टाळेबंदीच्या कडक अंमलबजावणीचा प्रयत्न

बीड : करोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली. मात्र लोक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याने प्रशासनाने सोमवारपासून त्यांच्या प्रतिजन चाचण्या सुरू  केल्या. पहिल्याच दिवशी पोलीस अधीक्षकांसह इतरही अधिकारी रस्त्यावर उतरून कारवाईत सहभागी झाले होते.

बीड  जिल्ह्यत सोमवारी प्रशासनाच्या वतीने विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या. शहरात पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी स्वत: तीन तास रस्त्यावर उभे राहून कारवाईत सहभागी झाले होते. प्रत्येक वाहनाची आणि व्यक्तीची कसून चौकशी करण्यात आली.

अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त रस्त्यावरून फिरणाऱ्या नागरिकांची जागेवरच प्रतिजन चाचणी करण्यात आली. दुपापर्यंत २५० चाचण्यांमध्ये वीस रुग्ण करोना बाधित आढळले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, माळीवेस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बार्शी नाका, नगर नाका आदी ठिकाणी आरोग्य विभागामार्फत दहा पथके नियुक्त करण्यात आली होती.

प्रत्येक पथकात चार कर्मचारी असून त्यांच्यामार्फत रस्त्यावर फिरणाऱ्यांची प्रतिजन चाचणी करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. नागरिकांनी टाळेबंदीच्या कालावधीत विनाकारण रस्त्यावर फिरून संसर्ग वाढवू नये. पोलिसांकडून यापेक्षाही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी सांगितले.

अंबाजोगाईत तरुणाची शिवीगाळ

बीड जिल्ह्यतील अंबाजोगाईत सोमवारी मुखपट्टी  न लावता फिरणाऱ्या दुचाकीस्वाराला पथकाने अडविले आणि प्रतिजन चाचणी व दंडाची सूचना केली. यामुळे संतापलेल्या तरुणाने चाचणीला विरोध करत पथकातील तहसीलदार विपीन पाटील, मुख्याधिकारी अशोक साबळे व अन्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. या प्रकरणी प्रवीण राजाभाऊ शेप (रा.शेपवाडी, ता. अंबाजोगाई) याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला.

बीड  जिल्ह्यत नवीन साडेबाराशे रुग्ण

बीड जिल्ह्यत दीड  हजारावर गेलेली रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. सोमवारी दिवसभरात १ हजार २५६ नवीन रुग्णांची नोंद झाली. बीडसह परळी, अंबाजोगाई, केज, आष्टी या तालुक्यामध्ये रुग्णवाढीचे प्रमाण अधिक आहे.

टाळेबंदीत रस्त्यावर  विनाकारण फिरणाऱ्यांच्या प्रतिजन चाचण्या प्रशासनाने सोमवारपासून सुरू  केल्या.