समुद्राकडं एकटक बघत परिसा उभी होती. पावसात ती चिंब भिजली होती. केसही सोडले होते तिनं. तिचे ते लांब केस, अंगाला चिकटलेला तिचा तो नेव्ही ब्लू रंगाचा शर्ट, तिचे डोळे.. फारच सेक्सी दिसत होती ती. अथर्व तिच्या मागं उभा राहिला. क्षणाचाही विलंब न करता त्यानं तिला स्वत:जवळ ओढले आपली मिठी तिच्याभोवती घट्ट पकडत त्यानं आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले.

“ए हॅलो! असा काय बघतोयस?” अथर्व भानावर आला. तिला मिठी मारण्याचे आणि किस करण्याचे आपण फक्त स्वप्न बघत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. “तुलाच बोलवायला आलो होतो. चल निघूया नाहीतर तूला सर्दी होईल. खूप भिजली आहेस तू”, आपल्या मनावर ताबा मिळवत त्यानं परिसाला गाडीत बसवलं. पुढं एका टपरीवर चहा घेऊन दोघेही घरी परतले. आयुष्यात पहिल्यांदा आपण कोणाच्यातरी प्रेमात पडलोय की काय असं त्याला वाटू लागलं, परिसाचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. रात्र जागरणात गेली. डोळे बंद केले तरी तिचाच चेहरा समोर दिसत होता. दुसऱ्या दिवशी अथर्व ऑफिसमध्ये पोहोचला. नेहमीसारखा तो नक्कीच नव्हता. त्याच्यामध्ये काहीतरी बदल दिसत आहे, हे एव्हाना सगळ्यांच्याच लक्षात आलं होतं. त्याचं परिसाशी बोलणं हळूहळू वाढलं होतं. तिच्याशी हँगआउट, व्हॉट्सअॅप, फोनवर बोलण्यात अथर्वचा तासन् तास जायचा. आता जग बदलंल होतं. परिसाशिवाय त्याचं पानही हलेना. ती त्याच्या आयुष्यात येऊन आता एक महिना उलटला असेल.

bollywood actor aamir khan celebrated eid 2024 with family video viral
Video: आमिर खानने कुटुंबासह साजरी केली ईद; पापाराझींना वाटली मिठाई, व्हिडीओ व्हायरल
riteish deshmukh and genelia deshmukh celebrate gudi padwa with family
Video: रितेश देशमुखने मुलांसह उभारली गुढी, जिनिलीया व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “पहाटे आमची…”
Vikrant Massey gets tattoo of son VARDAAN name and his birthdate
‘12th fail’ फेम विक्रांत मेस्सीने लाडक्या लेकासाठी काढला खास टॅटू; फोटो शेअर करत म्हणाला…
IPL 2024 Shah Rukh Khan owner of kkr team know his income from ipl matches
IPL सामन्यांतून ‘कोलकाता नाइट रायडर्स’ संघाचा मालक शाहरुख खान करतो कोटींची कमाई; जाणून घ्या

गुड मॉर्निंगपासून ते गुडनाइट… जेवलीस का? पासून ते ऑफिसमधून निघालीस का? अशा प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत आता परिसा आली होती. कधी कधी परिसाला ऑफिसमधून घरी ड्रॉप करणं, भेटायला जाताना तिच्या आवडीच्या प्रत्येक वस्तू घेऊन जाणं यात त्याला समाधान वाटायचं, गाडीत बसून तिच्याशी तासन् तास गप्पा मारणं अथर्वला खूप आवडायचं. या मुलीनं एका महिन्यात आपलं आयुष्य किती बदलवलं होतं. अथर्व विचार करत होता. “महिन्याभरापूर्वी आयुष्यात कोणी नाही म्हणून रडणारा मी आता जगातला सगळ्यात सुखी माणूस बनलो होतो. टच वूड नजरो नको लागायला माझ्या सुखाला” अथर्व मनात म्हटला.

कामाच्या गडबडीत आज अथर्वचे परिसाशी बोलणंच झालं नाही. “मी निघतेय.” परिसाचा हँगआऊटवर मेसेज आला. परिसा संध्याकाळी सहापर्यंत ऑफिसमधून निघते हे त्याला माहिती होतं. “थांब मी तुला फोन करतो”, असं म्हणत अथर्व ऑफिसमधून बाहेर आला. गेला महिनाभर परिसा रोज घरातून निघताना आणि ऑफिसमधून सुटल्यावर त्याला फोन करायची. त्यामुळं अथर्वसाठी हे नित्याचं झालं होतं. आजही परिसाचा फोन आला.

“हाय मी निघतेय ऑफिसमधून…”, पण नेहमीपेक्षा तिचा आवाज वेगळा होता. फारच तुटक बोलत होती ती..

“परिसा ऑफिसमध्ये काय झालंय का?”, अथर्वनं काळजीच्या स्वरात विचारले.

“काही नाही. थोडी भीती वाटतेय.”, परिसा शांतपणे बोलली.. पुढं काही बोलायला जाणार एवढ्यात परिसाचा फोन कट झाला…

“हॅलो… हॅलो… परिसा… परिसा…” फोन कट झाल्याचं त्याच्या लक्षात आलं.

अथर्वची काळजी वाढू लागली. गेल्या महिन्याभरात प्रेमापेक्षा तिच्यावर जीवच अधिक जडला होता. त्यानं परिसाला पुन्हा फोन केला. पण, तो काही तिनं उचलला नाही. बाहेर पाऊस पडत होता, “काही बरं वाईट तर झालं नाही ना?” अथर्वच्या मनात वाईट विचार येऊ लागले. अथर्वनं पुन्हा फोन डायल केला. तेव्हाही तिनं फोन उचलला नाही. त्यानं मेसेज केला पण काहीच रिप्लाय आला नाही. ६.०५ ला शेवटचं बोलणं झालं. अथर्वच्या अंगावर खूप काम आलं, पण कामात लक्ष कमी आणि परिसाकडं त्याचं लक्ष जास्त होतं, एव्हाना त्यानं तिला १०० फोन आणि शेकडो मेसेज केले असतील पण एकाचेही उत्तर आले नाही. आता मात्र अथर्वला खूपच धडधडू लागले. परिसाला कॉन्टॅक्ट  करणार तरी कसं? आपण तर तिला महिनाभराआधीच भेटलो होतो? रात्री अकरा वाजले होते. मिनिटा मिनिटाला मेसेज करणाऱ्या परिसाचं चार तास उलटून गेले तरी एकही मेसेज आला नव्हता. त्याची अस्वस्थता खूपच वाढली. पण परिसाच्या फोनची वाट बघण्यापलीकडं कोणताच पर्याय त्याच्याजवळ उरला नव्हता. काळजीनं अथर्वला त्या दिवशी झोप लागली नाही. पहाटे कधी डोळा लागला त्याचं त्याला कळलं नाही. बाजूला ठेवलेला फोन वाजू लागला…  नंबर नवीन होता. अथर्वनं फोन उचलला.

समोरून आवाज आला. “मला यापुढं मेसेज करू नकोस, फोनही करण्याचा प्रयत्न करु नकोस, प्लीज. बाय काळजी घे.”, अथर्वला धक्का बसला. आवाज परिसाचा होता. अथर्वचा एक शब्दही ऐकून न घेता तिनं फोन ठेवला. “ही अशी का बोलली? फोन करु नको, मेसेज करु नको म्हणजे काय?” अथर्व धक्का बसला. एवढ्यात ऑफिसच्या लँडलाइनवरुन फोन वाजला.

“हॅलो कुठे आहेस रे? कळत नाही का आज आपल्या चॅनेलचा खूप महत्त्वाचा शो आहे. असशील तसा ऑफिसमध्ये ये…” फोन कट झाला. अथर्व बधीर झाला होता. पण शो मस्ट गो ऑन. आताच्या आता ऑफिसमध्ये पोहोचणं गरजेचं होतं. त्यानं आंघोळ उरकली आणि दहा मिनिटांत ऑफिस गाठलं. कामात लक्षच लागत नव्हतं. शो संपल्यावर वॉशरुममध्ये शिरून अथर्व ढसाढसा रडला. “ती मला सोडून कशी जाऊ शकते? माझ्या सुखाला माझीच नजर लागली. मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. ती माझी गर्लफ्रेंड नव्हती. पण तरीही माझा जीव तिच्यात गुंतला होता. गेल्या महिन्याभरात मला जगायला शिकवलं होतं तिनं. माझं आयुष्य फुलवलं होतं आणि आता अचानक मेसेज करुन नको असं का म्हणाली ती?”, अर्थव फक्त रडत होता.

तिनं बोलणं सोडून आता तीन आठवडे उलटले होते. रोज फेसबुकवर काहीना काही अपलोड करणाऱ्या परिसानं गेल्या तीन आठवड्यात काहीच अपडेट्स टाकल्या नव्हत्या. अथर्व मात्र रोज फेसबुकवर प्रेमभंगाच्या स्टेटस टाकत होत्या. परिसा त्या नक्की वाचेल आणि आपल्याला फोन करेल, असं त्याला सारखं वाटायचं. humtumforever2228@gmail.com वर परिसासोबत मारलेल्या गप्पा तो सारख्या वाचायचा. चेहऱ्यावर हसू यायचे पण आता परिसा नाही आहे, याची जाणीव होताच रडूही कोसळायचे. पुढचे दोन महिने डिप्रेशनमध्ये गेले, कामात लक्ष लागेना. चीडचीड वाटू लागली. परिसाला तेव्हा मेसेज केले नसते तर बर झालं असतं, असं त्याला सारखं वाटू लागलं होतं. “काहीही झालं तरी आयुष्यभर घट्ट मित्र राहू असं एकमेकांना प्रॉमिस केलं होतं ना आपण? मग ती इतक्या लगेच कसं काय विसरली?” अथर्वला तिचा खूप राग येत होता. इथे काही काम करणं शक्य नाही त्याला सारखं वाटत होतं. त्यानं आपली दिल्लीत ट्रान्सफर मागून घेतली, दोन दिवसांत ती अप्रुव्ह झाली. पुढच्या आठवड्यात दिल्लीच्या ऑफिसमध्ये तो तिथे रुजू होणार होता. त्याने फेसबुकवर पुन्हा एक स्टेटस टाकला. अर्थात तो परिसासाठी होता. आता आपण तिच्यापासून दूर या मुंबईपासून दूर जाणार आहोत, हे तिला सांगायचं होतं.

अपेक्षेप्रमाणे तो परिसाने वाचलाही. संध्याकाळी त्याला परिसाचा हँगआऊटवर मेसेज आला. “Hi मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे? भेटूया का?”

खरंतर परिसाचा मेसेज येणं अथर्वसाठी अनपेक्षित होतं, तिच्या मेसेजला त्यानं लगेच रिप्लाय दिला.

“हो, भेटतो कुठे येऊ?”

“माझ्या बिल्डिंगखाली येशील?” परिसानं विचारलं.

पुढचं काही न बोलता २० मिनिटांत येतो, असं सांगून अथर्वनं लॉगआऊट केलं. नेहमीप्रमाणं वेळेच्या आधी पोहोचून अथर्वनं परिसाच्या बिल्डिंगखाली गाडी थांबवली. समोरुन परिसा येत होती. दोन महिने तिला पाहिलेही नव्हतं. ना तिचा आवाज ऐकला होता. पण तिला पाहून आनंद वाटण्यापेक्षा अथर्वला काहीसा धक्का बसला. नेलपेंटपासून ते केस, कपडे, अॅक्सेसरिज अशा सगळ्याच गोष्टींची काळजी घेणारी परिसा दोन महिन्यांत किती बदलली होती. फॅशनचा सेन्स असणारी परिसा आज वेळगीच होती. पूर्ण बाह्यांचा कुडता तिने घातला होता. केसही तिनं विंचरले नव्हते. नेहमी हसतमुख असलेल्या परिसाचा चेहरा फारच मलूल दिसत होता. दरवाजा उघडून ती आत आली आणि अथर्वच्या बाजूच्या सीटवर बसली. दोघंही बराच वेळ फक्त आणि फक्त शांत बसून होते.

शेवटी न राहवून अथर्वनं विचारले, “मला का भेटायला बोलवलंस?” अथर्वच्या बोलण्यातून राग स्पष्ट दिसत होता. परिसा काहीच बोलली नाही. “तू सांगलीश का? त्यादिवशी तुला किती फोन केले मी. एकही कॉल उचलला नाहीस. वरून दुसऱ्या दिवशी फोन करुन मला सांगतेस आजपासून फोन किंवा मेसेज करू नकोस, याला काय अर्थ आहे? अथर्व परिसाच्या अंगावर ओरडला. बराच वेळ गप्प बसलेल्या परिसानं आपलं मौन सोडलं.

“सॉरी मला तुला दुखवायचं नव्हतं, पण तुझं मात्र मैत्रिचं नातं मला टिकवायचं होतं म्हणून मी दोन महिने तुला कॉन्टॅक्ट केला नाही.”

“मी मूर्ख वाटलो का तूला? अशी फालतू कारणं देऊ नकोस मला. म्हणे दुखवायचं नव्हतं.” अथर्वचा पारा चढत होता. परिसा यावर काहीच बोलली नाही. पुढचा काही वेळ शांततेत गेला. परिसा रडू लागली.

“तुला काहीतरी सांगायचं होतं, म्हणून बोलावलं. गेल्या दोन महिन्यांपासून तुझे स्टेटस वाचतेय. मला माहितीय माझ्या जाण्यानं तुला खूप दु;ख झालं आहे. मी तुला खूप दुखावलं आहे पण माझा नाईलाज होता.”

“नाईलाज कसाला नाईलाज?” स्वत:ला शक्य तितकं शांत करत अथर्व म्हणाला.

“अथर्व. तू माझ्या आयुष्यात येण्याआधी माझा बॉयफ्रेंड होता. नावालाच बॉयफ्रेंड. अहंकार, राग ठासून भरला होता त्याच्यात, मी कोणाशी बोललेलं त्याला आवडायचं नाही. आम्ही रिलेशनशिपमध्ये आल्यापासून माझ्या मित्र-मैत्रिणी सगळ्यांशी कॉन्टॅक्ट त्यानं तोडून टाकले होते. मी कोणाशी बोलावंपासून ते काय बोलायचं हे सारं तोच ठरवायचा, त्याचं ऐकलं नाही की रागात हात उचलायचा. मग आपण रस्त्यात आहोत की आणखी कुठे हेही बघायचा नाही. मी गप्प बसायचे, कारण नाती तोडायला मला आवडत नाही. तो कसाही वागला असला, तरी माझं प्रेम होतं त्याच्यावर. माझे मोबाईल, फेसबुक अकाऊंट सतत चेक करायचा, त्याच्याकडं पासवर्डही होते माझ्या अकाऊंटचे.” परिसा  बोलायची मध्येच थांबली.

“मग? आपण महिनाभर बोलत होतो… पण तू एका शब्दानेही मला कधीच याबद्दल सांगितलं नाही.”, अथर्वनं आश्चर्यानं विचारलं.
“हो. कारण तू कधी विचारलं नाही आणि तेव्हा आमचं ब्रेकअप झालं होतं, म्हणून मीही सांगितलं नाही. तो माझ्या आयुष्यातून कायमचा गेला असं मला वाटतं होतं, मी खूप सुखात होते. तो असताना मी कोणाशीच बोलले नाही, पण तू एका महिन्यात माझं आयुष्य बदललं होतं. तुझा स्वभाव, माझी काळजी करणं मला आवडायचं. तू माझा पहिला आणि जवळचा मित्र होता. मला तुझी सोबत आवडायची. तो आयुष्यात परत येईल, असं मला कधीच वाटलं नव्हतं. मला तुला अंधारात ठेवायचं नव्हतं अथर्व.”

“त्या दिवशी ऑफिसमधून निघताना मला त्याचा फोन आला होता. मला शिव्या देत होता. तू खूप कामात होता आणि मला तुला या प्रकरणात गुंतवायचं नव्हतं, म्हणून मी काहीच बोलले नाही. मी ऑफिसमधून सहाच्या आसपास निघते हे त्याला माहिती होतं. तो खालीच उभा होता. मी तुझ्याशी नेहमीप्रमाणं बोलत निघाले तेव्हा तो मागून आला आणि माझा फोन काढून घेतला. म्हणून फोन कट झाला. तू शंभर फोन केले पण माझा फोन त्याच्याकडं होता. तुझ्या माझ्यातील चॅटिंग सगळं त्यानं वाचलं होतं. आपण भेटतो हे ही त्याला कळलं होतं. त्यानं रागात मला मारायला सुरूवात केली. तुलाही सोडणार नाही, अशी धमकी देत होता. एक महिना तो शांत बसला होता पण ही वादळापूर्वीची शांतता होती हे मात्र मला ठाऊक नव्हतं. ब्रेकअपनंतरही तो माझ्यावर पाळत ठेवून होता. त्यादिवशी रात्री १२ वाजेपर्यंत मी बाहेर होते. माझ्या डोक्याला मार लागला होता. शेवटी तुझ्याशी यापुढे मी कधीही बोलणार नाही, असं माझ्या तोंडून वदवून घेतल्यानंतर मला उशीराने घरी जाऊ दिलं.”

मी त्याची नाही झाले तर मला कोणाचीच तो होऊ देणार नाही, हे मला माहिती होतं. जर तू मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला असताच तर तुझंही त्यानं काहीतरी बरं वाईट केलं असतं आणि माझ्यामुळं तुला कोणताही त्रास झालेला मला आवडला नसता. म्हणून त्यादिवशी काहीही न बोलता तुझ्याशी मी सारे संबंध तोडून टाकले होते. एक महिन्यांपूर्वीच तू माझ्या आयुष्यात आला होता त्यामुळं या साऱ्या प्रकरणात तू कसा रिअॅक्ट करशील मला माहिती नव्हतं आणि माझ्या आयुष्यात असलेली सगळ्यात जवळची व्यक्ती मला या कारणामुळं गमवायची नव्हती. म्हणून पुढचे काही दिवस तुझ्या संपर्कात न राहण्याचा निर्णय मी घेतला. तुझ्या फेसबुक स्टेटसवरून मी तुला खूप दु:खावलंय हे मला कळत होतं. पण माझा नाईलाज होता. दरम्यानच्या काळात ब्रेकअपनंतरही त्याचे फोन मला येत होते, माझं आयुष्य उदध्वस्त करु अशा धमक्या तो मला देत होता, शेवटी मी घरातल्यांना विश्वासात घेऊन सगळं सांगितलं तेव्हा कुठं त्याचे फोन बंद झाले.” परिसाच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहतं होते.

अथर्वनं एकही शब्द न बोलता परिसाला आपल्या हातून रुमाल काढून दिला. परिसानं डोळे पुसले. आज तू फेसबुकवर स्टेटस टाकलंय की तू पुढच्या आठवड्यात दिल्लीत शिफ्ट होतोय, मला माहिती नाही यापुढे तूझी माझी भेट होईल की नाही, पण मला त्याआधी तुला भेटायचं होतं. जाता जाता माझ्याविषयी कोणतीही तक्रार मनात ठेवून तू तिथे गेलेलं मला आवडलं नसतं म्हणून तूला भेटायला बोलावलं.
एव्हाना अथर्वचा राग कुठच्या कुठं पळाला होता होता. परिसाचीही बाजू असू शकते, याचा आपण कधीही विचार केला नाही, याचं दु:ख त्याला अधिक होत होतं. त्यानं कोणताही विचार न करता परिसाला घट्ट मिठी मारली. परिसाच्या डोक्यावर आपले ओठ त्याने हलकेसे टेकवले. त्याला काहीतरी बोलायचं होतं. परिसा फक्त मैत्रिण नव्हती तिचं आयुष्यातलं स्थान मैत्रिणीपेक्षाही अधिक होतं. आयुष्यात एक व्यक्ती अशी असतेच की जी फार कमी वेळात आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग होऊन जाते. आपलं आयुष्य ती कधी व्यापून टाकते, हे आपल्यालाही कळतंच नाही. परिसा ती व्यक्ती होती. आपले ओठ परिसाच्या डोक्यावरुन त्यानं ओठांवर टेकवले I love you परिसा. अथर्वनं आपल्या दोन्ही हातांनी तिचा चेहरा अलगद पकडला होता. मी तुझ्या उत्तराची वाट बघेन. यावर परिसानं काहीच रिअॅक्ट केलं नाही, अथर्वला शेवटची मिठी मारुन तिने दरवाजा उघडला आणि ती चालू लागली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडं बघत अथर्व बघत होता

“तू मला उद्या काय उत्तर देशील मला माहिती नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की भविष्यात hum आणि tum मित्र म्हणून एकत्र राहू. forever. अगदी काही झालं तरी..”

– तीन फुल्या, तीन बदाम

 

© सर्व हक्क सुरक्षित