या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे मराठी वळणकसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- श्रीपाद कृष्ण कोल्हटकर!

मागील लेखात आपण वासुदेव वामनशास्त्री खरे यांच्या लेखनाविषयी जाणून घेतले. त्यांच्या लेखनाचा प्रारंभ खऱ्या अर्थाने एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात झाला. याच काळात लिहू लागलेल्यांपैकी आणखी एक महत्त्वाचे नाव म्हणजे- श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. त्यांनी तब्बल बारा नाटके लिहिली. त्यातील ‘वीरतनय’ (१८९६), ‘मूकनायक’ (१९०१), ‘गुप्तमंजूष’ (१८९८-९९), ‘मतिविकार’ (१९०८), ‘प्रेमशोधन’ (१९०८) ही नाटके त्या काळात लोकप्रिय ठरली. या नाटकांतून त्यांनी सामाजिक विषयांना हात घातला असला तरी नाटय़संवादांत विनोदालाही स्थान दिले होते.

अशाप्रकारे प्रभावी नाटय़लेखन करणाऱ्या कोल्हटकरांच्या लेखनाची सुरुवात झाली ती नाटय़समीक्षक या नात्याने! १८९१ साली पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांचा पहिला समीक्षा लेख ‘विविधज्ञानविस्तार’मध्ये प्रसिद्ध झाला. त्यात कोल्हटकरांनी ‘विक्रम-शशिकला’ (लेखक- माधवराव पाटणकर) या नाटकाची समीक्षा केली होती. कोल्हटकरांच्या त्या पहिल्या लेखाच्या सुरुवातीचा हा काही भाग पाहा –

‘‘आजपर्यंत जे महावीर म्हणून नांवाजलेले पुरुष होऊन गेले, त्यांच्या चरित्रांचे अवलोकन केलें असतां आपणांस असें आढळून येईल कीं, त्यांना क्षुद्र मनुष्यावर तरवार उपसण्याचा मनापासून कंटाळा. क्षुद्र प्रतिस्पध्र्यानें कितीही वल्गना केल्या, तरी त्यापासून खऱ्या उदार वीरांच्या ह्रदयांत त्वेष उत्पन्न न होतां, उलट तिरस्कारच उत्पन्न होतो. समरांगणांत शिखंडी आला असतां ज्या बहाद्दरानें हातांतलें शस्त्र फेंकून दिलें, त्यानें तें केवळ पराजय झाला असतां कीर्तीस कलंक लागेल म्हणून फेंकून दिलें असे नव्हे; तर जय मिळाला असतां यश दूषित होईल म्हणूनच.

हाच नियम पंडितांसही लागू आहे. क्षुद्र मनुष्याविरुद्ध लेख लिहिण्यास टांक दौतींत बुडविला असतां त्या टाकांस जो काळिमा लागतो, त्याच्या शतपट आपल्या मुखास लागतो, असें ते समजतात. अनेक प्राकृत लोकांनीं स्वत:ची निंदा केली असतांही डॉक्टर जॉन्सन् यानें त्याविरुद्ध लेख लिहिण्याचा प्रयत्नही केला नाहीं; तो स्वत:चें खंडन होईल या भीतीनें नव्हे, तर आपल्या लेखांनीं आपल्या प्रतिस्पध्र्याचें मंडन होईल; व ज्या ग्रंथकर्त्यांच्या कीर्तीचें जीवित फार झालें, तर त्यांच्या स्वत:च्या जीविताबरोबरच लयास जाणार, त्यांचें नांव स्वत:च्या कीर्तिरूप ओघाबरोबर पुढील कोटय़ावधि पिढय़ांपर्यंत जाऊन पोहोंचणार, या भीतीनें.

ह्य़ा नियमास एक अपवादही आहे. वीर व पंडित यांना स्वत:चें यश जरी इतकें प्रिय असतें, तरी त्यांपैकीं बहुतेकांना त्या यशापेक्षां स्वबांधवांचें हित अधिक श्रेयस्कर वाटतें; व यास्तवच जनहिताच्या आड येणारे जन कितीही क्षुद्र असले, तरी त्यांबरोबर झुंजण्याच्या कामीं मानहानीही सोसण्यास ते एका पायावर तयार असतात. सूर्य आकाशाच्या मध्यभागीं येऊन देदीप्यमान असतांही जनहितास्तव पुन: क्षितिजावर उतरून नीचत्व पत्करितो. हें त्याच्या थोरपणास योग्यच आहे.’’

१८९२ ते १९०२ या काळात कोल्हटकरांनी असे ११ समीक्षात्मक लेख लिहिले. दरम्यानच्या काळात वकिलीची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते १८९८ साली वऱ्हाडमध्ये वकिलीसाठी दाखल झाले. याच ठिकाणी कोल्हटकरांच्या स्वतंत्र विनोदी लेखनाला बहर आला. त्याची सुरुवात झाली ती ‘साक्षीदार’ या लेखाने. १९०२ सालच्या ऑगस्ट-सप्टेंबरच्या ‘विविधज्ञानविस्तार’च्या अंकात हा लेख प्रसिद्ध झाला. त्या लेखातील पुढील उतारा पाहा –

‘‘साक्षीदार सत्यप्रियतेबद्दल फार ख्याती आहे. ते ज्यांच्या वतीने बोलवयास येतात, ते जरी नेहमी त्यांचे नातेवाईक किंवा सावकार असतात तरी ते खरे असेल तेच सांगतात; व त्यांना कितीही प्रश्न विचारले तरी ‘माहीत नाही’ हे शब्द त्यांच्या तोंडावाटे कधी बाहेर पडावयाचे नाहीत. एवढेच की, कधी कधी प्रसंगानुसार त्यांच्या उत्तराचा नमुना बदलतो. उदाहरणार्थ, उलट तपासणीच्या वेळी त्यांचे उत्तर प्रश्नरूप किंवा सामान्य सिद्धांताच्या स्वरूपाचे असते. समजा, आपण एखाद्या साक्षीदाराला विचारले, की ‘अमुक अमुक करार चावडीवर झाला की काय?’ तर या प्रश्नाला उत्तर खालील दोहोंपैकी एका स्वरूपाचे आहे असे तुम्हाला आढळेल : ‘असे करार चावडीशिवाय दुसरीकडे कशाला होतील?’ किंवा ‘असे करार चावडीवरच व्हावयाचे.’ या उत्तर देण्याच्या पद्धतीत वैचित्र्य असून शिवाय तीपासून लौकिक ज्ञानही प्राप्त होते. ही उत्तरसरणी साक्षीदारांच्या इतकी अंगवळणी पडून गेलेली असते की, कधी कधी तिच्यामुळे खालच्याप्रमाणे मासलेवाईक प्रकार घडून येतात.

प्रश्न- तुम्हाला चार बायका होत्या की काय?

उत्तर- सगळ्यांनाच चार चार बायका असतात.

प्रश्न- पहिली बायको मेली वाटते?

उत्तर- मरू नये तर तिने काय करावे?

प्रश्न- तिच्यापासून तुम्हाला एक मुलगा होता ना?

उत्तर- माझ्यापासून होऊ नये तर काय..?

साक्षीदारांना घातलेले प्रश्न त्यांना सहसा कळत नाहीत; त्यामुळे कधी कधी ते त्यांना विसंगत उत्तरे देतात, व कधी कधी कोणी, केव्हा, कोठे, इत्यादी प्रतिप्रश्न विचारून व प्रश्नातील काही शब्दांचा पुनरुच्चार करून पृच्छा करणारास पुरेपुरेसे करतात.’’

सुदामा, बंडुनाना आणि पांडुतात्या अशा तीन पात्रांचा समावेश असणाऱ्या कोल्हटकरांच्या अशा विनोदी लेखनातून धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनातील विसंगतींवर त्यांनी बोट ठेवले. त्यांच्या अशा १८ लेखांचा ‘सुदाम्याचे पोहे अर्थात अठरा धान्यांचे कडबोळे’ हा संग्रह १९१० साली प्रसिद्ध झाला. त्यात पुढे आणखी १४ लेखांची भर घालून १९२३ साली ‘सुदाम्याचे पोहे अर्थात साहित्यबत्तिशी’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकाला कोल्हटकरांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील पुढील उतारा पाहा –

‘‘आपला समाज व्यक्तींचा बनलेला नसून जातींचा व पोटजातींचा बनलेला आहे. या जातींपैकीं काहीं सुशिक्षित व सुसंस्कृत आणि कांहीं पूर्णपणें अशिक्षित व संस्कारहीन आहेत. पूवरेक्त वर्गाच्या जाती आपापल्या हितास दक्षतेनें जपूं शकतात. पण उत्तरोक्त वर्गातील जातींस ते शक्य नसतें. व्यक्तीस सज्ञान व आत्मसंयमी करणें सर्वस्वी नसलें तरी बरेंच साध्य असतें; पण सबंध समाजांत ज्ञानाचा किंवा संयमनाचा प्रसार करणें अशक्य नसलें तरी अत्यंत दुर्घट असतें. यामुळें नीच जातींत विशेष चेतना उत्पन्न होत नाहीं व उच्च जातींत नीच जातीकरितां स्वार्थत्याग करण्याची बुद्धि उत्पन्न करण्याचे प्रयत्न थोर महात्म्यांकडून होत असतांहि त्यांस यावें तसें यश येत नाहीं. व्यक्तीप्रमाणें जातीचा स्वभाव उतावळा नसतो हें खरें आहे. त्याचप्रमाणें प्रत्येक जातीमागें कांहीं ना कांहीं तरी नियतकर्म लावून दिलेले असल्यामुळें, त्या जातीस इतर जातींशीं विरोध करण्यास फावत नाहीं हेंहि खरें आहे. पण जातींच्या या स्थितिस्थापत्वामुळें व आत्मसंतुष्टतेमुळें समाजांत क्रांति होण्याचें भय नसलें तरी त्यांनीं त्यांच्या प्रगतीस साहाय्य न होतां विघ्नच होतें; व त्यावर बाहेरून आघात होऊं लागल्यास त्याच्या अवयवांतील वैषम्यामुळें त्याचा नाश होण्यास विलंब लागत नाहीं. सर्व जीवात्मे परमात्म्याचींच स्वरूपें आहेत या अभेदप्रतिपादक सिद्धांतास हिंदु धर्माच्या तात्त्विक अंगांत जरी महत्त्वाचें स्थान आहे तरी त्याच्या वर्णव्यवस्थारूप आचारात्मक अंगावर त्याचा थोडासुद्धां परिणाम झालेला दिसत नाहीं. वर्णव्यवस्थेंत भिन्नभिन्न वर्णात भिन्नभिन्न कर्तव्यें आंखून दिलेलीं असल्यामुळें सर्व वर्णास समान असे जिव्हाळ्याचे धार्मिक व सामाजिक हितसंबंध मुळींच नाहींत असें म्हटल्यास चालेल. सर्व जातींची नियामक राजसत्ता एक असल्यामुळें त्यांचे राजकीय हितसंबंध एक आहेत ही गोष्ट खरी आहे. पण जातीजातींमध्यें शिक्षण, संपत्ति, अधिकार इत्यादि बाबतींत वैषम्य असल्यामुळें व ते वैषम्य शतकानुशतकें चालत आलेलें असल्यामुळें हल्लीं जागृत होऊं लागलेल्या मागासलेल्या जातींना पुढारलेल्या जातींबद्दल अविश्वास वाटत आहे. आणि यामुळें त्यांजमध्यें राजकीय हितसंबंधाच्या ऐक्याच्या भावनेपेक्षां भिन्नतेची भावनाच प्रबल आहे; व ती बदलणें जातींच्या स्वाभाविक स्थितिस्थापकतेमुळें अत्यंत दुर्घट होऊन बसलें आहे. मागासलेल्या जातींकडून जातवार प्रतिनिधींची जी जोराची मागणी करण्यांत येत असते ती या अविश्वासाची व भेदभावाची उत्तम निदर्शक होय. हा अविश्वास व भेदभाव घालविण्याकरितां पुढारलेल्या जातींनी प्रचंड स्वार्थत्याग केला पाहिजे. पण जेथें हरएक प्रकारच्या भेदांमुळें कनिष्ठ जातींशीं तादात्म्य होण्याचीच भ्रांती, तेथें तशा स्वार्थत्यागाची अपेक्षा तरी कशी करावयाची?’’

दरम्यान १९१३ मध्ये ‘ज्योतिर्गणित’ हा ज्योतिषशास्त्रावरील विवेचक ग्रंथ कोल्हटकरांनी लिहिलाच, शिवाय पुढील काळात कादंबरी आणि कथालेखनही केले. १९२५ साली त्यांच्या ‘दुटप्पी की दुहेरी’ आणि ‘शामसुंदर’ या दोन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. तसेच त्यांनी आत्मवृत्तही लिहून ठेवले आहे. ‘कोल्हटकरांचे आत्मवृत्त’ या शीर्षकाने हे आत्मचरित्र आज उपलब्ध आहे. ते आपण आवर्जून वाचावे. त्यातील हा काही भाग पाहा –

‘‘वयाच्या सुमारें ९ व्या वर्षी कांहीं महत्त्वाच्या गोष्टी घडून आल्या. तोपर्यंत माझी प्रकृति चांगली सुदृढ होती; परंतु त्या सुमारास माझ्या तोंडास अर्धागवायूचा विकार झाला.. मला औषधोपचारांकरितां माझे चुलते वामनराव कोल्हटकर यांचपाशीं ठेविलें होतें. या आजारामुळें माझें एक वर्ष बुडालें. त्याचें मला फार वाईट वाटलें. या आजारांत ‘कादंबरी’चें एक मराठी भाषांतर वाचल्याचें आठवतें. याच्यापूर्वी नुकताच मला वाचनाचा नाद लागला होता. माझ्या वर्गात त्रिंबक शिवराम नावाचा एक बहुश्रुत मुलगा असे, तो रोज पुराणास जात असे. त्याची कल्पनाशक्ति चांगली असल्यामुळें तो स्वत: नवीन गोष्टीहि रचून सांगत असे. त्यास वाचनाचा बराच नाद होता. त्याच्याशी स्पर्धा करण्याच्या इच्छेनें मी वाचनाचा व्यासंग जडवून घेतला. हा व्यासंग वाढण्यास एक क्षुल्लक बाब कारण झालीं. मला झालेला अर्धागवायूचा विकार तोंडापुरता नसून त्याची हातांस व पायांसहि बाधा झाली होती. किंवा माझें सर्वाग मूळचेंच वांकडें होतें, हें मला सांगतां येत नाहीं. पण एवढी गोष्ट मात्र खरी आहे कीं, या सुमारास माझ्या बेडौल शरीराबद्दल व बेढब चालण्याबद्दल माझा इतरांकडून बराच उपहास होऊं लागला. अर्थातच् इतरांशीं मिळून मिसळून वागण्याची माझी प्रवृत्ति कमी होऊं लागली; व एकांतांत पुस्तकें वाचून वेळ काढावासा वाटूं लागला. आपलें शरीर जरी बेढब असलें, तरी मन संपन्न करून त्याची उणीव आपणांस भरून काढितां येईल, व आपली गति जरी बेडौल असली तरी लेखनांत प्रावीण्य मिळवून तें व्यंग झांकून टाकितां येईल असें वाटूं लागलें; व मी वाचनाकडे अधिकाधिक लक्ष्य पुरवूं लागलों. या सुमारास मी मोरोपंतांच्या आर्याच्या धर्तीवर सयमक आर्या करण्यास सुरुवात केली.. मराठी पांचव्या इयत्तेंत असतां माझ्या कानीं किलरेस्करांच्या ‘शाकुंतला’ची कीर्ति आली. तेव्हां आपणहि एक संगीत नाटक लिहावें असें वाटून मी एका संगीत नाटकाचे बरेच प्रवेश लिहिले. फारशा चाली माहीत नसल्यामुळें दिंडय़ा, साक्या व कटाव यांचीच त्यांत विशेष भरती होती. साऱ्या ॠतूंतील एकूणएक फुलझाडांचा व फळझाडांचा नामनिर्देश केलेला असा एका बागेच्या वर्णनाचा कटाव त्यांत घातला होता. मराठी सहाव्या इयत्तेंत, लक्ष्मण कृष्ण चिपळूणकर- विष्णुशास्त्र्यांचे बंधु- आमचे शिक्षक होते. त्यांची मजवर फार मेहरबानी होती व ती अखेपर्यंत कायम राहिली. त्यांनीं आपल्या वडिलांच्या ‘अरबी भाषेंतील सुरस व चमत्कारिक गोष्टीं’बद्दल माझ्या मनांत प्रेम उत्पन्न केलें. ‘निबंधमाले’विषयी आदरयुक्त प्रेम उत्पन्न होण्यालाहि तेच कारणीभूत झाले.’’

मराठी साहित्यातील आद्य विनोदकार असलेल्या कोल्हटकरांविषयी आणि त्यांच्या साहित्याविषयी आणखी जाणून घ्यायचे असल्यास वा. ल. कुळकर्णी लिखित ‘श्रीपाद कृष्ण कोल्हटकर- वाङ्मयदर्शन’ हे पुस्तक आणि गं. दे. खानोलकर यांनी लिहिलेले ‘साहित्यसिंह श्रीपाद कृष्ण कोल्हटकर’ हे चरित्र अवश्य वाचावे.

prasad.havale@expressindia.com

मराठीतील सर्व मराठी वळण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Write shripad krushna kolhatkar comedian
First published on: 24-12-2017 at 02:36 IST