प्रदीप नणंदकर

डॉक्टर, लेखक, पत्रकार, छायाचित्रकारांचा समूह कार्यरत

लातूर : करोनाच्या रुग्णासोबत उपचारासाठी त्याच्या नातेवाइकांचीही सत्त्वपरीक्षाच सुरू होते. खाटा कुठे उपलब्ध होतील, औषधे आहे त्या किमतीत मिळतील की नाही, प्राणवायूची चिंता, रुग्ण करोनामुक्त होईल की नाही, राहायचे-जेवायचे कोठे, अशी प्रश्नावली त्याच्या समोर उभी राहते आणि त्याची अवस्था सैरभैर होते. अशावेळी दिशा नेमकी मिळत नाही. याचा अभ्यास करून रुग्ण व नातेवाइकासाठी निस्पृहपणे मदत करण्यासाठी एक हात पुढे येतो. ‘माझं लातूर’ गट समूहाचा. आजवर ‘माझं लातूर’ने अनेकांना ऐन अडचणीच्या काळात सर्व प्रकारे मदत केली आहेच, पण पुणे, औरंगाबाद येथेही काही गरज पडली तर रुग्ण, नातेवाइकांची व्यवस्था करण्याचेही अवकाश शोधले आहे.

लातुरातील पत्रकार, छायाचित्रकार, लेखक, प्राध्यापक, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, संवेदनशील अधिकारी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांचा विचारांची देवाणघेवाण करणारा ‘माझं लातूर’ हा समाजमाध्यमाचा समूह आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध विषयांवर चर्चा या समूहावर चालतात. करोनाच्या दुसऱ्या लाटेने वेग घेतल्यानंतर यातील काही सदस्यांनी आपण केवळ चर्चा करायची का, प्रत्यक्ष काही कृती केली पाहिजे, गरजूंना मदत केली पाहिजे, अशी भूमिका मांडली. त्याला अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

अनेकांनी दररोज काही तास या कामासाठी आम्ही देऊ व पडेल ते काम करू, अशी तयारी दाखवली. दुसऱ्या लाटेत मुख्य अडचण होती ती कोविड रुग्णांच्या नातेवाइकांना योग्य मार्गदर्शन करायची. जिल्ह्य़ातील विविध रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांची प्रकृती ढासळल्यानंतर जेव्हा व्हेंटिलेटरची गरज भासेल, अशी स्थिती निर्माण झाली की नातेवाइकांची धावाधाव सुरू होई. मर्यादित व्हेंटिलेटरची संख्या असल्याने रुग्णवाहिकेत घेऊन नातेवाइकांना विविध रुग्णालयांत शोधत फिरण्याची वेळ येई. ‘माझं लातूर’ने या कामात रुग्णांच्या नातेवाइकांना मदत करायची भूमिका घेतली. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख, महापौर, उपमहापौर यांच्याशी चर्चा केली. जिल्हा शल्यचिकित्सक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व विविध कोविड रुग्णालय संचालकांशीही चर्चा केली व त्यातून हे मदत केंद्र सुरू झाले.

सकाळी ७ पासून रात्री १० वाजेपर्यंत शिवछत्रपती ग्रंथालयातील इमारतीत हे मदत केंद्र चालते. त्यानंतर रात्री १० ते सकाळी ७ भ्रमणध्वनीवर सर्व जण उपलब्ध असतात. २६ एप्रिलपासून हा उपक्रम सुरू आहे. चार पाळ्यांमध्ये किमान २५ कार्यकर्ते वेळ देतात. यामध्ये पत्रकार, वकील, छायाचित्रकार, सामाजिक कार्यकर्ते आदींचा सहभाग आहे. गेल्या तीन आठवडय़ांत काही हजारात रुग्णांना खाट उपलब्ध करून देणे, औषधे, भोजन व जी काही मदत लागेल ती उपलब्ध करून देण्यात माझं लातूरने मोठे योगदान दिले आहे. माझं लातूरच्या मदतीतून अनेकांना वेळीच उपचार, खाटा मिळाल्यामुळे एकप्रकारे त्यांच्या जीवनाला संजीवनीच मिळाली. त्याबाबत कृतज्ञता तर व्यक्त होतेच. शिवाय या कामाची व्याप्ती औरंगाबाद, पुणे येथेपर्यंत होतेय का हो, अशी विचारणाही केली जाते. त्यातून समूहाने औरंगााबाद, पुणे येथेही सेवा देता येऊ शकते का, यासाठी अवकाश शोधायला सुरुवात केली आहे.

सर्वाच्या सहकार्यातून जगन्नाथाचा रथ ओढला जातोय

सामाजिक विषयावरती चर्चा करण्यासाठी माझं लातूर हा समूह गट तयार करण्यात आला होता. कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी याला कृतीची जोड द्यावी, अशी सूचना काही जणांकडून आली. अनेकांची संमती मिळाल्याने त्याला मूर्तरूप प्राप्त झाले. तन-मन-धनाने यामध्ये अनेक जण काम करत आहेत. हा जगन्नाथाचा रथ सुरू आहे, याचा आनंद आहे.

सतीश तांदळे, माझं लातूर, समूह प्रमुख