मराठीत वाङ्मयाचा इतिहास लिहिण्याची परंपरा एकोणिसाव्या शतकाचे शेवटचे दशक संपता संपता सुरू झाली. वि. ल. भावे, ल. रा. पांगारकर यांनी तशा प्रकारच्या लेखनाला सुरुवात केली होती. मात्र या दोघांचेही लेखन मध्ययुगीन मराठी साहित्याविषयी होते. ते ज्या काळात वाङ्मयाचा इतिहास लिहीत होते, तोपर्यंत खुद्द एकोणिसाव्या शतकातील साहित्य- ज्याला आपण आधुनिक मराठी वाङ्मय संबधतो- आकाराला आले होते. तीन लिहित्या पिढय़ा मराठीने पाहिल्या होत्या. मात्र या वाङ्मयाचा समग्र परामर्श मराठीत तोपर्यंत घेतला गेला नव्हता. इंग्रजीत न्या. रानडेंनी यावर एक निबंध लिहिला होता खरा, परंतु मराठीत ते काम सर्वप्रथम केले ते मोती बुलासा यांनीच. त्यामुळे आज या सदरातील शेवटच्या लेखात मोती बुलासा यांच्या लेखनाविषयी जाणून घेणे योग्य ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलासा हे ‘सुविचारसमागम’ हे मासिक चालवत. त्याचा पहिला अंक मे, १८९८ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यात बुलासा यांचा ‘मराठी भाषेची सद्य:स्थिती’ या शीर्षकाचा आठ पानी लेख प्रसिद्ध झाला. त्यात सुरुवातीलाच बुलासा यांनी लिहिले आहे-

‘‘‘वाङ्मय’ हा शब्द अलीकडेच प्रचारात येऊ लागला आहे. इंग्रजी भाषेतल्या Literature या शब्दाच्या ऐवजी ‘वाङ्मय’ शब्दाचा उपयोग करितात. याचा साधारण सर्वास समजण्याजोगा अर्थ म्हणजे ‘भाषेतील ग्रंथसंपत्ती’ असा होईल. मराठी भाषेच्या ग्रंथसंपत्तीचे आम्ही दोन विभाग करतो. एक इंग्रजी भाषेचा व इंग्रजी वाङ्मयाचा आमच्या भाषेंवर व लोकांवर परिणाम होऊन त्या भाषेच्या अनुकरणाने झालेली ग्रंथसंपत्ती व एक याच्याही पूर्वीची म्हणजे मराठी भाषा प्रचारात आल्यापासून पेशवाई अखेपर्यंत त्या भाषेत जी ग्रंथसंपत्ती झाली ती.’’

याचा अर्थ, बुलासा यांनी मराठी वाङ्मयाची मध्ययुगीन आणि आधुनिक अशी विभागणी केली आहे. लेखाच्या सुरुवातीलाच मध्ययुगीन साहित्याविषयी आपली निरीक्षणे नोंदवून पुढे बुलासा थेट एकोणिसाव्या शतकात काव्य, नाटक, कादंबरी या साहित्यप्रकारांत झालेल्या मराठी लेखनाविषयी विवेचन करतात. या लेखानंतर पुढील दोन वर्षांच्या काळात ‘सुविचारसमागम’मध्ये बुलासा यांचे या विषयावरील आणखी सहा लेख प्रसिद्ध झाले. त्यांत गद्य वाङ्मय, इतिहास ग्रंथ, शास्त्र, तत्त्वज्ञान व संकीर्ण वाङ्मयाचा आढावा त्यांनी घेतला आहे. मात्र ते करताना बुलासा यांनी नेमकी, मार्मिक निरीक्षणेही नोंदवली आहेत. मराठी गद्याविषयी विवेचन करणारा पुढील उतारा वाचल्यास त्याचा प्रत्यय येईल-

‘‘इंग्रजी भाषेचे अध्ययन केल्यावर तिच्या तुलनेने आमच्या भाषेतला ग्रंथसंग्रह अगदी तुटपुंजी आहे असे प्रथमच इंग्रजी शिकलेल्या आमच्या विद्वानांना वाटू लागले व भाषेची उन्नती केल्याशिवाय बहुजनसमाजामध्ये ज्ञानाचा प्रसार होणे नाही असा मनात विचार येऊन अव्वल इंग्रजीतल्या बऱ्याच विद्वानांनी भाषाभांडार वाढविण्याचे काम झपाटय़ाने सुरू केले. त्या वेळच्या इंग्रजीभाषाभिज्ञ एतद्देशीयांमध्ये मराठीत ग्रंथरचना करण्याची जितकी हौस असे तितकी आजच्या विद्वानांमध्ये दिसत नाही, ही गोष्ट खेदकारक पण निर्विवाद आहे. कृष्णशास्त्री चिपळूणकर, गोपाळराव हरी देशमुख, बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर, गोविंद नारायण माडगांवकर इत्यादी विद्वानांचा मराठी लेखनक्रम अव्याहत चालला असे. या गृहस्थांनी स्वतंत्र ग्रंथरूपाने व वर्तमानपत्रे व मासिक पुस्तके यांच्या द्वारे पुष्कळ निबंध प्रसिद्ध करून लोकांच्या ज्ञानात भर घातली आहे. त्रमासिक ज्ञानदर्शन व ज्ञानप्रसारक ही पुस्तके मुख्यत: या व दुसऱ्या अशाच विद्वानांच्या लेखन साहाय्यावर चालली होती. शास्त्रीय, व्यावहारिक वाङ्मय व सामाजिक सुधारणा इत्यादी नाना प्रकारच्या विषयांवर लेख लिहून त्यांनी लोकांमध्ये वाचनाभिरूची व शुद्ध जिज्ञासा उत्पन्न केली व होतकरू ग्रंथकारांना ती तृप्त कशी करावी याचा मार्ग सांगितला. त्याचप्रमाणे रूढ आचारविचारांवर हल्ला करून निद्रिस्त समाजाला जागृत करून विचार करावयाला लाविले. तात्पर्य निबंधरचनेचे अनुकरण करून त्यांनी मराठी समाजात व वाचकवृंदात मोठी चळवळ सुरू केली.. इंग्रजीच्या अव्वल अमदानीतले लेखक ज्याप्रमाणे येथून तेथून आपल्या चालीरीतींची व आचारविचारांची नालस्ती करीत सुटले होते, असे आपल्यांपैकी कित्येक म्हणतात, त्याचप्रमाणे त्यांच्या मागून आलेल्या लोकांनी- ज्यांचे नायक तरूण (विष्णुशास्त्री) चिपळूणकर शास्त्री होत-  देखील पूर्ण विचार न करता आपल्या आधीच्या पिढीच्या मतांवर भडिमार केला आहे. असो. झाला तो प्रकार कदाचित नैसर्गिकपणानेच घडून आला असेल, पण आज तरी आम्ही डोळे उघडून बरे वाईट शुद्धदृष्टीने पाहिलेले बरे..’’

पुढे ते लिहितात-

‘‘गोविंद नारायण (माडगांवकर) यांच्या भाषेचा साधेपणा, लोकहितवादींच्या भाषेत विषयाची मांडणी करण्याचे चातुर्य व आवेश व (कृष्णशास्त्री) चिपळणूकर शास्त्र्यांच्या भाषेमध्ये प्रौढपणा, अलंकार व संस्कृत शब्दांचे मिश्रण ही विशेष दिसून येतात. लोकहितवादी व माडगांवकर यांची भाषा आजला जरा जुनी झाल्यासारखी वाटेल; आजला प्रचारात नसलेले पुष्कळ शब्द व शब्दयोजनेचे प्रकार तिच्यातून दिसून येतील; पण कृष्णशास्त्र्यांच्या भाषेचा प्रकार तसा नाही. शास्त्रीबुवांचे संस्कृतभाषेचे ज्ञान वरच्या दोन्ही गृहस्थांपेक्षा अधिक असल्यामुळे निरनिराळ्या प्रकारचे अर्थव्यंजक शब्द, समास किंवा वाक्ये त्यांनी संस्कृत भाषेच्या साहाय्याने मराठीत नवीन तयार केली. त्यांच्या जाडय़ा संस्कृत अध्ययनाचा त्यांच्या मराठी लेखांवर सुद्धा परिणाम झाल्यामुळे त्या वेळी प्रचारात असलेले केवळ मराठी शब्द त्यांच्या लेखांत फार थोडे आले आहेत. शास्त्रीबुवांनी आणखी एक मोठा उपकार मराठी भाषेवर केला आहे. इंग्रजी पुस्तकांची विशेषत: शास्त्रीय विषयांवरच्या पुस्तकांची मराठीत भाषांतरे त्यांनी संस्कृत भाषेतून नवीन शब्द काढून, समासरचना करून केली आहेत..’’

हे सांगून पुढे बुलासा यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्याही भाषेतील गुण-दोषांचे परखड विवेचन केले आहे. त्यातील हा काही भाग पाहा-

‘‘शास्त्रीबोवांच्या भाषासुंदरीकडे नजर दिल्यास विलक्षण फरक दिसून येतो. नैसर्गिक सौंदर्याची कोणत्याही प्रकारे उणीव नसून कारागिराच्या कुशलतेने ते सौंदर्य द्विगुणीत झाले आहे; नाना प्रकारची वस्त्राभूषणे तिच्या साहजिक सौंदर्याला अधिक खुलवितात; जवळ बाह्य़ साधनांची रेलचेल असूनही ज्या ठिकाणी जे पाहिजेत तेच वस्त्रालंकार घालण्याचे चातुर्य ठाकठिकीने व योग्य प्रमाणाने विशेष दिसून येते; लोकांचे मन आपल्याकडे ओढून घेण्यास सौंदर्य, अलंकार, हावभाव इत्यादी ज्या गुणांची आवश्यकता असते तितके सगळे भरपूर तिच्याजवळ आहेत..

तिचे कर्णमधूर प्रौढ शब्द, नाना प्रकारचे रस उत्पन्न करण्याची क्षमता, प्रत्येक विचार व मनोवृत्ती व्यक्त करण्याची हजारो साधने, इकडे नुसती कोणाची थट्टा करून त्याला लाजीव, दुसरीकडे रागाने डोळे वटारून कोणाला गप बसव, कोणाला एक शब्द बोलून चीत कर, तर कोणाला आपल्या अत्यंत मनोहर व जवळ बसलेल्या जनांच्या आत्म्यास गार करून टाकणाऱ्या वाक्प्रवाहात बुडवून मार, अशा प्रकारच्या प्रतिपक्षाची दुर्दशा उडवून देणाऱ्या तिच्या नाना प्रकारच्या क्रिया पाहून सर्व रसिक भक्तवृंद तल्लीन होऊन जातो व त्यास विचार करण्याची फुरसत किंवा अक्कल किंवा दोन्हीही राहत नाहीत, यात नवल ते काय? .. तिचे अंत:स्वरूप चांगल्या तऱ्हेने दिसेल अशा प्रकारचा हल्लीच्या एक्स् किरणांचा चष्मा जर डोळ्यास लावावयास मिळाला, तर असे दिसून येईल की या सुंदरीच्या मनोवृत्ती व विचार इतर जनांपेक्षा अधिक उदात्त नाहीत, या अभिमानीनीची महत्त्वाकांक्षा आपल्या भक्तांवर आपली छाप बसावी याच्या पलीकडे गेलेली नाही. त्यांच्या भक्तवृंदास आपल्या सेवेत आणण्याकरिता ही नाना प्रकारच्या भुलथापा देते व खोटय़ानाटय़ा बाता सांगते, प्रतिपक्षाचा नाना प्रकारे अयोग्य उपहास करिते, त्याला वेडावून दाखविते,भलभलत्या गोष्टींचा आरोप करिते व या प्रकाराने बाहेरच्या सौंदर्यादी गोष्टींस नेहमी भुलणाऱ्या बहुजनसमाजास आपल्या भजनी लावते..’’

शास्त्रीय व तत्त्वज्ञानपर विषयांतील मराठी लेखनाविषयी बुलासा यांनी लिहिले आहे-

‘‘इंग्रजलोक हिंदुस्थानात यायच्या आधी मराठी, गुजराथी, बंगाली वगैरे एतद्देशीय भाषांची फारशी उन्नती झालेली दिसत नाही. यापूर्वीचे या भाषांतले ग्रंथ म्हणजे काव्येच. मराठी बखरींमध्ये इतिहास व गद्य या दोहोंचाही समावेश झालेला दिसतो. पण या दोन्ही शाखांमधल्या वाङ्मयाची त्या काळी चांगली उन्नती झालेली दिसत नाही. जुन्या बखरींमध्ये इतिहासासंबंधी शोधकबुद्धीचा व स्थलकालनिर्णयाचा अभाव दृष्टीस पडतो व भाषेसंबंधाने पाहिले असताही मराठी गद्याची त्या वेळी मुळीच उन्नती झालेली दिसत नाही. नाटके, कादंबऱ्या किंवा शास्त्रीय विषयांवर त्यावेळी मुळीच ग्रंथ झाले नाहीत. याचे कारण त्यावेळी प्रत्येक विद्वान होऊ इच्छिणाऱ्या महाराष्ट्रीयाला संस्कृत भाषेचे अध्ययन करावे लागत असल्यामुळे व राजदरबारी सुद्धा मराठी जाणणाऱ्या कवी किंवा हरिदास यांपेक्षा संस्कृत जाणणाऱ्या पंडिताला अधिक मान असल्यामुळे भाषेची अधिक उन्नती करण्याकडे त्या वेळच्या सुशिक्षितांचे लक्ष लागले नसावे हेच असावे असे वाटते. संस्कृतज्ञ पंडितास मराठी भाषेचे अध्ययन करणे किंवा मराठी भाषेत ग्रंथरचना करणे, या गोष्टी फार अपमानाच्या वाटत असत.. मराठेशाहीचा लय होऊन जिकडे तिकडे इंग्रजी अंमल झाल्यावर, बुद्धिवान ब्राह्मण तरूण संस्कृत भाषेला झुगारून, द्रव्योपार्जनाला साहाय्यक अशा इंग्रजी भाषेचे अध्ययन करू लागले. त्यावेळी इंग्रजी भाषेतला अमूल्य व अश्रुतपूर्व ग्रंथभांडार पाहून त्यांचे डोळे अर्थातच दिपून गेले व नुसत्या मराठी जाणणाऱ्या आपल्या देशबांधवाला यांतली कोणती रत्ने आवडतील यांचा विशेषसा विचार न करता इतर ग्रंथांबरोबर शास्त्रीय ग्रंथांचीही काही मंडळी भाषांतरे करू लागली..’’

पुढे तत्कालीन मराठी नियतकालिकांविषयी बुलासा यांनी लिहिले आहे-

‘‘मराठी वाङ्मयाचा विचार करताना, कै. चिपळूणकर, आगरकर, हरी माधव पंडित प्रभृति महात्म्यांनी मासिकपुस्तके व वर्तमानपत्रे यामध्ये लेख लिहून महाराष्ट्रभाषेची यथामूल जी सेवा केली, तिच्याकडे दुर्लक्ष करिता येत नाही. आमच्या भाषेत आजपावेतो किती तरी मासिकपुस्तके जन्मास येऊन लय पावली! ज्ञानप्रसारक, दंभहारक, निबंधमाला, निबंधचंद्रिका, नाटय़कथार्णव, मनोरंजन, शिल्पकलाविज्ञान, भाषांतर इत्यादी प्रख्यात लेखकांनी चालविलेली मासिकपुस्तके सुद्धा, कधी कधी प्रकाशकांच्या अव्यवस्थेमुळे व नेहमी द्रव्याश्रयाच्या अभावी, वर्गणीदारांकडून वेळचेवेळी वर्गणी न मिळाल्यामुळे लयास गेली!!! दु:खात सुखाची गोष्ट इतकीच, की विविधज्ञानविस्तार, ग्रंथमाला, बालबोध, केरलकोकिल, विद्याविनोद इत्यादी मासिकपुस्तके अजूनही स्वभाषेची सेवा करण्याकरिता जिवंत आहेत. पूर्वी स्त्रियांच्या उपयोगाकरिता, गृहिणी नावाचे मासिकपुस्तक काही दिवस चालले होते. हल्ली वेंगुल्र्यास काही विद्वान मंडळी मिळून स्त्रीशिक्षणचंद्रिका काढितात. जुन्या बखरींच्या व काव्यांच्या प्रकाशनाला काव्येतिहाससंग्रहाने व सर्वसंग्रहाने बरीच मदत केली. हल्ली ही कामे काव्यसंग्रह, ग्रंथमाला, ऐतिहासिक लेखसंग्रह व भारतवर्ष यांनी आपापसात वाटून घेऊन चांगल्या तऱ्हेने चालविली आहेत. भाषांतराचेही काम ग्रंथमाला अधिक चांगल्या प्रकारे, उत्साहाने व नियमितपणे बजावीत आहे. शिल्पकलाविज्ञानासारखे आणि नाटय़कथार्णव व मनोरंजनासारखी शास्त्रीय लेख व नाटके, कादंबऱ्या प्रसिद्ध करणारी स्वतंत्र मासिकपुस्तके आज नाहीत.. कुटुंबातल्या स्त्रीपुरुष, मुलामुलींना वाचावयाला योग्य व समजण्यासारखी, मासिक मनोरंजन व करमणूक ही दोनच पत्रे आहेत.’’

बुलासा यांचे हे सारे लेख डॉ. द. दि. पुंडे आणि डॉ. विद्यागौरी टिळक यांनी ‘मराठी वाङ्मयाची सद्य:स्थिती’ (प्रकाशक- स्नेहवर्धन प्रकाशन) या पुस्तकात संपादित केले आहेत. एका दृष्टिवान वाङ्मयचिंतकाचे शतकभर दुर्लक्षित राहिलेले हे लेखन त्यामुळे वाचकांना उपलब्ध झाले. १९ व्या शतकातील मराठी वाङ्मयाविषयी सर्वागाने जाणून घेण्यासाठी हे पुस्तक आपण आवर्जून वाचावे.

prasad.havale@expressindia.com

(समाप्त)

मराठीतील सर्व मराठी वळण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Moti bulasa marathi literature history marathi literature
First published on: 31-12-2017 at 00:35 IST