कंपनीवर कारवाईची आमदार चव्हाण यांची मागणी

औरंगाबाद : पीएम-केअर निधीतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयास देण्यात आलेले २५ आणि मराठवाडय़ातील इतर जिल्ह्यत देण्यात आलेल्या  ७५ निकृष्ट  व्हेंटिलेटरमुळे रुग्णांच्या जिवाशी खेळण्याची मानसिकता दिसून येते. ज्या कंपनीला व्हेंटिलेटर बनवण्याचा अनुभव नव्हता, त्यांना हे काम देण्यात आले. परिणामी जीवरक्षक म्हणून रुग्णांच्या नातेवाइकांना वाटणारे यंत्र गेल्या महिनाभरापासून पडून आहेत. ही बाब निंदनीय असल्याचे सांगत पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान पीएम केअर मधून पुरविण्यात आलेल्या व्हेंटिलेटरपैकी दोन यंत्रांची तपासणी केल्यानंतर त्यात आणखी सामुग्री लागणार आहे,असे  कंपनीच्या अभियंत्यांनी दोन दिवसाच्या तपासणीनंतर सांगितले. गरज असताना पुरविण्यात आलेले यंत्र निकृष्ट दर्जाचे असल्याने संताप व्यक्त होत आहे.

औरंगाबाद येथे पीएम केअर निधीतून १५० व्हेंटिलेटर पुरविण्यात आले. त्यापैकी पूर्वी देण्यात आलेल्या ५० पैकी ४२ व्हेंटिलेटर सुरू असल्याचा दावा भाजपचे नेते करत आहेत. पण महिनाभरापूर्वी दिलेल्या शंभर व्हेटिंलेटरपैकी एकही यंत्र सुरू नाही. दोन व्हेंटिलेटर कसेबसे सुरू झाले आणि १५-२० मिनिटे चालून ते बंद पडले. त्यातून ऑक्सीजन पुरवठा योग्य दाबात येत नसल्याचेही तज्ज्ञ समितीने दिलेल्या पाहणीत नमूद करण्यात आले आहे. पीएम- केअर निधीतून व्हेंटिलेटर मिळाल्यानंतर त्याचे भाजप नेत्यांनी स्थानिक पातळीवर कौतुक केले. व्हेंटिलेटरसह छायाचित्रे आवर्जून काढण्यात आली. १२ एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयास २५ व्हेंटिलेटर मिळाले. ‘ ज्योती एनएनसी धामन’ या नावाच्या कंपनीकडून बनविण्यात आलेले हे यंत्र उपयोगाचे नाहीत असा अहवाल डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, डॉ. पी. एस जीरवनकर, डॉ. अनिल जोशी, डॉ. कैलाश चिंताळे, डॉ. चेतन वारे आणि बायोमेडिकल इंजिनिअर सुंदरलाल चव्हाण यांनी दिला. करोना रुग्णांना या यंत्राचा उपयोग होत नाही. प्राणवायूच्या मुख्य वाहिनीला व्हेंटिलेटर लावल्यानंतरही योग्य दाब असल्याचे दिसून येत नव्हते. त्यामुळे या यंत्राचा उपयोग नसल्याचे डॉक्टराच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. निकृष्ट दर्जाच्या व्हेंटिलेटरची खरेदी प्रक्रिया आणि तंत्रज्ञांशी चर्चा करण्यासाठी आमदार सतीश चव्हाण यांनी घाटी रुग्णालयास भेट दिली. या संपूर्ण प्रकारची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

हा तर रुग्णांच्या जिवाशी खेळ

सर्वसामांन्य माणूस हैराण आहे. एवढे दिवस प्राणवायू खाटा मिळत नव्हत्या. आता त्या उपलब्ध आहेत तर रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जीवरक्षण अशी रुग्णांच्या नातेवाइकांची मानसिकता असलेले यंत्र पुरवठय़ात घोटाळा दिसतो आहे. ज्या कंपनीचा काही एक अनुभव नव्हता त्यांना व्हेंटिलेटर बनविण्याचे काम देण्यात आले. पण निकृष्ट दर्जाच्या पुरवठय़ानंतर ते पुरविल्याचे ढोल पिटण्यात आले. हा खरे तर रुग्णांच्या जिवाशीच खेळ आहे.

आमदार सतीश चव्हाण