12 July 2020

News Flash

क्षुद्रवादाची विकासवादावर पुन्हा मात!

उद्या म्हणजे २९ नोव्हेंबरला देशाच्या राजधानीत देशभरातील लाखो शेतकरी निदर्शने करणार आहेत.

|| मिलिंद मुरुगकर

भारतीय शेतकऱ्यांचे दुर्दैव असे की, जेव्हा जेव्हा त्यांच्या आर्थिक प्रश्नांना टोक येते तेव्हा कोणता तरी भावनिक मुद्दा राजकारणात प्रभावी ठरतो आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यात हा भावनिक मुद्दा यशस्वी ठरतो.

उद्या म्हणजे २९ नोव्हेंबरला देशाच्या राजधानीत देशभरातील लाखो शेतकरी निदर्शने करणार आहेत. शेतीप्रश्नावर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी त्यांची मागणी आहे. त्या आंदोलनाची तयारी आणि शेतीप्रश्नावरील चर्चा हा खरे तर आज सर्व माध्यमांतील विषय असायला हवा; पण आता सर्व माध्यमांमध्ये चर्चा कोणती? तर राम मंदिराची. काही चित्रवाणी वाहिन्यांनी तर कहर केला आहे. या प्रश्नावर चर्चा करण्याअगोदर रामाची प्रतिमा दाखवण्यात येते आणि भक्तिसंगीताची धून वाजवण्यात येते. वातावरण भावनिक करून दर्शकांची विचारशक्ती क्षीण करण्याच्या आपल्या प्रयत्नात या वृत्तवाहिन्या कोणतीही कसर ठेवत नाहीयेत. अशा परिस्थितीत शेतकरी, बेरोजगारी वगरे प्रश्न आपल्या मनात येतील तरी कसे?

‘क्षुद्रवाद’ हा शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते शरद जोशी यांचा लाडका शब्द. धर्म, जात यांसारख्या अस्मितांना कवटाळण्याच्या प्रवृत्तीला शरद जोशी क्षुद्रवाद म्हणत असत. अशा क्षुद्रवादी राजकारणाचा शेतकरी आंदोलनाला सर्वात मोठा धोका आहे, असे त्यांचे मत होते. त्याबद्दलची त्यांची टीका अगदी प्रखर होती. आज अनेकांना हे खरे वाटणार नाही; पण जेव्हा १९९० मध्ये राम मंदिराच्या प्रश्नावर वातावरण तापायला सुरुवात झाली होती तेव्हा शरद जोशी कमालीचे उद्विग्न झाले होते. त्यांनी आपल्या लेखातून या ‘क्षुद्रवादी’ राजकारणावर सडेतोड टीका केली. इतकेच नव्हे तर ग्रामीण भागात ठिकठिकाणी सभा घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या मुख्य आर्थिक प्रश्नापासून ढळू नये आणि भावनिक राजकारणाला बळी पडू नये, असे त्यांना कळकळीचे आवाहन केले होते. त्या काळात शेतकरी संघटनेची ताकद लक्षणीय होती. तोवर संघटनेचे विभाजन झालेले नव्हते. शरद जोशींनी त्या काळात या संकुचित धर्मवादी म्हणजे ‘क्षुद्रवादी’ राजकारणावर जे कोरडे ओढलेले आहेत ते वाचले तर आजही अंगावर रोमांच उभे राहतील. जेव्हा सबंध देश राम मंदिराच्या प्रश्नावर उन्मादित अवस्थेत होता तेव्हा शेतकऱ्यांनी ‘या जातीयवादी गिधाडांपासून सावध राहावे’ असे आवाहन आपल्या भाषणांतून, लिखाणांतून शरद जोशी सातत्याने करीत होते. लालकृष्ण आडवाणींचा रथ देशभर फिरत होता. जनता भावनिक आणि उन्मादित अवस्थेत असताना हिंदुत्ववादी पक्षांची ‘जातीयवादी गिधाडे’ म्हणून संभावना करणे याला मोठी हिंमत लागते, धर्य लागते. प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची ती हिंमत शरद जोशींमध्ये होती. त्यांच्या वक्तव्याला मोठे नतिक वजन होते. शेतकऱ्यांची ताकद त्यांच्यामागे होती. दुर्दैवाने आज शेतकऱ्यांना हा इशारा देणारा कोणीही नेता आपल्यात नाही.

खरे तर आज भारतात जे घडते आहे, घडवले जात आहे ते जगभरच्या अनेक लोकशाही देशांत घडत आहे. समाजातील मूठभर लोकांकडे अमाप संपत्ती आणि उर्वरित जनता त्या संपत्तीपासून कैक मल दूर अशी कमालीची विषमता जगात वाढत आहे आणि अशा परिस्थितीत चिडलेल्या आणि निराश झालेल्या जनतेला भावनिक राजकारणाच्या हिंदोळ्यावर झुलवत ठेवण्याचे तंत्र या देशातील नेते यशस्वीपणे वापरत आहेत. सर्वसमावेशक विकास साधण्याच्या कामी येत असलेल्या अपयशाचे खापर आपल्याच समाजातील अन्य घटकांवर, दुसऱ्या देशांवर, दुसऱ्या देशातून आलेल्या निर्वासितांवर फोडण्यात हे नेते कमालीचे यशस्वी होत आहेत. अमेरिका, ब्राझील, इंग्लंड, रशिया, तुर्कस्तान अशा अनेक देशांत ही प्रक्रिया वेगवान आहे. आपल्या आर्थिक अपयशाचे खापर दुसऱ्या कोणावर तरी फोडणारा आक्रमक, शत्रुकेंद्री राष्ट्रवाद हा सगळीकडेच आपले प्राबल्य गाजवतो आहे आणि वाढती विषमता, बेरोजगारी यांकडील लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यात तेथील राष्ट्रप्रमुख यशस्वी ठरताहेत. डोनाल्ड ट्रम्प यांची ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ ही घोषणा आपल्याकडील सांस्कृतिक राष्ट्रवादासारखीच आहे. आपल्याला सांगण्यात येते की, आपल्याकडे पूर्वी खूप समृद्धी होती, प्रगत तंत्रज्ञान होते आणि सगळा जो ऱ्हास झाला तो ब्रिटिश किंवा मुघलांच्या आगमनामुळे झाला. हा आपल्याकडील सांस्कृतिक राष्ट्रवाद्यांचा खास सिद्धान्त. या सिद्धान्तामुळे आपण सुखावतो. वृथा अभिमान बाळगायला लागतो. सारासारविचार करण्याची क्षमता गमावतो. आपल्या इतिहासाबद्दलच्या अत्यंत हास्यास्पद दाव्यांवरही विश्वास ठेवायला लागतो. आपल्यापुढील आजच्या आर्थिक आव्हानांचा तर्कशुद्ध विचार करण्याऐवजी भूतकाळात रममाण होतो. डोनाल्ड ट्रम्प नेमके हेच करीत आहेत. पूर्वी अमेरिका ‘ग्रेट’ होती; पण आता मात्र मेक्सिकोमधून येणाऱ्या, आशिया खंडातून येणाऱ्या लोकांमुळे आपण मागे जात आहोत, हा डोनाल्ड ट्रम्प यांचा लाडका सिद्धान्त. खरे तर अमेरिका आर्थिक विकासाच्या बाबतीत ‘ग्रेट’ झाली ती तिच्या खुलेपणामुळे. सर्व जगातून येणाऱ्या नागरिकांना आपल्यात सामावून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे; पण आज त्याच खुलेपणावर घाला घालण्यात येत आहे.

असमान विकासामुळे, आर्थिक विषमतेचा परिणाम म्हणून ही जी संकुचित विचारसरणी सबंध जगाला विळखा घालत आहे त्यातून खरे तर २०१४ साली भारत बचावला. कारण लोकांमध्ये विषम विकासाबद्दल राग होता; पण अजून ते निराश नव्हते झाले. सलग एक दशक चढय़ा आर्थिक वृद्धिदरामुळे निर्माण झालेल्या समृद्धीची फळे आपल्यालाही मिळावी, ही आकांक्षा त्यांच्यात होती.. आणि याला नरेंद्र मोदींनी मोठमोठी आश्वासने देऊन प्रतिसाद दिला. ही आश्वासने टोलेजंग होती, पण ती केवळ आर्थिक विकासाबाबतच होती. ‘मी राम मंदिर बांधेन म्हणून मला मते द्या’ असे नव्हते त्यांनी म्हटले. त्यांचे आश्वासन दरवर्षी दोन कोटी रोजगारनिर्मितीचे होते, शेतकऱ्यांना ५० टक्के नफा देणारे हमी भाव देऊ असे होते; पण दुर्दैवाने आज मोदी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात राम मंदिराचा प्रश्न उपस्थित करून विरोधकांवर टीका करीत आहेत. २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा विषय विधानसभेच्या निवडणुकीत उकरून काढत आहेत. खरे तर त्यांनी उद्धव ठाकरेंना ठणकावून सांगायला हवे होते की, मी विकासाच्या मुद्दय़ांवर, ‘अच्छे दिन’च्या आश्वासनावर निवडणूक जिंकलो आहे. लोकांनी त्यासाठी माझ्यावर विश्वास टाकला आहे. त्यामुळे मी फक्त विकासावरच बोलेन. माझी साडेचार वर्षांतील कामगिरी लोकांपुढे नेईन आणि त्याच जोरावर निवडणूक लढवेन; पण मोदी असे म्हणाले नाहीत. त्यांनी शिवसेनेची त्यांच्यावर होणारी टीका विरोधकांकडे वळवण्याचा प्रयत्न केला आणि राम  मंदिर हा निवडणुकीच्या आखाडय़ातील मुख्य मुद्दा बनवला. आता राजकीय मदान भगवे कपडे घालणाऱ्या तथाकथित संतांना(?) मोकळे झाले आहे. हे संत आता २०१९ पर्यंत आपले ‘प्रबोधन’ करणार आहेत. त्यांच्या वक्तव्यांवर आता हिंदू समाजाचे वैचारिक पोषण होणार आहे. कोणी तरी साक्षी महाराज जामा मशिदीच्या खाली मूर्ती आहेत, असे आपल्याला सांगणार आहे, तर कोणी आणखी काही सांगणार आहे. वातावरण भावनिक उन्मादक करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जाणार आहे.

‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या आश्वासनाचे काय झाले?’ असे आपण विचारले की राम मंदिराचा मुद्दा आपल्यासमोर टाकण्यात येणार आहे. दर वर्षी दोन कोटी रोजगाराच्या आश्वासनाचे, ‘स्किल इंडिया’चे काय झाले, असे विचारल्यावर शरयू नदीच्या किनाऱ्यावर उभ्या राहणाऱ्या प्रचंड अशा रामाच्या पुतळ्याकडे बोट दाखवले जाणार आहे.

शरद जोशींच्या शब्दांत बोलायचे झाले तर क्षुद्रवाद पुन्हा एकदा विकासवादावर मात करणार आहे. २०१९ च्या निवडणुका जवळ येत चालल्या आहेत. क्षुद्रवादी विचाराच्या गिधाडांनी आपले पंख पसरायला सुरुवात केली आहे. त्याच्या अशुभ सावलीचे सावट विकासविषयक चच्रेवर पडू लागले आहे.

ईमेल :  milind.murugkar@gmail.com

लेखक आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवर लेखन करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2018 1:37 am

Web Title: farmers are in a very bad condition in india 2
Next Stories
1 माती, माणसं आणि माया.. : विकासाचा वेग, स्वायत्ततेला लगाम?
2 खरंच, ‘दाग अच्छे होते है’?
3 ‘चिडलेली’ नाचणी डोलू लागावी..
Just Now!
X