जालना : उद्योजकांच्या सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून जालना येथे करोना उपचारासाठी एक हजार खाटांचे आणखी एक रुग्णालय उभे करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारी इमारत तसेच वीज व पाण्याची व्यवस्था राज्य शासन करणार आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भात सांगितले की, भारतीय तंत्रज्ञान संस्था (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी) वेगवेगळ्या उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधीतून या रुग्णालयाची उभारणी करणार आहे. या व्यतिरिक्त अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारांच्या सुविधांसाठी मदत करण्याचा निर्णय टाटा ट्रस्टने घेतला आहे. जालना जिल्ह्य़ातील पाच विधानसभा मतदार संघात प्रत्येकी एक नवीन प्राणवायूचा पीएसए प्रकल्प उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पांसाठी प्रत्येकी ८० लाख रुपये लागणार आहेत. राजूर, मंठा, अंबड, घनसावंगी आणि जालना येथे हे प्राणवायू प्रकल्प उभे केले जाणार आहेत. जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथे प्राणवायूची व्यवस्था असणारे ५० खाटांचे करोना उपचार केंद्र तातडीने सुरू केले जाणार आहे. याशिवाय घनसावंगी आणि अंबड येथील रुग्णालयांत प्राणवायूची व्यवस्था असणाऱ्या आणखी ५० खाटांची व्यवस्था करण्याची सूचना संबंधित शासकीय यंत्रणेला देण्यात आली आहे.   येत्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात करोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून त्यासाठी जिल्ह्य़ातील आरोग्य यंत्रणा उभी करण्याची काळजी घेण्यात येत आहे. खासगी रुग्णालयांनी अवाच्या-सवा बिले रुग्णांकडून घेऊ नये. यासाठी शासकीय यंत्रणा लक्ष ठेवून आहे. एखाद्या रुग्णालयाने नियमबाह्य़ रीत्या अधिक बिल आकारले तर कारवाई करावी आणि अतिरिक्त घेतलेले पैसे रुग्णास परत करावेत, अशी सूचना संबंधित प्रशासकीय यंत्रणेस केल्याचे टोपे यांनी सांगितले.

खासगी रुग्णालयांना नोटिस

२७ करोना रुग्णांकडून प्राणवायूसाठी नियमापेक्षा अधिक बिल आकारल्याच्या आरोपावरून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे अध्यक्ष रवींद्र बिनवडे यांनी जालना शहरातील एका खासगी रुग्णालयास नोटिस बजावली आहे. या रुग्णांकडून प्राणवायू पुरवठय़ासाठी एकूण एक लाख १८ हजार रुपये अतिरिक्त बिल आकारल्याचे नोटिशीत म्हटले आहे. रुग्णालयातील वास्तव्य आणि शुश्रूषा यासाठी १३ रुग्णांना एकूण ३८ हजार ५०० रुपयांचे अधिक बिल आकारल्याच्या कारणावरून आणखी एका खासगी रुग्णालयास नोटिस बजावण्यात आली आहे. आणखी एका खासगी रुग्णालयास दोन रुग्णांच्या वास्तव्यासाठी ३१ हजार ५९६ रुपये अतिरिक्त बिल आकारल्याच्या कारणावरून जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिस बजावली आहे.