X

Love Diaries : दृष्ट लागण्याजोगे सारे…

मनातील गोष्टी ओळखून आपल्याला काय हवं ते शोधण्याचा त्यानं प्रयत्न करावा

उसंड्या घेण्यास सदोदित उत्सुक अशा तिच्या मनाला सावर गं… म्हणावं असं कधीचं वाटलं नाही. कारण तिचं ते बिनधास्त वावरण, मनमोकळं बोलणं आणि शुल्लक कारणावर हलकसं हसणं हेच तिच्या सौदर्याचं खरं गुपित होत. पण म्हणतात ना ‘दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं’ ही म्हण तिला अचूक लागू व्हायची. या परीचं हम दो हमारे दो… असं इनमिन चार माणसांच कुटुंब. इतर नातेवाईक आहेत पण ते नावालाच. हल्ली नातेवाईक हे समारंभापुरते असतात ना अगदी तशीच ही मंडळी. परीचा बाप मटका आणि बाईच्या नादात फसला आणि या छोट्या कुटुंबावर मोठी संकट यायला सुरूवात झाली. आईचं हाल बघतच दोन्हीं पोरं कशीबशी शिकली. परीचा मोठ्या भावाला आईनं इकड तिकडची ओढाताण करून मेडीकलला घातलं. पण परीचं आयुष्य कोमेजायला सुरूवात झाली.

बाप जेव्हा आईला ठेवणीतल्या शिव्या द्यायचा, तेव्हा वयात आलेली परी हैराण होऊन जायची. मग आईनं पोरीची डोकेदुखी दूर करण्यासाठी शिक्षणाच्या नावाखाली तिला दूरच्या नात्यातल्या मामाकडं धाडलं. पण तो माणूसही गेंड्याच्या कातडीचा निघाला. तो नेहमी परीच्या बिनधास्तपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करायचा. अर्थात परीची अवस्था आगीतून उठून फूफाट्यात पडल्यासारखी झाली. पर्याय नसल्यानं आलिया भोगाशी या मंत्राचा जप करत परी काकांच्या चाळ्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा हसण्याचा प्रयत्न करु लागली. आभाळा एवढं दु:खसोबत घेऊन निघालेल्या परीला आता मानसिक आधाराची गरज वाटू लागली. आपलं कुणीतरी जीवा भावाचं असावं. आपल्या दोन गोष्टी त्यानं ऐकून घ्याव्यात. मनातील गोष्टी ओळखून आपल्याला काय हवं ते शोधण्याचा त्यानं प्रयत्न करावा, त्याच्या या धडपडीमुळे जीवन सार्थक झाल्याचा आनंद मिळावा, असे विचार तिच्या मनात घोळू लागले. कॉलेजातल्या मैत्रीणीच्या चाळ्यामुळे तिच्या मनातील इच्छा आणखी तीव्र व्हायच्या. पण कॉलेजात फिरताना तिला आपला राजकुमार काही दिसत नव्हता. कदाचित कॉलेजमध्ये आपण यासाठी येत नसल्याची जाणीव तिनं जिवंत ठेवली होती. मनात निर्माण होणाऱ्या या भावनेलाच प्रेम म्हणतात हे तिला कळत होतं. अर्थात परी प्रेमाच्या किनाऱ्यावर होती. मनात प्रेमाच्या लहरी तरंगत असताना बऱ्याचदा अधिक काळ संपर्कात असणाऱ्या व्यक्तीमध्ये माणूस न कळत गुंतत जातो. परीच्या बाबतीत अगदी असंच झालं. कॉलेजातून रोज घरी येताना नेहमी पारावर बसून असलेल्या नाम्या तिच्या मनात न कळत घर करु गेला.

आपण शोधत असणारा आधार नाम्या अर्थात नामदेवात तिला दिसायला लागला. साधा सरळ आणि शंभर नंबरी स्वभावाचा गडी. त्याच्या भोळ्याभाबड्या स्वभावामुळे त्यानं परीच्या ह्रदयात नकळत घर केलं. त्यानंतर नामदेव काय करतो? त्याला काय आवडतं? हे जाणून घेत त्याला आपलसं करण्यासाठी परीचा खटाटोप सुरु झाला. नाम्याबद्दल सांगायचं तर परी राहत असलेल्या ठिकाणापासून दोन गल्लीच्या अंतरावर नाम्या राहायचा. मधल्या आळीतल्या पारावर तो बऱ्याचदा बसलेला असायचा. त्याचं शिक्षण एसएससी चारवेळा नापास. सध्याचा उद्योग मामाच्या डेअरीवर कॅन उचलणे. पोशाख पाहिला तर तो दादा कोंडकेला आदर्श वगैरे मानत असल्याचा भास करुन देणारा. फरक एवढाच की नाम्या फुल पॅन्टमध्ये असायचा आणि त्या पॅन्टीला नाडीऐवजी सुधारित चेन नावाचा प्रकार असायचा. आता त्याच वर्णन ऐकल्यावर या यड्या गबाळ्याच्या प्रेमात एखादी पोरगी पडेल असं कुणालाच वाटणार नाही. पण परी त्याला अपवाद ठरली. त्याच कारण तिला आधाराची गरज होती, असे म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला आपली आवड असते, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. त्यामुळे तिच्या प्रेमाचा कदाचित अपमान होणार नाही. दिवसागणिक परी त्याच्यात अधिक गुंतू लागली. हे गुंतणे म्हणजे सुरुवातीला फक्त त्याचा विचार करण्यापुरते मर्यादित होते.

मग तिने यातून थोडे पुढे सरकण्यासाठी गल्लीतल्या शाळेत जाणाऱ्या पोरांचा आधार घेण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यांना खाऊ देऊन ती त्यांच्याकडून नामदेवाबद्दल विचारपूस करु लागली. प्रत्यक्षात त्याला भेटावे, मनसोक्त बोलावे यासाठी तिची धडपड सुरु झाली. तिचा हा सर्व प्रकार तिच्या जीवलग मैत्रीण सुमनच्या लक्षात आला. ती तशी परीपेक्षा तीन एक वर्षांनी लहान. त्यामुळे परीला ती अक्का म्हणून हाक मारायची. पण दोघीं ऐकमेकींसोबत बऱ्याच गोष्टी शेअर करायच्या. त्यामुळे एकेदिवशी सुमनने परीच्या डोक्यात भिरभिरणाऱ्या विषयाला हात घातला. “अक्का काय गं तू आज काल त्या डेअरीवाल्या नाम्यादाची लयच इचारपूस करत्यास. अगं त्यो तुझ्याएवढा नाय शिकल्याला. माझ्यासारीचं त्याची गाडी बी दहावीतच अडकल्या. म्या तर ऐकलंय की आई-बाप बी नाय त्याला. लहानाचा मोठा तो मामाबशीच झालाय. मामा राबराब राबवून घेतोय. एक बी शबूद न बोलता तो बिचारा राबतोय त्या डेअरीत. तू एवढी बीए का सी ए झालेली तुझ्या डोक्यात कसा काय बसला गं त्यो?” यावर आपल्याच धुंदीत परीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. “सुमे तू अजून छोटी हाईस, तुला नाय समजायच. पण तुला त्याच्याबद्दल बरंच माहितंय गं? सुमनने नामदेवाचा नॉन स्टॉप पाढा वाचल्यावर परीने जीवलग मैत्रीकडूनच नाम्याला जाणून घेण्याचं ठरवलं. सुमननं नाम्याच गायलेलं गीत ऐकून परी चांगलीच सुखावली होती. कारण जीवलग मैत्रीणचं आपल्याला नाम्यापर्यंत पोहोचवेल, अशा प्रकारचा विश्वास तिच्या मनात निर्माण झाला होता. मग सुमनकडनं तिला कळलं की नाम्या आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी डोंगराव असणाऱ्या महादेवाच्या मंदिराबाहेर दूध आणि बेलाची पान विकायला बसतो. परीला नाम्याला भेटीतील अडथळा दूर झाला.

देवावरुन विश्वास उठलेल्या परीनं नामदेवासाठी महादेवाला वारी सुरु केली. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून तिने आपलं व्रत सुरु केलं. आता व्रत म्हणजे उपवास वगैरे नव्हे; तर नाम्याला भेटण्यासाठी मोकळीक मिळावी म्हणून मनात केलेला निश्चय. सांस्कृतिक भान जपत भेटीची भूक मिटवण्यासाठी याशिवाय सुलभ मार्ग असू शकत नाही, या विचारातून परीने हा मार्ग निवडला. तास दीड तासांच्या अंतरावर असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात परी पहिल्यांदाच चालली होती. रस्त्याने अनेक बायका आरतीचे ताट घेऊन अंतर कापत होत्या. काही बायका थकवा दूर करण्यासाठी आराम करताना दिसत होत्या. सलग अर्धा तास चालल्यानंतर सुमनही थकली. पण परीच्या चेहऱ्यावर अजिबात थकवा जाणवत नव्हता. मग काही वेळाने थकलेली सुमनच परीला म्हणाली, “अगं अक्का अजून तासभर चालायचं हाय, जरा इश्रांती घेवूया का? त्यो काय दिसंभर तितच असणार पळून नाय जायचा. बस थोडावेळ” यावर परीने तार्कीक उत्तर देत सुमनचा विश्रांतीचा डाव उधळून लावला.

परी म्हणाली “अगं सुमे त्यो पळून नाय जाणार गं! पण ऊन डोक्यावर यायच्या आत अंतर कापलं की, थकवा जाणवत नाही. म्हणून म्हणते चलं गुमानं….” परीच्या शब्दाला मान देत, सुमीनं आपला विश्रांतीचा विचार बदलला आणि परीसोबत अंतर कापण्यास सुरुवात केली. दीड एक तासानं दोघी टेकडीवर पोहोचल्या. परीच्या नजरा चोहूबाजूला नाम्याला शोधू लागल्या. पण नाम्या काही दिसेना. परीने डोळे मोठे करुन सुमीकडे पाहिले. सुमे अगं… त्यो तर दिसत नायं की कुठं? तो नाई आला ना तर सांगते तुला! अगं अक्का त्यो कट्टा दिसतोय का? तिथं त्याच साहित्य मांडलेल्या दिसतंय नव्हं. आलाय त्यो पण कुठतरी गेला असलं इकडं तिकडं येईल धीर धर थोडा. तोपर्यंत तरी शांत बस लागली लगेच डाबरायला. तुझ्यासाठी एवढं केलं तरी बी तुला काय आमची किंमतच नाय बघ!… तसं नाही गं सुमे… किंमत बिंमत काय काढते. तुझ्यामुळं तर माझ्यात हिमंत आलीया. पण तुला नाही तर मी कुणाला बोलणार सांग असं… अक्काच्या भावनिक उत्तरानं सुमीच्या गालावर पुन्हा हास्य फुलंल. कारण तिला माहिती होतं की, परीएवढं आपलुकीनं तिच्यासोबत कोणच वागत नाही. आता दोघीं नाम्याने मांडलेल्या दुकानासमोर बसल्या.

काहीवेळानंतर नाम्या दुकानावर आला. परीला आणि सुमीला आपल्या दुकानावर पाहून तो थक्क झाला. तो म्हणाला, “अरे सुमे एवढ्या सकाळी देवाला.” सुमीनं संधी साधत परीला तुला भेटायच होतं असं थेट सांगितले. सुमीचं हे वाक्य एकून नाम्या थोडा गोंधळला. मात्र त्याच्यापेक्षाही अधिक गोंधळ हा परीचा उडाला. नाम्याने तिच्याकडे एक नजर टाकली. नाम्यापासून ती साधारण तीन ते चार फूट अंतरावर उभी होती. सुमीचं बोलणं सुरुच होतं. “नाम्यादा अक्काला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायच हाय. गावात कसं भेटायचं म्हणून मीच म्हटल इथं भेटावं.” इतक्या वेळापासून आतूर झालेली परी आता मात्र निःशब्द झाली होती. ती फक्त एकटक नाम्याकडे बघत होती. नाम्याला काही कळायला मार्ग नव्हता, तो म्हणाला बोला की, काय बोलायच व्हतं. सुमनने परीला भानावर आणले. भानावर येत परी म्हणाली इथं रोज यतो का तू? नाम्या म्हटला, हे इचाराय इथंवर आलासा व्हयं! नाम्याचा आदराचा टोन पाहून परी त्याला म्हणाली आरे माझ्याशी आवजाव काय करतोस एकेरी नावाने बोल.

नाम्याच शिक्षण कमी असलं तरी व्यावहारिक ज्ञान चांगलं होतं. तो म्हणाला, “आहो तुम्ही आमच्यापेक्षा चार बुक जास्त वाचल्यात, तुम्हाला थोडं जास्ती जग कळतंय, मग तुमच्याशी आमची बरोबरी कशी होणार?” नाम्याला प्रत्युत्तर देत अखेर परीने निःशब्दता सोडली. तसं काही नसतं रे!.. तू सरळ नाव घे बोलेना! तो बरं तर म्हणाला पण परी म्हणण्याचं धाडस काय त्याला शेवटपर्यंत झालं नाही. दोघांना एकांत मिळावा म्हणून सुमन महादेवाचं दर्शन घ्यायला मंदिरात गेली. ती परत आली तरी खुसपूस तिला सुरुच दिसली. शेवटी वैतागून ती म्हणाली, अक्का मुद्द्याचा बोलली असशील तर निघायचं का? सकाळी आठला निघालोय आपण, आता चार वाजायला आल्यात. घरात समदी बोंबा मारत असतील!” तिघही निघू गं थांब जरा! नाम्याला गृहीत धरुन आत्मविश्वासान परीनं सुमनच्या प्रश्नाला उत्तर दिलं.

या भेटीनंतर दोघांतील संवाद आणखी वाढला. दोघांनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. दोघे एकमेकांना सावरायला लागले. पण दोघांच्यात अजूनही आय लव्ह यू हा शब्दप्रयोग कुणीही वापरला नव्हता. कारण दोघांनाही त्याची गरज वाटली नव्हती. परीचं त्याच्यावरील प्रेम वाढत चाललं होत. तर नाम्याच्या मनात परीविषयी आपुलकी वाढत होती. परीसाठी हे पुरेसं होत. अर्थात परी सगळं दुःख विसरून प्रेमाच्या धुंदीत आनंदी आयुष्य जगू लागली. आईची मेहनत, भावाचे किस्से आणि बापाविषयी अजूनही मनात दाबून ठेलेला आदर ती नाम्यासमोर व्यक्त करु लागली. दोघांच्या प्रेमाची चर्चा आता गल्लीत सुरु झाली. परीच्या आनंद प्रकरणाचा प्रताप एकून तिची आई चांगलीच संतापली. पोरगीला शिकायला पाठवलं आणि तिने नाव बदनाम केलं, अशी भावना तिच्या मनात निर्माण झाली. यामुळे ती परीला वाट्टेल ते बोलली, ‘तू थंड झाली असशील गं…आणि होत ही असशील अजून…चल आता तुझा इथला मुक्काम हलवं… आता तुला कुणाच्या तरी गळ्यात बांधते त्याशिवाय माझ चित्त थाऱ्यावर येणार नाही.

मायलेकीच्या वयात अन् विचारात अंतर असू शकते. पण यामुळे दोघीत दुरावा कधीच नसतो. पण मुलीसोबत आता लग्न कोण करणार हा तिच्या आईसमोर उभा राहिलेला मोठा प्रश्न होता. आईच्या तोंडून अभद्र शब्द एकूनही परी ढळली नाही. ती निर्भीडपणे आईला म्हणाली आई, मला त्या नाम्याशी लग्न करायचयं देशील लावून. यावेळी चुलता आणि चुलती देखील तिथे आले होते. आतापर्यंत शांत बसलेलेली चुलती पटकन म्हणाली, “ये पोरी चार पुस्तक काय वाचलीस आणि तू आम्हाला सोयरिक जुळवायची अक्कल सांगायल्यास ? लग्न म्हणजे काय कालेजात दाखला घेण्याइतकं सोप काम आसतंय व्हय? काय माहिती आहे तुला त्या पोराबद्दल? आई-बाप नाहीत त्याला. मामाच्या घरात इज्जत नाही. आणि त्याला आम्ही जावई करायचं, ते बी तू सांगती म्हणून. डोक्यात जे खुळ भरलयंस ते काढून टाक ते अजिबात शक्य होणार नाही. हा सर्व प्रकार परीचा दाद्या फक्त शांतपणे एकत होता. त्याला कोणती भूमिका घ्यावी समजत नव्हते. विशेष म्हणजे परी जरी ठामपणे नाम्यासोबत लग्न करायला तयार असल्याचे सर्व नातेवाईकांसमोर सांगत असली तरी नाम्याची भूमिका नक्की काय हे कुणालाच माहिती नव्हती.

(पूर्वार्ध)

– तीन फुल्या, तीन बदाम