एक दिवसांपूर्वी….
“केतन तू काल जे काही बोललास ते खोटं होतं ना? सांग ना? तू खरंच ब्रेकअप करतोय का माझ्याशी?”
“प्राजक्ता तू ठिक आहेस ना?”
“मी ठिक आहे असं तू विचारूच कसं शकतो? तुझ्यामुळे मला किती त्रास झालाय याची कल्पना तरी आहे का तुला? मी काल ऑफिसमध्ये बेशुद्ध पडले होते हे तरी ठाऊक आहे का तुला”
“प्राजक्ता माहितीये मला, मी काल आलो होतो घरी पण तू झोपली होतीस”
“तू आला होतास?” एवढं प्रेम करतोस माझ्यावर मग का सोडतोय मला?’
“प्राजक्ता सहा वाजलेत, तुला बरं नाहीये तू आराम कर आपण यावर मग बोलू”
“आराम? माझं ज्या मुलावर प्रेम आहे तो मला सोडून जायच्या तयारीत आहे आणि तू मला आराम करायला कसं सांगू शकतोस केतन?”
“तू प्लीज पॅनिक होऊ नकोस, आपण बोलू शांतपणे. प्लीज ऐक माझं प्राजक्ता मी तुझ्याशी बोलतो नंतर तू फ्रेश हो, काहीतरी खाऊन घे मग बोलू”
“केतन I love you”
“प्राजक्ता…..” पुढे केतन काहीच बोलला नाही त्याने फोन ठेवला. प्राजक्ता पुन्हा रडू लागली.
थोड्यावेळानं प्राजक्ताचा फोन वाजला, केतनचा फोन होता.
“प्राजक्ता तू काही खाल्लंस का?”
“हे विचारायला फोन केलास का?, तू का असं वागतोस ते सांग आधी?”
“प्राजक्ता मला तुला त्रास द्यायचा नाही पण स्पष्टच सांगतो. मी यापुढे सायलीसोबत राहायचं ठरवलं आहे.”
“सायली?”
“हो, मी सायलीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. मला तिला यापुढे सुखात ठेवायचं आहे.”
“केतनsss” प्राजक्ता जोरात ओरडली.

“केतन, तू तिच्यासाठी मला सोडतोय?” प्राजक्ताने ओरडायला सुरूवात केली.
“प्राजक्ता माझा नाईलाज आहे. प्लीज मला माफ कर मला नाही राहता येणार.”
“नाईलाज, ती तुला सोडून गेली आणि आता ती आल्यावर तू मला सोडून जातोय. किती स्वार्थी निघालास तू. मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती तू माझ्याशी असा वागशील आणि माझा विश्वासघात करशील”
“प्राजक्ता प्लीज माझं ऐकून घे”
“काय ऐकून घेऊ? काय आहे तिच्यात जे माझ्यात नाही? का तू असं करतोय?”
“प्राजक्ता माझा निर्णय ठाम आहे. मी असं का करतोय हे तुला मी नाही सांगू शकत पण प्लीज तू मला समजून घेशील”
“ठिक आहे”
प्राजक्ताने रागात फोन कट केला. इतर कोणतंही कारण असलं असतं तर तिने समजूनही घेतलं असंत. पण केवळ सायलीमुळे आपल्या नात्याचा अंत होतोय हे तिला जराही सहन होत नव्हतं. तिने स्वत:चा राग शांत करण्याचा खूप प्रयत्न केला. पण काही केल्या आपल्या रागावर नियंत्रण मिळवणं कठीण होत होतं.
तिने पुन्हा केतनला फोन लावला.
केतन काही बोलणार एवढ्यात “ठिक आहे तुला सायलीसाठी मला सोडायचं आहे ना? तुला मला सोडून जायची काहीच गरज नाही. मीच तूला सोडून जातेय कायमची.”
“प्राजक्ता ऐक माझं शांत हो” केतन तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता.
“मी जीव द्यायला जातेय. Good bye forever”
प्राजक्ता किती हट्टी होती हे केतनला माहिती होतं, ती जे बोलते ते केल्याशिवाय राहत नाही याची पूर्ण कल्पना केतनला होती. गेल्या दिवसांत आयुष्यात गोष्टी पार झपाट्याने बदलत चालल्या होत्या.
“थांब प्राजक्ता तुला माझी शपथ आहे” केतन पलिकडून जोरात ओरडला.
केतन जोरजोरत रडू लागला.

“केतन केतन…” केतनचा रडतानाचा आवाज ऐकून प्राजक्ताला काही वेळ कळेनाच.
“तू पण जा आता मला सोडून, सायलीपण जाणार मला कायमचं सोडून प्राजक्ता’ केतनला पुढचं वाक्यही पूर्ण करता येईना.
“सायली सोडून जाणार? कुठे जातेय सायली?”
“सायलीकडे फार कमी दिवस आहेत त्यानंतर ती…” केतन आणखी रडू लागला.
प्राजक्ताने क्षणात स्वत:ला सावरलं. “केतन काय झालंय? रडणं थांबव आधी… केतन तू ऐकतोय ना माझं, सायलीला काय झालंय?”
“प्राजक्ता मला आता नाही जगायचंय.. मी सुद्धा जीव देणार आहे…”
“केतन, तू तिथेच थांब मी तासाभरात घरी पोहोचतेय. तू स्वत:ला काही करणार नाहीये आणि मीही स्वत:ला काही करत नाहीये.. तू थांब मी आले.” प्राजक्ताने केतनला शांत करण्याचा प्रयत्न केला. काय होतंय, काय सुरूये याची तिला काहीच कल्पना नव्हती. सारी चक्र अत्यंत वेगाने बदलत होती काही मिनिटांपूर्वी ती स्वत: आत्महत्या करण्याच्या विचारात होती आणि आता ती फक्त आणि फक्त केतनचा विचार करत होती. तासाभरात ती केतनच्या घरी पोहोचली.
केतनने दरवाजा उघडला. केतनला पाहताचा तिला धक्का बसला. गेल्या तीन दिवसांत तो बहुदा झोपला नसावा. घरभर वस्तू पडल्या होत्या. केतनने रागाच्या भरात घरातल्या वस्तू तोडून टाकल्या होत्या. त्याने किचनमध्ये जेवण तसंच ठेवलं होतं, सारं जेवण खराब झालं होतं त्याचा उग्र वास पसरला होता. तिला नुसत्या वासाने मळमळायला झालं होतं. काहीतरी भयंकर घडल्यासारखं तिला वाटतं होतं.
“केतन काय हे…”
“काय अवस्था केलीय तू घराची आणि तूझीही…”
“केतन काहीच बोलला नाही.”
प्राजक्ताला पाहून त्याने कडकडून मिठी मारली आणि लहान मुलांसारखा तो हमसून हमसून रडू लागला.
प्राजक्ताने केतनला घट्ट मारली. काही वेळाने केतनला तिने सोफ्यावर बसवलं. सोफ्यावर दारूच्या दोन बाटल्या होत्या, त्या घरंगळत खाली पडल्या.

“केतन तू दारू प्यायलास?”
केतन पुन्हा काहीच बोलला नाही..
“केतन मी तुझ्याशी बोलतेय…”
“हो मग काय करू? मला आता सहनच होत नाहीये. हे सगळं माझ्यासोबतच का होतंय. तुझ्यासोबत मी आता कुठे जगायला लागलो होतो, आणि देवाला हे सुख पण बघवलं नाही”
“मला काहीच कळत नाहीये केतन तू मला समजेल असं बोल”
“त्या दिवशी केईएमला गेलो होतो, काम होतं माझं. बाहेर येत होतो. तेव्हा अपर्णा दिसली.”
“अपर्णा? कोण?”
“माझी आणि सायलीची मैत्रिण, तिने सांगितलं सायली इथेच अॅडमिट आहे. सायलीला…” वाक्य पूर्ण करणार एवढ्यात केतन पुन्हा रडायला लागला.
“प्राजक्ता तुला माहितीये.. सायलीला कॅन्सर झालाय. शेवटच्या स्टेजला आहे ग ती… काहीच महिने उरलेत तिच्याकडे.. माझी सायली नेहमी हसत खेळत असणारी. सगळ्यात बोल्ड सायली.. बिनधास्त.. मनाला वाटेल ते करणारी सायली. माझी सुंदर सायली, तुला माहितीये जेव्हा जेव्हा ती कुर्ता घालायची एका बाजूला केस घेऊन छान लाजायची तेव्हा वेडा व्हायचो ग मी तिच्यासाठी आणि त्या दिवशी सायलीला पाहिलं. नुसती श्वास घेतेय फक्त. शून्यात बघत होती कुठेतरी, केसही नव्हते तिच्या डोक्यावर. फक्त लाकडाच्या ओंडक्यासारखी पडून होती…” सांगताना केतन थरथरत होता.
केतनच्या तोंडून हे ऐकून प्राजक्ता एकदम थंड पडली. सायली आणि तिचा तसा काहीच संबध आला नव्हता, पण तरीही सायलीसाठी तिला खूप वाईट वाटत होतं.

“तुला माहितीये सायली. मी मुंबईत नवीन होतो. पहिल्यांदा मुंबईत आलो. नवी नोकरी होती. पण राहायला घर नव्हतं. चाळीत चार जणांसोबत घर शेअर करून राहायचो. सुरूवातीला पगारही नव्हता. घराचं भाडं मुंबईतला खर्च सारं अशक्य होतं. मुंबईत कोणीच ओळखीचं नव्हतं ग माझ्या. सारखं घरी परत जावसं वाटायचं. बाहेर वडापाव खाऊन राहायचो. उशीरा घरी यायचो. जेवण बनवायला वेळ नसायचा. मुंबईत स्वत:चं घर घ्यायचं होतं म्हणून पैसे पण जपून खर्च करायचो. तेव्हा सायली होती सोबत… ऑफिसमध्येच काय पण मुंबईत पण माझी पहिली मैत्रिण जर कोणी असेल तर ती होती. मी गावावरून आलोय म्हणून माझ्याशी कोणीही बोलायचं नाही, तेव्हा ती पहिल्यांदा आली होती माझ्याशी बोलायला.” केतन भूतकाळातल्या आठवणीत हरवून गेला होता.
“माझं इथे कोणी नाही म्हटल्यावर रोज माझ्यासाठी डबा आणायची. मी जेवलो की नाही सतत काळजी असायची तिला. महिन्याअखेरीला पैसे पण नसायचे तेव्हा ती द्यायची… माझ्या कठीण काळात तिने खूप साथ दिली मला.”
प्राजक्ताने केतनचा हात घट्ट पकडून त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला.
“त्यादिवशी मला तिने पाहिलं. खूप रडली ती… माझी माफी मागत होती सारखी. मला सोडून दुसऱ्या सोबत गेली म्हणून एवढं वाईट झालं असं बडबडत होती. मला तिच्याकडे खरंच बघवत नव्हतं.”
“केतन रडून काही होणार नाही स्वत:ला सावर” प्राजक्ताने त्याचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला.
“डॉक्टर काय म्हणालेत?”
“लास्ट स्टेजला आहे, काहीच महिने राहिलेत तिच्याकडे”

“oh I m so sorry”
“प्राजक्ता मला तिच्यासाठी काहीतरी करायचं आहे ग, मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा तिने माझ्यासाठी खूप काही केलं. आता तिच्याजवळ जे काही सहा एक महिने उरलेत मला ते तिच्यासोबत घालवायचे आहेत.”
“परवा तुला न सांगता तिच्याकडे गेलो होतो. हॉस्पिटलमध्ये थांबून होतो. तिचा हात हातात घेतला ना प्राजक्ता तेव्हा तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. एकत्र असतो तर एव्हाना तुझी बायको असते असं म्हणाली”
केतनचं ऐकून प्राजक्ताही रडत होती, पण तिच्या अश्रूंकडे बघायला केतनचं चित्त थाऱ्यावर नव्हतंच.
“केतन तू अजूनही प्रेम करतोस सायलीवर?”
“प्राजक्ता तू होतीस तेव्हा मला सायलीची आठवण येत नव्हती असं नव्हतं, मला अनेकदा आठवण यायची. तुझी तिची तुलनाही मनातल्या मनात मी करायचो. पण मात्र सायली आयुष्यात नाही याचा त्रास व्हायचा नाही. कारण मी तुझ्यासोबत सुखी होतो, पण त्याचवेळी सायलीला मनातून पूर्णपणे पुसून टाकणंही शक्य नव्हतं हेही तितकंच खरं होतं”
“तुझ्या तोंडून हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट तर मी नक्की सांगू शकते की अजूनही तूझं तिच्यावर खूप प्रेम आहे.”
“सायली पहिलं प्रेम नाही ग विसरता येत इतक्या सहज”
“hmmm ते ही खरंय म्हणा”
“पण मग तू नेमकं काय करायचं ठरवलंस?”
“प्राजक्ता मला तुझ्यासोबत नाही राहता येणार”
“पण का? मला सोडून काय साध्य करणार आहेस तू?”
“प्राजक्ता सायलीला तिच्या बॉयफ्रेंडने कधीच सोडलं होतं. तिलाही तिची चूक कळाली होती. माझ्याकडे परत येऊन पुन्हा एकदा नव्यानं सुरूवात करावं असं तिला वाटतं होतं.”
“मग?”
“पण नशीब वाईट होतं आम्ही एकत्र यावं हे नशीबाला मान्य नव्हतं. त्या आधीच तिला कॅन्सर झाला. माझ्याकडे परत येण्याचं तिचं स्वप्न अपूर्णच राहिलं. पण आता मला ते पूर्ण करायचं आहे, मला तिची शेवटची इच्छा पूर्ण करायची आहे.”
“म्हणजे काय करणार आहे तू?”
“मी पुढचे काही महिने तिच्यासोबत राहणार आहे. प्राजक्ता आमचं लग्न जरी होऊ शकलं नाही तर मी मात्र माझं पूर्ण कर्तव्य पार पाडणार आहे. जेव्हा मुंबईत माझं कोणी नव्हतं तेव्हा ती होती आता तिचं कोणी नाहीये पण मला मात्र शेवटच्या श्वासापर्यंत तिची सोबत द्यायची आहे.”
“तुझा निर्णय पक्का आहे?”
“हो प्राजक्ता मी एका वेळी एकीला खूश ठेवू शकतो आणि मी जे थोडे दिवस उरले आहे त्या दिवसांत सायलीला खूश ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.”

प्राजक्ता यावर काहीच बोलली नाही. केतनशी वाद घालून, त्याच्याशी भांडून काही उपयोग नव्हता. आपण एखाद्यावर जीव ओतून प्रेम करू शकतो पण समोरच्या व्यक्तीला प्रेम करण्याची सक्ती आपण कशी करू शकतो? हे तिलाही कळत होतं. केतनने आपल्यावर प्रेम केलं होतं खरं पण जितकं प्रेम त्याने सायलीवर केलं होतं तितकं मात्र त्यानं केलं नाही. तिला आतून खूप वाईट वाटत होतं. तीन दिवसांत आयुष्य बदलेलं असं तिला वाटलंही नव्हतं. पण आता वेळ हातातून निसटून गेली होती. केतन परत येईल न येईल तिला माहिती नव्हतं आणि आलाच तरी तो पूर्वीचा केतन नसणार याचीही जाणीव तिला झाली. केतनच्या निर्णयाचा तिने आदर केला पुढे एकही शब्द न बोलता तिने हे रिलेशनशिप पुढे न ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यादिवशी ती केतनच्या घरी थांबली. तिच्या मांडीवर डोकं ठेवून कधी त्याला झोप लागली कळलंही नाही. तिच्यासोबत घालवलेली ती रात्र आठवत असताना त्याची तंद्री भंगली.
“भाईसाब कहाँ उतरेंगे?” कोणीतरी त्याला उठवायचा प्रयत्न करत होता.
हाँ? केतनने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं, आपण ट्रेनमधून प्रवास करत आहोत हे त्याचा लक्षात आलं.
“अरे कहाँ उतरेंगे?”
“प….परेल”
तीन दिवस घडलेल्या आठवणींच्या चक्रातून तो बाहेर आला. परेल स्टेशन आलं होतं… स्टेशनवरून बाहेर येत तो केईएमच्या दिशेने चालू लागला. प्राजक्ता कायमची निघून गेली होती… आणि काही दिवसांनी सायलीही त्याला सोडून जाणार होती पण जेवढे दिवस उरले होते त्याला ते सायलीसाठी द्यायचे होते. डोळ्यातलं अश्रू एव्हाना आटले होते आणि गर्दीतून वाट काढत तो फक्त चालत होता…
(समाप्त)
– तीन फुल्या, तीन बदाम