अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- काशीनाथ बाळकृष्ण मराठे!

गेल्या आठवडय़ात आपण पंचआजोबांच्या लेखनाविषयी जाणून घेतले. पंचआजोबांचे ‘हिंदुपंच’ १८७२ मध्ये प्रकाशित होण्यास सुरुवात झाली होती. त्याच वर्षी फेब्रुवारीमध्ये काशीनाथ बाळकृष्ण मराठे यांनी मुंबईच्या ज्ञानप्रसारक सभेपुढे एक निबंध वाचला. पुढे अनेक वर्षे चर्चेत राहिलेल्या या निबंधात त्यांनी त्या काळात रूढ होऊ लागलेल्या कादंबरी व नाटक या वाङ्मयप्रकारांविषयी सविस्तर मांडणी केली आहे. त्या निबंधाचे शीर्षक होते- ‘नावल व नाटक ह्य़ांविषयी निबंध’. या निबंधाच्या प्रयोजनाविषयी मराठे यांनी प्रस्तावनेत लिहिले आहे-

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Everything You Need To Know About Pune Famous Tourist place sarasbag history name and many more
पुण्यातील प्रसिद्ध ‘सारसबाग’ कोणी बांधली? पाहा काय आहे इतिहास…
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

‘‘रा. ब. विष्णु परशुराम रानडे (‘जॉर्ज वॉशिंग्टन’ या लघुचरित्राचे कर्ते) यांनी एकवार असा अभिप्राय दर्शविला होता कीं प्रस्तुत नावलें लिहिणारे व नाटकें लिहिणारे फार झाले आहेत; त्यांपैकीं पुष्कळांस नावल अथवा नाटक असावें कसें, हेंदेखील माहीत नसतें, त्यामुळें ते हव्या त्या प्रकारची भाषा लिहितात, हव्या तशा कल्पना पुस्तकांतून घालतात, व हवा तितका सत्याचा अपलाप करितात. असें होऊं नये म्हणून कोणी तरी चांगल्या विद्वानाने नावल व नाटक ह्य़ांच्या स्वरूपाविषयीं निबंध लिहावा, व तो छापून प्रसिद्ध करावा. विष्णुपंतांनीं हा अभिप्राय दोन तीन विद्वानांस कळवला, परंतु कोणाच्याहि हातून ती गोष्ट झाली नाही; म्हणून पुढील अल्पविद्वानाचा निबंध छापण्यांत आला. त्यांत न्यूनता पुष्कळ असतील, परंतु कांही माहिती इंग्रजी निबंधांतून व संस्कृत ग्रंथांतून घेतली आहे ती ह्य़ापुढें नावल करणाऱ्यांस अथवा नाटक लिहिणाऱ्यांस उपयोगी पडेल अशी निबंधकर्त्यांची आशा आहे.’’

हा निबंध प्रसिद्ध होईपर्यंत सुमारे ५० निबंधात्मक पुस्तके मराठीत प्रसिद्ध झाली होती. मात्र वाङ्मयविषयक सखोल चर्चा करणारा हा पहिलाच निबंध. त्या काळात लोकप्रिय झालेल्या ‘मंजुघोषा’, ‘विचित्रपुरी’, ‘मुक्तामाला’, ‘मोचनगड’ या कादंबऱ्या व ‘मनोरमा’, ‘स्वैर सकेशा’, ‘नारायणराव’, ‘थोरले माधवराव’, ‘जयपाळ’ ही नाटके विचारार्थ घेऊन मराठे यांनी कादंबरीकार आणि नाटककर्त्यांनी आपल्या कलाकृती रचताना कोणत्या बाबी ध्यानात घ्याव्यात, काय टाळावे याची या निबंधात चर्चा केली आहे. त्यातील सुरुवातीच्या भागातील हा उतारा पाहा-

‘‘नावल म्हणजे चमत्कारिक गोष्ट. ज्यांत आश्चर्यकारक गोष्टी फार, व जो वाचला असतां अवलपासून अखेपर्यंत वाचणारांस जागोजाग नवल वाटावें, अशा प्रकारचा जो ग्रंथ, त्यास इंग्रजींत ‘नावल’ अशी संज्ञा आहे. नावल म्हणजे नवलसमूह अशा अर्थसाम्यावरून मराठींत ही सदरहू ग्रंथांचें तेंच नांव राखलें असतां चिंता नाहीं. संस्कृतामध्यें अशा प्रकारचे ग्रंथ विरळा. सुबंधु नामक कवीची वासवदत्ता, दंडीचें दशकुमार चरित्र, बाण कवीची कादंबरी अशीं कांहीं नावलें संस्कृत भाषेमध्यें आहेत. परंतु नावलें गद्यात्मक असावीं, असा नियम केला नाहीं तर, संस्कृतांत अनेक नावलें सांपडतील. किंबहुना शास्त्रविषयक ग्रंथ वगळले तर सर्वच संस्कृत ग्रंथांस नावल म्हणण्यास काय चिंता आहे? चार वेद, अष्टादश पुराणें, व एकंदर काव्यें हीं काय नावलें नव्हेत? नाटक, हें एक नावलाचेंच अन्य स्वरूप आहे.’’

मराठे यांनी या निबंधात इंग्रजी ‘नॉव्हेल’ या शब्दासाठी ‘नावल’ हा शब्द योजला आहे. मराठीत तेव्हा कादंबरी हा शब्द रूढ झाला होता. पंरतु कादंबरी किंवा इतर कोणत्याही शब्दांतून ‘नॉव्हेल’चे बरोबर भाषांतर होत नाही, असे मराठे यांचे मत असल्याने त्यांनी ‘नावल’ हा शब्द तयार केला. मराठे यांचा हा निबंध गाजला, परंतु ‘नावल’ हा शब्द मात्र मराठीत रूढ झाला नाही. निबंधात पुढे मराठे यांनी कादंबरीसाठी आवश्यक असलेल्या बाबी सांगितल्या आहेत-

‘‘१. अ) जसें नाटकांत तसेंच नावलांत काळ, वेळ, पुरुषस्वभाव व स्थळ हीं एक असलीं पाहिजेत.. ब) जे पुरुष नावलांत वर्णिले असतील त्यांचा स्वभावही एकसारखा पाहिजे..प्रसंग पाहून लांब अथवा आखूड, कठोर, अथवा मृदु, पांडित्ययुक्त किंवा साधारण भाषण पात्रांच्या तोंडीं घातलें पाहिजे..क) नावलामध्यें स्थलैक्य पाहिजे परंतु सर्व हिंदुस्थान देश एकच आहे असें घेतलें तर प्रस्तुतच्या नावलकारांच्या लिहिण्यास फारसा दोष येत नाहीं.

२. नावलांमध्यें अशा गोष्टी असाव्या कीं त्या वाचल्या असतां वाचणारांमध्ये विशेष दया, माया, स्नेह, प्रीति, शौर्य, धैर्य, औदार्य वगैरे गुण उत्पन्न होतील. पुराणादिकांच्या श्रवणापासून अंशत: हे गुण वृद्धिंगत होतात यांत संशय नाहीं. परंतु अर्वाचीन नावलांमध्यें जागोजाग शृंगार फार, व शोक फार.. अनेक संकटें ऐकवून अंत:करणें दीन व खिन्न करणें यापेक्षा पुष्कळ उत्साहाच्या शौर्याच्या, धैर्याच्या, प्रौढीच्या, औदार्याच्या गोष्टी सांगून लोकांस जरा उल्हसित करावें हें बरें.

३. नावलांमध्यें ह्य़ा सृष्टीचे नैसर्गिक स्वरूपांचें वर्णन असावें, कांहीं वृत्तांत भाग कमजास्त असला अथवा पुरुष विशेषांचीं नांवें खोटीं असलीं, किंवा पुरुष कल्पित असले तरी चिंता नाहीं. परंतु त्यांच्या संबंधानें जी गोष्ट सांगितली असेल ती खरी कोठें तरी झालेली असावी. झालेली नसेल तर संभाव्य व खऱ्यासारखी भासणारी तरी असावी. केवळ लोकांकरितां असेल तर, अद्भुताचें मिश्रण असलें तरी चालेल. पण इत:पर जीं नावलें होतील त्यांत खऱ्या व संभाव्य गोष्टीच नावलकार घालतील तरच त्यांचीं पुष्कळ बुके विकून मोठा फायदा होईल. अमुक काळीं अमुक चमत्कारिक गोष्टी झाल्या त्यांचें खरें स्वरूप मनोरंजक रीतीनें वर्णिलें असतां त्याविषयीं चिरकाल लोकांची अभिरूची राहते.

४. नावलामध्यें कामक्रोधादि मनोद्वेगाचे जे वरचेवर मासले दाखवावे लागतात, ते सर्व मनुष्यजातीमध्यें ज्या सामान्य चिन्हांनीं त्यांचें प्रदर्शन होतें त्या सामान्य चिन्हांनी दाखवावे.

वर सांगितलेले चार धर्म नावलांमध्यें मुख्यत्वें असावे व असे धर्म असले म्हणजे नावलें फार उपयोगी ग्रंथ होतील.’’

निबंधाच्या उत्तरार्धात मराठे यांनी नाटकाविषयी ऊहापोह केला आहे. त्यात ते लिहितात-

‘‘नाटक म्हणजे हावभावांसह रंगभूमीवर म्हणून दाखवण्यायोग्य कांहीं रसभरित संवादमिश्रित काव्य. कोणतेही काव्य हावभावासहित बोलून दाखविणें याची आवड मनुष्यमात्रांस फार पुरातन काळापासून आहे. कितीही अडाणी, रानटी, अज्ञान लोक पाहिले तरी त्यांमध्यें हावभावसहित नक्कल करण्याची कांहींना कांहीं रीत आढळते. अज्ञान अवस्था असो कीं सज्ञान अवस्था असो, सर्व देशांत नाटकरूपी खेळ कमी-जास्त प्रकारें सांपडतात.. कवींची प्रज्वलित बुद्धी, इतिहासकाराचें इतिहासज्ञान, विजातीय चित्रकाराची कला, वक्त्याची विलक्षण मनोवेधकता, नावलकाराचें चातुर्य, व तत्त्ववेत्त्याची गहन बुद्धी इतके गुण एकत्र करावे तेव्हां एका नाटककाराची कल्पना पूर्ण होते..एक विषय किंवा कथा; दुसरें, नायक, नायिका, व इतर पात्रें; आणि तिसरें, नाटकांमध्यें रस असले पाहिजेत..’’

हे सांगून पुढे ते नाटककाराने नाटक रचताना कोणत्या बाबींकडे लक्ष द्यायला हवे, हेही नोंदवतात-

‘‘१. नाटकामध्यें अनेक गोष्टी घालून उपयोग नाहीं, कारण तितक्या गोष्टीकडे लक्ष ठेविलें असतां तें वाटलें जातें व मुख्य नायकाला किंवा नायिकेला गौणता येते. मुख्य पात्राच्या गोष्टीला साधनीभूत दुसऱ्या गोष्टी घातल्या असतां चिंता नाहीं..एकाचाच इतिहास स्पष्ट होण्यासाठीं जेथें जेथें दुसऱ्या पात्रांचा इतिहास अवश्य असेल, तेथें तो थोडक्यांत योग्य रीतीनें दिला पाहिजे.. कोणी म्हणेल कीं एक मुख्य पात्राच्या संबंधानेंच नाटक लिहिलें असतां कंटाळवाणें होईल, ह्य़ा करितां पांच चार भिन्न गोष्टी पाहिजेत. परंतु नाटक करून दाखविण्यामध्यें सदाचरणाची प्रौढी, दुराचाऱ्यांस शिक्षा, द्रव्य लोभापासून परिणाम, व्यभिचाराचें फळ, दुखितांचें दु:ख निवारण, जुलुम करण्याबद्दल शासन, किंवा नायकाची नायिकेवर विलक्षण प्रीति, असा कांहीं तरी एक उद्देश पाहिजे, नाहीं तर चित्त व्यग्र होऊन जाते. सर्व प्रकारचे वैचित्र्य ह्य़ा जगतांत आहेच, त्यांतून एक गोष्टीला प्राधान्य देऊन ती नाटककारानें नाटकांत वर्णावी, व नाटकसमयीं सर्वाच्या मनोवृत्तींत फेरफार होऊं देऊं नये.

२. नाटकाचा विषय फार प्रौढ असावा. थोर पुरुषाचे आचरण, पतिव्रता स्त्रियांचा दृढ निश्चय, शूर पुरुषांचीं साहसें, साधूचीं चरित्रे, उदार पुरुषाचें वर्तन, एकाद्या थोर मनुष्याचा वध, सुंदर स्त्रीपुरुषांची परस्पर प्रीति व त्यांचा बिघाड, ह्य़ा प्रकारचे विषय नाटकाला फार उत्तम. परंतु विषय कसाही असला तरी त्याचें स्वरूप पात्रांच्या कृतीवरून स्पष्ट झालें पाहिजे. ग्रंथकर्त्यांनें त्याचें वर्णन देऊन उपयोग नाहीं.

३. जे विषय नाटकांत वर्णावयाचे ते असे असावे कीं त्यापासून मनाची सुधारणा होईल..

४. नाटकांमध्यें स्थलाचें ऐक्य असलें पाहिजे; व काळाचें ऐक्य असलें पाहिजे..’’

कादंबरी व नाटक यांच्याविषयी चर्चा करून निबंधाचा शेवट करताना मराठे यांनी लिहिले आहे-

‘‘कोणी विचारील कीं नावलें व नाटकें चांगलीं लिहितां येऊन काय उपयोग आहे? नावलें व नाटकें लिहून मन रिझविणें ह्य़ापासून देशाची काय सुधारणा होणार आहे? त्या लोकांस आमचा असा प्रतिप्रश्न आहे कीं, तुमचीं बायकामुलें, केवळ लिहितांवाचतां येणारे चाकरचुकर, तुमचे अल्पज्ञानी देशबांधव, ह्य़ांनी आपला काळ कसा घालवावा? तीं तुमच्याबरोबर नाणीं, ताम्रपट, जुनीं लेणीं, जुन्या चालीरीती, जुनीं माणसें, व जुने लेख ह्य़ांचा शोध करीत बसतील काय? तीं तुमच्याप्रमाणें मन म्हणजे अमुक, आत्मा म्हणजे अमुक, ब्रह्म म्हणजे तमुक, असा विचार करीत बसतील काय? तीं तुमच्याप्रमाणें मनुष्याच्या शरिरांत काय आहे, रक्ताभिसरण, श्वासोच्छ्वसन, अन्नपचन, हीं कशीं होतात; प्राणवायूचे धर्म काय, धातूंचे धर्म काय, एकंदर मूलधर्म किती, अमुक वनस्पति किंवा प्राणी हीं कोणत्या वर्गातलीं, अमुक खनिजाचे धर्म काय, पृथ्वीच्या पृष्ठभागाखालीं किती निरनिराळे थर आहेत, ह्य़ा गोष्टीची चवकशी करीत बसतील काय? कदाचित् ताऱ्यांची नांवें माहीत करून घेण्याची इच्छा होईल. पण त्यांचीं अंतरें, व त्यांचें विशिष्ट गुरुत्व घोकण्यास त्यांचा कल होईल काय? क्ष, य, काटकोन चौकोन, पराबोला, हायपरबोला ह्य़ांपासून त्यांस काय मौज वाटणार आहे? असे अनेक प्रकारचे जे गूढ व क्लिष्ट उद्योग तुम्ही करतां, त्यांपासून त्यांस आनंद होणार आहे काय? कधीं नाही. त्यांचा काळ जाण्याला चमत्कारिक गोष्टीच पाहिजेत, आणि त्यांपासून त्यांचें हित व मनोरंजन हीं दोन्ही व्हावीं अशी तुमची इच्छा असली तर स्वत: आपण कांहीं सुबोध गोष्टी व नाटकें रचावीं अशी आमची विनंती आहे.’’

मराठी कादंबरी व नाटय़लेखनाच्या आरंभीच्या काळात मराठे यांच्या या निबंधाने तत्कालीन लेखकांना नवीन दृष्टी दिली. त्यामुळे या निबंधाचे महत्त्व अधिक आहे.

या निबंधाच्या आधी मराठे यांचा ‘वेदांविषयीं निबंध’ (१८६९) हा निबंध प्रसिद्ध झाला होता. पुढे त्यांनी मुंबईच्या सरकारी विद्याशाळा खात्यातर्फे प्रकाशित होणाऱ्या बालशिक्षा ग्रंथमालेसाठी अनेक शास्त्रीय विषयांवरील पुस्तके इंग्रजीतून मराठीत भाषांतरित केली. त्यांनी उपनिषद् भाषांतरमालाही सुरू केली होती. त्यात त्यांचे बृहदारण्यकोपनिषद- अध्याय ३ व ४ यांचे मराठी भाषांतर प्रकाशित झाले. याशिवाय त्यांनी संत तुकारामांच्या अभंगांचे नेल्सन फ्रेजर यांच्या सहकार्याने ‘पोएम्स ऑफ तुकाराम’ हे इंग्रजी गद्य भाषांतर सिद्ध केले. मराठे यांचे हे लेखन आवर्जून वाचायला हवे.

संकलन प्रसाद हावळे – prasad.havale@expressindia.com