटतं नाही.. तू इतक्या कमी वयात बरंच काही केलं आहेस.. मी तुझ्या आसपासदेखील नाही..’ नचिकेतच्या मनात भावना दाटून आल्या होत्या.. मात्र तरीही अभिलाषानं प्रॅक्टिकल व्हावं असं त्याला वाटतं होतं..

‘अरे कोणी लवकर सक्सेसफुल होतं, कोणाला थोडा वेळा लागतो.. त्यात काय एवढं..? तुला ती ससा आणि कासवाची गोष्ट माहितीय ना..?’ अभिलाषानं नचिकेतला प्रेमानं समजावलं आणि जवळ घेतलं..

दिवस पुढे सरकत होते.. अभिलाषाच करिअर अगदी उत्तम सुरू होतं.. नचिकेत कोरिओग्राफी करत होता.. मात्र त्यातही त्याला मनासारखी संधी मिळत नव्हती.. अभिलाषाचं ऐकून अभ्यासाकडे लक्ष दिलं असतं, तर आज ही वेळ आली नसती, असं त्याला वाटू लागलं होतं.. मात्र आता वेळ निघून गेली होती.. घरची स्थितीदेखील ठिक नव्हती.. त्यामुळे आज ना उद्या अभिलाषाच्या घरी सांगायचं झाल्यास तिच्या घरुन होकार मिळण्याची फारशी संधी नव्हती..

नचिकेत आणि अभिलाषामध्ये नकळत एक दरी निर्माण होत गेली.. दोघेही भेटायचे.. मात्र ती मनांची भेट नव्हती.. नात्यात काहीच उरलं नसल्याची जाणीव दोघांना झाली होती.. बोलणं व्हायचं.. मात्र तो संवाद कुठे तरी हरवला होता.. कॉलेजपासून जपलेलं एक नातं आता जवळपास संपलं होतं..

आई बाबांना सांगता येईल, घरच्यांना समजावता येईल, असं नचिकेत काहीही करत नव्हता.. याची जाणीव अभिलाषादेखील झाली होती.. तशी ती जाणीव आधीपासूनच होती.. मात्र आता नात्यातील प्रेमाचा ओलावा कमी झाल्याने ही भावना अधिकाधिक तीव्र होत गेली.. नचिकेत आणि अभिलाषानं नातं जपण्याचे प्रयत्नदेखील सोडून दिले होते.. पण आपण ज्याप्रकारे एकमेकांवर प्रेम केलं, तसं प्रेम आपण इतर कुणावरही करु शकणार नाही, याची जाणीव मात्र त्या दोघांच्याही मनात होती.. प्रत्येकाचं प्रेम नाही ना पूर्ण होतं.. काही गोष्टी अपूर्ण असूनही पूर्ण असतात, असा विचार करुन दोघेही शांत राहिले.. येणारा दिवस पुढे ढकलत राहिले..

‘दादरला उतरायचं ना..?’ अभिलाषा म्हणाली..

‘हो.. येईल आता.. चल..’ अभिलाषाच्या शेजारी असलेली व्यक्ती म्हणाली.. तो अभिलाषाचा नवरा होता, हे एव्हाना नचिकेतच्या लक्षात आलं..
अभिलाषा उठून निघून गेली.. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून नचिकेतच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले.. अभिलाषाची अवस्थादेखील तीच होती.. मात्र नवऱ्यासोबत असलेली ती रडूही शकत नव्हती.. स्टेशन येताच अभिलाषा उतरुन निघून गेली.. नचिकेतची गाडी सुटली होती.. नचिकेत हातानं अश्रू पुसण्याचा प्रयत्न करत होता.. शर्टचे स्लिव्ह वर जाताच त्याला अभिलाषाच्या नावाचा टॅटू दिसला.. ट्रेनमध्ये समोर अभिलाषा आणि तिचा नवरा समोर बसल्यावर त्याने तो टॅटू शर्टाचे स्लिव्ह्ज खाली करुन लपवला होता..

‘कदाचित सर्जरी करुन हा टॅटू काढतादेखील येईल.. पण मनातल्या आठवणींचं काय..? त्या आठवणींची सर्जरी कोण करणार..?’ असे प्रश्न नचिकतेच्या मनात आले.. गाडीनं वेग घेतला होता.. नचिकेतच्या आयुष्याची गाडी मात्र खूप आधीच घसरली होती.. मात्र ती जखम आज पुन्हा एकदा भळभळून वाहू लागली होती..

समाप्त.

– तीन फुल्या, तीन बदाम

 

© सर्व हक्क सुरक्षित

First Published on March 21, 2017 1:30 am

Web Title: exclusive marathi love stories true love story couple tattoo unconditional love part two