13 August 2020

News Flash

शैलीदार व्यासंगी!

विविधज्ञानविस्तार’मध्ये ओक यांनी लोकहितवादींवरही एक दीर्घ लेख लिहिला होता.

‘वामनरावांपुढें मराठी भाषा अगदीं हात जोडून उभी होती

अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- वामन दाजी ओक!

मागील लेखात आपण बाळाजी प्रभाकर मोडक यांच्या शास्त्रीय वाङ्मयाविषयी जाणून घेतले. त्याच सुमारास वामन दाजी ओक यांचेही लेखन वाचकप्रिय होऊ लागले होते. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी निबंधमालेत मोरोपंतांवर लिहिलेल्या निबंधांचा परखड परामर्श घेणारे लेख ओक यांनी लिहिले. ते निबंधमालेतच छापून आले. या लेखांमुळे ओक यांच्या काव्यविषयक अभ्यासाचा परिचय वाचकांना झाला. त्याच काळात ‘विविधज्ञानविस्तार’मधून त्यांचे व्यक्तीचरित्रपर लेखन प्रसिद्ध होत होते. वॉरन हेस्टिंग्ज या अठराव्या शतकातील इंग्रज गव्हर्नरवरील दीर्घ लेख यादृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यातील हा काही भाग पाहा-

‘‘हिंदुस्थानांतला पहिला मोंगल बादशाहा बाबर; पहिला मराठा राजा शिवाजी; आणि पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ; तसा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन् हेस्टिंग्स् होय. प्लासीची लढाई मारून लॉर्ड क्लैव्ह् ह्य़ानें जें रोंप लाविलें, त्यास चांगली मरामत करून वॉरन् हेस्टिंग्स् ह्य़ानें तें चांगलें वाढीस लागेसें केलें, असें ह्मणायास कांहीं चिंता नाहीं. ह्य़ा पुरुषाचे हातून ह्य़ा देशामध्यें पुष्कळ मोठमोठय़ा गोष्टी घडल्या, आणि त्यांच्या योगानें राज्यव्यवस्थेमध्यें अनेक फेरफार होऊन, इंग्लिश सरकाराचें राज्य वृद्धि पावलें.

.. त्याचें अंत:करण पराकाष्ठेचें कठोर होतें. अनाथ स्त्रियांचे हाल पाहून देखील त्यास कधीं वाईट वाटलें नाहीं. द्रव्यलोभ त्याला मनस्वी होता. पैसा मिळविण्याकरितां त्यानें जितकीं विलक्षण कर्मे केलीं तितकीं इतर थोडक्याच पुरुषांचे हातून घडलीं असतील. आणि त्याचे ठायीं सर्वात मोठा दुर्गुण हा होता कीं, नीति, धर्म, परमेश्वर, परलोक इत्यादि गोष्टींचें त्यास कधीं स्मरण सुद्धां होत नसे. हा दुर्गुण इतर दुर्गुणांचा जनिता आहे.

ह्य़ा पुरुषाचे ठायीं जसे वर सांगितलेले फार मोठे दुर्गुण होते, तसे कांहीं मोठे सद्गुणही होते. त्याचे अंगीं धैर्य चांगलें होतें. त्याजमध्यें समयसूचकता फार होती; ती पैसा काढण्याच्या अनेक भानगडींत प्रगट झाली. मनाची शांतता आणि प्राप्त झालेलें संकट काळेंकरून नाहींसे होईल असा भरंवसा हीं त्याचे ठायीं पूर्णपणें वसत होतीं. ह्य़ांशिवाय एक फार उत्तम गुण सांगावयाचा राहिला आहे. तो हा कीं विद्याव्यसन ह्मणजे ज्ञानसंपादनाची इच्छा. ही त्याला लहानपणापासून होती; ती त्याच्या वृद्धापकाळीं देखील तशीच अचल राहिली होती. तो विद्येच्या कामांस फार उत्तेजन देत असे. त्याला फारशी आणि आरबी ह्य़ा भाषा चांगल्या येत होत्या. त्याला संस्कृत मुळींच येत नव्हतें; परंतु ती भाषा फार उत्तम आहे, अशी त्याची खातरी झाली होती. ह्मणून ज्या युरोपियन पंडितांच्या परिश्रमांनीं ती युरोपांत प्रसिद्ध झाली, त्यांस मुख्य आश्रय काय तो ह्य़ाचा होता. ह्य़ाच्या वेळेपर्यंत ब्राह्मणांचीं धर्माचीं आणि शास्त्रांचीं पुस्तकें परकीय लोकांस अगदीं असाध्य होतीं. तीं ह्य़ानें आपल्या वजनानें आणि भिडेभाडेनें त्यांस सहज मिळत अशीं केलीं..

एकंदरीनें पाहिलें असतां वॉरन् हेस्टिंग्स् हा इतर सर्व मनुष्यांप्रमाणें सद्गुण आणि दुर्गुण ह्य़ांनीं भरलेला पुतळा होता. त्यांत सद्गुणांपेक्षां दुर्गुण अधिक होते. ते त्याला स्वत:ला फारसें भोंवले नाहींत; तर त्यांच्या योगानें आमच्या ह्य़ा हिंदुस्थान देशाची मोठी हानि झाली, आणि इंग्लंड देशाचा फार फायदा झाला.’’

‘विविधज्ञानविस्तार’मध्ये ओक यांनी लोकहितवादींवरही एक दीर्घ लेख लिहिला होता. त्यातून त्यांच्या लेखनशैलीचा प्रत्यय येतो. त्यातील हा उतारा पाहा –

‘‘जों जों विचार करावा तों तों प्रसंगीं कामीं पडणारा मनुष्य फार विरळा सांपडावयाचा असें वाटूं लागतें. संकटसमयीं भेदरून जाणारेच पुष्कळ. त्यांची संख्या इतकी मोठी आहें कीं, त्यांत इतरांची संख्या मोजूं गेलें असतां हजारांत एक सुद्धां सांपडण्याची मुष्कील आहे. सरासरी –

उडदांमाजी काळें गोरें।

काय निवडावें निवडणारें।।

हाच न्याय येथें लागू पडतो. जो तो रडगाणें गाणाराच दिसतो. जे कोणी खरे थोर असतात त्यांचा मात्र बोभाटा दैन्य भाकल्याचा ऐकूं येत नाहीं. त्यांस अशा प्रसंगापेक्षां मरण बरें वाटतें. किंवा असें ज्यांस वाटतें तेच थोर होत. भर्तृहरी ह्मणतो –

विपत्तिसमयीं पर प्रकटवीच ना दीनता।

भल्याविण असें असिव्रत करूं शके कोणता।।

असे थोर पुरुष आपल्या देशांत जन्मास येऊन या देशाला केव्हां भूषवितील याचें आज अनुमान करवत नाहीं. परंतु असा लाभ होण्यास पूर्व पुण्याई सबळ असली, तर केव्हांना केव्हां तरी योग येईलच. तिचाच जर अभाव असेल, तर हा देश वैभवशिखरारूढ होऊन त्यास सज्ञान राष्ट्रांत मानमान्यता पावण्याची आशा नको..

आपल्या हातीं अधिकार अथवा हुद्दा असतां कोणीं काहीं आपल्यास न आवडण्यासारखें आपल्याशीं वर्तन केलें, आणि तें योग्य असलें तरी तें कित्येकांस सहन होत नसतें. प्रभुत्वाचा असाच कांहीं विलक्षण धर्म आहे. आपल्यास न रुचणारा असा कोणी एखादा शब्द बोलला, तर तो कितीही योग्य व समर्पक असला तरी त्यावर अधिकाराच्या जोरानें घसरा केल्याशिवाय कधींहीं रहावयाचें नाहीं असें कित्येकांचें आचरण असतें. सरकारी हुद्दय़ाच्या संबंधानें लोकहितवादी यांचे आचरण निर्दोष आणि तारीफ करण्याजोगें आहे, असें आह्मीं वारंवार ऐकिलें आहे. ते आपल्या कामांत हुशार, दक्ष व नि:पक्षपात रीतीनें वागणारे आहेत.’’

‘विविधज्ञानविस्तार’मधील ओक यांचे लॉर्ड बेकन, महाराजा रणजीतसिंग यांच्यावरील लेखनही व्यासंगपूर्ण आणि शैलीदार आहे. पुढे १८८९ साली  ‘बाबा नानक ह्य़ांचें चरित्र’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यातील हा उतारा पाहा-

‘‘आमच्या हिंदुस्थानांत अनेक धर्म, विविध पंथ, आणि असंख्य मतें पसरलीं आहेत. ज्याला त्याला आपला धर्म जीवप्राण वाटतो. कोणताही धर्म पाहिला तरी धर्माचा प्राण म्हटला तर विश्वास आणि ईश्वरास्तित्व होय. धर्माचा हेतु सुख. मग तें पारलौकिक असो अथवा ऐहिक असो. स्वधर्माचरण करून शेवटीं मिळवावयाचें काय? तर सुख. सुखप्राप्ति हा सर्व धर्माचा उद्देश. हिंदुधर्म पहा, मुसलमानधर्म पहा, परधर्मोपहासपटु ईश्वरपुत्रसेवकांचा धर्म पहा, सर्वात सुखप्राप्तीची लालुच आहे. निरपेक्ष, निरिच्छ असें म्हणून कांहीं नाहीं. विश्वासाचें पायावर सर्व धर्माची इमारत उठविली आहे. लोकव्यवहारांत साधारणत: विश्वासाचें जसें प्राधान्य आहे तसेंच धर्मव्यवहारांतही आहे. जेथें विश्वास नाहीं तेथें धर्म नाहीं, अधर्म नाहीं, पाप नाहीं, पुण्य नाहीं आणि कांहीं नाहीं. सर्वच शून्यवत् होय. धर्माचा ओघ पारलौकिक सुखप्राप्तीकडे जसा आहे तसा ऐहिक सुखाकडे आहे. धर्मातराच्या संबंधानें वेळोवेळीं मनुष्याचे सुखांत जितक्या घडामोडी होत असतील तितक्या दुसऱ्या कोणत्याही योगानें नाहींत.’’

ओक यांनी केलेले व्यक्तीचरित्रपर लिखाण महत्त्वाचे आहेच, परंतु त्यांनी काव्यविषयक लेखनही केले आहे. तब्बल १४ काव्यग्रंथांचे त्यांनी संपादन केले. हे संपादन करताना त्यांनी आवश्यक त्या ठिकाणी टिपा, टिपण, संदर्भ अशी अर्थनिर्णायक माहितीही दिली आहे. त्यांनी संपादित केलेल्या ‘वामन पंडितकृत यथार्थदीपिका’ या ग्रंथातील ‘गाती भाट अचाट घोष करिती, थाटीं पुढें चालतीं..’ या श्लोकासाठी लिहिलेले हे टिपण पाहा –

‘‘पूर्वी भाट, चारण यांची प्रतिष्ठा फार असें. ते राजाचें उपाध्ये असत, आणि राजाच्या वंशाचें वर्णन कवितारूपानें करीत, व तें वर्णन वीररस उत्पन्न करण्याकरितां स्वारींत राजापुढें म्हणत. त्यांस ‘वहिवंचे भाट’ म्हणतात. राजांची वंशावळ त्यांजजवळ लिहिलेली असते, व दरएक राजकुळास नेमलेला भाट असतो. तो वर्षांस राजदरबारीं येतो, व त्यास कांहीं द्यावें लागतें. याप्रमाणें भीक मागून ते निर्वाह करतात. जामीन घेणें तरी त्यांस घेत; मुलीबरोबर पाठविणें तरी भाट पाठवित; त्याचेसारखा विश्वासू कोणी नाहीं व तो प्राण दिल्याशिवाय राहावयाचा नाहीं, अशी लोकांची समजूत असे. ते त्रागा करीत म्हणजे त्यांजवर कोणीं जुलूम केला तर ते आपले घरच्या म्हाताऱ्या माणसाचें डोकें मारीत; आणि जो जुलूम करील त्याचे घरीं त्या प्रेतास आणून त्याचें तोरण बांधीत व ‘तुझ्यावर ही हत्या पडली’ असें म्हणत! मरणाची तर त्यांस बिलकूल पर्वा नसे. अहमदाबादेंत एका भाटिणीवर सरकारांत खोटी फिर्याद झाली. सबब ती आपले पोटांत कटार मारून घेऊन मेली! तिचें देऊळ हल्लीं शाहापुरांत आहे. कोणीं त्यांस नेमणूक वगैरे दिली नाहीं तर ते त्याचें चित्र करून, तें एका उंच काठीवर टांगून त्याजबद्दलचें कवन व निंदा सर्व मुलुखभर दाखवीत फिरत. व याजकरितां राजेसुद्धां त्यांस भीत असत, आणि त्यांचा संतोष राखीत! हल्लीं भाटांमध्यें ज्या अनेक जाती आहेत त्या : ब्राह्म भाट, बारवट भाट,वहीवंचे भाट, कंकाली भाट, तुर्की भाट, श्रमण भाट, वगैरे. भाट लोक रजपूत लोकांपासून उपजीवन करितात. त्यांच्या कवितेस कुंडली, सवाई, चौपाई, छप्पा, कबीत, छंद, प्रबंध, दोहा, केहेवत, गीत, असें म्हणतात. असें म्हणतात कीं, कृतयुगांत वेलंग, बळास व भीमसी हे मोठे भाट झाले; त्रेतायुगीं बळीराजाजवळ पिंगळ नामत भाट होता; रामाजवळ रंपाळ होता; द्वापारयुगांत पांडवांजवळ सूत व संजय हे होते; पृथ्वीराजाजवळ चंद भाट म्हणून होता, त्यानें ‘रासा’ म्हणून मोठा भारतासारखा ग्रंथ केला आहे. विक्रमाजवळ वेताळ भाट होता आणि तसाच अकबराजवळ गंग भाट म्हणून होता.’’

निर्णयसागर छापखान्याकडून ‘काव्यमाला’ व ‘काव्यसंग्रह’ ही दोन मासिके प्रसिद्ध केली जात असत. त्यांचे संपादन जनार्दन बाळाजी मोडक करत असत. १८९० साली मोडक यांचे निधन झाले. त्यानंतर या मासिकांच्या संपादनाची जबाबदारी वामन ओक यांनी पार पाडली. शिवाय इतिहासविषयक लेखन-संपादनही त्यांनी केले आहे. ओक यांच्या या विविधांगी लेखनाविषयी ‘बालबोध’कर्ते वि. कों. ओक यांनी लिहिले आहे –

‘वामनरावांपुढें मराठी भाषा अगदीं हात जोडून उभी होती, आणि मनांतला कोणताहि अर्थ अगदीं चित्र बरोबर रीतींने व्यक्त करण्यास – बिनचूक ओळख पटेल असें त्याचें शब्दरूपानें काढण्यास- त्यांस मुळींच प्रयास पडत नसत. असें असून भाषा शुद्ध, सरळ, गोड आणि मोठी भारदस्त अशी असे.’

ओक यांचे लेखन त्यामुळे वाचायलाच हवे.

संकलन प्रसाद हावळे prasad.havale@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2017 1:14 am

Web Title: marathi writing skill of waman daji oak
Next Stories
1 शास्त्रीय वाङ्मयाचे अध्वर्यु
2 काव्य आणि इतिहास
3 सेतू व्हावेत दीन सुमतीचे..
Just Now!
X