परभणी :  हवेतून प्राणवायूची निर्मिती करणारा प्रकल्प येथे कार्यान्वित झाला असून हा प्रकल्प करोनाच्या रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. येथील जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतील कोविड रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे शुक्रवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा रुग्णालय आणि अन्न व औषधी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

परळी येथील औष्णिक विद्युत केंद्र येथून हा प्रकल्प प्राप्त झाला आहे. सध्या जि.प. च्या नवीन इमारतीत पहिल्या मजल्यावर दाखल असलेल्या ५० रुग्णांना या प्रकल्पातूनच प्राणवायू देण्यात येणार आहे. परळी येथील औष्णिक वीज प्रकल्पातून हा प्रकल्प येथे आणण्याचा निर्णय जवळपास एक महिन्यापूर्वी घेण्यात आला होता. मध्यंतरी हा प्रकल्प बराच काळ रखडला.

या प्रकल्पाचे कामही धिम्या गतीने सुरू होते. १८ एप्रिल रोजी हा प्रकल्प परभणीसाठी मंजूर झाला होता. या माध्यमातून दररोज शेकडो रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा करणे शक्य होणार आहे. या वैशिष्टय़पूर्ण प्रकल्पातून ९३ टक्के शुद्ध प्राणवायू मिळणार आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प हवेतील कार्बनडाय ऑक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साइड वेगळे करून शुद्ध ऑक्सिजन शोषून घेतो. या प्रकल्पाची उभारणी झाल्यानंतर प्रत्यक्ष प्राणवायू निर्मिती करण्यास सुरुवातही झाली होती.

मात्र अन्न व औषधी प्रशासन विभागाने तयार झालेला हा प्राणवायू रुग्णांना वापरण्यास योग्य आहे की नाही याची पनवेल येथील प्रयोगशाळेतून तपासणी करून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या प्रयोगशाळेने हे प्राणवायूचे नमुने तपासले. तपासणीअंती हा प्रकल्प आता कार्यान्वित झाला आहे.

लसीकरणापूर्वी चाचणी होणार

शहर महानगरपालिका क्षेत्रातील ९ केंद्रांवर शनिवारी वयोगट ४५ वर्षांपुढील नागरिकांना कोविशिल्ड लशीची पहिली मात्रा व दुसरी मात्रा देण्यात येणार आहे. तसेच टोकन घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी केली जाणार आहे. शहरातील इनायत नगर, साखला प्लॉट, वर्मा नगर, दर्गा रोड, कल्याण मंडपमजवळील जायकवाडी रुग्णालय, शंकर नगर, खंडोबा बाजार, खानापूर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच बाल विद्यामंदिर हायस्कूल, नानल पेठ  येथे नागरिकांना लसीकरणासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेचे कर्मचारी लसीकरण केंद्रावर सकाळी ७ ते सकाळी १० वाजेपर्यंत उपस्थित राहून टोकन वाटप करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर सकाळी ७  ते सकाळी १०  या वेळेत उपस्थित राहून टोकन प्राप्त करून घ्यावे. नागरिकांनी आरटीपीसीआर करून घ्यावी असे आवाहन आयुक्त देविदास पवार यांनी केले आहे.